लोणच्याच्या कैरीचा आंबा

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


लोणच्याची कैरी हे पीक तोंडी लावण्यापुरते न राहता हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे. त्याचे कारण असे की, मसाल्याची भाजी असो किंवा पिठले भाकरी असो. लोणच्याशिवाय जेवण पुर्ण होत नाही किंवा त्याला चव येत नाही. लग्नसराईतील पंगती असो किंवा समारंभातील जेवण असो, कैरीचे लोणचे हा त्या जेवणाचा अविभाज्य भाग असतो. विशेष करून उन्हाळ्यामध्ये जेव्हा तहानेने जीव पाणी - पाणी करतो, कोरड पडते, तेव्हा कैरीचे लोणचे किंवा पन्हे हे तृष्णा शांत करते. आशिया खंडातील लाखो लोक जगाच्या सातही खंडामध्ये पोटापाण्यासाठी स्थळांतरीत झाले आहेत. त्यांच्या पापड, मसाले या गरजाबरोबर अस्सल भारतीय कैरीचे लोणचे त्यांना त्यांच्या आहारामध्ये नक्कीच आवश्यक असते. भारतीय जेवण युरोप आणि अमेरीका खंडातही अतिशय चवीने घेतले जाते. अमेरीकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बिल क्लिंटन हे ही या जेवणाचा न्युयॉर्क शहरात भारतीय हॉटेलात आवडीने आस्वाद घेतात. भारतीय करी (सार) हा युरोप राष्ट्रात आहारातील अतिशय लज्जतदार पदार्थ मानला जातो. ते हा पदार्थ अतिशय चवीने खातात. या बरोबरच कैरीचे लोणचे असले तर त्याची चव न्यारीच असते. त्यामुळे भारतीय कैरीच्या लोणच्याची निर्यात १५०० ते २००० कोटी रुपयांच्या घरातील असावी असे वाटते. भारतामध्ये प्रत्येक घरी कैरीचे लोणचे असतेच. त्यामुळे कैरीचे लोणचे न आवडणारा भारतीय विरळच किंबहुना नाहीच.

भारतीय उपखंडात लोणच्याच्या कैरीच्या जाती ठळक अशा माहिती नाहीत. परंतु स्थानिक पातळीवर त्या - त्या भागात हिरवीगार जाड सालीची, कडक, टणक, आंबट, बाठ किंवा कोय कमी (चपटी, लहान) असलेली, दाशी नसलेली, गर अधिक असलेली कैरी 'लोणच्याची कैरी' म्हणून निवडली जाते. शेतकऱ्याच्या शेतामध्ये अशा वर्णनाच्या कैरीचे एखादे तरी झाड असतेच. जर नसेल तर शेजारच्या शेतकऱ्याला आंबे बदल्यात देऊन लोणच्याच्या कैरीची देवाणघेवाण करतात. अशा रितीने स्थानिक पातळीवर लोणच्याची गरज भागविली जाते. महाराष्ट्रातील निवडक भागात खानदेश, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रामध्ये वर वर्णन केलेल्या कैरीसारखे वाण स्थानिक पातळीवर प्रसिद्ध आहेत. त्यातील प्रसिद्ध वाण म्हणजे पुणे जिल्ह्यातील खेडशिवापूरचा. या कैरीचा आकार साधारण हापूससारखा असून गर्द हिरवा, कडक, टणक, जाड सालीचा, मध्ये फुगीर, आंबट असून गर बिगर दशीचा, पांढरा स्वच्छ, अडकित्यावर फोडताना चर्रर आवाज येतो असा हा आदर्श समजला जातो. जेवढी कैरी आंबट तेवढे मीठ जास्त लागते. म्हणजे लोणचे रुचकर व टिकाऊ समजले जाते. खरे तर माणसाला जेवढी आंब्याची गरज आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक गरज लोणच्याच्या कैरीच्या वाणाची आहे. त्यामुळे फळ (राष्ट्रीय बागवाणी अभियान) संशोधन केंद्राने किंवा देशभरातील फोलोद्यान विद्यापीठातील शास्त्राज्ञांनी लोणच्याच्या कैरीचे वाण, छुंदा, कैरी पन्हे, कैरीचीभाजी, लोणच्याची कैरी, अन्नपदार्थामध्ये चव येण्यासाठी मिसळण्याकरता कैरीची पावडर असे वाण विकसीत करणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवरील वाण विकसीत करण्यामध्ये हल्ली बाठ अथवा कोईपासून पिशवीत रोपे तयर केली जातात. उन्हाळ्यात या कोया जर्मिनेटर १ लि. + १०० लि. पाणी किंवा कठीण कैऱ्या प्रिझम १ लि. + १०० लि. पाणी या द्रावणात कोया रात्रभर भिजवून पिशवीत लावल्या तर १५ दिवसात आंब्याचे रोप उगवते. रोपांना सप्तामृताच्या २ ते ३ फवारण्या १५ दिवसाला केल्या असता ही रोप १।। ते २ महिन्याची १ ते १।। फुट झाल्यावर १८ x १८ ते २० x २० फुटावर हम चौरस उत्तर - दक्षिण लावावीत. ३ x ३ चा खड्डा घेऊन खाली पालापाचोळा टाकून वाळवीचा त्रास असल्यास प्रोटेक्टंट १ ते २ काडेपेटीचे १ लि. पाण्यामध्ये द्रावण आणि क्रुड ऑईल किंवा फॉलीडॉंल किंवा थायमेट थोडे टाकावे.खड्ड्यात २५० ग्रॅम कल्पतरू खड्डयावर पसरावे व खड्डा पोयटा मातीने भरावा. मग अशी तयार झालेली रोपे मधोमध लावावीत आणि बाजूची माती टाचेने दाबावी. नंतर वरून जर्मिनेटरचे आळवणी करावे, म्हणजे नांग्या पडणार नाहीत व झाडे चांगली जगतील, वाढतील.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात याला सप्तामृत ३० मिली + १० लि. पाणी याप्रमाणे फवारा द्यावा. सप्टेंबरमध्ये १०० ग्रॅम कल्पतरू बांगडी पद्धतीने द्यावे व पुन्हा वरीलप्रमाणे फवारा करावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे याच्यात मिरची, कांदा, बटाटा, पालेभाज्या ही आंतरपिके पहिले २ - ३ वर्षे घेता येतात. झाडे वरंब्यावर घेऊन दांडाने पाणी द्यावे. 'सिद्धीविनायक' शेवग्यासारखे आंतरपीक फायदेशीर ठरते. कारण या पिकाचे वर्षात १ ते १।। लाख रू. होतात, की जे इतर कोणत्याच पिकात (कोथिंबीर सोडून) होत नाही. मात्र कोथिंबीरीचेही बाजारभावावरच अवलंबून असते, तसे शेवग्यात होत नाही. जुलैमध्ये लावलेल्या आंब्याची डिसेंबरमध्ये कंबरेएवढी वाढ होते. दर महिन्याला सप्तामृताचा फवारा द्यावा. आंतरपिक घेतल्यानंतर सध्या चाऱ्याच्या दुर्भिक्षतेमुळे जनावरांची वाणवा झाल्याने शेणखताची कमतरता जाणवत आहे. तेव्हा उन्हाळ्यात एकरी ताग ६० किलो आणि रान जर चिभडे, चोपण असेल तर धैंच्या ६० ते १०० किलो जर्मिनेटरचे द्रावणात भिजवून फोकावा. म्हणजे ७ - ८ व्या दिवशी उगवण होते. १५ ते २० दिवसात हे पीक पोटरीबरोबर येते, तेव्हा अर्धा लि. सप्तामृताचा फवारा द्यावा. म्हणजे ते पीक दीड महिन्यात कबर ते छातीबरोबर होते. तेव्हा ते नांगरामागे गाडून टाकावे. पावसाळा सुरू झाल्यावर ३ महिन्याच्या अंतराने वर्षातून ३ वेळा या आंब्याच्या रोपांना कल्पतरूचे डोस द्यावेत व जुलै, सप्टेंबर, डिसेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यात सप्तामृताचे स्प्रे घेतले म्हणजे खोडाचा बुंधा जाड होतो. ३ - ४ महिन्याचे झाड असताना शेंडा खुडावा म्हणजे फांद्या फुटून झाड डेरेदार होते. दुसऱ्या - तिसऱ्या वर्षी आलेला मोहोर काढून टाकावा. चौथ्यावर्षी याची फळे धरण्याच्या हिशोबाने नियोजन करावे. जून महिन्यात १ पाटी शेणखत आणि अर्धा किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. उन्हाळ्यामध्ये मोरचूद, चूना, प्रोटेक्टंट प्रत्येकी २५० ग्रॅम १० लि. पाण्यात कालवून कुंच्याने हे द्रावण खोडाला ३ ते ४ फुटावर लावावे. म्हणजे वाळवीचा व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. काळ्या भुसभुशीत जमिनीत जेथे पाणी धारणक्षमता चांगली आहे तेथे उन्हाळ्यात बाष्पीभवन कमी करण्यासाठी आपण भाताचे किंवा गव्हाच्या काडाचे आच्छादन करतो, तेव्हा वाळवीचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता पाणी देताना आळ्यामध्ये क्रुड ऑईलचे २ ते ३ थेंब टाकावे किंवा प्रोटेक्टंट १ - २ काड्या पेट्या बादलीभर पाण्यात मिसळून आळ्यात टाकवे. हीच गोष्ट सप्टेंबरमध्ये परत करावी.

सप्तामृताच्या नियमित फवारण्याने डिसेंबरमध्ये मोहोर लागेल. या मोहोराचे संरक्षण करण्याकरता डिसेंबर ते मार्च सप्तामृताचे ३ - ४ स्प्रे घ्यावेत. अगोदर दसऱ्याच्या सुमारास अर्धा किलो कल्पतरू व २ पाट्या शेणखत भरून घ्यावे, म्हणजे मोहोर डिसेंबरमध्ये चांगला निघेल, टिकून राहील. या काळामध्ये विशेष करून प्रोटेक्टंट व हार्मोनीचा वापर करावा. म्हणजे मावा, तुडतुडे व काळ्या बुरशीला आळा बसेल. म्हणजे एरवी जो मोहोर जळतो, गळतो तो होणार नाही. थंडी व ऊन या काळात हवामानात प्रचंड बदल होतो. त्या काळात क्रॉपशाईनरचे प्रमाण १।। ते २ लि. सप्तामृतासोबत २०० लि. पाण्यात वापरावे. राईपनरचा वापर टाळावा, कारण येथे कच्ची कैरी लोणच्यासाठी अभिप्रेत आहे. पिकलेला आंबा नको आहे. चौथ्या वर्षी १५ ते २० कैऱ्या येतील. साधारण त्या २५० ते ३०० ग्रॅमच्या असताना कैरीचा रंग पालटू न देता टणक असताना एप्रिल मध्येच काढाव्यात.

ज्याप्रमाणे आंबा पिकतानाच्या काळात पाणी तोडतो, तसे कैरीच्या आंब्यास पाणी तोडू नये. तसेच ते जास्तही देऊ नये. ते मध्यम प्रमाणात द्यावे.

ही कैरी मार्केटमध्ये ३० ते ४० रू. किलो दराने जाते. जसा वाण असेल आणि वाणाचा आकार, झाडावर घेणाऱ्या फळांची संख्या यांचा अभ्यास करून कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांना भेटून त्यावरून खत, पाणी, फवारणीचे नियोजन करावे. यामध्ये अधिक संशोधनाची गरज असल्याने प्रयोगशिलता आणि शेतकऱ्यांचा सहभाग गरजेचा आहे. जसे निरीक्षणे, निष्कर्म हाती येतील त्याची माहिती वेळोवेळी 'कृषीविज्ञान' मधून देण्यात येईल.