पानवेलची यशस्वी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


पानवेलीची लागवड आणि निगा इतर पिकांपेक्षा वेगळीच असते. पानवेलीची लागवड निगा अतिशय कैशाल्याने आणि हळुवारपणे केली जाते. अगदी योग्य हवामान, आर्द्रता, सावली आणि प्रमाणशीर खतांचा पुरवठा ह्या सर्व पानवेलीस आवश्यक बाबी आहेत. ह्या सर्व बाबी पानमळ्याला उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्याने अतिशय तत्पर राहिले पाहिजे. पानमळ्याला वरचेवर व सतत पाणीपुरवठा करावा लागतो. त्यासाठी नदीचे, ओढ्याचे, पाटबंधाऱ्याचे किंवा विहिरीचे पाणी अगदी वर्षभर पुरेल अशा भागातच पानमळ्याची लागवड करता येते. मलबार किनारा आणि आसामच्या काही भागातच पानमळ्याची आखणी नैसर्गिक पर्जन्यमानावर अवलंबून अशी केली जाते. कृत्रिमरित्या आधार, पाणी, निवारा इत्यादी बाबी निर्माण करून कमी जास्त प्रमाणात भारताच्या कुठल्याही भागात पानवेलीची लागवड केली जाते. हल्लीच्या काळात पानवेलीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असली तरी भारतीय शेतकऱ्यांना ती पिढीजातच वाटते. अशा भारतीय शेतकऱ्यांनी पिढीजात चालत आलेला पानवेलीचा व्यवसाय सोपा करून त्यांच्या कौशल्याचा उपयोग साध्यासुध्या शेतकऱ्यांना करून दिला पाहिजे.

वनस्पतीशास्त्रीय दृष्टिकोन: पानवेल ही वर्षायू वनस्पती असून (Piperaceae) ह्या कुळात पानवेली ची गणना होते. वनस्पतीशास्त्रात पानवेलीला पायपर बीटल ह्या नावाने ओळखले जाते. पानवेलीला दिलेल्या आधारावर एक वर्षभारत वाढलेल्या पानवेलीची उंची ३ ते ५ मीटरपर्यंत असते. वेगवेगळ्या जातीनुसार पानाचे आकारमान व जाडी कमी - जास्त असते. पानांमधील तंतूची संख्य वेगवेगळ्या प्रदेशात जातीनुसार भिन्नभिन्न असते. वनस्पतीशास्त्रीय दृष्ट्या वेलीवरील पानांची रचना, पानांचा रंग, पानांची चव आणि स्वाद यानुसार पनावेलीच्या वेगवेगळ्या जाती ठरविल्या जातात. नागवेलीच्या काही जाती ज्या त्या भागात लागवडीखाली आणल्या जातात, त्या प्रदेशाच्या नावावरून ह्या ओळखल्या जातात. उदा. बनारसीपान, देशी पान इ. विशिष्ट भागातील वातावरणानुसार पानातील गुणधर्म भिन्न भिन्न असतात. अनुकूल परिस्थिती व वातावरणात पानमळे वाढविले असता त्यांच्यापासून मिळणारी पाने कमी तिखट असतात. परंतु प्रतिकूल परिस्थितीत किंवा वातावरणात वाढलेल्या पान मळ्यातील पाने तिखट असतात असे आढळून आले आहे.

भारतातील राज्यांतील पानांच्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

१) महाराष्ट्र :

१) देशी पान - प्राचीन जात, पाने आकाराने सर्वसाधारण. मर रोगास बळी पडते.

२) कळी पान - हृदयाच्या आकाराची लांब, रुंद पाने, रंगाने गर्द हिरवी, चवीला तिखट, नवीन जात, मर रोगाला फारशी बळी पडत नाही, उत्तर भारतात प्रख्यात, पाकिस्तानात वाढती मागणी.

३) नालेकर पान - लांबलचक टोकदार आणि मध्यम जाडीची पाने. हेक्टरी उत्पादन कमी पण भाव जास्त.

४) बंगाली पान - लांब, रुंद, आणि मोठी पाने, पानाला शिरा अधिक प्रमाणात असतात. उत्पादन कमी, भाव सर्वसाधारण

५) कुऱ्हे पान - लांब निमुळते पान, चवीला मध्यम, अधिक उत्पादन देणारी जात.

२) आसाम -

२) आसाम :

१) खासी पान - अत्यंत कडक पान. सर्वसाधरण उत्पन्न देणारी जात.

२) असामी पान - मध्यम आकाराची पाने, चवीला सर्वसाधारण. सर्वसाधारण उत्पन्न देणारी जात.

३) साची पान - एक प्रकारचा सुवास असणारी मध्यम आकाराची पाने. सर्वसाधारण उत्पादन देणारी जात.

४) मिठा पान - मध्यम आकाराची गोड पाने, सर्वसाधारण उत्पन्न देणारी जात.

३) आंध्र प्रदेश -

कवतिक पान - अतिशय नाजूक आणि पातळ पाने, आकाराने मध्यम, सर्वसाधारण उत्पन्न देणारी जात.

४) पश्चिम बंगाल -

१) भूसना पान - आकाराने मध्यम आणि चवीला चांगली. सध्या 'बंगला पान' ओळखले जाते. मर रोग प्रतिबांधक भारतात सर्वांत प्रसिद्ध असे पान.

२) ढोलडोगा पान - आकाराने मध्यम, पूर्वी प्रसिद्ध होते. मर रोगाला बळी पडते.

५) उत्तर प्रदेश -

१) देशी देवतारी पान - पातळ, लांबलचक, टोकदार आणि की तंतुमय पाने, शिरा रंगाने तांबूस, खाण्यासाठी सर्वोत्तम पाने.

२) देशी बंगला पान - जाड, रुंद आणि टोकदार पाने. पानात मसाला न घालता खाल्ल्यास तिखट लागते.

३) कपुरी पान - मध्यम जाड, देशी बंगला पानापेक्षा तिखट. उत्पादन चांगले, परंतु कमी प्रतीची असल्यामुळे भाव कमी.

४) कलकत्ता बंगला पान - मध्यम जाड, निमुळती लसणासारखी तिखट पाने. पाने चावत असताना तोंडात अधिक चोथा राहतो.

५) महोबा पान - पानावेलीच्या सर्व जातींमध्ये महोबा पान लांबलचक, रुंद, जाड आणि तंतूमय असते. कोवळे पान थोडेसे तिखट परंतु तयार झालेले पण फारसे तिखट लागत नाही. अधिक उत्पादन देणारी पानाची जात.

६) मधाई पान - पान लहान, कमी तंतूमय, अगदी तयार झाले तरी लुसलुशीत असते. उत्कृष्ट जातीचे पान, ह्या जातीच्या पानालाच वाराणशी पान समजले जाते.

६) कर्नाटक :

१) कुंबाला वल्ली पान - आकाराने मोठी पाने, टिकाऊपणा सर्वसाधारण. कामगार वर्गाकडून मोठ्या प्रमाणात मागणी.

२) अंबाडी पान - अरुंद आणि लांबलचक पाने, कापरासारखी चव, अधिक टिकाऊ आणि चांगल्या प्रतीचे पान, उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध.

३) गंगेरी पान - मध्यम आकाराची, तांबूस शिंराची आणि चांगल्या चवीची पाने. कमी उत्पादन देणारी बेळगाव जिल्ह्यातील महत्त्वाची जात.

४) गिडगॅप पान - मध्यम आकाराची फिकट हिरवी पाने. बेळगाव जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात आढळतात.

७) तामिळनाडू -

१) रावेशी पान - लहान आणि पातळ पान. पूनमल्लाई विभागाच्या चिंगलपूर जिल्ह्यात लागवड आढळते.

२) कर्पुरा पान - मध्यम आकाराची सर्वसाधारण पाने. पूनमल्लाई विभागाच्या चिंगलपूर जिल्ह्यात आढळते.

३) कामेरा पान - अतिशय कडक, आकराने मोठी आणि तंतूमय पाने. चित्तूर, नेल्लोर आणि पूनमल्लाई विभागातील चिंगलपूर जिल्ह्यात आढळते.

४) मद्रास स्थानिक पान - मध्यम आकाराची, गडद, हिरव्या रंगाची खरबरीत पाने, ३ ते ४ दिवस टिकतात. वेळाळी पान ह्या नावाने ओळखले जाते. मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

५) मार पान - १५ ते १८ सें.मी. लांब आणि १० ते १२ सें.मी. रुंद मोठी पाने काळसर, खरबरीत आणि थोडीशी तिखट. ह्या जातीमध्ये गोलपूरी हा एक प्रकार आहे. काही भागात चवकाई ह्या नावाने ओळखली जातात. तामिळनाडू राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड. अधिक टिकाऊ पान. डिसेंबर ते जून ह्या काळात मागणी अधिक. उत्तर भारतात अधिक मागणी.

६) कपूरी पान - १८ ते २० सें.मी. लांब आणि १० ते १२ सें.मी. रुंद, पिवळसर, पांढरी किंवा काळापट आणि थोडीशी तिखट पाने, पेप्पाडा हा या जातीचा एक प्रकार आहे. या पानांना सतत वर्षभर मागणी असते. त्यातील पेप्पाडा प्रकाराला जानेवारी ते जुनपर्यंत मागणी असते. टिकाऊपणाचा काळ अधिक.

८) केरळ राज्य -

१) केरळ पान स्थानिक - आकाराने लहान, पातळ पाने. कमी उत्पादन देणारी जात, पालघाट जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड.

२) फुटकोटी पान - रुंद पानाची सुधारलेली जात. स्थानिक जातीपेक्षा उत्पादन अधिक, पालघाट जिल्ह्यात सर्वत्र आढळते.

३) नतनकोटी पान - लहान आकाराची मऊ पाने. स्थानिक लोकांकडून जास्त मागणी. सुपारीच्या बागेत अधिक लागवड. काझिकोडा जिल्ह्यात अधिक.

४) पुडूकोटी पान - रुंद आणि तंतूमय पाने, पॅक केली असता आठ दिवस राहू शकतात. काझिकोड जिल्ह्यात लागवड. उत्तर भारत व पाकिस्तानात जास्त मागणी.

हवामान : समशीतोष्ण कटिबंधातील जंगलाच्या भागामध्ये योग्य आणि पाणी पुरवठा, आर्द्रता आणि थंडगार सावली चांगल्या प्रमाणात असल्याने पानवेलीची वाढ चांगली होते. आसामच्या ईशान्य भागात, महाराष्ट्राच्या वसईच्या भागात आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पानवेलीला अनुकूल असे हवामान आढळते. म्हणून या भागात पानमळे अधिक प्रमाणात आढळतात. सुपारीच्या बागेत पानवेलीला आवश्यक असणारी सावली भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे सुपारीच्या बागेत मिश्रपीक म्हणून पानवेलीची लागवड केली जाते.

वरील तीन भाग सोडून भारताच्या सर्व भागात कृत्रिमरित्या निवारा, तापमान आणि पाणी ह्या बाबी निर्माण करून पानवेलीची लागवड केली जाते. २२५ ते ४७५ सें.मी. पाऊस पडणाऱ्या केरळ राज्यात पानवेलीचे मळे आढळून येतात. समुद्रसपाटीपासून ६६६० मीटर उंच असणाऱ्या आसाम आणि कन्नडा विभागातील घाटावर पान मळे घेतले जातात. मध्यम तापमान, भरपूर आर्द्रता आणि पुरेसा पाऊस ह्या भागात मिळतो.

आंबा, चिंच, नारळ पाम आणि इतर जंगली झाडे असणाऱ्या महारष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील वसईसारख्या भागामध्ये पानवेलीची लागवड केली जाते. ह्या भागातील लागवड अधिक कौशल्याने अतिशय आकर्षक वाटते. वसईच्या भागामध्ये २२५ ते २५० सें. मी. इतके पर्जन्यमान असते. उष्ण आणि सोसाट्याच्या वाऱ्याने पानवेलीचे शेंडे जळतात किंवा सुकतात आणि शेवटी पानवेल उभळते. अतिशय कमी तापमान असल्यास पानवेलीची पाने गळून पडतात. कृत्रिमरित्या निर्माण करून आर्दता आणण्याचा प्रयत्न करावा लागतो. उदाहरणार्थ ७५ ते १०० डी. सें.मी. वार्षिक पर्जन्यमान असणाऱ्या आणि १० डी. सें.ग्रे. पासून ४० डी. सें.ग्रे. तापमान असणाऱ्या आंध्र प्रदेशात पानवेलीची लागवड केली जाते. तसेच ३५ ते ६० सें. मी. पाऊस पडणाऱ्या आणि १५ डी. ते २५ डी. सें.ग्रे. तापमान असणाऱ्या कर्नाटक राज्यात सुद्धा पानवेलीची लागवड केली जाते. १७० सें.मी. वार्षिक पर्जन्यमान असणाऱ्या पश्चिम बंगाल राज्यात अतिशय आकर्षक अशी पानवेलीची लागवड दिसून येते. उत्तर प्रदेशात कृत्रिमरित्या पानवेलीला अनुकूल वातावरण निर्माण केले जाते.

जमीन - सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा असलेली सुपीक आणि उत्तम निचऱ्याची जमीन पानवेली ला उत्कृष्ट ठरते. क्षारांचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीवर पानवेलीचा लागवड अयशस्वी ठरते. भरपूर कसलेल्या किंवा नवीन तांबूस खडकाळ (लॅटराईट) जमिनीवर पानवेलीचे पीक घेतले जाते. केरळ राज्यातील समुद्र किनाऱ्यावरील पोयट्याच्या रेताड किंवा गाळाच्या जमिनीवर पानवेलीचे पीक घेतले जाते.

महाराष्ट्रातील वसई भागातील जमिनी पानवेलीच्या लागवडीस अतिशय उत्कृष्ट अशा आहेत. पश्चिम बंगालमधील पोयट्याच्या जमिनीची पानमळ्यासाठी निवड केली जाते.

योग्य जमीन व मिळाल्यास दुसऱ्या ठिकाणाहून माती आणून पानमळ्यासाठी ठेवलेल्या जमिनीवर टाकली जाते. महाराष्ट्राच्या पुष्कळशा भागात पानमळ्याला योग्य अशी जागा निवडली जाते. बाजूची माती टाकून मळ्याची जागा उंचावली जाते. नंतर ३० ते ४५ सें.मी. जाडीचा पोयट्याचा किंवा पांढऱ्या मातीचा थर दिला जातो. पानमळ्याच्या जमिनीची उंची आजूबाजूच्या जमिनीपेक्षा साधारणत: ५० सें. मी. पासून ९० सें. मी. पर्यंत चढविली जाते आणि त्यामुळेच पानमळ्याला योग्य असा निचर होण्यास मदत होते. सुपीक किंवा पोयट्याच्या आणि उत्तम निचऱ्याच्या जमिनीवर घेतलेल्या पानमळ्यापासून उत्तर प्रदेशात अधिक उत्पादन आल्याचे आढळून आले आहे. मध्य प्रदेशात तांबड्या पण भरपूर खोल जमिनीवर पानवेलीची लागवड केली जाते.

महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, अमरावती आणि इतर काही जिल्ह्यांत हलक्या तांबड्या किंवा मध्यम काळ्या जमिनीची पानमळ्यासाठी निवड केली जाते. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात जरी वेगवेगळ्या जमिनीवर पानवेलीचे पीक घेतले जात असले तरी पोयट्याच्या आणी सुपीक जमिनीवर पानवेलीचे उत्पादन ह्या राज्यात चांगले येते. कर्नाटक राज्यातील सुपीक पोयट्याच्या आणी तांबड्या जमिनी भरपूर खोल आणि उत्तम निचऱ्याच्या असतात. पानवेलीच्या यशस्वी लागवडीसाठी तांबडी पोयट्याची आणि रेताड जमीन चांगली ठरते.

फेरपालट आणी मिश्रपिके - पानमळ्याला दरवेळेला थोडे थोडे पाणी द्यावे लागत असते तरी ते सतत वर्षभर द्यावे लागते. म्हणून ज्याठिकाणी पानमळा १० वर्षे किंवा अधिक काळापर्यंत घेतला गेलेला असेल अशा जमिनींना विश्रांतीची किंवा एखाद्या पिकाच्या फेरपालटीची आवश्यकता अपरीहार्य ठरते. पानमळ्याची जागा बदलने फायद्याचे ठरते. एकाच प्रांतातील निरनिराळ्या भागांमधील हवामानात बरीचशी तफावत असल्याने ठराविक प्रकारची फेरपालट ठरविता येत नाही. निरनिराळ्या भागांमध्ये पानमळ्यानंतर घ्यावयाची फेरपालटची पिके वेगवेगळी असू शकतात.
पानमळा एकाच जागेवर बराच काळ राहत असल्याने व्यवस्था चांगली असावी लागते. म्हणून रेतीचे प्रमाण असलेली मध्यम जमीन पानमळ्यासाठी योग्य ठरते. जमीन भारी असल्यास पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था चांगली ठेवावी लागते.

पुर्वमशागत व खते: कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, आसाम आणि महाराष्ट्रासारख्या सपाट प्रदेशात निवडलेल्या जागेची नांगरणी आणी कुळवणी बऱ्याच वेळा करतात. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत जमीन माणसाच्या सहाय्याने खणून तयार केली जाते. नदीकाठचा अगर ओढ्याकाठचा पोयटा जमिनीवर टाकून त्याचा एक थर देतात. तसेच शेणखताचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात हेक्टरी ४५ गाड्या, विदर्भात हेक्टरी ६० गाड्या आणि मेंढ्या बसवून तितक्याच प्रमाणात म्हणजे हेक्टरी ६० गाड्या लेंडीखत दिले जाते. २ - ३ कुळवाच्या पाळ्यांची किंवा हाताने दिलेले खत मिसळले जाते.

पानमळ्यासाठी एकरी ७५ ते १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. खत हे फोकून न देता प्रत्येक वेलीलगत लागवडीवेळी आणि लागवडीनंतर १।। ते २ महिन्यांनी वेलीभोवती असे दोन समान मात्रेत द्यावे. वेगवेगळ्या भागात पानमळ्यासाठी जमिनी तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

आखणी : हवामान आणि जमीन यांच्या फरकाने सुद्धा पानमळ्यावर लागलीच परिणाम होतो. पानमळ्याचा योग्य आराखडा तयार करणे, त्यात योग्य त्या आधारासाठी बांबू किंवा इतर आधार लावणे, तसेच सावली तयार करणे, अनावश्यक पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे आणि पानमळ्याच्या सभोवार वाऱ्याचा वेग रोखण्यासाठी झाडे किंवा बांबूचा तट्ट्या लावणे ह्या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ह्याची व्यवस्था पानमळ्याच्या लागवडीअगोदरच व्हावी लागते.

सुपारीसारख्या बागांमध्ये पानवेलीचे पीक घेतले असेल तर सावली. निवारा आणि आधार ह्यांची गरज भासत नाही. मात्र जेथे अगदी सपाटीवर पनामळा घेतला जातो, तेथे या तीनही बाबी पानमळ्या ला पूर्ण मिळतील अशी व्यवस्था करावी लागते. पानमळ्यासाठी जमिनीची आखणी करण्याचे खूप प्रकार भारतामध्ये आढळून येतात. आणि त्यापैकी बरेचशे जुन्या रूढीनुसार पडलेले आहेत. भारतातील काही प्रमुख राज्यात पानमळ्यासाठी रान तयार करून त्याची आखणी करण्या चे (layout) प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

* महाराष्ट्र :

१) वसई (ऑक्टोबर - नोव्हेंबर) : निवड केलेल्या जमिनीवर प्रथमत: पाण्याचे मुख्य पाट आणि चर उघडले जातात. त्यानंतर त्यांचे उप - पाट आणि उप - चर तयार केले जातात. दोन पाटांतील अगर दोन चरांतील अंतर साधारणत: ४ मीटर असते. पुणेरी पानमळ्याच्या लागवडीप्रमाणेच करतात.

२) सातारा, सांगल, कोल्हापूर, नगर, पुणे - एक एकराचे रान समान चार भागांत विभागतात, प्रत्येक चतकोर भागाला चौक असे नाव देतात. हे चार भाग १ मीटर रुंदीच्या रस्त्याने विभागले जातात. प्रत्येक रस्त्याला पाथ असे म्हणतात. प्रत्येक चौकाचे समान दहा भाग करतात. ह्या प्रत्येक भागाला चिरा म्हणतात. प्रत्येक चिऱ्यामध्ये १.० x १.५ मी. आकाराचे १२ उभे आणि ६ आडवे असे १८ सपाट वाफे असतात. प्रत्येक चौकाला प्रत्येक चिऱ्याला, आणि प्रत्येक वाफ्याला पाण्याचे स्वत्रंत्र पाट आणि त्यांचा निचरा होण्यासाठी स्वतंत्र असे चर ठेवलेले असतात. वेलींच्या आधारासाठी शेवरी आणि पांगारा ह्या झाडांची निवड केली जाते. काही भागात शेवग्याची देखील निवड (लागवड) केली जाते. वाफ्याच्या लांबीस अनुसरून शेवरीचे बी दाट पेरतात. मधून - मधून पांगाऱ्याचे तुकडे देखील लावतात. ही लागवड जून महिन्यात केली जाते. तसेच अधून - मधून केळीचे कंद लावले जातात आणि मळ्याच्या सभोवार तुतीची दाट लागवड केली जाते. काही वेळा बांबूचा तट्ट्या बसविला जातो.

ह्या पद्धती प्रमाणेच लांब वाफा आणि चर पद्धत, आखुड वाफे पद्धत, चर आणि सरी पद्धत, आखुड वाफे पद्धत, चर आणि सरी पद्धत अशा अनेक पद्धती आहे. बेळ्गाव विभागांतील सपाट वाफे पद्धत अहमदनगर पद्धतीप्रमाणे आहे. ह्या बेळगाव पद्धतीत ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यांत लागवड केली जाते.

लागवडीचा हंगाम: पानवेलीची लागवड मुख्यत: तापमान आणि पाऊस ह्या दोन बांबीवर अवलंबून असते. लागवडीच्यावेळी दमट आणि थंड हवामान लागते. अतिशय थंड हवामान असल्यास पानवेलीचे वेल लवकर फुटत नाहीत. पानवेलीला लागवडीनंतर थोड्या - थोड्या अंतराने सतत थोडे - थोडे पाणी द्यावे लागते. परंतु मोठ्या प्रमाणावर सतत पाणी दिल्यास वेल कुजण्याची शक्यता असते. पाऊस आणि तापमान ह्या दोन्ही बाबी अनुकूल असतील अशा वेळी लावलेल्या आधाराच्या झाडाच्या वाढीवरून लागवडीची वेळ ठरविली जाते. सुपारीच्या बागेत किंवा कृत्रिमरित्या रोवलेले खांब असतील तर लागवड लवकर होऊ शकते.

ह्या सर्व बाबीचा सारासार विचार करून मान्सून पावसाच्या सरी सुरू झाल्याबरोबर सुपारीसारख्या बागेत पानवेलीची लागवड सुरू होते. केरळ, आसाम आणि कर्नाटक राज्याच्या काही भागात मे - जून महिन्यांत पानवेलीची लागवड केली जाते.

महाराष्ट्रातील दक्षिणेकडील काही जिल्हे, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याचे काही जिल्ह्यांतून ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये पानवेलीची लागवड करतात. कर्नाटक राज्याच्या काही भागात जेथे भातानंतर पानवेलीचे पीक घेतले जाते, अशा ठिकाणी ऑक्टोबर महिन्यातच लागवड केली जाते. उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मान्सूनचा पाऊस उशीरा पडतो आणि कडक थंडी लवकरच सुरू होते म्हणून पानवेलीची लागवड एप्रिल - मे महिन्यातच केली जाते. एकंदरीत पाहता लागवडीचा हंगाम मे - जूनमध्ये सुरू होतो आणि पुढीलवर्षी मार्च - एप्रिलमध्ये संपतो.

* लागवडीसाठी बियाण्यांची निवड - जुन्या पानमळ्यातील पानवेलीचे शेंड्याकडील तुकडे लागवडीसाठी निवडतात. शेंड्याकडील तुकड्यावरील डोळे लागवडीनंतर लवकरच फुटतात. म्हणून ते लागवडीसाठी योग्य समजले जातात. केरळ, कर्नाटक आणि आसाम राज्यातील काही भागात बियाण्याच्या तुकड्यांची लांबी सर्वसाधारणपणे ४५ सें. मी. पेक्षा जास्त असते. आंध्रप्रदेश महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागात ही लांबी ३० ते ४५ सें. मी. तर उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये ही लांबी अवधी २० ते २५ सें. मी. इतकीच असते. लागवडीची पद्धत आणि दोन वेलांतील अंतर यामुळे तुकड्यांच्या लांबीत फरक आढळून येतो.

लागवडीची पद्धत - पानवेलीच्या शेंड्याच्या बाजूकडील आणि जोमदार वाढणाऱ्या डोळ्यांचे थोडेसे तंतूमय असलेले तुकडे लागवडीसाठी निवडतात. निवडलेल्या तुकड्यांचा अर्धा भाग आधाराकडे वर ठेवून खालचा अर्धा भाग आधाराकडे वर ठेवून खालचा अर्धा भाग आधारासाठी लावलेल्या झाडांच्या बुंध्याजवळ जमिनीत गाडावा. वेलाचा निवडलेला तुकडा लांब असल्यास त्याचे वर्तुळाकार वेटोळे करून ते जमिनीत गाडावे आणि शेंड्याकडील थोडासा भाग आधारावर सोडावा. लागवडीपूर्वी एक हलकेसे पाणी देऊन जमिनीस वापस आल्यावर लागवड करावी. महाराष्ट्राच्या वसईसारख्या भागात मर रोगाचा उपद्रव होण्याची शक्यता असते. म्हणून पाण्यात विरघळणारे मोरचूद हेक्टरी २५ किलो या प्रमाणात पाण्याबरोबर द्यावे. बियाण्यास मुळे लवकर फुटून बियाणे जमिनीत लवकर रुजण्यासाठी आसपासची सर्व माती हाताने चांगली दाबून घ्यावी. बियाणे जमिनीशी एक रूप झाले नाही तर शेंड्याकडील कोवळी पाने गळून पडतात आणि मूळधारणा लवकर होत नाही. म्हणून लागवड झाल्याबरोबर प्रथम वेलाजवळ हाताने पाणी शिंपपडावे अगर झारीने घालावे. नंतरचे पाणी मात्र ठरलेल्या पद्धतीनुसार वेळेवर द्यावे.

बेणे प्रक्रिया : १०० लि. पाण्यात १ लि. जर्मिनेटर आणि ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट या प्रमाणात द्रावण तयार करून त्यामध्ये बेणे पुर्णपणे बुडवून लागवड करावी. म्हणजे फुट लवकर व जोमाने होऊन मर, मुळकूज रोगास प्रतिबंध होतो.

आंतरमशागत : लागवडीनंतर २१ दिवसांनी बियाण्याला मुळे फुटण्यास सुरुवात होते आणी एक महिन्याच्या अवधीत वेलींना पाने फुटू लागतात. वेलांना मुळे फुटून ते वाढीला लागल्यावर माहितगार, माणसाकडून त्यावर सतत लक्ष ठेवले पाहिजे. पानवेलीच्या आधारासाठी लावलेल्या झाडांची छाटणी करणे, मोकळ्या झालेल्या जागांवर प्रत वेळ लावणे, पिकांस खत देणे, वेळेवर पाणी देणे आणि जादा झालेल्या पाण्याचा निचरा करणे ही प्रमुख कामे आंतर मशागतीत मोडतात तसेच वर्षाच्या शेवटी वेल खाली उतरून जमिनीत पुरणे आणि वेळोवेळी खुडणी करणे ही कामेसुद्धा आंतरमशागतीत मोडतात. आंतरमशागतीची कामे खालीलप्रमाणे आहेत.

१) आधारासाठी लावलेल्या झाडांची निगा: सपाटीवरील आणि मध्यभारतातील बऱ्याचशा भागात शेवरी, पांगारा आणि शेवगा यासारखी झाडे आधारासाठी लावली जातात. या झाडांपासून मिळणारा पाला जनावरांना खाण्यासाठी उपयुक्त ठरतो. आधारासाठी वापरावयाच्या झाडांचे बी सुरूवातीलाच दाट पेरावे आणि नंतर आवश्यक असणारी झाडे योग्य त्या अंतरावर ठेवून बाकीची विरळणी करून काढून टाकावीत. सुरूवातीच्या दोन वर्षाच्या काळातच शेवरीचा आधार टिकतो. त्यानंतर हळुहळू वाढणाऱ्या पांगऱ्याचा आधार पानवेलींना पुरेसा होतो. पांगाऱ्याचे बी उगवले नाही तर पांगाऱ्याचे वाढीला लागलेले तुकडे लावले तरी चालतात. वेळ वाढीला लागून आधारावर चढण्यास सुरुवात होण्याच्या वेळी आधाराच्या झाडांच्या १.५ ते १.८ मीटर उंचीवरील सर्व फांद्या काढून टाकून आधार सफाईदर ठेवावा. झाडांची पूर्ण वाढ झाल्यावर ३.६० ते ४.५० मीटर उंचीवर आधाराचे शेंडे छाटले जातात. निर्जीव आधाराचा उपयोग केलेला असल्यास छाटणी करणे, शेंडे तोडणे याचा प्रश्न उद्भवत नाही.

२) पाण्याचे प्रमाण आणी निचरा : पानमळ्या सतत ओलावा लागतो. परंतु अधिक पाणी किंवा कोरडेपणा पानवेलींना सहन होत नाही. म्हणून सततच्या व जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे निर्माण झालेली दलदल कमी करण्यासाठी शेताचे सभोवार चर काढून तसेच पावसाळ्यात ठेवलेले चार थोडेसे उकरून घ्यावेत. नियमित काढलेले चर सभोवारच्या चारांना जोडल्यास पाण्याचा निचर व्यवस्थित आणी झटकन होतो. पानमळ्यातील प्रत्येक वाक्यात फक्त एक तास थांबेल इतकेच पाणी द्यावे. पाणी नेहमी सकाळच्यावेळी द्यावे.

जमिनीचा प्रकार, हवामान आणि पानमळ्याची रचना ह्यावर पाण्याचे प्रमाण आणि दोन पाळ्यांतील अंतर अवलंबून असते. पावसाळ्यात आवश्यकतेनुसार जमिनीतील ओलीनुसार पाणी दिले जाते, तर हिवाळ्यात पाण्याच्या पाळ्यांतील अंतर साधारणपणे ८ ते १० दिवस असते. उन्हाळ्यात हे अंतर अगदीच कमी म्हणजे ३ ते ४ दिवस इतके असते.

३) खुरपणी, माती लावणे आणि आधारावर वेल चढवणे.

लागवडीनंतर एक महिन्यातच वेलींना मुळे फुटून ती वाढीला लागतात. अशावेळी त्यांना आधारावर चढण्यास वळण लावणे अतिशय महत्त्वाचे असते. वेल केळीच्या सोपटाने प्रत्येक १५ ते २५ सें.मी. अंतरावर बांधावेत. थोडासा आधार मिळाल्यावर तेथेच तंतूमयमुळे फुटून वेल आधारावर घट चिकटतात आणि वर चढण्यास सुरुवात करतात. वेळच्या वाढीनुसार १५ ते २० दिवसांनी वेल बांधणीची वेळ ठरवावी. तण वाढलेले असल्यास अगर चिकणाई प्राप्त झाली असल्यास जरुरी प्रमाणे खुरपण्या देऊन पानमळा स्वच्छ ठेवावा लागतो.

४) पानवेलीची उतरण - वर्षभरात साधारणत: तीन मीटरपर्यंत वेलांची वाढ होते. त्यानंतर वेलीवर मिळणाऱ्या पानांचे आकारमान आणि प्रमाण कमी होते. त्यामुळे वेलीची उतरण करणे महत्त्वाचे ठरते. म्हणून एक वर्षे पूर्ण झाल्यावर वेल आधारावरून काढून त्याची गोलाकार किंवा इंग्रजी आठ (8) ह्या आकाराची वेटोळी तयार करून परत आधारासाठी लावलेल्या झाडाजवळच अर्धवट जमिनीत पुरतात. प्रत्येक वेळी वेटोळे पुरण्याची जागा त्याच झाडाजवळ बदलावी लागते. उतरण करण्यापूर्वी शेंड्याकडील अतिशय कोवळी पाने ठेवून बाकीची सर्व पाने तोडतात. भारतातील पुष्कळ भागांमध्ये उतरणीच्यावेळी पानमळ्याला खत देऊन त्याची खांदणी केली जाते व जमीन परत व्यवस्थित बांधली जाते. उतरण झाल्याबरोबर पानमळ्याला हालकेसे पाणी द्यावे लागते. पानवेलीच्या उतरणीला हुशार आणि अनुभवी माणूस लागतो. म्हणजे पानवेलीचा नाश न होता वेलींची उतरण व्यवस्थित केली जाते.

भारताच्या काही भागांमध्ये उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा असतो. वेल मोठे वाढल्यास त्याला अधिक पाणी लागते. पूर्ण वाढ झालेल्या वेलांना उन्हाळ्यात तीन दिवसांच्या अंतराने पाणी लागते. पाण्याच्या कमतरते मुळे अधिक पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. म्हणून अशा वेळी उतरण करणे फायद्याचे ठरते. पानमळ्यातून मिळणारे उत्पन्न पानवेलींच्या संख्येवर आणि त्यापासून फुटणाऱ्या फांद्या वर अवलंबून असते. नवीन पानमळ्यात बियाण्यापासून फक्त एकच वेल येतो. उतरण केल्यास वेटोळ्याला जोमदार मुळे फुटून त्याला अनेक फुटवे फुटतात आणि एकाहून अधिक वेल आधाराकडे वाढण्यास सुरुवात होत. त्यासाठी उतरण ही एक अत्यंत महत्त्वाची मशागत आहे. पानवेलीच्या उतरणीची वेळ बहुतांशी पावसावर अवलंबून असते. भारतात निरनिराळ्या प्रांतात वेगवेगळ्या वेळी उतरण केली जात. मान्सून पावसाळ्याच्या सुरुवातीला उतरण केली जाता नाही. वसंत ऋतूमध्ये पानवेलीची उतरण करणे चांगले समजले जाते. महारष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत एप्रिल - मे महिन्यांत पानवेलींची उतरण केली जाते. केरळ राज्याच्या काही भागात ऑगस्ट - सप्टेंबर मध्ये उतरण केली जाते. उतरण केल्याने जमिनीतून अन्नांश घेण्यासाठी पानवेलीला भरपूर मुळे फुटतात. वेल जोमात वाढतात तसेच परत आधारावर चढून जाण्यासाठी पहिल्या वर्षाप्रमाणे वेल बांधावे लागतात. वेल अधिक उंच गेल्यामुळे वेलावरील पाने काढणे अवघड होते. दक्षिणेच्या भागात वेलांची वाढ रोखली नाही तर वादळी पावसाने पानमळेच धोक्यात येतात.

कीड आणि रोग - पानवेली ही अतिशय नाजूक वनस्पती आहे. खालील काही किटकांचा पानवेलीला उपद्रव होतो.

१) टिंब्या (Betelvirne Bug) - पानवेलीच्या अगदी शेवटच्या अवस्थेत ह्या किडींचा उप्रद्र्व दिसून येतो.

२) ढेकण्या (Mealy Bug) - 'टिंब्या' किटकांप्रमाणेच ही उपद्रवकारी कीड आहे. वेळीच उपाययोजना केली नाही तर पानवेलीच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसून येतो. या किडीच्या बंदोबस्तासाठी स्प्लेंडर २० मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅम १० लि. पाण्यात मिसळून पानवेली वर फवारावे.

पानवेलीवर वरील किडींशिवाय खालील काही रोगांचाही प्रादुर्भाव दिसून येतो.

१) मर रोग (Foot Rat) - या रोगात 'फायटोप्थोरा' नावाच्या बुरशीमुळे पानवेलीच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडतात. २ - २ - ५० च्या बोर्डो मिश्रणाची किंवा ५०% ताम्रयुक्त बुरशीनाशके ५०० ग्रॅम २०० लिटर पाण्यात मिसळून त्या मिश्रणाने जमीन निर्जंतुक करावी.

२) पानकुजव्या (Leaf Rot) - हा रोग 'फायरोप्थोरा' ह्या वनस्पतीजन्य बुरशीमुळे होतो. पानवेलीवर हा रोग पावसाळ्यात दिसून येतो. या रोगामुळे वेलीची जमिनीलगतची पाने वर्तुळाकार ठिपके पडून कुजतात व गळून पडतात.

रोगट पाने वेचून जाळून टाकावीत. लागवडीपूर्वी बेणे एक तास अगोदर २ - २ - ५० च्या बोर्डो मिश्रणात बुडवावे व नंतर लागवड करावी. तसेच पानवेलीवर ह्या मिश्रणाची फवारणी करावी.

३) भुरी (Powry mildew) - हा रोग वेलींच्या पानावर ओआडीयम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पानाच्या दोन्ही बाजूस पांढरट करड्या रंगाचे ठिपके पडतात. ते सर्व पानांवर पसरतात. कालांतराने पाने गळून पडतात. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हार्मोनी १.५ ते २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

४) मूळकुजव्या (Sclerocium Root Rot) - वेलीच्या बुंध्याजवळ स्क्लेरोशियम नावाची पांढरी बुरशी पसरते. त्यामुळे वेल कोमेजते, वेलीचा बुंधा आणि मुळे सडतात व वेल मरते.

५) पानावरील ठिपके - (Colletotrichum capsici) - या रोगात पानांवर पिवळसर रंगाचे वलय भुरकट असणारे करड्या किंवा काळसर रंगाचे ठिपके पडतात. पानांवरील ठिपक्यांचा भाग जळून जातो.

पानवेलीवर कुमार एलू - ०.२०% किंवा बाविस्टीन ०.१०% किंवा ब्लायटॉंक्स ०.४० % किंवा हार्मोनी २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

६) पानावरील टिब्का आणि मुळे कुजणे - पावसाळयाच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर हे रोग आढळून येतात. उपाय झालेले वेल, पाटाचे पाणी, चिखल अगर भरखातांद्वारे ह्या रोगाचा प्रसार होतो. कोवळे धुमारे सुकणे, पानवेलीवरील पाने गळून पडणे आणि वेल कुजण्यास सुरुवात होणे, ही या रोगाची प्रमुख लक्षणे होत.

वरील कीड - रोगांस प्रतिबंधात्मक अथवा नियंत्रणासाठी तसेच पानवेलीस फुटवे निघून वाढ जोमाने होण्यासाठी व व पानांचे उत्पादन, दर्जा वाढीसाठी पुढीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या कराव्यात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.

४ ) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ७० ते ७५ दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ४०० मिली. + २५० लि.पाणी.

यानंतर फवारणी क्र. ४ च्या प्रमाणे दर १५ ते ३० दिवसांच्या अंतराने फवारणी करणे. म्हणजे पानांचा दर्जा, तोडे व उत्पादनात खात्रीशीर वाढ होईल.

पानांची तोडणी, प्रक्रिया आणि विक्री - योग्य पद्धतीने लागवड करून उत्तम प्रकारे काळजी घेतल्यास आणि अनुकूल हवामान मिळाल्यास उत्तम प्रकारची पाने मिळण्यास लवकर सुरुवात होते. बाजारातील मागणीनुसार पानांच्या तोडणीची वेळ ठरविली जाते. महाराष्ट्र राज्यात वसईसारख्या भागात, केरळ आणि आंध्रप्रदेशात पानवेलीचे आयुष्यमान कमी असते. म्हणून पानांची तोडणी ३ ते ६ महिन्यापासून सुरू होते.

भारताच्या इतर भागात मात्र लागवडीनंतर एक वर्षानंतर पानांची तोडणी सुरू होते. एकदा पानांची तोडणी सुरू झाली की आठवड्यातून एकदा अगर दोनदा बाजारपेठेतील मागणीनुसार तोडणी केली जाते. पानाच्या दोन तोडण्यातील अंतर १५ दिवसांपासून असते. पानवेलींची उतरण होईपर्यंत तोडणी चालू राहते. पानवेलीच्या मुख्य फांद्यावरील पाने उत्तम प्रतीची असतात. तर उपफांद्यावरील पाने थोडीशी कमी प्रतीची असतात. म्हणून तोडणी करताना दोन्ही प्रकारची पाने वेगवेगळ्या वेळी तोडली जातात. पानांची तोडणी करणारा माणूस उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये पोलादी नख बसवितो आणि तिच्या सहाय्याने तोडणी करतो. बऱ्याचशा भागात उजव्या हाताच्या अंगठ्याचे नख वाढवून त्याच्या सहाय्याने तोडणी केली जाते. वेलीवरील पाने देठासह तोडली जातात. तोडणीनंतर पानांची प्रतवारी केली जाते आणि त्यानुसार पानांचे गड्डे वेळीच्या सोपटाने बांधले जातात.

उत्पादन : पानमळा लागवडीनंतर पहिल्या वर्षी पानाचे उत्पन्न कमी मिळते. ते पानमळ्याच्या मध्यकालावधीपर्यंत वाढत जाते आणि त्यानंतर शेवटपर्यंत कमी कमी होत जाते. पश्चिम बंगालमध्ये एक हेक्टर पानमळ्यापासून दोन कोटी इतकी पाने मिळतात. तर आसाम, आंध्रप्रदेश, महाराष्ट्राचा वसई - कोल्हापूरचा भाग, केरळ आणि कर्नाटक राज्याच्या काही भागात एक हेक्टर पानमळ्यापासून ५० ते ७५ लाख पाने मिळतात. महाराष्ट्राच्या वसई भागात पानमळ्याचे आयुष्यमान २ ते ३ वर्षे इतकेच असते, तर नगर, सातारा आणि पुणे विभागात पानमळ्याचे आयुष्यमान ६ ते १० वर्षापर्यंत असते. आंध्रप्रदेशात पानमळा १० वर्षापर्यंत टिकतो.

पानांची विक्री - पानवेलीपासून तोडलेली पाने निरनिराळ्या आडत्यांच्या किंवा दलालांच्या मार्फत सामान्य माणसांपर्यंत अतिशय पद्धतशीर रितीने जातात. मुंबई, पुणे मद्रास, दिल्ली आणि कलकत्ता यासारख्या मोठ्या शहरांतील ठोक मालाचे व्यवहार करणारे (Whole Salers) व्यापारी पानमळ्याच्या परिसरात असणाऱ्या आपल्या दलालांकडून पानांचे भाव तेजीत असताना पाने मागवून घेतात व योग्य ते कमिशन घेऊन ती पाने इतर लहान व्यापाऱ्यांना विकतात. हे लहान व्यापारी कर वगळून, स्वत: चा फायदा पाहून, पानांवर प्रक्रिया करून किंवा तशीच पाने गिऱ्हाईकांना विकतात. पानमळ्यांच्या परिसरातील काही स्थानिक व्यापारी पानांची तपासणी आणि प्रतवारी करून पाने शहरातील मोठमोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. तोडलेली पाने जास्त दिवस टिकाव धरू शकत नाहीत. म्हणून ती ताबडतोब मोठ्या शहरांत पाठविली गेली पाहिजेत. अगदी थोड्या अंतरावर पानांची ने - आण करण्यासाठी बैलगाडीचा किंवा ट्रकचा वापर केला जातो. परंतु अधिक अंतरावर पानांची वाहतूक करण्यासाठी विमानांचा वापर अगदी कमी प्रमाणावर केला जातो. आंध्रप्रदेश, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधून अशा रितीने मुंबई, मद्रास पुणे, कलकत्ता, हैद्राबाद अशा मोठ्या शहरांत पानांचा व्यापार चालतो.