३० वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १ एकरातून दरवर्षी २ लाखाहून अधिक उत्पन्न घेणारा अल्पभूधारक समाधानी शेतकरी

श्री. नारायण नामदेव जमदाडे,
मु.पो. लिंब, ता.जि. सातारा.



माझ्याकडे मुरमाड पद्धतीची १ एकर जमीन असलेला अल्पभूधारक शेतकरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा गेली ३० वर्षापासून सातत्याने वापर करून वर्षाला २ लाख रुपयाहून अधिक उत्पन्न मिळवून बहु सुखी आहे. दरवर्षी मेथी, शेपू, लाल पोकळा अशा भाज्यांचे ५ - ५ गुंठ्याचे प्लॉट करतो, तर १ महिन्यात १० ते १५ हजार रूच चे उत्पन्न मिळते. पालेभाज्यांचे पीक काढल्यावर त्या जमिनीत काकडी लावतो. काकडीनंतर स्वीटकॉर्न मका, कलिंगड, खरबुज, दोडका, कारली अशी पिकांची फेरपालट करतो. काकडी बाराही महिने असते.

मागे १० वर्षापुर्वी १।। गुंठे काकडी केली होती, तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १ टन माल निघाला होता. ती १० रू. ने गेली होती, तर २।। महिन्यात १० हजार रू. झाले होते . ४० दिवसात काकडी चालू होते. दररोज तोडा करतो. २ क्रेट काकडी सातारा मार्केटला पत्नी विक्रीम घेऊन गेली तर २ - ३ तासात १००० रू. आणते. पहाटे ५ ला मार्केटला माल नेला की पहाटे झुंजुमुंजूलाच विकला जातो. पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत हे मार्केट चालते अशी साताऱ्यातील 'शेतकरी - मंडई' आहे. परगावचे शेतकरी तेथे येऊन स्वत: भाजीपाला केवट्यांना थेट विकतात. केवट्यांना तेथे माल घेतल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी माल विकू दिला जात नाही. असे शेतकऱ्यांसाठी सुरक्षित मार्केट आहे. ही एक चांगली गोष्ट आहे.

आमच्या काकडीचा टेप्मो मंडईत गेला की लोक म्हणतात, 'काकडीवाले आप्पा आले. ' तशी काकडी अनेक ठिकाणाहून तेथे येते, मात्र आमची कायम बारमाही काकडी मार्केटला जाते व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने इतरांपेक्षा दर्जा अतिशय उच्च प्रतीचा असतो. त्यामुळे घेणारे काकडी खरेदीस धावत येतात. ४० रू. च्या खाली काकडी विकली जात नाही. क्वचित २० रू. ने जाते तर जास्तीत जास्त ६० ते ८० रू. किली दराने आपली काकडी विकली आहे. स्वीटकॉर्न मका हात विक्रीने १० रुपयाला कच्चे एक कणीस जाते. स्वीटकॉर्न चा दर्जाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चांगला मिळतो. एका झाडावरून २ जाड मोठी कणसे मिळतात.

मला एकच मुलगा आहे. तो कंपनीत कामाला जातो. आम्ही पती - पत्नी व सुनबाई ही १ एकर शेती करतो. मजूर लावत नाही. सुनबाई एकटी आमच्या दोघांएवढे काम करते. मी जातीने भोई असून कृष्णा नदीवरून मासे पकडण्याचा व्यवसायही करतो. संध्याकाळी १ तासभर नदीत जाळं टाकले की, ५ - ६ किलो ताजे मासे मिळतात. शेतातील उत्पन्न चालू होण्यास वेळ असला की, संध्या काळी १ तासभर नदीवर जाळे लावले की, २०० - ३०० रू. चे मासे मिळतात. मळे, कोकशी, खडशी, चिलाब, वांब यापाकारातील मासे असतात. मासे स्वत: पकडत असल्याने घरच्या भाजीचे टेन्शन नसते. एरवी पाहुणे आले तरी काय भाजी करायची ही समस्या असते तेव्हा माशांचे कालवण पाहुणे मंडळी आवडीने खातात. माझे सध्या वय ६८ असून कोणतीही व्याधी नाही. गुडघे कधीच दुखत नाही. अजून शेतीत जोमाने काम करतो. १ गुंठ्यात सिमेंटचे ४ खोल्यांचे घर बांधले आहे. वर पत्रा आहे. स्वतंत्र संडास, पाण्याची टाकी आहे. लिंब गावाला जवळच कृष्णा नदी असल्याने पाण्याची टंचाई नसते. आज सरांनी मला आल्याचे पुस्तक भेट दिले आहे. सरांच्या मार्गदर्शनानुसार आता १० गुंठे आले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने करणार आहे.