एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन नेईल शाश्वत उत्पादनाकडे

श्री. आशुतोष सर्जेराव धोंडे,
निलेश हनुमंत थोरात व श्री. प्रशांत मो. घावडे पीएच.डी. विद्यार्थी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी


सध्या रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीच्या सुपिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. शाश्वत उत्पादनासाठी आवश्यक ती अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात पुरविणे गरजेचे आहे.

योग्य व्यवस्थापनाअभावी जमिनीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सातत्याने पिके घेतल्याने अन्नद्रव्याच्या कमतरता भासत असून जमिनीची सुपिकता खालावत आहे. गरजे एवढ्या अन्न द्रव्याचा पिकांना पुरवठा करण्यासाठी रासायनिक खते, जैविक खते, हिरवळीची खते, पिके अवशेष अशा विविध उपलब्ध स्रोतांचा वापर केला पाहिजे. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये रासायनिक खतांचा समतोल वापर करून सेंद्रिय खतांचा पूरक वापर केला पाहिजे. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढवली जाते.

* एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनातील घटक :

एक किंवा अनेक पिकपद्धतीमध्ये सेंद्रिय व पिकांच्या अवशेषाचे कंपोस्ट अथवा गांडूळ खते इतर पद्धतीने पुनर्चक्रीकरण केले पाहिजे. त्याद्वारे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात सुधारणा घडवून आणणे.

* रासायनिक खते.

* जैविक खते

* पिकांची फेरपालट

* जमिनीतील अन्नद्रव्ये

* पिकांचे व प्राण्यांचे अवशेष

* शाश्वत उत्पादनासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन :

* सेंद्रिय खताद्वारे ३० ते ४० टक्के

* जैविक खताद्वारे १५ ते २० टक्के

* रासायनिक खताद्वारे ४५ ते ५० टक्के

-- फायदे

* पिकांना संतुलित अन्नद्रव्य पुरवठा होतो.

* सेंद्रिय खतामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपयोगिता वाढते.

* जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते.

* अविद्राव्य अन्नद्रव्याचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर होते.

* जमिनीची जलधारण क्षमता वाढते.

* उपयुक्त जिवाणूमध्ये वाढ होते.

* एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनात वापरावयाची सेंद्रिय खते:

* भर खते : शेण खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, सोन खत, कोंबडी खत, शहरी घन कचरा.

* जोर खते : भुईमुग पेंड, करडई पेंड, एरंडी पेंड, लिंबोळी पेंड, मोहाची पेंड, मासळी खत.

* पिक फेरपालट :

एका जमिनीवर तिनीही हंगामात होन अथवा दोनपेक्षा एकमेकांना पूरक अशा पिकांची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीच्या गुणधर्मावर चांगला परिणाम होतो.

फायदे :

* पिकांच्या फेरपालटीमुळे जमिनीची सुपीकता टिकवणे, नत्राचे स्थिरीकरण व नत्राची बचत होते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे, किड व रोगांच्या विविध अवस्थांना अटकाव करणे या बाबी शक्य होतात त्यासाठी खालील तत्त्वे लक्षात ठेवावीत.

* जमिनीचा पोट सुधारण्यासाठी खोल मुळाच्या पिकानंतर उथळ मुळाची पिके लावावीत.

* एकदल पिकानंतर द्विदल पिकांची लागवड करावी.

* जास्त अन्नद्रव्ये शोषणाऱ्या पिकानंतर कमी अन्नद्रव्ये शोषणारी पिके लावावीत.

* जौविक खतांचा वापर : हवेतील नत्र स्थिर करणारे, जमिनीतील अविद्राव्य स्फुरद विरघळविणारे अशा जिवाणूंची स्वतंत्र वाढ करून योग्य वाहकात त्यांचे संवर्धन केले जाते. या मिश्रणास जीवाणू खत म्हणतात.

* जिवाणू खतांचे फायदे :

* वरील जिवाणू खतांची बियाबरोबर बीजप्रक्रिया केल्यास बियाणांची उगवण लवकर व चांगली होते.

* पिकांची वाढ जोमदार होण्यास मदत होते.
* जमिनीचा पोत सुधारतो.

* पिक उत्पादनात वाढ होते.

* रासायनिक खतांची बचत होते.

* हिरवळीच्या खतांचा वापर :

जमिनीमध्ये हिरवी वनस्पती अथवा हिरवी पाने फांद्या इ. भाग जमिनीत पुरले असता. त्याचा जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपयोग होतो.अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात.

* हिरवळीच्या खताचे प्रकार :

* जागेवरच लागवड करून त्यांचे हिरवळीचे खत करणे, उदा. ताग, धैंचा, चवळी.

* हिरवळीची पाने व फांद्या जमिनीत गाडणे, उदा. गिरिपुष्प, सुबाभुळ.

* हिरवळीच्या खतांचे फायदे :

* हवेतील नत्राचे स्थिरीकरण होवून तो जमिनीत साठवला जातो व पुढील पिकाला उपयोगात येतो.

* जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते.

* जमीन भूसभूशित होते व हवा खेळती राहते.