कवठाची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


कवठ हे औषधी फळ आहे. आयुर्वेदाच्या ग्रंथात कवठ फळाचे अनेक विविध औषधी वापराचे उल्लेख आहेत. कमी पावसाच्या विभागात कवठ वाढवता येईल. कवठाची बाग ही चिंच, आवळ्याप्रमाणे पहिले काही दिवस पाण्यावर आणि नंतर केवळ पावसावर अशा पद्धतीने वाढवता येईल.

कवठाचे मूळस्थान कोणते याबाबत निश्चित माहिती नाही. भारत, ब्रम्हदेश व श्रीलंका या देशांमधील जंगलात कवठाची झाडे आढळतात. शहरी तसेच ग्रामीण भागात कवठ गर हा साखरपाकात घालून आगर गुळात शिजवून खातात. काही ठिकाणी तसाच वापर करतात. फळे ही मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या मार्केटला खपतात. झाडे पाण्याचा ताण सहन करू शकणारी व अत्यंत काटक अशी असतात. विस्तार खूप मोठा होतो. या फळाच्या बागा करण्यास खूप मोठा वाव आहे. महाराष्ट्रात नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात बांधावर, शेतात, गोठ्यासमोर दोन चार झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतात महाराष्ट्राबरोबर कवठाचा वापर व अशी तुरळक लागवड कर्नाटक, आंध्रप्रदेश व गुजरातमध्ये आढळते.

* महत्त्व

* कवठाचे झाड काटक, खोल मुळे जाणारे व पाण्याचा ताण सहन करणारे आहे.

* दुष्काळी पट्ट्यात याच्या बागा वाढवण्यास मोठा वाव आहे.

* कवठाचा गर, फळे, पाने, साल सर्वच औषधी आहेत.

* कवठाचा गर साखर घालून खाल्ल्याने पित्त नाहीसे होते.

* कवठाच्या पाल्याचा रस हा पित्त कमी करण्यासाठी दुधाबरोबर देतात.

* कावीळ झाल्यास गाईचे दुघात पाल्याचा रस हा पाचसहा दिवस घ्यावा. तो अत्यंत त्वरीत परिणाम घडवून आणतो.

* कवठाच्या पाल्याचे चूर्ण दुधात खडीसाखर घालून देतात. त्यामुळे धातुपुष्टी होते.

* कवठ व वेळू याचा पाला स्त्रियांचे प्रदर रोगावर समप्रमाणात वाटून वापरतात.

* कवठाच्या बियांचे तेल उंदीर चावला असता जखमेवर लावतात. उंदराचे विष नष्ट करण्याची ताकद फक्त या बियाच्या तेलात आहे.

* पित्ताच्या गांधी अंगावर उठतात अशावेळी पाला बारीक वाटून लेप लावावा. पित्ताच्या गांधी लगेच कमी होतात. उचकी व श्वाससाठी मधात कवठाचा अंगरस हा पिंपळी बरोबर देतात.

* पाण्यासारखे जुलाब होत असल्यास धायटी, बोर व कवठाचा कल्प दह्यातून घ्यावा.

* हगवण व आमांशावर कवठाच्या सालीचे चूर्ण वापरतात.

* कवठाची पाने अगर रस लहान मुलाच्या हागवण व पोटदुखीत देतात.

* कवठाच्या गराने दात घासल्यास हिरड्या मजबूत होतात.

* सर्पदंशावर कवठाचा गर मधाबरोबर देतात.

* खाज सुटली तर कवठ बियाचे तेल वापरतात.

* कवठाचा गर दालचिनी, काळीमिरी व मीठ एकत्र करून सरबत करतात. हे सरबत थंड वीर्यवर्धक कामोत्तेजक आहे.

* गर हा खाण्यास वापरतात.

* कवठाच्या गरातून जाम, जेली, बर्फी बनवतात.

* कवठाच्या गरात 'ब' जीवनसत्त्व आहे. म्हणून गर हा तसाच अथवा साखर गुळाबरोबर सेवन करावा.

* गरापासून सार करून आहारात वापरतात.

* खाण्यात कवठाचे प्रमाण जादा असल्याने आदिवासी लोकांची यकृते अत्यंत कार्यक्षम राहतात. त्यांच्या यकृतावर केवळ कवठ गर खाण्यामुळे गावठी दारूचे दुष्परीणाम होत नाहीत असे अलीकडेच अभ्यासात सिद्ध झाले आहे.

* कवठाचा मुरंबा उत्तम होतो. तो बरेच दिवस टिकतो.

* पानात सुवासिक तेल असते. ते औषधी आहे. उर्ध्व पतन पद्धतीने तेल काढतात.

* कवठाचा पाला तेल काढण्यासाठी उपयोगात आणतात, शिवाय इतर अनेक औषधात तो वापरला जातो. काही आयुर्वेदिक कंपन्या कवठपाला विकत घेतात.

* कवठाचा पाला शेळ्या - मेंढ्याचे खाद्य म्हणून वापरतात.

* या फळात पेक्टिनचे प्रमाण भरपूर असल्याने जेली उत्तम होते. पेक्टिन अलग करूनही वापरतात.

* अपचनाचे विकारावर गर अत्यंत गुणकारी आहे.

* कवठ कच्चे असताना त्याच्या गराची चटणी करतात.

* गर अलग करून त्याची पावडर करता येते. ही पावडर मिक्स फ्रुट ज्यूस, सरबते, बर्फी, मिक्स फ्रुट जाम मध्ये वापरतात.

* खोड्यात कवठाचा गर हा पंचामृत, कोशिंबिरीसाठी वापरतात.

* गरात 'ब' जिवनसत्त्वामधील रिबोफ्लेवीन हे महत्त्वाचे पोषणमूल्य आहे.

* कवठाच्या गरात याशिवाय लोह, स्फुरद व चुना ही खनिजे आहेत.

* कवठाचे लाकूड कठीण असल्याने शेती औजारे व फर्निचरसाठी व बैलगाडीची चाके बनविण्यासाठी वापरतात.

* हवामान, जमीन : कवठाचे झाड सध्या कोकणाखेरीज सर्वत्र आढळते. जंगलात व शेताच्या बांधावर दंडाच्या कडेला मुद्दाम लावलेली झाडे आढळतात. याला उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. मध्यम कोरड्या हवामानात तसेच समुद्रसपाटीपासून ५००० मिटर उंचीवर कवठाची झाडे आढळतात.

कवठाचे झाड पडीक, माळाच्या, बरड्या, हलक्या जमिनीत वाढते. मध्यम जमिनीत कवठाचा विस्तार जादा होतो. चुनखड व खारवट जमिनीत कवठ उत्तम येते. परंतु माध्यम खोलीची तांबड उत्तम निचऱ्याची जमीन याला उत्तम ठरते.

दंडाच्याकडेची नदी काठावरची व गावतळ्याच्या भरावावरची, ओढ्याकाठची झाडेही भरपूर ओलावा व उत्तम जमीन यामुळे मोठ्या विस्ताराची आढळतात. ती जादा फळे देणारी, फळाचा आकार मोठा असणारी असतात. साधारणपणे कवठ झाड जर खड्डा घेऊन बी वाळवून लावले व चार वर्षे नियमित पाणी घातले तर बियापासूनचे झाड उत्तम वाढते. फांद्या भरपूर येतात. विस्तार चांगला होतो. सातव्या वर्षी फळे येतात. व्यापारी उत्पन्न नऊ वर्षांनी सुरू होते. आज असलेली बहुसंख्य झाडे ही बियापासूनची आहेत. पुणे कृषी महाविद्यालयातून डोळा भरलेली व भेट कलमाच्या रोपांना लागणीनंतर चौथ्या वर्षी फळे येतात, तर व्यापारी उत्पादन सातव्या वर्षी सुरू होते.

* अभिवृद्धी : कवठाची अभिवृद्धी ही बियापासून, डोळे भरून व भेट कलमाने करता येते.

* सुधारित जाती व लागवड : कवठाच्या फळावर महाराष्ट्रात मराठवाडा कृषी विद्यापीठ व पुणे कृषी महाविद्यालयात डॉ. भोरे यांनी काम केले आहे. कवठाची सुधारित जात मराठवाडा कृषी विद्यापीठाने औरंगाबादच्या हिमायत बागेतील सी.एच. १९ ची जात विकसित केली आहे. या जातीची वैशिष्टचे खालीलप्रमाणे आहेत.

१) फळे आकाराने मोठी, कठीण कवचाची असतात.

२) फळे वजनदार, सरासरी वजन ३५० ग्रॅम असते.

३) बियाचे वजन ८ ग्रॅम असते.

४) गराचे वजन २२४ ग्रॅम असते.

५) सालीचे वजन ११८ ग्रॅम असते.

६) साल गराचे प्रमाणे १:१:+८

याशिवाय अंबेजोगाई येथील एका कवठाच्या गराला एक विशिष्ट असा सुगंध आहे.

कवठाची जादा दिवस फळे देण्याची क्षमता. कवठ झाडाचा आंब्याप्रमाणे विस्तार या बाबी लक्षात घेता कवठाची लागवड ही ८ मीटर x ८ मीटर अगर १० मीटर x १० मीटर अंतरावर करावी. कवठाची पहिली वाढ उत्तम व्हावी म्हणून आवळा अगर जांभूळ पद्धतीप्रमाणे खड्डे भरून घ्यावेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला तयार बियापासून केलेले आगर डोळा भरलेले किंवा भेट कलमाचे रोप आणून लावावे. नंतर पहिली ३/४ वर्षे नियमित पाणी द्यावे. झाडाच्या संरक्षणासाठी कनगुले ३/४ वर्षे वापरावे.

कवठाच्या झाडाला पहिली ४ वर्षे पावसाळ्यात जून महिन्यात आळे खणून ५०० ग्रॅम ७:१०:५ + ५०० ग्रॅम निंबोळी पेंड + १ टोपले पुर्ण कुजलेले शेणखत आणि ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. हीच मात्रा जानेवारीच्या सुरुवातीला परत द्यावी.

नंतर झाड फळावर आल्यावर २ टोपले शेणखत ५०० ग्रॅम १९:१९:१९ व ५०० ग्रॅम डी.ए.पी. आणि कल्पतरू सेंद्रिय खत ७५० ग्रॅम ते १ किलो वर नमूद केल्याप्रमाणे वर्षातून दोन वेळा जून व जानेवारीत द्यावे.

* अन्नघटक व अर्थशास्त्र: कवठ हे अत्यंत समृद्ध पोषणमूल्य असलेले फळ आहे.

कवठाच्या १०० ग्रॅम गरात असलेली घटकद्रव्ये:

पाणी - ६९.५%, प्रथिने - ७.३% स्निग्धांश - ०.६%, खनिजे - १.९ %, तंतूमय पदार्थ - ५.२%, पिष्टमय पदार्थ - १५.५%, चुना - ०.१३%, स्फुरद - ०.११%, लोह - ०.६%, रिबोफ्लेवीन -१७० मि. ग्रॅम.

कवठाची झाडे ही साधारण ८ x ८ मीटर वर लावल्यास एकरी झाडे ६२ बसतात. जर लागवड १० x १० मिटरवर असेल तर ४० झाडे बसतात. झाडाचे व्यापारी उत्पादन सुरू झाल्यावर अगदी ३०० फळांची सरासरी १० व्या वर्षी सहज मिळू शकते. कलमी व उत्तम व्यवस्थापन केलेल्या झाडाची सरासरी ४०० मिळेत. अगदीच कमी भाव धरून ४ रु. ला १ फळ गेल्यास ४८ हजार रुपये व वरचेवर विस्तार वाढणार तसतशी फळांची संख्या वाढणार. या झाडाला पीक संरक्षणाचा खर्च नाही. पॅकिंग वगैरे लागत नाही. जे लोक इतर उद्योगात व्यग्र आहेत, ज्यांना शतात गम्य नाही, कमी व्यवास्थापन व इतर लेबर प्रॉब्लेम नको आहेत त्यांना आवळा, चिंच, चारोळी, जांभुळ ह्या कोरडवाहू फळ झाडांबरोबर कवठ हे फळझाड एकदम सोपे, सुलभ व सोयीस्कर आहे. काही कवठाला जूनपासून फुले येतात. त्यांना नोव्हेंबर, जानेवारी या मुदतीत म्हणजे आवळा, बोर येण्याच्या मुदतीत तुळशीचे लग्न ते मकरसंक्रात दरम्यान फळे मिळतात. तर काही वेळेस फेब्रुवारी ते मे या काळात फुले येतात व फळे ऑक्टोबरमध्ये बाजारात विक्रीला येतात. या काळात डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या महिन्याच्या अंतराने जानेवारी ते मार्च आणि जूनमध्ये अशा ३ ते ४ फवारण्या आणि जूनमध्ये २ ते ५ किलो कल्पतरू खत दिले असता फळे जादा लागून उत्पादनात हमखास वाढ होते.

* नंतरची काळजी आंतर पीके:

कवठाची वाढ पहिले दोनतीन वर्षे संथ गतीने होते. या चारही वर्षात कनगुले वापरावे, त्याचप्रमाणे मागे नमूद केलेली खतमात्रा वरचेवर ठरवून द्यावी. कवठाच्या आळ्यातील तण सतत काढणे, आच्छादन तंत्र वापरणे, ह्या बाबी नंतरचे निगेत येतात. शिवाय एकदोन झाडांना माती दरमहा वरखाली केल्यास आणि बुंध्याला माती लावल्यास पहिल्या चार वर्षात दुष्काळातदेखील सहज तग धरू शकते.

चार वर्षात आंतरपिके म्हणून मका व सूर्यफूल खेरीज इतर कोणतीही पिके घेण्यास हरकत नाही. पाणी, जमीन व मजुराचे उत्तम वापरासाठी मिरची, झेंडू, हरबरा, भुईमूग ही आंतरपिके सर्वोत्तम ठरतात. उन्हाळ्यात पाणी देण्याची सोय असेल तर चौथ्या वर्षानंतर आंतरपिके करण्याऐवजी आळ्यात सर्व बाजूला बी टोकून उन्हाळ्यात कलिंगडे, खरबूज तर रब्बीत भोपळा, दोडका घेण्यास हरकत नाही.

* उत्पादन : सध्या कवठाचे दोन प्रकार आढळतात. आंबट गराचे बारिक कवठ हा एक, तर दुसरा म्हणजे कठीण कवचाचे, गोड गराचे, आकाराने मोठे व वजनदार असे मोठे कवठ, निरीक्षणातून असे आढळले आहे की सोळा ते अठरा वर्षे वयाची अनेक झाडे अशी आहेत की ती प्रत्येकी ५०० ते ६०० फळे दर झाडी देतात.