कपाशी, वांगी, मिरचीतील मिश्रपीक, 'सिद्धीविनायक' मोरिंगा (शेवगा)

श्री. प्रकाश पांडुरंग लहासे (सर),
मु. पो. पहुर, ता. जामनेर, जि. जळगाव,
मोबा. ९४२३९३७१३६मी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी ज्युनिअर कॉलेज फत्तेपूर येथे ३० वर्षे नोकरी केली. पहुर गावी डॉ. बावसकर सरांची व आमची शेती बांधाला बांध लागूनच आहे. तेव्हा सर गावी आल्यानंतर आमची भेट व्हायची २००७ मध्ये अशीच सरांची भेट झाली तेव्हा सरांनी मला शेतीविषयी भरपूर मार्गदर्शन केले आणि २ - ३ 'कृषी विज्ञान' मासिके भेट दिली. त्यानंतर त्या मासिकाचे सखोल वाचन करून गावाच्या वडीलोपार्जीत ९ एकर शेतामध्ये डॉ. बावसकर तंत्रज्ञान भविष्यात निवृत्त झाल्यानंतर जरूर वापरायचे व सरांच्या मार्गदर्शनाने शेतीत वेगवेगळे आधुनिक प्रयोग करायचे ठरविले.

३१ जानेवारी २०११ रोजी ३० वर्षे नोकरी करून निवृत्त झाल्यावर शेती करण्यास (कसण्यास) सुरुवात केली. एकूण ९ एकर क्षेत्रापैकी सव्वा तीन एकरचा १ प्लॉट आणि साडेपाच एकराचा एक प्लॉट आहे. दोन्ही प्लॉट मध्ये प्रथम पाण्याची सोय करण्यासाठी २०११ मध्ये वेगवेगळ्या २ विहीरी खोदल्या. ३ एकर १० गुंठे जो प्लॉट आहे, तेथे १ विहीर व १ बोअर आहे. जमीन भारीकाळी आहे. या जमिनीमध्ये २०१२ मध्ये फक्त कापसाचेच पीक घेतले होते. त्याला डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरले नव्हते. मात्र २०१३ च्या हंगामात ७ जून २०१३ रोजी सव्वा तीन एकर क्षेत्रात १२' x १२' वर 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याचे बी टोकले. त्याला जर्मिनेटरची प्रक्रिया केली होती. त्यामुळे उगवण पुर्ण झाली. त्याचवेळी २ एकर शेवग्यामध्ये आंतरपीक कपाशी ४ x २।। फुटावर तर १ एकरमध्ये भरताची वांगी ४ x २।। फुटावर आणि १० गुंठ्यामध्ये मिरचीचे आंतरपीक ४ x २।। फुटावर ठिबकवर ७ जून २०१३ रोजी शेवग्याबरोबरच घेतले आहे.

शेवग्याला १ महिन्याचा प्लॉट असताना कल्पतरू खताच्या ४ बॅगा आणि ५ महिन्याचा प्लॉट असताना ३ बॅगा दिल्या आहेत. शेवग्याची पहिली छाटणी २।। फुट उंचीचा प्लॉट असताना (शेंडा खुडणी) केली. त्यानंतर १५ - २० दिवसाला शेंडे खुडणी ४ महिन्याचा प्लॉट होईपर्यंत चालूच होती. ४ थ्या महिन्यानंतर फुल दिसू लागले. ४ महिन्याचा प्लॉट असताना फुलांचे प्रमाण वाढले. ६ व्या महिन्यात संपुर्ण झाडांवर फुले लागून शेंगा धरण्यास सुरुवात झाली. एकूण १००० झाडे १२' x १२' वर आहेत.

१ डिसेंबरला पहिला तोडा केला. सुरूवातीला शेंगा कमी निघत आहेत. पण नवीन निघणाऱ्या लहान शेंगांचे प्रमाण जादा आहे. प्रत्येक झाडावर सध्या (२० डिसेंबर २०१३) ५० ते १०० शेंगा लागलेल्या आहेत. आतापर्यंत ५० किलो शेंगा विकल्या आहेत. जळगाव, जामनेर, भुसावळ, यावल, रावेर, फैजपूर येथे लोकल मार्केटला ७० रू./किलो भाव मिळाला आहे. आता येथून पुढे शेंगांचे प्रमाण वाढेल.

कापूस, वांगी, मिरचीतील 'सिद्धीविनायक' शेवगा या सर्वांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या दर महिन्याला फवारण्या घेत आहे. त्यामुळे झाडांचा फुटवा वाढून फुलकळी प्रत्येक फांदीवर भरपूर लागली आहे. शिवाय फुलगळ होत नाही व शेंगांचे पोषण चांगले विशेष म्हणजे ४ ते ४।। फुटाची शेंग पाहोन लोक आश्चर्च करतात. याच शेवग्यातील कापसावर सप्तामृत फवारण्या केल्याने बोंडांची संख्या अधिक होती. लाल्या व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. लागणीच्या २ एकर मुख्यपीक कापसाचे २० क्विंटल उत्पादन मिळाले. फरदडचा कापुसही उत्तम आहे. बोंडांवरून १५ क्विंटल उत्पादन सहज मिळेल अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे सर्व कापूस स्वच्छ, पुर्ण अमललेला, कवडी अजिबात नसल्याने वेचणीस सुलभ होता. ४६०० रू./क्विंटल भावाने कापसाची विक्री झाली. हे शेवग्यातील मिश्रपीक असूनदेखील उत्पादन गेल्यावर्षी एवढे मिळाले. शिवाय कापसाच्या दर्जात भरपूर वाढ झाल्याचे अनुभवले. संदर्भासाठी या प्लॉटचा फोटो कव्हरवर दिला आहे.

भाजी पिकातील 'सिद्धीविनायक' शेवगा

आंतरपीक १ एकर भरीताच्या वांग्यापासून आतापर्यंत १ लाख रू. चे उत्पन्न मिळाले असून वांगी तोडे चालू आहेत. तिसऱ्या दिवशीच्या तोड्याला २० कट्टे (६ क्विंटल) वांगी निघतात. त्याला सरासरी १० रू./किलो भाव लोकल मार्केटमध्ये मिळत आहे. अजून ३ - ४ महिने उत्पादन चालेल.

१० गुंठ्यामध्ये मिरची लावली आहे. तर तिचेही तोडे चालू आहेत. आतापर्यंत ४० हजार रू. ची मिरची विकली. तिला १० ते १३ रू./किलो भाव लोकल मार्कटला मिळत आहे. तीदेखील सध्या पुर्णता बहारात आहे.

दुसऱ्या रानातील ५।। एकर मध्ये फक्त कापूस आहे. येथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले नव्हते. तेथे पाटाने पाणी देतो. तर या ५।। एकरातून २० क्विंटल कापूस मिळाला. यामध्ये उडीद व मुगाचे आंतरपीक घेतले होते, तर उडीद ५ क्विंटल व मूग ३ क्विंटल झाला. आता आंतर पीक नसल्याने नुसत्या फरदडपासून २० क्विंटल तरी उत्पादन मिळेल.

शेवग्याच्या प्लॉटच्या बांधाने २० हादग्याची झाडे शेवग्याबरोबर लावली आहेत. त्याचे ६ महिन्यानी (नोव्हेंबर २०१३ मध्ये) उत्पादन चालू झाले. तर १ महिन्याभरात आठवड्यातून २ वेळा तोडे करतो. एका तोड्याला ६ किलो फुले निघतात. त्याला ४० रू./किलो भाव मिळतो. या फुलांची भाजी आरोग्यदाई असते.