नियोजनबद्ध कांदा लागवड व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर एकरी २२ ते २४ टन उत्पादनाचे ३ लाख

श्री. मंगेश पांडुरंग ठिकेकर,
मु. पो. ठिकेकरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे
मो. ७७३८१४७५५२आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा गेली ९ - १० वर्षापासून वापर करून प्रतिकूल परिस्थतीतूनही टोमॅटो, कांदा, काकडी पिकांचे दर्जेदार उत्पादन घेत असतो.

दरवर्षी ४ - ५ एकर फुरसुंगी कांद्याची १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरच्या दरम्यान लागवड करत असतो. गेल्यावर्षी ९ एकर कांद्याची लागवड १५ नोव्हेंबर २००९ रोजी केली होती. जमीन काळीभोर आहे. विहीरीचे पाणी जानेवारीपर्यंत १२ व्या दिवशी व जानेवारीनंतर ९ -१० या दिवशी देतो.

कांद्याला लागवडीनंतर १६ व्या दिवशी एकरी १८:४६ खताच्या ३ बॅगा, हायपड १०० किलो, बायोझाईम १० किलो आणि झिंक, फेरस, मॅग्नेशियम ८ किलो असा डोस देतो. नंतर १ महिन्याचा प्लॉट असताना गांडूळ खत एकरी १२ बॅगा देऊन पाणी देतो. त्यानंतर दुसऱ्या पाण्याच्या अगोदर खुरपणी करून (दीड महिन्याचा प्लॉट असताना) रासायनिक खत १०:२६:२६ च्या ३ बॅगा देतो. रासायनिक आणि गांडूळखत कधीच एकत्र देत नाही. गांडूळ खताने जमीन भुसभुशीत राहते. त्याने खुरपणी सोपी जाते. तसेच कांदा पोसण्यासही मदत होते.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटरचा प्रथम पुर्नलागवडीच्या वेळी रोपे बुडवुन लागवडीसाठी करतो. त्यामुळे पाती सरळ, सतेज राहतात. जारवा वाढतो, मर, नांगी पडत नाही.

पुढे साधारण १५ दिवसांच्या अंतराने सप्तामृताच्या फवारण्या हवामानातील बदलानुसार करतो. फवारणी ही जमीन ओली (वाफसा अवस्था) असताना केल्याने अधिक चांगला परिणाम जाणवतो. हवामान अचानक बदलले तर सप्तामृत फवारणी केल्यानंतर लगेच पाणी देतो किंवा पाणी दिल्यानंतर हवामान बदलले तर वाफश्यावर लगेच फवारणी घेतो. हे गेली ९ - १० वर्षापासून करत असल्याने डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने खराब हवामानावर मात करून पीक निरोगी ठेवता येते.

साठवणुकीचे दृष्टीने शेवटचे पाणी महत्त्वाचे

कांदा पोसण्याच्या काळात थ्राईवर, क्रॉंपशाईनर सोबत राईपनर, न्युट्राटोन च्या फवारण्या घेत असल्याने कांद्याची फुगवण एकसारखी मिळते. कांद्याला २ - ३ पत्ती तयार होऊन पत्तीला आकर्षक चमक येते. पत्ती कडक बनते. त्यामुळे साठवणुकीत फायदा होतो. त्याचबरोबर ह्या कांद्याची साठवण करत असल्याने साठवणुकीत टिकण्याच्या दृष्टीने शेवटची पाण्याची पाळी वेळेत देणे आवश्यक असते, ती म्हणजे कांद्याची शेवटची पाण्याची पाळी कांद्याची मान कडक असताना दिली गेली पाहिजे. जर मान लुज पडली असेल (कांदा काढणीच्या अवस्थेकडे गेला असेल) आणि त्यानंतर पाणी दिले गेले तर कांदा काढणीनंतर सडण्याची शक्यता असते, कारण कांदा खाली जमिनीत पक्वतेकडे गेलेला असतो.

साधारणपणे कांदा पावणे पाच महिन्यात १५ एप्रिलच्या आसपास काढणीस येतो. एकरी २२ ते २४ टन उत्पादन मिळते. हा कांदा १ महिना सावलीमध्ये ठेवून नंतर मे अखेरीस ते पहिला पाऊस होण्यापर्यंतच्या काळात माल साठवणूकीत आरणीमध्ये ठेवतो. तो गणपतीत मार्केटला काढतो. बाजार भावानुसार माल विक्रीस काढत असतो. साधारणपाने दिवाळीपर्यंत माल पुर्ण विकला जातो. माल काढणीच्या वेळी जर साधारण २०० पिशवी असेल तर तो साठवणुकीत वाळून १५० ते १६० च्या आसपास भरतो. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा तसेच बुरशीनाशकांचा उत्पादन घेते वेळेसच वापर केल्याने साठवणुकीच्यावेळी बुरशीनाशकाचा वापर न करताही फक्त १ ते २ % घट (नासाडी, काजळी किंवा कोंब येणे) येते.

काढणीच्या वेळी सर्वसाधारण ५ रू. किलो भाव असला तर गणपती ते दिवाळीच्या काळात तोच भाव १५ ते २० रू. किलोपर्यंत होतो. त्यामुळे उत्पन्न (घट वजा जाताही) दुपटीहून अधिक मिळते. अशा पद्धतीने एकरी ३ लाख रू. उत्पन्न या मालापासून मिळाले.

चालूवर्षी वरीलप्रमाणेच ४ एकर कांदा लावलेला आहे, तो २ महिन्याचा झाला आहे. याला सर्व खते भरून झाली आहेत. खुरपणी झाली आहे. फक्त फवारण्या आणि पाणी देणे एवढेच काम चालू आहे.

उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे फायदेशीर

अभिनव टोमॅटोची लागवड चैत्री पाडव्याला करतो. बी शिवरात्रीला जर्मिनेटरची प्रक्रिया करून टाकतो. त्यामुळे उगवण चांगली होते. तसेच पुर्नलागवडीच्या वेळी जर्मिनेटरच्या द्रावणात रोपे बुडवून लागवड करतो, त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही रोपे तग धरून राहतात. रोपे मरत नाहीत, जारवा वाढतो. लागवड ४ फुटाच्या सरीला १ - १ फुटावर असते. लागवडीपुर्वी घरचाच ट्रॅक्टर असल्याने अभी आडवी २- ३ वेळा मशागत करून जमीन १ ते २ महिने चांगली तापू देऊन शेणखत आणि उसाची मळी टाकून सरी पाडतो.

खुरपणीच्या वेळी १०:२६:२६ च्या ४ बॅगा आणि माल चालू होतानाच्या अवस्थेत पोटॅशच्या ४ बॅगा देतो. गांडूळ खताचा एकदा वापर करतो. टोमॅटोला एकच तार ४ फुटावरून ओढलेली असते.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या थ्राईवर, क्रॉंपशाईनरच्या किटकनाशक व बुरशीनाशकासह माल लागेपर्यंत दर १५ दिवसाला फवारण्या घेत असतो. त्यामुळे झाडांची रोगमुक्त जोमाने वाढ होऊन फुटवा अधिक निघतो. फुलकळी अवस्थेत गळ होत नाही. पुढे माल लागल्यानंतर थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनच्या फवारण्या दर १५ दिवसाला माल संपेपर्यंत चालू असतात.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे फळ एवढे पोसते की दलाल, शेतकरी जात नवीन असे म्हणतात !

तर चालू वर्षीचा फड एवढा जबरदस्त होता की, झाडे ५ फुटाहून मोठी झाली होती. फुलकळी प्रत्येक फुटीच्या बेचक्यातून निघत होती. करपा किंवा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. क्रॉंपशाईनरने फळांना चमक आणि राईपनर, न्युट्राटोनने फुगवण एवढी जबरदस्त मिळाली की ओतूर, मार्केटला हा अभिनवचा माल नाही, दुसरीच कोणती तरी नवीन व्हरायटी आहे असे लोक व व्यापारी म्हणत. जून अखेरीस तोडा चालू होतो तो दीड पावणेदोन महिने चालतो एकरी १००० ते १२०० क्रेट माल निघतो.

त्याच तारेवर काकडीचे पीक !

शेवटचे २ - ३ तोडे बाकी असताना त्याच प्लॉटमध्ये जिप्सी काकडीची लागवड करतो. टोमॅटोच्या झाडांच्या आधाराने तारेवर या काकडीचे वेल सोडतो. ही काकडी ४ फुटाच्या सरीवर दाट लावतो. एकरी १४ पुड्या लागतात.

दिवसाआड १।। टन, ३० - ३२ तोडे

ह्या काकडीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या वरील पिकांप्रमाणेच घेत असतो.

तोडे चालू झाल्यानंतर दिवसाड तोड करतो. एकरी तोड्याला ३० ते ३५ पिशवी (५० किलोची) निघते. साधारणपणे ३० ते ३२ तोडे याप्रमाणे होतात.

सर्व मालाची विक्री ओतूर मार्केटला लिलाव पद्धतीने होते. मुंबईचे व्यापारी येथील माल खरेदी करून, वाशी, कल्याण मार्केटला पाठवितात.