हॉर्टिकल्चर ट्रेन - हवी देशभर कमॉडेटी ट्रेन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जगामध्ये भारत हा फळांच्या उत्पादनामध्ये जवळजवळ एक नंबरच्या जवळ आला आहे. भाजीपाला व तत्सम उत्पादने देशातील नागरिकांना मुलतत्वे आणि जीवनसत्वे पुरवितात. मात्र ती सर्वांना पुरू शकत नाहीत त्यामुळे लोक आजारी पडतात. कुपोषण होते. मुलतत्त्वे आणि जीवनसत्त्वे न मिळण्याचे कारण म्हणजे भाजीपाला व तत्सम शेती उत्पादनाचे काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा अभाव, मुल्यवर्धनाचा अभाव असल्यामुळे देशाचा दरवर्षी ७० ते ७२ हजार कोटी रुपयांचा शेतीमाल वाया जातो. तेव्हा हा भाजीपाला ज्या पॉकेटमध्ये होतो तेथे अशा हॉर्टिकल्चर ट्रेन किंवा Spices and Condiments अशा ट्रेन्स ज्या भागामध्ये याची उत्पादनक्षमता अगोदरच आहे तेथेच काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा वापर करून आणि मुल्यवर्धन त्या - त्या ठिकाणी जर करून नंतर त्याची विक्री केली तर या ट्रेनचा वापर हा देशाच्या कृषी विकासामध्ये फार मोठा टप्पा (Mile Stone) ठरणार आहे. आरोग्य संवर्धनाचा दर्जा सुधारण्यामध्ये लॉजिस्टिक हा फार महत्त्वाचा टप्पा आहे. ज्याच्या अभावामुळे देशातील अर्धी जनात कुपोषीत, अर्धपोटी, बुद्धीची प्रगल्भता मुळात असतानाही ती कुपोषणामुळे दबल्यामुळे बुद्धीमत्तेच्या विकासात खंगलेली म्हणून अनेक आजारांना कवटाळलेली आणि कुत्रिम औषध कंपन्यांच्या अगणित रासायनिक औषधांच्या उपचाराच्या आहारी जाऊन देशाचे अब्जावधी रुपये त्यामुळे पाण्यात जातात. यामध्ये जनतेचे शारीरिक, मानसिक असंतुलन झाल्यामुळे देशाचे आर्थिक आरोग्य बिघडेल आहे. तर या Commodities ट्रेनमुळे देशाच्या आर्थिक आरोग्याचे इंजीन हे नुसतेच जनतेचा गरीबरथ न राहता नेताजी सुभाषचंद्रांचा शताब्धी एक्सप्रेस ठरेल. हे संपादकीय ज्या दिवशी लिहिले जात आहे त्यादिवशी (२३ जानेवारी २०१२) म्हणजे आपले सारे जीवन देशासाठी समर्पित करणाऱ्या महान नेते नेताजी सुभाष चंद्रबोस यांची जयंती दिवस आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ आणि रेल्वेमंत्रालयातर्के सुरू होणाऱ्या या हॉर्टिकल्चर रेल्वेची चाचणी झाली असून, महाराष्ट्रात पहिली रेल्वे भुसावळपासून चालू झाली (२४/०१/२०१२) आहे. देशातील केळीचे आगर मानले जाणाऱ्या जळगाव जिल्हातून केळी उत्तर हिंदुस्थानात पाठविली जाते, मात्र रेल्वेच्या विद्यमान व्यवस्थेत केळीची वाहतूक करताना १८ ते २० टक्क्यापर्यंत नुकसान होते. केळी सुस्थितीत राहण्यासाठी सर्वसाधारणपणे १८ ते २० डी. से. तापमान हवे असते, मात्र सध्याच्या कंटेनरमध्ये खेळती हवा नसते. शिवाय, भुसावळहून केळी निघाल्यानंतर दिल्लीसारख्या ठिकाणी ती ३६ तासांत पोचणे अपेक्षित असले तरी वेगवेगळ्या कारणांमुळे विलंब होतो. बऱ्याचदा केळी बाजारात पोचेपर्यंत होणारा विलंब तब्बल ५० तासांचा असतो, त्यामुळे खरगपूर येथे बनविण्यात आलेल्या विशेष कंटेनरमध्ये रेल्वेच्या गतीचा वापर करून हवा खेळती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या 'एअर सर्क्युलेटेड' कंटेनर मुळे केळीचे नुकसान तब्बल १५ टक्क्यांनी कमी होणारा आहे.

अशा प्रकारचे 'एअर सर्क्युलेटेड कंटेनर' खासगी कंपनीतर्फे उपलब्ध करोन दिले जात असून, पंजाबमध्ये मांस वाहतूकीसाठी त्याचा उपयोग होतो, मात्र फलोत्पादन महामंडळासारख्या सरकारी संस्थातर्फे प्रथमच ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मालगाडीला ९८ कंटेनर असतील. हे सर्व कंटेनर भुसावळ येथे पोचणार आहेत. सध्याच्या कंटेनरच्या तुलनेत या कंटेनरचा आकार कमी असून, प्रत्येक कंटेनरची क्षमता १२ टनांची असेल, विशेष म्हणजे काही कंटेनर वातानुकूलित आहेत. लहान आकाराचे कंटेनर हे थेट शेतातही नेता येऊ शकतात, त्यामुळे शेतातून रेल्वेच्या धक्क्यापर्यंत माल आणताना शेतकऱ्यांची होणारी धावपळ टळणार आहे. हे कंटेनर ठेवण्यासाठीचे विशेष क्रेन भुसावळ येथे लावण्यात येणार आहे.

ही हॉर्टिकल्चर रेल्वे लांबचा पल्ला गाठेल. आग्र्याहून बटाटे, दिल्लीहून सफरचंद नवी मुंबईच्या वाशी बाजारपेठेत पोचविणे, तेथून नाशिकमार्गे द्राक्ष घेऊन जळगावला पोचणे आणि तेथून केळी घेऊन दिल्लीला परतणे असा मार्ग ठरविण्यात आल आहे.

आम्ही परवाच बेलूर मठामध्ये कोलकत्त्यामध्ये जो फुलांचा दर्जा, उत्पादन, रंगसंगती पाहिली ती जगातील फुठल्याही राष्ट्रांपेक्षा श्रेष्ठ पाहिली. बंगाल हा नुसताच राष्ट्रप्रेमी नाहीतर कृषीप्रेमी, फुल - Flower प्रेमी आहे.

यावेळी कलकत्ता बंगाल, झारखंड, बिहार राज्यांचा दौर केला तेव्हा तेथे हजारो एकरवर दोन मोसमामध्ये येणारे भाताचे पीक आणि शेकडी एकर बटाट्याखाली असणारे क्षेत्र काय दर्शवितो ? तर ही वाहतूक व्यवस्था देशाच्या जनतेमध्ये अव्यवस्थित वितरण व चुकीचे नियोजनाच दर्शवितो. आज कलकत्ता, बंगाल, बिहार येथील वर्तमान पेपरमध्ये बातमी होती की, बटाट्याचे भाव कोसळले आहेत. काही ठिकाणी १ ते १॥ रू. किलोही शेतकऱ्याला दर मिळत नाही. तर प्रत्यक्ष ग्राहकाला तोच बटाटा १० ते १२ रू. किलो एवढ्या उच्च दराने खरेदी करावा लागत आहे. त्यासाठी ज्या भागात जो माल पिकतो तो त्या ठिकाणाची गरज भागवून म्हणजे बिहारचा तांदूळ बिहारमधील गरज भागवून, उत्तर प्रदेशमधील साखर तेथील गरज भागवून ज्याठिकाणी भाव मिळेल तेथे या हॉर्टिकल्चर ट्रेनच्या माध्यमातून पोहचवून तेथे विकणे शक्य होईल. यामध्ये वाहतूक खर्च कमी येईल आणि प्रत्यक्ष ग्राहकालाही खरेदीचा भाव परवडेल.

वाहतूकीमध्ये होणाऱ्या खर्चाला व मालाच्या नासाडीला पर्याय म्हणून खास टोमॅटो ट्रेन, कांदा ट्रेन, बटाटा ट्रेन, भाजीपाला ट्रेन, 'फुल राणी' (Flower) ट्रेन अशा वेगवेगळ्या ट्रेनची सोय होणे गरजेचे आहे. अशा मुल्यवर्धनासाठी, प्रक्रिया उद्योगासाठी चालना दिल्यास निश्चित कुपोषण थांबवून देशाचे आरोग्य बलवान ठरणारे हॉर्टिकल्चर ट्रेन हा केंद्रीय कृषीमंत्र्यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा निर्णय आहे. हे जर केले तर यातून देशाचे सुधारलेले आरोग्य पाहून नेताजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोखले, लालबालपाल, नेहरू, महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांच्या आत्म्यास शांती मिळेल. हे कार्य शास्त्रज्ञ व निर्णयकर्ते यांनी जर घेतले तर हुतात्म्यांचा आत्मा फुले न वाहताही या सत्कृतीमुळे दुवा देईल.