शेतीमालाचे बाजारभाव कशावरून ठरतात? (फुलपिके)

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


अनादीकालापासून फुले म्हणजे आपले आराध्य दैवत, कुलदैवत, कुलस्वामिनी, विघ्नहर्ता, दुर्गामाता, अल्ला, इसाई अथवा वाढदिवस, व्हॅलेंटाईन डे थोडक्यात बारश्यापासून ते बाराव्या पर्यंत येणाऱ्या सर्व धार्मिक, सार्वजनिक, सामाजिक, ऐहिक सुख - दु:खाचे क्षणामध्ये दु:खात सांत्वन करणारे आणि सुखाचा आनंद पुलकित करणारे विविध रंगांनी, आकारांनी निसर्गाचे लेणं ल्यालेले वृक्षवल्लीचे अंग म्हणजे 'फूल'

वेलीवर २ x २ सेंटीमीटरपासून ३ x ३ इंचाची जागा व्यापणारे सदैव आपली मान उंच करून नभाकडे पाहणारे जणू संकटात माणसाला साथ देवून यशाच्या वाटचालीकडे मानवाला प्रेरीत करणारे मखमली, नाजूक स्पर्शाचे, सुगंध दरवळवणारे 'फूल'.

हजारो वर्षापासून ग्रामदैवत असो, अंबामाता, दुर्गामाता, भवानीमाता, नवरात्रीतील असो याला प्रिय असणारे फूल म्हणजे झेंडूचे फूल. श्रावणमासात महादेवाला प्रिय असणारा बेल आणि चतुर्थीला विघ्नहर्त्याला शांत करणारी आणि मानवांचे दु:ख हलके करणारी दुर्वांची जुडी. अशा अनेक रूपांतून सजीव वनस्पतीचे विविध भाग परमेश्वराच्या चरणी अर्पण करून परमेश्वरानी आपल्या दु:खाचे हुंदके हलके करणारे एकमेव फुल. समारंभामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या अतुलनीय यशामध्ये त्याला अधिक उत्साह देणारा फुलांचा गुच्छ.

विविध फुलांचे त्या - त्या हंगामातील महत्त्व आणि त्या काळामधील फुलांचा उपयोग आणि पारंपारिकतेपासून ते आधुनिकतेपर्यंत फुलशेती विकसित झाल्याचा इतिहास याचा आपण थोडक्यात आढावा घेवू.

सध्या नवरात्रीचे दिवस आहेत. यामध्ये झेंडू हा ५० ते ८० वर्षापुर्वी म्हणजे आपोआप उगवून आलेले 'परसातील फूल' माणसाला एवढेच ज्ञात होते. पिवळे फुल हे देवीला प्रिय असते. शारदा (विद्येचे आराध्य दैवत), तुळजाभवानी, एकवीरा, चतुश्रृंगी, सप्तश्रृंगी, यलम्मा या देवींना पिवळे किंवा केशरी रंगाचे फुल फार प्रिय समजले जाते. मग देवीची दुसरी माळ, सातवी माळ आणि आठवी माळ ही महत्त्वाची असल्याने आणि याच्या व्यतिरिक्त मंगळवार व शुक्रवार ह्या देवीच्या वारादिवशी या फुलांना मागणी असते.

तसेच दसऱ्याला (खंडेनवमीला) शस्त्रू पूजन व कारखान्यातील यंत्र पूजन यात फुलांना मागणी असते. या काळात फुलांचे दर हे ४० रू. पासून १०० रू. पर्यंत वाढतात आणि या काळात एकरी ८० हजार रू. ते १.५० लाख रू. मिळतात. याच काळात झेंडूबरोबर शेवंती हे पीक अहमदनगर, पारनेरच्या दुष्काळी भागात व मध्यप्रदेशमध्ये येणारे शेवंती हे फूल कलकत्यातील दुर्गामातेस अतिशय लोकप्रिय आहे.

बिजलीच्या सिंगल पाकळीला सर्वसाधारण ८ रू. किलो आणि हाच भाव नवरात्रात १० ते १२ रू. पासून ३० ते ३४ रू. पर्यंत होतो. डबल पाकळीचा भाव ३० रू. पासून ८० ते १४० रू. नवरात्र व दसऱ्यात होतो. या पिवळ्या फुलांची मागणी गणेश उत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा व अक्षय्य तृतीया या काळामध्ये मोठ्या प्रमाणात असते. तेव्हा शेतकरी बांधवांनी आणि तरूण प्रगतीशिल शेतकऱ्यांनी या विविध फुलांचा अभ्यास करून उन्नत लागवड (Intensive Cultivation) करून दर्जेदार उत्पादन घेतले म्हणजे ३ ते ४ महिन्यामध्ये एकरी लाखभर रुपये सहज मिळवू शकतात.

पिवळा चाफा हा गणपतीला फार प्रिय असतो. हिरव्या व पिवळ्या चाक्याचे झाड हे बहुवर्षीय आहे. हे जर २० -२० फुटावर लावले तर ४ थ्या वर्षापासून फुले देते. ४ वर्षापासून ४० ते ५० वर्षापर्यंत १००० पासून १० हजार फुले वर्षाला १ झाड देते. म्हणजे एका झाडापासून १ हजार ते १० हजार रुपयाचे उत्पन्न मिळते. कमी पाऊस व रान हलके असलेली जमीन या पिकास निवडून उत्पादन चालू होईपर्यंत यामध्ये आंतरपीक महणून 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड करावी. म्हणजे फुले चालू होईपर्यंत शेवगा वर्षाला लाखभर रू. देईल व त्यातील आंतरआंतर पीक ५० ते ६० हजार रू. देईल, असे नियोजन करावे.

गुलाब हा मुळचा इराणहून नूरजहाने मोघल जेव्हा भारतात आले तेव्हा आणलेले फूल. ७० ते ९५ वर्षापुर्वी गावठी गुलाब मधमाशा आकर्षित करणारा, सुंगधी आणि संध्याकाळी अंगठ्याच्या आकाराची मुग्ध (मुकी) आकर्षित दिसणारी कळी सकाळी लगेच पुर्ण उमलते व ४ वाजता कोमेजाते तो गावठी गुलाब. हा गुलाब खरेतर प्रत्येक हिंदू दैवताला व मुस्लीम समाजात दर्ग्याला तसेच लग्नात शेऱ्याला लावणारा गुलाब. गुलाब म्हणजे मंद हळुवार सुगंध, आकर्षक, मधमाश्यांना आकर्षित करणारा असा हा गावठी किंवा देशी गुलाब, वाड्यावस्त्यावर जुने तालुक्याचे, जहागीरदारांचे, इनामदारांचे तुळशी वृंदावनातील कुंड्याशेजारी किंवा परसात उंच - उंच वाढणाऱ्या काटेरी गुलाबाचे फूल. त्यावेळी रुपयाला शेर (२०० ते ४०० फुले) दर असे. उत्तर प्रदेशातील कनोज व राजस्थानातील पुष्कर या भागामध्ये या गावठी गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. तेथे गुलाबाचे प्रक्रिया उद्योग आहेत. देशी गुलाबापासून गुलकंद, गुलाबपाणी, उत्तर काढले जाते. या गावठी गुलाबाचे फुल हे अतिशय मऊ पाकळ्याचे आकर्षक व लवकर कोमेजणारे असल्याने मानवाने त्याचा उपयोग आयुर्वेद व प्रक्रिया उद्योगात अतिशय खुबीने केला. अशारितीने त्याचे मुल्यवर्धन फ्रान्स या देशामध्ये मोठ्या प्रमाणात झाले. येथे नैसर्गिक अत्तर (Cosmetics) केले जाते. या फुलांचे मुल्यवर्धन एवढे वाढले की, कॉस्मेटिक या शास्त्रात बी.टेक व एम.टेक शिकलेली मुले - मुली मोठ्या हुद्द्यावर जावून आय. टी. इंजीनिअरहून अधिक पैसा मिळवू लागले.

गुलाबाचे उत्तर हे देवीला, महालक्ष्मीला, लक्ष्मीपूजनाला, विविध संतांना, सर्व दैवतांना फार प्रिय आहे. विविध पूजेत अत्तर हे अविभाज्य घटक आहे. याचा अर्थ असा, फूल हे नाजूक असले तरी त्याचा उपयोग अनेक प्रकारात केला जातो. पुष्कर व कनोज येथे खडीसाखरेत केलेला गुलकंद हा १४ रू. पासून १४० रू./किलो दराने उपलब्ध होतो. म्हणजे तरुण पिढीला पारंपारिक बी.ए., बी.एस्सी.सारखे (Academic) शिक्षण घेऊन त्यांना जेव्हा नोकऱ्या मिळत नाहीत तेव्हा कौशल्यावर आधारित (Skill) कोर्सेस जर निवडले तर आजचा नैराश्येतील तरुण हा मुलूंडच्या (मुंबईचे उपनगर) उत्तर तयार करणारे केळकरांसारखा उत्तराचा कारखानदार होवू शकतो. म्हणजे १० रुपयाच्या गुलाबाचे मुल्यवर्धन १०० रू. करता येवू शकते. गुलाबाच्या शेतीत पारंपारिक १० फुलांच्या गड्डीचा भाव ५ ते ८ - १० रू. मिळू लागला. नंतर 'ग्लेडिएटर' फुलाचा उदय १९७० मध्ये झाला. हे फूल १० ते १५ दिवस टिकणारे. घट्ट मोठी आकर्षक कळी असणारे. लाल जर्द मखमली (Appearance) असल्याने १९७० च्या काळात या गुलाबाचा महाराष्ट्र व देशात मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि नंतर बहुरंगी फुलांच्या जाती विकसीत झाल्या, परंतु ह्या जाती नुसत्याच आकर्षित होत्या. त्यांना कोणताही गंध नसणाऱ्या दुर्गुणावर त्याच्या आकर्षकपणाने मात केली. ह्या विविध रंगाच्या गुलाबांचा महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश व भारताच्या चारी बाजूच्या धार्मिक राज्यात याचा फुलशेतीत फार मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपारिक पिकांपेक्षा या फुलाकडे वळायला संधी मिळाली. फुलशेती ही उन्नत शेती झाली. या फुलशेतीतून दुभत्या गाईसारखे उत्पन्न मिळू लागल्याने शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली. त्यामुळे विविध धर्माच्या दैवतांनाही प्रसन्न वाटू लागली कारण त्यांना रोज ताजी आकर्षक फुले प्राप्त होवू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैशाचा खुळखुळा वाजू लागला.

पुढे डेनमार्कचा डच गुलाब आला. या डच गुलाबाच्या पॉलीहाऊसमध्ये विविध जाती विकसित होवून ५ गुंठ्यातून ५ ते १० लाख रू. धाडसी, चिकाटी, उत्साही शेतकरी काटकपणाने सातत्याने मिळवू लागले आणि सुशिक्षीत बेरोजगार हा या उद्योगाने उद्योजक बनला. मात्र या व्यवसायात विश्रांती नसते त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या अर्धा ते एक टक्काच शेतकरी या उद्योगाकडे वळला. मग व्हॅलेंटाईन डे या इंग्लिश, भारतीय अपारंपारिक व परदेशातील पारंपारिक मनोमिलनाचा उत्सव (५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी) साधणारे डच गुलाबाचे फुल हे एकमेव प्रेमाचे द्योतक ठरले. त्यामुळे त्या पंधरा दिवस ते एक महिन्याच्या काळात देश - विदेशात या गुलाबाच्या निर्यातीतून अब्जावधी रुपयांची उलाढाल साऱ्या जगभर होवू लागली आणि त्यामुळे आर्थिक विकासाच्या प्रगतीचे घड्याळ या सणाच्या निमित्ताने स्पोर्टमॅनच्या घड्याळाच्या वेगाच्या तालावर चालू लागले. म्हणजे आनंदाचे काही क्षण हे स्पोर्टच्या घड्याळातील सेकंदाच्या अतिसुक्ष्म विभागासारखे (Fraction) नाजूक होकारार्थी स्फटिक बनून ते कमी वेळातील उन्नत फूल शेतीच्या उत्कर्षाचे महत्त्व पटवू लागले.