कृषी विज्ञान मासिक वाचून माझ्यासारखा वयस्कर शेतकऱ्यासही मिळते प्रेरणा !

श्री. बापुराव मारुती गुरव,
मु. तेलगाव भिमा, पो. कुसूर, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर,
मोबा. ९४२२७१०६५५


मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ८ -१० वर्षापासून कांदा, टोमॅटो, वांगी, दोडका, कारली, मिरचीला वापरतो. असाला फक्त बेणे प्रक्रियेसाठी जर्मिनेटर वापरतो.

गेल्यावर्षी फेब्रुवारी २०१३ ला अंकूर ९३० आणि व्होलकॅलो (सिंजेटा) मिरचीची लागवड अर्धा एकरमध्ये केली. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थती असल्याने पाण्याचे फारच दुर्भिक्ष असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एका बोअरच्या मोजक्याच पाण्यावर हे मिरचीचे पीक घेतले. मिरचीची रोपे विकत आणली होती. लागवडीच्या वेळी जर्मिनेटर ५० मिली + प्रोटेक्टंट ३० ग्रॅमचे १० लि. पाण्यात द्रावण तयार करून त्यामध्ये रोपांच्या मुळ्या बुडवून लागवड केली. ऐन उन्हाळ्यातील लागवड असतानाही जर्मिनेटरच्या प्रक्रियेमुळे रोपांची मर झाली नाही. सर्व रोपे जोमाने वाढू लागली. त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने पंचामृत औषधांच्या नियमित ३ फवारण्या केल्या. यामुळे शेंडावाढ व फुटवा कायम चालू होता. फुलकळी अवस्थेत तिसरी फवारणी केली होती. त्यामुळे फुलगळ अत्यंत कमी होऊन फळधारण भरपूर झाली. या अवस्थेत पुन्हा २ फवारण्या पंचामृत औषधांच्या घेतल्या. त्यामुळे मिरच्या भरपूर लागून त्यांचे पोषण चांगले झाले. मिरच्या हिरव्या व लांब मिळत होत्या. १५ दिवसाला तोडा करीत होतो. तर ८ - ९ पोती (५० किलोचे पोते) मिरच्या निघत होत्या. लोकल बाजारात किरकोळ हातविक्री करणाऱ्यांना पोत्यावर विकत होतो. तर ४०० ते ५०० रू. ला १ पोते जात असे. गेल्यावर्षी सोलापूरला भाव साधारणच (होलसेल ८ ते १० रू./किलो) होते. एप्रिलमध्ये तोडे चालू झालेली मिरची जुलैपर्यंतच चालू ठेवून नंतर कांद्याला रान शिल्लक नसल्याने चालू मिरची काढून त्यात (२० गुंठे) आणि शेजारच्या १० गुंठे क्षेत्रात असा ३० गुंठ्यात कांदा लावला. त्यावेळी कांद्याला होलसेल भाव ४० - ५० रू./किलो होते. हा कांदा लागवडीसाठी रोपे घरीच जर्मिनेटरची प्रक्रिया करून तयार केली होती. लागवडीच्यावेळी देखील जर्मिनेटरच्या द्रावणात रोपे बुडवून लावल्याने वाढ चांगली होऊन रोपांना तेज काळोखी आली. जुलै ते सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या दोनच फवारण्या करता आल्या. जमीन मध्यम प्रतिची व उताराची असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत असल्याने पिकावर जादा पावसाचा दुष्परिणाम फारसा झाला नाही. काही ठिकाणी पिवळी पडलेली पात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्याने दुरुस्त झाली. इतरांचे मात्र कांद्याचे प्लॉट अति पावसाने सडले.

मिरची प्लॉट मोडून हा कांदा करण्यामध्ये १५ दिवस अपेक्षेपेक्षा लागवडीस उशीर झाल्याने तो कांदा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात काढणीस गेला. तोपर्यंत कांद्याचे भाव कमी झाले होते. तरी कांद्याचा दर्जा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने हळवी वाण असूनही डबल पत्तीचा, उत्तम आकर्षक चमक असलेला शिवाय पोषण चांगले झाल्याने ५५ क्विंटल उत्पादन मिळाले. यातील १ नंबर माल ३० क्विंटल १२५० रू./क्विंटल ने गेला. तर २ नंबर वक्क्ल २५ क्विंटल माल १००० रू./क्विंटल ने गेला. या कांद्यापासून ३० गुंठ्यात ६५ हजार रू. झाले.

एकूण ५ एकर क्षेत्र आहे. त्यापैकी ३ एकरमध्ये कायम ऊस करतो पाऊस बऱ्यापैकी असल्यास बोअरचे पाणी पुरते. तरी उन्हाळ्यात कमीच पडते. त्यामुळे एकरी ४० टनापेक्षा जास्त उत्पन्न मिळत नाही. नदीकाठच्या जमिनीत मात्र ६० टन उत्पादन मिळते. तेथे उन्हाळ्यात पाणी पुरते. उसाला फक्त लागणीच्यावेळी जर्मिनेटर वापरतो. बाकी फवारण्या मजुरांअभावी करीत नाही. ऊस लोकमंगल कारखाना भंडारकवठे व सिद्धेश्वर कारखाना कुमठे (सोलापूर) येथे दोन्हीकडे सभासद असल्याने पाठवितो. गेल्यावर्षी लोकमंगलचा २३०० रू. टन तर सिद्धेश्वरचा २४०० रू./टन भाव मिळाला. मजुरांचा प्रश्न असल्याने फारसा परवडत नसला तरी ऊस करावा लागतो. उरलेल्या २ एकर मध्ये घरचे माणसांवरच भाजीपाला पिके घेतो.

आता उन्हाळ्यात कांद्याच्या रानात १० -१० गुंठे कारली. दोडका डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने करणार आहे. एवढा माल किरकोळ बाजारात खपतो. तर गावातील ५ - ६ जण मिळून आम्ही ग्रुपमध्ये १ - १ एकर मिरची करणार आहे. चालू वर्षी अजून २ बोअर घेतले आहेत. कमी पाण्यावर ही उन्हाळी पिके डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घेणार आहे. मिरची ग्रुपमध्ये करत असल्याने पुणे - वाशी मार्केटला पाठविणे सोईचे होते. सोलापूरला भाव कमी मिळतो.

याचबरोबर भगवा डाळींबाची सघन (दाट) लागवड '६ x ६' वर करणार आहे. रान हलके असल्याने दुसरे कोणते पीक येत नाही किंवा आंतर पिकही घेता येत नाही. म्हणून ही सघन लागवड करणार आहे. पुढे ३ -४ वर्षानंतर मधले १ - १ कमकुवत झाड काढून टाकून १२' x १२' अंतर ठेवणार आहे. याला सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे.

यंदा ३ बोअरचे पाणी असल्यामुळे उन्हाळी भुईमूगदेखील करणार आहे. नेहमी वेस्टर्न २४ वाण थोडा करायचो. यंदा १ एकर वेस्टर्न - ५५ लावणार आहे. यासाठी पंढरपूरवरून जर्मिनेटर घेतले आहे.

'कृषी विज्ञान' मासिकाचा ५ - ६ वर्षापासून वर्गणीदार वाचक आहे. पुण्याला दरवर्षी कृषी प्रदर्शनात वर्गणी भरतो. यंदा प्रदर्शन पाहण्यास येता आले नाही. म्हणून आज (१४ जानेवारी २०१४) पुणे ऑफिसला वर्गणी भरत आहे. 'कृषीविज्ञान' मासिक अतिशय आवडीने वाचतो. अंक लेट झाल्यास बेचैनी होते. म्हणून पोस्टमनकडे लगेच चौकशी करतो. मासिकातील माहिती अतिशय प्रेरणादायी ठरते. त्यामुळे माझ्यासारख्या वयस्कर माणसालादेखील उत्साह येऊन तंत्रज्ञानाने विविध पीक पद्धतीचा अवलंब करावासा वाटतो. यातील प्रेरणेतूनच वरील पिकांचे यशस्वी प्रयोग करीत आहे.