दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जगातील सर्वाधिक पशुधन असलेल्या देशामध्ये जरी भारताचा समावेश होत असला तरी सुद्धा जागतिक दुग्ध व्यवसायातील भारताचा हिस्सा केवळ ०.०१ टक्के आणि त्यापैकी महाराष्ट्राचा हिस्सा फक्त ८ टक्के आहे. आजच्या परिस्थितीचा विचार करता दुग्धोत्पादन व्यवसायास उज्ज्वल भविष्य आहे हे निर्विवाद. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने एक - दोन संकरित जनावरांपासून व्यवसाय करण्यास हरकत नाही. असे असतानाही शेतकरी या व्यवसायाकडे वळलेले दिसून येत नाहीत किंवा जे व्यवसाय करत आहेत ते पारंपारिक पद्धतीने करतात किंवा त्यांना व्यवस्थापन जमलेले दिसून येत नाही. दुग्ध व्यवसाय नफ्यात चालण्यासाठी दुधाळ गाईची निवड, पशुपोषण, सभोवतालची परिस्थिती या सर्व गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील काळात उत्तम व्यवस्थापनाने खर्च कमी करून दुग्ध व्यवसाय करणे आवश्यक आहे. किफायतशीर दुध उत्पादनाकरिता खालील बाबींकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे.

* दुधाळ गाईची निवड :

* कमी दूध देणाऱ्या, भाकड गाईऐवजी अधिक दूध उत्पादन देणाऱ्या संकरित गाईची निवड करावी.

* जास्त विदेशी रक्त प्रमाण असणाऱ्या गाईंना व्यवस्थापन अतिशय चांगले लागते. अन्यथा त्या विविध रोगांना लवकर बळी पडतात. तेव्हा दुग्धोत्पादनाच्या दृष्टीने जास्तीत जास्त ६२.५ टक्के विदेशी रक्त प्रमाण असलेल्या गाईंची निवड करावी.

* दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील गाय निवडावी व दूध उत्पादनाची प्रत्यक्ष पिळूनच खात्री करावी.

* बाजारात गाई खरेदी करताना दलालामार्फत फसलो जाणार नाही याची दक्षता घ्यावी. बाजारामध्ये येणाऱ्या जनावरांची कोणी खात्री देऊ शकत नाही.

* त्याचबरोबर अनेक ठिकाणावरून गाई विक्रीसाठी आलेल्या असतात, त्यामुळे संसर्गजन्य रोग किंवा इतर आजार व दोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

* दुधाळ गाईची पाश्र्वभाग मोठा व रुंद असतो.

* गाय ही आकर्षक, तरतरीत, मऊ अंगकातीची निरोगी असावी. गाईची त्वचा ही स्थितीस्थापक असावी.

* कास हाताला मऊ लागणारी, लांब, रुंद आणि ती मागे वरपर्यंत गेलेली असावी, लोंबकळणारी नसावी. तसेच चारही सड सारख्या आकराचे व समान अंतरावर असणे आवश्यक आहे.

* गाईचे डोळे, नाकपुड्या, जबडा, कपाळ, खांद्याची हाडे, पुठ्ठ्याचा भाग, माकड हाडाचा जोड, शेपटीचे मूळ, छातीचा घेर, पाय, खुर इ. अवयव योग्य प्रमाणबद्ध व सदोष आहेत की नाहीत याची खात्री करून मगच खरेदी करावी.

* गोठा व्यवस्थापन : दुभत्या गाईंना आरोग्यदायक थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करणारा गोठा हवा असतो. दुभत्या संकरीत जनावरांना अधिक आजारांची उत्पत्ती ही अस्वच्छ गोठयामुळे होत असते हे लक्षात घ्यावे. साधारणत: पाच गाईंसाठी २० फूट लांब व ८ फूट रुंद अशी १६० चौ. फूट जागा लागते. गोठा बांधताना तो पूर्व - पश्चिम दिशेस लांब असा बांधावा. ऊन, वारा, पावसापासून संरक्षण होण्यासाठी समोरच्या बाजूच्या भिंतीची उंची ६ फूट तर पाठीमागील बाजूच्या भिंतीची उंची ६ ठ ७ फूट ठेवावी. पैशाच्या उपलब्धतेप्रमाणे दगड किंवा विटाची भिंत बांधून घ्यावी. त्यावर सिमेंटचे अथवा चुन्याचे प्लॅस्टर करावे. त्यामुळे गोचिडांना राहण्यासाठी अथवा अंडी घालण्यासाठी जागा मिळत नाही. समोरील भिंतीलगत २ फूट रुंद, २ फूट उंच आणि आतून दीड फूट खोल गव्हाण बांधून घ्यावी. दर चार फुटावर लोखंडी अँगल्समध्ये एक कडी गाय बांधण्यासाठी बसवून घ्यावी. गोठ्याची उंची सर्वसाधारणपणे १० ते १२ फूट ठेवावी. गोठ्याच्या समोरील व पाठीमागील भिंतीच्या वरील मोकळ्या भागाला चेनलिंक जाळी बसवून घ्यावी. जमिनी मुरूमरहीत किंवा शक्य असल्यास कोबा, फरशी, घडवलेल्या दगडाची करता येते. गव्हाणीपासून जमिनीला साधारण १ फुटास १/२ इंचाचा उतार द्यावा. शेवटी गटार असावी. गोठ्यातील जनावरांना ताज्या व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. शेणखताचे खड्डे किंवा उकिरडा गोठ्यापासून दूर अंतरावर असावा.

* आहार व्यवस्थापन : दुग्धव्यवसायामध्ये जास्तीत जास्त (६० - ९०%) खर्च हा आहारावर होत असतो. त्यामुळे आपल्या दुभत्या गाईची निगा ठेवणे, तिच्या आहाराकडे लक्ष पुरविणे, आहाराचा पूर्णपणे उपयोग करून त्यापासून जास्त उत्पादन कसे मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे असते. खाल्लेल्या अन्नाचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता ही संकरित गाईत जास्त असते. त्यामुळे योग्य व संतुलित आहार वापरून पूर्णपणे उपयोग करून घेणे हे दुग्घ व्यवसायाचे मूलभुत तत्त्व आहे. सकस व संतुलित आहार गाईंना दिल्यास दूध उत्पादनात सातत्य राहते व त्याचबरोबर शरीराला सर्व अन्नघटक योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे शरीराची झिज होत नाही, चांगली वाढ होते, रोगाला सहज बळी पडत नाहीत तसेच प्रजननाच्या क्रियेस सहसा, अडथळे येत नाहीत. आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की, भरघोस दूध उत्पादनासाठी अनुवंशिक गुणाबरोबरच आहारालाही तेवढेच महत्त्व आहे. गाईला आहार हा तिच्या वजनाच्या २ ते २.५ टक्के कोरड्या प्रमाणात द्यावा लागतो. यामध्ये ६६.६६ टक्के भाग कोरड्या वैरणीच्या स्वरूपात तर ३३.३३ टक्के भाग खुराक (अंबोण) अशा स्वरूपात द्यावा.

* सुका चारा - वाळलेली गवते, ज्वारी, बाजरी, मक्याचा कडबा इ.

* हिरवा चारा - एकदल धान्य गवत प्रकार- डोंगरी चारा, ज्वारी, बाजरी, मका, ओट इ.

* एकदल गवत प्रकार - गजराज, गीनीग्रास, पॅराग्रास, संकरित नेपीअर इ.

* द्विदल गवत प्रकार - सुबाभूळ,चवळी, घास बरसीम इ.

* हिरवा चारा उपलब्ध नसल्यास किंवा कमी असल्यास २ - ४ किलो सुका चारा आणि १ ते १.५ किलो पशुखाद्या वाढवून द्यावे व त्या सोबत जीवनसत्त्व 'अ' (कॉड लिव्हर ऑईल, शार्क लिव्हर ऑईल) पुरविणे अत्यंत गरजेचे असते. २५ ग्रॅम खाण्याच्या सोड्याच्या आहारात समावेश करावा.

* गाभण काळामध्ये शेवटचे दोन महिने दूध उत्पादन बंद असल्यामुळे, खुराक कमी केला जातो. असे न करता त्या काळात वाढीव २ किलो खुराक द्यावा. त्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते व पुढील वेताचे दूध उत्पादनही चांगले मिळते.

* प्रजनन व्यवस्थापन : दुग्ध व्यवसायात प्रजननाला अनन्य साधारण महत्त्व आहे. दुग्ध व्यवसाय परवडण्यासाठी गाय विल्यानंतर ४५ ते ६० दिवसांत माजावर येऊन ६० ते ९० दिवसात गाभण राहणे आवश्यक असते. तरच तिच्यापासून आपण वर्षाला एक वित घेऊ शकतो. त्यासाठी गाय माजावर आल्यानंतर १२ ते १४ तासात कृत्रिम रेतनाने भरविली पाहिजे. गाईंचा माज लक्षात येण्यासाठी त्या काळात रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी लवकर गोठ्यात लक्षपूर्वक पाहणी करावी. गाय माजावर येत नसल्यास वेळ न घालवता गाय तपासून घ्यावी व उपचार करावेत. वेळेवर नियमितपणे विणारी गाय ही दुग्ध व्यवसायाचा पाया असते.

* गर्भावस्थेच्चा सातव्या महिन्याच्या शेवटी गाय अटविण्यास सुरुवात करावी, म्हणजे आठव्या महिन्याच्या सुरूवातीला तिचे दूध देणे बंद होईल.

* गाय अटविल्यानंतर स्तनदाह विरोधी औषधे सडातूनकासेत सोडावीत.

* गाभण काळात शेवटच्या तीन महिन्यात १.५ ते २ किलो वाढीव खुराक द्यावा. सोबत २० ते ३० ग्रॅम क्षारमिश्रण द्यावे.

* गाय विण्याच्या शेवटच्या आठ ते दहा दिवस आधी गाईचा पशुआहार व क्षारमिश्रण रोज थोडा थोडा कमी करत जावा व हिरवा चारा थोडाफार वाढवावा, त्यामुळे शेण पातळ राहते व गर्भावर येणारा दाबा कमी होतो.

* प्रसुतीच्या वेळी वासरू जर नौसर्गिक स्थितीमध्ये असेल तर गाईस मदत करण्याची गरज नसते. परंतु अनैसर्गिक स्थितीत वासरू असेल तर पशुवैद्यकाच्या सहाय्याने प्रसुती करून घ्यावी.

* गाय व्याल्यापासून ४ ते ६ तासात जार पडतो. असे न झाल्यास पशुवैद्यकाकडून जार सोडवून घ्यावा किंवा गर्भाशयात औषधी गोळ्या सोडाव्यात. त्यामुळे नंतर जार पडून जाऊ शकतो. तो गर्भाशयात सडत नाही.

* वासरांचे संगोपन -

* आजची वासरे उद्याची दूध देणारी व शेती काम करणारी भावी पिढी होय. वासरांच्या सर्वांगिण विकासासाठी व वाढीसाठी उत्तम संगोपन आवश्यक आहे.

* वासरू जन्माला आल्याबरोबर त्याचे नाक, तोंड, कान यातील चिकट द्रव काढून स्वच्छ करावे. त्यानंतर ते गाईसमोर ठेवावे. गाय चाटून ते कोरडे करते.

* त्यानंतर वासराची नाळ शरीरापासून २ इंचावर बांधून त्याखालील नाळेचा भाग नव्या ब्लेडने कापून टाकावा. नाळ वाळेपर्यंत दिवसातून तीन ते चार वेळेस टिंक्चर आयोडीनच्या द्रवात बुडवावी.

* वासराला पहिल्या अर्ध्या तासात पोटभर किंवा त्याच्या वजनाच्या १/१० इतका चीक पाजावा. चिकामुळे पुढच्या तीन महिन्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती मिळते.

* एखाद्या वासरास जन्मत : आईचा चीक मिळू शकत नसल्यास दुसऱ्या गाईचा चीक शक्य झाल्यास पाजावा किंवा अर्धा ते दीड लिटर दुधात एक अंडे, एक चमचा कॉड लिव्हर ऑईल, चार चमचे एरंड तेल व ३० मिलीग्रॅम अरोमायसीन औषध घालून ते मिश्रण शरीराच्या तापमान इतपत कोमट करून दिवसातून तीन वेळा तीन दिवस वासरास पाजावे.

* वासराला दर तीन महिन्यांनी जंताचे औषध पाजावे.

* क्षारमिश्रण तीन महिन्यापासून पुढे रोज वापरावे.

* महिन्यातून एकदा गोचिडनाशक फवारा मारावा.

* आरोग्य - संकरित गाईच्या उत्तम वाढ, नियमित प्रजनन आणि अधिक दूध उत्पादनसाठी गाईचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे असते. त्यासाठी स्वच्छ गोठा, संतुलित आहाराबरोबर खालील गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

* गाईला लाळ्या, खुरकूत, बुळकुंडी, घटसर्प या आजारापासून बचाव करण्यासाठी योग्य वेळी लसीकरण पशुवैद्यकाच्या मार्फत करून द्यावे.

* मोठ्या गाईमध्ये जंत प्रादुर्भावामुळे दूध उत्पादनात घट येते, वजन कमी होते, आरोग्य बिघडते, रक्तक्षयासारखे रोग होतात. त्याचबरोबर अन्नद्रव्याची कमतरता भासल्यामुळे प्रजननाची क्रिया सुद्धा बिघडते. तर लहान वासरांची वाढ खुंटण्यासाठी व मरतुकीसाठी सुद्धा प्रामुख्याने जंत कारणीभूत असतात. त्यासाठी वर्षातून किमान दोनदा (पावसाळ्यापुर्वी व पावसाळ्यानंतर० पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार सर्व जनावरांना औषधे पाजावीत.

* जनावरांच्या शरीरावरील गोचिडामुळे बबेसिओसीस, थयालेरिओसीस तर माशामुळे सरासारखे प्राणघातक रोग उद्भवतात. त्याचबरोबर जनावरात ताणतणाव निर्माण करणे, जनावरांना कातडीचे आजार होणे, केस गळणे यासारखे परिणार दिसून येतात. यामुळे जनावरे अशक्त व अनुत्पादक होतात. म्हणून पशुवैद्यकाच्या सहाय्याने योग्य मात्रेत योग्य पद्धतीने डेल्टामेथ्रीन १.२५ इ. सी. योग्य पद्धतीने डेल्टामेथ्रीन १.२५ इ. सी. सायपरमेथ्रीन २०० इ. सी. सारख्या औषधांचा वापर करावा.

* स्वच्छ दूध निर्मिती :

* धार काढण्यापुर्वी व काढल्यानंतर कास व सड पोटॅशिअम परमँग्नेटच्या किंचीत लालसर पाण्याने स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून स्वच्छ करावी.

* सुरूवातीला प्रत्येक सडातील चार धारा वेगळ्या भांड्यात घेऊन ते दूध बाहेर टाकून द्यावे. कारण सुरूवातीच्या दुधात जीवाणूंची संख्या जास्त असते त्यामुळे दुधाची प्रत खालावते.

* धार अंगठा दुमडून न काढता पूर्ण हात पद्धतीने व आठ मिनिटांमध्ये काढावी.

* दूध साठवण्याची सर्व भांडी व्यवस्थित धुवून कोरडी केलेली असावीत.

* दूध काढणाच्या व्यक्तीची नखे कापलेली असावीत.

* तसेच धार काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे गरजेचे असते. दूध हा नाशवंत पदार्थ असल्याने लवकरात लवकर दूध संकलन केंद्रात घेऊन जावे.

* सायंकाळचे दूध साठवायचे असेल तर ते दूध स्वच्छ भांड्यात ठेऊन वरती सुती कपडा बांधून थंड जागी किंवा शितकरण उपकरणात ठेवावे.