प्रयत्नवाद असला म्हणजे आशावादाला समृद्धीची फळे आपोआपच येतात

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


२०१७ चा पावसाळा परमेश्वराच्या कृपेने भारतभर जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे बरोबर मृग नक्षत्रात सुरू झाला आणि नंतर आर्द्र नक्षत्रात बरसला. शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने महाराष्ट्र व जवळच्या राज्यांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मका यांची पेरणी लगबगीने केली. जमिनीत ओल गेल्या २ - ३ वर्षापुर्वीपेक्षा पुरेशी असल्याने वाफसा अवस्था निर्माण झाली. कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश येथे उपयुक्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सर्व निविष्ठा भरल्या व त्याचा योग्य वापर केला. जमिनीतील पुरेशा ओलीमुळे बी व्यवस्थित उगवून आले. पिके तरारून आली. शेतकऱ्यांनी वितभर आलेल्या पिकामध्ये तण नियंत्रणासाठी मोठे कोळपे मारले. यंदा ही पिके चांगली येतील या आशेने पुलकीत झाले. पुढील १० - १५ दिवसांमध्ये ही पिके पोटरीबरोबर झाली. सोयाबीन फुलात येऊ लागले आणि अचानक २० - २५ दिवस पाऊस जवळपास गायबच झाला. विशेषकरून विदर्भ व मराठवाड्यात जो ताण पडला तो अनाकालनीय आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आणि चॅनेलवर दिलेल्या बातम्यानुअसार १० ते १५% च धरणे भरली आहेत. अजून १/३ सुद्धा खरीप हंगाम झाला नाही. भूमाता हिरवा शालु पांघरलेली असताना २५ ते २८ दिवसाच्या उघडीपीमुळे पिके करपायला लागली आहेत. फुल अवस्थेत असलेले सोयाबीन आणि मका ही पिके पुर्ण करपून पिवळी फटक झाल्याचे दृष्ट नजरेस येत आहे. मक्याचे पीक तर आता गेलेलेच आहे. मक्याला उर्जीतावस्था येणे अवघड आहे. परंतु जी द्विदल शेंगवर्गीय पिके ज्यांची मुळे सोटमुळे आहेत व ज्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरले आहे त्या शेंगवर्गीय पिकांच्या मुळांवर नत्राच्या गाठी वाढल्याने अजून ४ - ८ दिवस पिके तग धरतील, परंतु त्यानंतर फार अवघड आहे. हवामान शाश्त्रातील अनेक तज्ञांनी गेल्या १५ दिवसापासून (३ ते १८ ऑगस्ट) पावसाची अनेक भाकीते वर्तविली होती. परंतु त्या सर्वाला निसर्गाने हुलकावणी दिली.

विदर्भ व मराठवाड्यातील अवस्था दयनिय झाली आहे. ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने टँकर आताच सुरू झाले आहेत. अजून तर पुढील पावसाळ्यापर्यंतचा काळ यायला अजून ८ ते १० महिन्याचा काळ आहे. परमेश्वराची कृपा जर झाली व जर या २- ३ दिवसात म्हणजे १९ ते २१ ऑगस्टला तुफान पाऊस व्हावा हे भाकित नव्हे प्रत्यक्ष घडेल हा अंतरमनाचा कौल आहे आणि ते घडलेच तर आणि परतीचा मान्सून बरसला तर पिण्याच्या पाण्याची सोय होईल. अजून नद्या, नाले, धरणे, विहीरीचे तळ झाकले नाहीत. बोअर अजून रिचार्ज झाले नाहीत.

परतीचा पाऊस हवामान बदलामुळे जो १ सप्टेंबरला सुरू होतो तो १ ऑक्टोबरच्या सुमारास सुरू होईल असा अंदाज आहे. पण तरी हा परतीचा पाऊस नोव्हेंबरमध्येही पडेल तेव्हा रब्बीच्या आशा पल्लवीत होण्याची शक्यता आहे. तसेच त्याने धरणांनी पातळी वाढेल. विहीरीला पाणी वाढेल आणि पाण्याचे बोअर आनंदाने डोलू लागतील. असे घडण्यासाठी आपण परमेश्वरचरणी प्रार्थना करूयात. सप्टेंबरचे संपादकीय लिहिण्यासाठी १५ दिवसापासून अनेक विचार येत होते की, संपादकीय नेमके काय लिहावे व कसे लिहावे. परंतु कालच डॉ. स्वामिनाथन सरांचे 'Combating Hunger and Achieving Food Security' हे पुस्तक हाती लागले. हे पुस्तक फारच चांगले आहे. यातील प्रकरणे हाताळली. यातील २० वे प्रकरण 'Challenges in the year of Science ' पान नं. १०५ ते १०९ वरील लिखाण फारच अभ्यासपुर्ण सर्वांना उपयुक्त आहे. त्याचा अभ्यास केला व जे माझ्या मनात विचार घोंगावत होते तेच विचार यात वाचण्यात आले.

भारतातील उत्तरेकडील अर्ध्या पावसाने व पुराने एवढे थैमान घातले आहे की राजस्थान, गुजरात, पंजाब, हरीयाना, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम शिवाय ईशान्येकडील (उत्तर पुर्वेकडील) ६ ही राज्ये येथील सतत पाऊस पडून पुराखाली जमिनी गेल्या आहेत. पिके सडली, नुकसानीचा अंदाज अजूनही येत नाही. लोक घरे सोडून गेली. त्यांचे घरदार. सर्व जिवनावश्यक गोष्टी, जंगल मालमत्तेचे नुकसान झाले आहे. रस्ते, पुल उद्ध्वस्त झाले आहेत. डोंगराच्या कडा कोसळून राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग यांनी यात्रेकरू, प्रवाशी यांच्या बसेस, वहाने ही ज्वालामुखीसारखी पोटात घेतली आहेत व साऱ्या जनतेला हवालदील केले आहे. ही परिस्थिती बदलायला २ - ४ वर्षे सहज लागतील. एका बाजूला ही परिस्थिती आहे तर दक्षिण भारतात येथे अजूनही पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. तो रुळावर आणण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार व जनतेला नाकीनऊ येणार आहेत.

हे पुस्तक वाचत असताना यात जे उपय सुचविले आहेत ते अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे आहेत. भारताचे हवामान, पाऊस काळ व पाऊस पडण्याचा काळ असे देशाचे विविध भाग करावेत व राज्यांचे कृषी खाते व हवामान खात्यांनी स्वयंचलित हवामानाचे कमाल व किमान हवामान, सकाळ व दुपारची आर्द्रता, पाऊसमानाचा काळ, प्रमाण व विस्तृता (विस्तार) याचा नुसता अंदाज न देता दिलेल्या अंदाजाचा प्रत्यक्षात परिणामकारक उपयुक्तता या हवामानाच्या घटकांमध्ये कमी जास्त ५ ते १० % च फरक असला तरच त्या हवामानाच्या अंदाजाला महत्त्व येते. अन्यथा त्यांचे दिलेले अंदाज खरे न ठरल्याने लोक नैराश्येत जातात व त्यामळे पुढील शेतीचे नियोज़न करणे व पाणी व्यवस्थेचे नियोजन करणे हे शेतकरी, प्रशासन व धोरणकर्ते यांना अवघड जाते. तेव्हा परदेशात जे हवामानाचे अन्दाज वर्तवले जातात. ते तंतोतंत खरे ठरतात. त्याच धर्तीवर मानके (Stanadards) वापरून ती अती पावसाच्या व कमी पावसाच्या प्रदेशात राबवून येथे अन्न (धान्य) सुरक्षा म्हणजे बाधीत राज्यामध्ये गेल्या १० - २० वर्षात केंद्र सरकारने साठवलेले चांगले अन्नधान्य त्याचे वितरण करावे. म्हणजे एका बाजूला ते धान्य अती पावसाने सडणार नाही व जेथे आवश्यकता आहे तेथे जनतेला ते मोफत मिळाल्याने जनता दुवा देईल. येथे वेळात छावण्या करून जनावरांसाठी जेथे जास्त पाऊस तेथून रेल्वे वॅगनने चारा आणून द्यावा. अशा रितीने पशुधन वाचवावे. म्हणजे पशुधन वाचले तर शेतकरी वाचेल व शेतकरी वाचला तर देश वाचेल. उत्तर भारतात अतिवृष्टी आणि याच्या पूर्ण पुर्णपणे उलट म्हणजे दक्षिण भारतात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. तेव्हा दक्षिण भारतातील परिस्थितीवर स्वामिनाथन सरांनी सांगितलते की, येथे पहिली - दुसरी पेरणी वाया गेली की शेतकरी कर्जबाजारी झाल्याने संरक्षीत बीजसाठ (Reserve Seed Bank -RSB ) अशी पुर्तता व व्यवस्था महिला बचत गटात प्रचलीत करावी, ती कायमस्वरूपी असावी, यासाठी कृषी खात्याचा स्वतंत्र विभाग असावा. याकडे अतिवृष्टी व अनावृष्टी या दोन्ही भागामध्ये नियोजन कसे करावे याचे व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रयोग अनुभवाने सिद्ध झालेले या भागात पुन्हा - पुन्हा करावेत.

दुसरी गोष्ट म्हणजे जग विज्ञानाच्या दृष्टीने इतके पुढे गेले आहे की, भारतासारखा देश मंगळावर पहिल्याच प्रयत्नामध्ये पोहचतो. अनेक देशांचे १५० उपग्रह एकाच दमात अवकाशात यशस्वीपणे मानवतेच्या कल्याणासाठी सोडतो. नंतर कालचीच (१७ ऑगस्ट) बातमी आहे की, अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठाने अशा रबराचा शोध लावला आहे की त्याचे टायर कधीच पंक्चर होणार नाही. म्हणजे अपघात होणार नाही, जगभर जिवीत हानी टळेल, कामे वेळात होतील.

विज्ञानाची झेप एवढी अफाट आहे की, रोबोने माणसाला पर्याय शोधला आहे आणि तो रोबो माणसाची सर्व कामे अथकपणे, परिणामकारक, माणसाहून प्रामाणिक, अचूक करत आहे. मग असे असताना उत्तरेकडील अतिवृष्टीचा पाऊस हा आवर्षण प्रवण भागामध्ये (Drought Prone Area -DPA ) जेव्हा जेव्हा जनतेला. पिकाला व जनावरांना आवश्यक आहे. तेव्हा तो शाश्त्राज्ञांना व विकास अधिकाऱ्यांना जनकल्याणासाठी वळविता आला पाहिजे. तसेच पुरपरिस्थतीमुळे होणारे नुकसान टळून तेथील जनजिवन सुरळीत व सुस्थितीत राहून वळविलेले पाऊसमान व पाणी या दुष्काळी भागामध्ये विज्ञानाच्या कौशल्याने व नैपुण्याने शाश्त्रज्ञांनी ठराविक काळापर्यंत बरसण्याची व्यवस्था केल्यास रूक्ष वाळवंटीमय बकाल जमीन, जंगले आणि जैवविविधता आणि पर्यावण हे सफल होतील. नद्या, धरणे, तलाव दुष्काळी भागातसुद्धा समृद्ध राहतील आणि अशारितीने दुष्काळी भागदेखील संपन्न होईल. पंक्चर न होणारे टायर जर आले तर ही केवढी क्रांती होईल. तसेच ही विरोधाभास परिस्थिती की एका बाजूला अतिवृष्टी व दुसऱ्या बाजूला अनावृष्टी यावर जर उपाय सापडला तर भारताला सुवर्ण काळ परत कायमचा येईल आणि जगातील अनेक खंडामध्ये जे विषम हवामान तयार होऊन आगी लागतात, वादळे येतात, भुकंप होतात. हे सर्व थांबून पृथ्वीची उत्क्रांती हाईल व सगळा मानव, निसर्ग व पर्यावरण एका सुरामध्ये आपला जिवन संसार थाटतील.

याला भारतातीलच शास्त्रज्ञ उपाय शोधतील. हा नुसता आशावाद नसून आपण रोज अत्यंत गरीबांची मुले जी १० ते व १२ वि ला ९५ ते ९८% अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवितात, जगाच्या पाठीवर अनेक भारतीय शास्त्रज्ञ व तरुण पिढी उपयुक्त शोध लावते तेव्हा अशा जिवनाशी असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नावर उपाय सापडवणे अवघड आहे मात्र अशक्य नाही. हा नुसता आशावाद नसून प्रयत्न नाविण्यतेच शोध आणि वेध घेतल्यास हमखास यश येते. गरज ही शोधाची जननी आहे. (Need is 'Mother' of 'Invention') हे लक्षात घेतले तर 'सारे जहाँसे अच्छा हिंदोस्तां हमारा' हे सार्थ ठरेल !