गारपीट, अवकाळी पाऊस व शेतकरी !

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


बदलत्या हवामानाचा आणि जागतिक तापमानात झालेली वाढ (ग्लोबल वार्मिंग) याची चाहूल महाराष्ट्राला १९७२ च्या दुष्काळापासून लागली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. १९७२ पुर्वी दुष्काळ १० वर्षातून एकदा येत असे आणि स्वातंत्र्यापुर्वी २० व्या शतकाच्या सुरुवातीला १९०५ साली जेव्हा त्यावेळी भूगोल, इतिहास समजू लागला तेव्हा पश्चिम बंगालच्या दुष्काळाचा भारत वर्षाला धक्का बसला. तेव्हा लॉर्ड कर्जनने त्यावेळी पुर्व बंगाल व पश्चिम बंगाल अशी बंगालची फाळणी केली. १९५० नंतर १० वर्षातून एकदा दुष्काळ. यामध्ये ३ वर्ष अतिवृष्टी, ३ वर्ष चांगले हवामान, चांगला पाऊस, चांगली पिके, ३ वर्ष पाऊस चांगला पण मध्यम पिके आणि १ वर्ष दुष्काळ अशी साधारण परिस्थिती असे. १९७२ च्या दुष्काळानंतर मात्र पावसाने मृगाच्या ७ जूनला होणारा शिडकाव व पेरणीची न चुकणारी तारीख या ठरलेल्या शेतकऱ्यांच्या आनंदाच्या क्षणाला तडा जावू लागला. मृगाची ७ जूनला सुरुवात म्हणजे शेतकऱ्यांतील चैतन्य, कृषी क्षेत्रातील व्यापारउदीमतेतील उत्साह, ग्रामीण स्त्रियांची बी भरण्याची लगबग व साफसफाई करण्याची मुहूर्तमेढ ठरत असे. जस - जसे कोरडवाहू क्षेत्रातील मान्सून पावसावरील अवलंबन कमी होऊ लागले याचे कारण तिसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून ते नवव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत लघू पाटबंधारे, मध्यम व मोठी धरणे, केनॉल यामधून सिंचन क्षेत्रात भरीव वाढ होऊन अन्नधान्य, कडधान्य, गळीत धान्याच्या उत्पादनात वाढ होऊ लागली. १९७८ च्या वर्षापासून सरकारने कोरडवाहू फळबाग व बारमाही डाळींब, द्राक्ष पिकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे फळबाग ही योजना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व त्यावर मिळणाऱ्या अनुदानामुळे कृषी क्षेत्राला नवीन संजीवनी मिळाली व कृषी क्रांती झाली.

साधारण १९८५ ते १९९५ च्या दशकात द्राक्ष फळबागांनी व २००० पासून डाळींबाला भाव बऱ्यापैकी मिळू लागल्याचे जसे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या लक्षात येवू लागले तसे डाळींब फळबाग लागवडीमध्ये वाढ झाली. भावाच्या बाबतीत ७० ते १२० रू. किलो शेतकऱ्यांना भाव मिळू लागले, तसे शेतकऱ्यांच्या जीवनात चहल - पहल निर्माण झाली. सुरूवातीच्या काळात गणेश वाण हा चालत असे. याला भाव १५ रू. ते ४५ रू. निर्यातीचा भाव मिळत असे. परंतु म्हातोबाची (चोराची) आळंदी येथे १९७२ ते १९७५ च्या काळात आकाराने छोटा, दाणा मोठा, लालभडक व गोडीला बऱ्यापैकी अशा स्थानिक डाळींबाचा वाण बराच काळ विकला जात असे. तेव्हा स्वस्ताईत त्याला ५ ते १० रू. किलो भाव मिळत असे. परंतु भगवा हा वाण नंतर विकसित झाल्यावर झपाट्याने वाढला आणि या वाणास युरोपात व आखाती राष्ट्रांत मागणी वाढल्याने नाशिक - सटाण्यापासून संगमनेर, पुणे, सोलापूर मराठवाडा अशा अनेक भागांमध्ये झंजावातासारखा प्रसार वाढला आणि आता तर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग व भारताच्या विविध भागात डाळींबाचा प्रसार वाढू लागला आहे. दुसऱ्या बाजूला खानदेशची बसराई व नांदेडची अर्धापुरी केळीला ७० च्या दशकात २ ते ५ रू. किलो असा स्थानिक भाव मिळत असे. परंतु जेव्हा केळी या सर्वसाधारण फळाचे महत्त्व 'गरिबांचे फळ' म्हणून रुजले आणि नंतरच्या काळात उत्तर हिंदुस्थानात व रशियात याला मागणी वाढली आणि खानदेशच्या रावेर, फैजपूर, सावदा, चिनावल, चोपडा या भागात लागवडी वाढल्या. तेथे तापी काठी उत्तम दर्जेदार केळी उत्पादन होऊन निर्यात होत असे. त्यावेळी शेतकऱ्यांची श्रीमंती ही केळीच्या बागांमध्ये असणाऱ्या खोडांच्या संख्येवर ठरत असे. ही सांगण्याचे कारण असे अधिक उष्ण हवामानात बारमाही केळीचे उत्पादन जमिनीत घेतले गेले व आता १० ते १४ रू./किलोचा भाव शेतकऱ्यांना मिळू लागला. त्यावेळेस जोपर्यंत ग्लोबल वार्मिंगचा शिरकाव झाला नव्हता तोपर्यंत केळीला अवकाळी पाऊस, वादळाचा फटका बसत नसे. परंतु पृथ्वीवरील गेल्या ३० वर्षामध्ये अर्धा ते १ सेल्सिअस तापमान वाढल्याने बागांना पाणी दिल्यावर पाण्याचे बाष्प होते. हे बाष्प वातावरणात एकरूप होते आणि जेव्हा या तापमानाला रात्रीच्या हवामानातील तफावतीमुळे विदर्भातील संत्री, खानदेशातील केळी, सोलापूरचे डाळींब व विविध भागातील हंगामी फळ - भाजीपाला पिके, उसासारखी अति खादाड व पाण्याची गरज जास्त असणाऱ्या पिकाला धरणातील पाणी दिल्याने त्याचे बाष्पीभवन आणि मग अवकाळी पाऊस गारपीटचा जन्म व धोका पुढे पाचविला पुजला गेला. वातावरणातील कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन आंध्र, ओरिसाच्या पट्ट्यात सप्टेंबरपासून वादळीवारे व अवकाळी पाऊस होऊ लागले. तसेच उत्तर भारतातील उत्तरांचल, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, बंगाल या भागातील तापमान जसे वाढे तसे गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांना उन्हाळ्यात बर्फ वितळल्याने पूर परिस्थिती येवून प्रचंड नुकसान होऊ लागले.

थोडक्यात पर्यावरण व वातावरणातील बदलाने व एकंदरीत बागायती क्षेत्रात झालेल्या वाढीमुळे सप्टेंबर ते मार्च - एप्रिल मे या काळात वरील कारणांनी देशातील विविध भागात वादळ, गारपीट, अवकाळी पाऊस, सुनामी आली तसेच अमेरिका, युरोप, इंडोचायना, फिलीपाईन्स, चीन व जपान, काही प्रमाणात श्रीलंका, मालदीव या ठिकाणी विविध प्रकारची वादळी, भूकंप आणि सुनामी आकस्मित संकटमय (Disaster) परिस्थिती उद्भवू लागली. त्यामुळे मनुष्य, पशु - पक्षी, घरे- दारे, गाड्या हे उद्भवस्त होऊन निसर्ग मानवाच्या काबू बाहेर गेला. कारण निसर्गावर माणसाने अत्याचार केला. या सर्व गोष्टींचा केंद्राबिंदू 'ग्लोबल वार्मिंग' हा आहे. गेल्या ३ वर्षामध्ये सतत सलग देशपातळीवर व राज्य पातळीवर तापमानातील वाढ, थंडी कमी होणे, मोसमी पावसाची सुरुवात २ महिने उशीरा होवून त्याची भरपाई निसर्ग जमेल तेव्हा करून नेहमीचे निसर्गचक्र बदलून मान्सूनची परिस्थिती ही कालबाह्य व समयशीर न राहता उनाडक्या करणाऱ्या बेछूट लहान मुलासारखी बेदरकार झाली आणि त्यामुळे विविध प्रकारच्या धान्य, गळीत पिके, भाजीपाला, फळपिके, फळबागा, - द्राक्ष डाळींब, केळी अशा साऱ्या शेतीमालाच्या पिकांवर परिणाम होवून अब्जावधी रुपयांचे नुकसान देशभर झाले. म्हणजे कोणत्याही हंगामात शेतीमालाची नासाडी झाली नाही असे झाले नाही. याकरिता हे आव्हान राज्य सरकार, केंद्र सरकार, हवामान तज्ज्ञांना, शेतकऱ्यांना असून अकल्पित होणाऱ्या घटनांची चाहूल जशी मुंग्या, गाय, घोडा, पक्षी यांना प्रथम लागते, यातून सुनामी, वादळ २ तासात पडणारा वादळी पाऊस याची चाहूल मेंढ्यांना लवकर लागते. नुकतेच वाचनात आले की, ९०० किलोमिटरवरील वादळाची चाहूल ही पक्ष्यांना प्रथम लागते. मेंढ्यांची गोष्ट जर म्हटली तर या संदर्भात एक मजेशीर सत्यकथा सांगता येईल ती अशी की, ब्रिटीश राजवटीत देशाची राष्ट्रीय हवामान संस्था ही महाबळेश्वरला उभारावी अशी कल्पना एका शास्त्रज्ञ डायरेक्टरने सुचविल्यानंतर तेथील परिस्थितीची पाहणी व तपासणी करण्यासाठी दिल्लीहून मुख्य शास्त्रज्ञ महाबळेश्वरला आले. त्यावेळी त्यांनी तेथील शास्त्रज्ञ प्रोजेक्ट डायरेक्टरला आजच्या दिवसाच्या हवामान परिस्थती बद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले आज हवामान स्वच्छ आहे. पाऊस येणार नाही. तेव्हा ते मुख्य शास्त्रज्ञ जेव्हा महाबळेश्वरच्या जंगलात संस्था उभारणीच्या जागेची पाहणी करत असताना तेथे त्यांना वाटेत एक मेंढपाळ दिसला. तो नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ वाजता मेंढ्या घरी न नेता ४ वाजताच मेंढ्या घरी नेवू लागला होता. तेव्हा त्या मुख्य शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटले व त्यांनी विचारले तू लवकर घरी का निघालास ? तेव्हा त्याने त्यांना सांगितले आज संध्याकाळी तुफान पाऊस येणार आहे. यावर त्या मुख्य शास्त्रज्ञांनी त्याला विचारले, हे तुला कसे समजले ? तेव्हा त्याने सांगितले, जेव्हा मेंढ्या चरतात तेव्हा त्या मातीचा वास घेवून त्यांना पाऊस जोराचा येणार आहे, याची चाहूल लागते व त्या चरायच्या थांबून घराची वाट धरतात यावरून समजते आणि काही क्षणातच मुसळधार पाऊस सुरू झाला. मग त्यांनी नेमलेल्या प्रोजेक्ट डायरेक्टरने केलेल्या विसंगतीबद्दल धक्का बसला. कारण एका अडाणी मेंढपाळाने वर्तविलेला अंदाज इतका अचूक ठरला. त्यावरून त्यांनी हवामानाची मुख्य संस्था महाबळेश्वरला न उभारता ती पुण्यातील प्रसिद्ध सिमला ऑफिस येथे १९३० साली उभारली.

म्हणजे थोडक्यात १९३० - ५० पर्यंत हवामानातील अचूकतेबद्दलचा अंदाज हा शास्त्रीयदृष्ट्या अंधारात चाचपडण्याजोगाच होता. शास्त्रज्ञ, ज्योतिषी, विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ यांना हवामान बदलाचे अचूक भाकीत करता आले नाही. करता येत नाही तथापि धार्मिक, सामाजिक, पारंपारिक शेतीचा अभ्यास काही कल्पकतेपलिकडच्या ठोकताळ्यावर गेल्या ३०० ते ४०० वर्षापासून विदर्भ, बुलढाणा, सोलापूर अंदाज हे शेतीचे, पिकाचे, पावसाचे, थंडी व उष्णतेचे, राजकीय आखाडे, येणारी अकल्पित संकटे, युद्ध या अनेक विषयांवर हे महापुरुष अचूक भाकीत करीत असत व ते तंतोतंत खरे ठरत असे. त्यासाठी समाज ६ - ६ महिने ते ऐकण्याची वाट पाहत असे.

आता जग २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असताना जपान, चायना, रशिया, अमेरिका हे २ ते ३ दिवस अगोदर सुनामी, प्रचंड वादळ, येणारे पूर, हवामानातील तापमान, ढगाळ हवा, प्रचंड पाऊस, भूकंप, तापमानातील बदल व ओझोनचे अवरण (Ozone Layer) आणि अशा प्रकारच्या अकल्पित संकटांची चाहूल वक्तशीरपणे कल्पना देवू लागले आहेत. परंतु ही बातमी दिली तरीही जादा होणारी जिवीत हानी तसेच पशुधन हानी, जंगम मालमत्ता व पिकांची हानी ही पाहिजे त्याप्रमाणात टाळू शकले नाहीत. गारपिटीवर अजूनपर्यंत संरक्षणात्मक इलाज सापडला नाही. परंतु काही शास्त्रज्ञांनी फळबागांवर शेडनेट अथवा टणक प्लॅस्टिकचा कागद आंथरुण काही प्रमाणात नुकसान टाळता येत असल्याचे सांगितले आहे. परंतु काही वेळेस अकस्मित परिस्थितीचा शेतकऱ्यांना समान करावा लागतो. त्यामुळे हवामान शास्त्रज्ञ, मृद शास्त्रज्ञ, पीक शास्त्रज्ञ, वातावरण शास्त्रज्ञ यांनी एकत्र येवून याच्यावर उत्तम तोडगा काढणे गरजेचे आहे. जेणेकरून होणारे नुकसान टळेल आणि शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी घालेला घास वाचून ते दु:खाच्या गर्तेत कोसळले जाणार नाहीत. या संदर्भात डॉ. जाधव या शास्त्रज्ञाचा अभ्यास दांडगा आहे. त्यांचा अनुभव आम्ही तरूण वर्गाला व शेतकऱ्यांना मार्गदर्शन ठरेल म्हणून एक लेख इंग्रजीत प्रकाशित (कृषी विज्ञान, जानेवारी २०१५) केला आहे.