शेवग्याच्या अनेक समस्यांवर उपाय !

डॉ. अप्पाराव विश्वनाथ बिरादार (BAMS),
मु.पो. घोडनदी, ता. शिरूर, जि. पुणे.
मोबा. ९५५२०९८५८४आम्ही ३ वर्षापुर्वी कोईमतूर -१ वाणाचा शेवगा लावला आहे. जमीन हलक्या प्रतीची असून १३% चुनखड आहे. या जमिनीत लागवड १०' x ८' वर आहे. पाणी बोअरचे पाटाने आवश्यकतेनुसार देत असतो.

या शेवग्याचे उत्पादन घेत असताना आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेंगा लागतानाच खालील टोकाकडून सुकतात. त्याला होल पडते. त्यातून मग डिंक बाहेर येतो. लागलेल्या शेंगा वाकड्या जांभळ्या काळ्या होतात. खोडकीड लागते. त्यातूनही डिंक बाहेर येतो. अशा एक न अनेक समस्यांवर अनेक उपाय करूनही मार्ग निघत नाही. तेव्हा डॉ.बावसकर सरांचे शेवग्यावर फार मोठे काम असल्याने खास सरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी पुण्याला आलो आहे.

वरील परिस्थिती सरांना सांगितल्यानंतर सरांनी सांगितले "तुमचा प्लॉट आहे तेथील परिस्थिती दुष्काळी, पाट पाणी, जमिनीची पाणीधारण क्षमता कमी, जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक या कारणांमुळे ही वरील समस्या उद्भवत आहे. तेव्हा प्रथम अशा जमिनीतील क्षार कमी होण्यासाठी पावसाळ्यात धैंच्या लावून तो फुलावर येताच (फुले दिसण्यास सुरुवात झाल्याबरोबर) कापून जागेवर जमिनीत गाडावा. असे किमान २ - ३ वेळा करणे गरजेचे आहे. म्हणजे क्षार कमी होतील. तसेच प्रेसमड केकचा वापर करावा. कारण त्याचा सामू हा ४.५ ते ६ असतो. म्हणजेच आम्लधर्मीय असल्याने जमिनीतील क्षार कमी होतील.

पाणी देण्याची पद्धत सरांनी विचारल्यावर आम्ही सांगितले, आळे भारून पाणी देतो तेव्हा सरांनी सांगितले हे चुकीचे आहे. शेवग्याला अशा परिस्थितीत १० ते १२ दिवसांनी पाणी द्या. पाणी देण्याची वेळही उन्हाळ्यात सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत आणि थंडीत सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतची असावी. पाणी देतान खोड भिजणार नाही असे पहावे. यासाठी खोडाचा दंड कोरडा ठेवून त्याच्या शेजारील दुसऱ्या दंडाने पाणी द्यावे. पांढऱ्या मुळीचा जारवा वाढण्यासाठी जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करावे. कल्पतरू अर्धा ते १ किलो/झाड वापरावे.

शेवग्याला पाणी दिल्यानंतर चुनखड जमिनीच्या विशिष्ट वासाने खोडकीड लागते. हे साधारण शेवग्याचे खोड पोटरीच्या जाडीचे असताना घडते. याला क्लोरोपायरीफॉस वापरूनाही खोडकीड आटोक्यात येत नाही. यावर सरांनी सांगितले, "वाळू पाण्यात भिजवून ती फॉलीडॉलमध्ये किंवा क्रुडऑईलमध्ये किंवा प्रोटेक्टंटमध्ये बुडवून ती खोडकिडीने केलेल्या होलात तारेच्या सहाय्याने घालून वरून शेण व मातीने छिद्र बंद करावे. त्याने खोडकीड आटोक्यात येईल." आम्ही थायमेट वापरले तरी तिचे नियंत्रण झाले नाही. यावर सरांनी सांगितले, "थायमेटचा वास जमिनीत ३ फूट खोल जातो व हुमणी ५ फूत खोल जाते. याकरिता हुमणीच्या नियंत्रणासाठी आम्ही सुचविलेला सुकटीचा/झिंग्याचा प्रयोग डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कृषी मार्गदर्शिकेत पान नं. १४ वर दिल्याप्रमाणे करावा.

शेवग्याला साधारणपणे भाद्रपद व फेब्रुवारी, मार्च अशी वर्षातून २ वेळा फुले भरपूर लागतात. यासाठी शेवग्याची छाटणी १ महिनाभर अगोदर करावी. हे करताना शेंडे क्रॉस छाटून त्यावर जर्मिनेटर, प्रोटेक्टंट व शेणाचा गोळा लावावा. भाद्रपद महिन्यात लागलेल्या फुलांना थंडीत भरपूर शेंगा लागून थंडीत शेंगांना ५५ ते १०० रू./किलो भाव मिळतो. मार्केटचा अभ्यास करून भावाचा अंदाज घेऊन मग माल पाठवावा. अनुभव असा आहे की, शिरूर, दौंड तत्सम अशा खेडेगावात हात विक्रीवर शेवग्यास दुप्पट भाव मिळतो.

हलक्या जमिनीत मुळे उथळ असतात. शेंगांच्या ओझ्याने झाडाच्या फांद्या मोडून नुकसान होते. म्हणून खोडाला डेंग्य लावाव्यात किंवा बहार आल्यावर चारीबाजूने झाडाला माचनाप्रमाणे तंगुसाने अथवा बांधकामाच्या बाईडिंग वायरने बांधावे. खारवट जमिनीत लसूण, कांदा, ऊस, भात, कापूस, शेवरी अशा पिकांचे आंतरपीक घ्यावे."