सुपारीवर चढविलेले मिरीचे वेल फार कष्टाचा पैसा

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर

दक्षिण भारतातील आमच्या एका शेतकऱ्याचा मिरी व सुपारीतील अनुभव असा आहे की, त्यांनी सांगितले, आमच्याकडे सुपारीची ५ - ६ वर्षांची ६ हजार झाडे आणि १२ - १५ वर्षांची ५ हजार अशी एकूण ११ हजार झाडे आहेत. जमीन काही भात शेतीची तर काही उताराची आहे. लागवड ९' x ९' वर आहे. जर्मिनेटरची प्रक्रिया करून गादीवाफ्यावर सुपारीची रोपे तयार करतो. गादीवाफा तयार करताना जंगलातील जमिनीवर वरचा थर जो कुजलेला पालापाचोळा आणि जनावरांची जर्मिनेटरची विष्टामिश्रीत असतो त्याला 'कानगोरी'म्हणतात, तो वापरतो. त्यातून रोपांना अन्नद्रव्य मिळत असल्यानें इतर खतांची गरज भासत नाही. शिवाय रोपे चांगली सशक्त व लवकर तयार होतात. सुपारी ८ वर्षांची झाल्यानंतर त्यामध्ये मिरी लावतो. गेल्या ८ वर्षांपासून फक्त डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरतो. बाकी काहीच वापरत नाही. शेणखतही वापरत नाही. शेणखताने बुरशी येते. त्यासाठी जंगलातील वाळलेला पाला गोळा करून बागेत ६ इंच उंचीपर्यंत मल्चिंग करतो आणि मायक्रोस्प्रिंकलरने पाणी देतो. त्यामुळे तो कुजून खत मिळते. शिवाय गांडूळही वाढतात.

सुपारी एकरी ५०० झाडे व काळ्या मिरीची ५०० झाडे आहेत. गेल्या ८ वर्षांपूर्वी काळ्या मिरीच्या वेलांवर व्हायरस आला होता. तो कशानेच जाईना. त्या रोगाने वेल पिवळे पडून जागेवरच मरून जात होते. तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर हे तंत्रज्ञान वारपले तर रोग नियंत्रणात आला. तेव्हापासून आम्ही नियमित फक्त डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी फवारतो. इतर कोणतेच औषध किंवा खत वापरत नाही.

काळ्या मिरीला जगभर मागणी आहे. ती सर्व लोकांमध्ये चालते. मसाला पिकात सर्वात जास्त व्यापार काळ्या मिरीचा होतो. त्यामुळे तिला मसाल्याचा राजा म्हटले जाते. ह्या मिरीचे एका वेळापासून सुकलेली ३ किलो मिरी मिळते. हिला ७०० रु./किलो भाव मिळतो. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरल्याने मिरीचा दर्जा सुधारतो त्यामुळे भाव उच्च प्रतिचा मिळतो. काही लोक मिरीची करून आणि ऑइल काढून विकतात.

जून महिन्यात मिरीला बहार लागतो. जूनमध्ये फुलोरा आला की, पाऊस आवश्यक असतो. कारण मिरीचे नर केशर व स्त्री केशर हे एकाच घडावर येत असून घडाच्या वरील (देठाकडील) भागावर नर केशर व खालील (जमिनीकडील) भागावर स्त्री केशर असतात. तेव्हा पावसाच्या पाण्याने त्याचे परागीभवन होते. याकाळात पाऊस जर नसेल तर परागीभवन चांगल्याप्रकारे न झाल्याने उत्पादनात घेत येते. म्हणून उत्पादनाच्या दृष्टीने फुलोऱ्याच्या काळात पाऊस असणे गरजेचे असते.

साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी - मार्चपर्यंत हंगाम असतो. आमच्याकडे जुनला मिरी लागते ती एप्रिल - मे मध्ये काढणीस येते. हिरवी मिरी थोडीशी लालसर (पिंकीश रेड) झाली की काढून वाळवितो. वाळली की ती काळी होते व नंतर वाहत्या पाण्यात पोत्यात भरून ८ - १५ दिवस ठेवली जाते. पाणी मुरून वरचे टरफल कुजते, मऊ पडते मग ती थोडी सुकवून हाताने चोळली असता टरफल वेगळे होऊन पांढरी मिरी मिळते. असे १०० किलो हिरव्या मिरीपासून २५ किलो वाळलेली काळी मिरी होते व त्या काळ्या मिरीपासून २३ किलो पांढरी मिरी तयार होते. म्हणजेच एकरी ५०० झाडांपासून (वेलींपासून) प्रत्येकी ३ किलो काळी मिरी म्हणजे एकरी १५०० किलो उत्पादन मिळून ७०० रु. भाव मिळाल्यास १० लाख रु. हे काळ्या मिरीपासून मिळतात. तर तेच पांढरी मिरी केली असता ५०० वेलींपासून २ ते २। किलो प्रमाणे पांढरी मिरीचे ११०० किलो उत्पादन मिळून त्याला ११०० रु. भाव त्यापासून १२ लाख उत्पन्न होते.

मिरीची काढणी अवघड असते. घड हाताने तोडावे लागतात. विळा किंवा लोखंडी धातूने काढल्यास वेलीवर त्याचा आघात होऊन वेल खराब होतात.

७ - ८ वर्षात या वर्षी मात्र मिरीवर वेगळाच रोग आला आहे. पाने पिवळी, काळी पडून वेल मरत आहेत. तसेच सुपारीची फळे अपक्व अवस्थेतच फुटत आहेत. त्यामुळे हे वेल व सुपारी फळे सरांना दाखविण्यास आलो आहोत.

पक्षी काळी मिरीची फळे खातात. त्यामुळे उत्पादनात जवळपास ५०% घट येते. तेव्हा सरांनी सांगितले, "याला दिवाळीतील छोटे कंदिल दोरीवर बांधावेत. त्याला झुरमुळ्या असतात. तसेच ऑडीओ कॅसेट पिरगळून बागेत तिरप्या बांधल्या असता वाऱ्याने त्याचा कुईंग असा आवाज येऊन त्याने पक्षी पळून जातात. इतर पिकांत हा प्रयोग काही अनुभवातून फायदेशीर ठरला आहे. आपणही प्रयोग करून पहावा व कळवावे.

सुपारीची झाडे रासायनिक युरीया खतानी आतून पोकळ होतात. त्यामुळे सुपारी काढताना माणूस झाडांवर चंढला असता झाडे मोडून माणूस झाडावरून खाली पडून जिवीतास धोका निर्माण होतो. त्यामुळे सुपारी काढणीस लोक मिळत नाहीत. मात्र डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरलेली झाडे कणखर असल्याने मोडत नाहीत. त्यामुळे मजुर ख़ुशीखुशी सुपारी काढणीस येतात. भट लोक १०० - २०० वर्षापासून पिढ्यानपिढ्या शेती करणारे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने आलेल्या मालाची क्वॉलिटी व उत्पादन पाहिल्यावर बागा पाहण्यासाठी येतात.

कर्नाटकातील शिरशी येथून एस - ३० ही सुपारी जात विकसीत झाली आहे. तिची ४ - ५ वर्षांत फळे काढण्यास येतात ७ - ८ वर्षात व्यापारी उत्पादन सुरू होते. फुले लागल्यावर २ - ३ महिन्यांनी सिंगार लागल्यावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या घेतल्या जातात. सिंगार एप्रिल - मे - जून - जुलै असा एका मागे एक लागतो. ३ - ३।। महिन्यात छोटी सुपारी तयार होते. ती ऑक्टोबर ते मार्च पर्यंत काढणीस येते.

तांब्याचे मोठे हांडे असतात. त्यामध्ये १०० किलो सुपारी मावते. त्यात कात टाकून ती उकळविली जाते. काताच्या पाण्याने सुपारीला लाल रंग येतो. सुपारी काढल्यानंतर उकळलेले पाणी सुकवून घट्ट झाल्यावर ते घट्ट पाणी ४० ते ५० रु. लिटर ने बाजारात कलम करण्यासाठी घेतात. हा सेंद्रिय कलर असल्याने त्याला मागणी जास्त असते. पक्वी सुपारी लाल असते. कच्ची सुपारी पांढरी असते. एका झाडापासून तयार सुपारी ३ ते ५ किलो निघते. लाल सुपारी ३०० ते ४०० रु. किलो भावाने जाते. पांढरी सुपारी २०० ते २५० रु. किलो भावाने जाते. अॅप्पी सुपारी दुधात शिजवतात. त्याला मघई सुपारी म्हणतात. ती महाग असते.

Related New Articles
more...