सुर्यफुलाची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


खाद्यतेलाचे मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण खाद्यतेलात स्निग्ध हा महत्त्वाचा घटक असतो. आहार शास्त्रज्ञांच्या मते मानवी आहारात प्रतिदिन ४० ग्रॅम खाद्यतेलाची आवश्यकता आहे. बाजारातील खाद्यतेलाचे वाढलेले भाव लक्षात घेता रब्बी मध्ये तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी सुर्यफूल लागवडीस अनन्य साधारण महत्त्व येणार आहे.

सुर्यफुल हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तेलबिया पीक असून भारतात एकूण तेलबियांपैकी २८ % क्षेत्र व १० % उत्पादन सुर्यफुलापासून होते. महाराष्ट्रात विविध तेलबिया पिकांची लागवड केली जाते. प्रामुख्याने मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती व इतर काही जिल्ह्यात सुर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्याच्या एकूण सुर्यफूल क्षेत्रापैकी ७० % क्षेत्र मराठवाड्यात आहे. सुर्यफुल हे गळीताचे नवीन पीक असून राज्यात या पिकाखालील सन २००२ - २००३ वर्षी एकूण २.८९ लाख हेक्टर क्षेत्र व उप्तादन १.४३ लाख टन आहे. सरासरी उत्पादकता ४९४ किलो/ हेक्टरी आहे.

हवामान : सुर्यफुल हे पीक विविध हवामानात चांगले येऊ शकते. सुर्यफुलाचे पीक महाराष्ट्रात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेतले जाते. रब्बी हंगाम हा खरीप व उन्हाळी हंगामापेक्षा, सुर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी चांगला आहे. कारण रब्बी हंगामातील वातावरणामुळे सुर्यफुलाच्या वाढीसाठी भरपूर कालावधी मिळतो. वर पीक काढणीस जास्त कालावधी लागतो. याउलट खरीप उन्हाळी हंगामात अधिक तापमानामुळे पीक लवकर काढणीस तयार होते. त्यामुळे उत्पादनात फरक पडतो. २० डी. ते २२ डी.सें.ग्रे. तापमान सुर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी पोषक आहे.

जमीन : सुर्यफुलाच्या वाढीसाठी वाळूमिश्रीत जमीन अधिक चांगली परंतु सुर्यफूल पीक सर्व प्रकारच्या निचरा होणाच्या जमिनीत चांगले येते. सुर्यफुलाच्या मुळाच्या वाढीसाठी निचरा होणारी जमीन आवश्यक असते. निचरा होणार्या जमिनीत अन्नद्रव्यांचे शोषण चांगले होऊन पिकाची वाढ जोमदार होते. जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ असल्यास सुर्यफुल चांगले होते.

बीजप्रक्रिया : पेरणीकरीता चांगले, टपोरे बी निवडावे बारीक, पोचट बी बाजूला काढावे. १ किलो बियाणे २५ ते ३० मिली जर्मिनेटर आणि १ लि. पाण्याच्या द्रावणात ५ ते ६ तास भिजवून सावलीत वाळवावे. त्यामुळे उगवण लवकर, एकसारखी आणि चांगली होते. मर, मुळकुजव्या तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.

पुर्वमशागत : सुर्यफुलाच्या मुळ्या जमिनीत ६० सेंमी खोलवर जात असल्यामुळे १५ ते २० सेमी खोलवर नांगरट करावी. कुळवाच्या २ - ३ पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत व शेत सपाट करून घ्यावे. जमिनीचा पोत व सुपिकता सुधारण्यासाठी चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत प्रतीएकरी ४ - ५ गाड्या आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० किलो जमिनीत पसरावे. पसरल्यानंतर पाळ्या देऊन शेत सपाट करून घ्यावे.

पेरणीची वेळ व लागवड : सुर्य फुलाची लागवड अशा तऱ्हेने केली पाहिजे की पीक परिपक्व होण्याच्या वेळेपर्यंत जमिनीत ओलावा टिकून राहील, याप्रमाणे फुलोऱ्याच्या वेळी पीक जास्त पावसात सापडणार नाही. प्रयोगाअंती असे आढळून आले आहे की, खरीप पिकांची पेरणी जुलैच्या पहिल्या पंधरावड्यात तर, रब्बी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्यात करावी. उन्हाळी हंगामात फेब्रुवारी महिन्याचा पहिला पंधरावडा पेरणीस योग्य आहे. अधिक उत्पादनासाठी संकरित वाणांची दर एकरी २२,२०० झाडांची संख्या असावी. म्हणून दोन ओळीतील अंतर ६० सेंमी व दोन झाडातील अंतर ३० सेमी असावे. बियाणे ५ ते ६ सेमी खोल लावावे. सुर्यफुलाचे एकरी २ किलो बियाणे पुरेसे होते.

सुधारित जाती :

१) एल. एस. एच. १ : या जातींचा कालावधी ८० - ८५ दिवसाचा आहे. तेलाचे प्रमाण ३८ - ४० % असून एकरी सरासरी उत्पादन ४ ते ५ क्विंटल येते. ही जात कमी कालावधीत येते व केवडा रोगास प्रतिबंधक आहे.

२) एल. एस. एच. ३ :या जातीचा कालावधी ९५ -१०० दिवसाचा आहे. तेलाचे प्रमाण ४० - ४२% आहे. एकरी ६ ते ७ क्विंटल उत्पादन येते. या जातीचे वौशिष्ट्ये म्हणजे मध्यम कालावधीत येते. केवडा रोगास प्रतिबंधक आहे.

३) एम. एस. एफ. एच - ८ या जातीचा कालावधी ९५ - १०० दिवसाचा आहे. या जातीत तेलाचे प्रमाण ४० -४२% आहे. एकरी ६ ते ७ क्विंटल उत्पादन येते. या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे उत्पादनात स्थिरता असते.

४) एम. एस. एफ. एच - १७ - जा जातीचा कालावधी १०० ते १०५ दिवसाचा आहे. तेलाचे प्रमाण ३५ - ३७ % असून एकरी ७ ते ८ क्विंटल उत्पादन देते. उत्पादनात स्थिरता आणते व तेलाचे प्रमाण कमी असते.

५) के. बी. एस. एच. १ : या जातीचा कालावधी ९० ते १०० दिवसाचा आहे. तेलाचे प्रमाण ४० -४४% आहे. या जातीचे सरासरी उत्पादन ७ ते ८ क्विंटल एकरी येते. तेलाचे प्रमाण जास्त असते.

६) ए. पी. एस. एच. ११ : या जातीचा कालावधी ९० ते १०० दिवसाचा आहे. तेलाचे प्रमणा ४० - ४२% असून एकरी ७.५ ते ८ क्विंटल उतप्दन मिळते. ही जात अधिक उत्पादन क्षमता असणारी आहे.

७) पी. के. व्ही. एस. एच. २७ : या जातीचा कालावधी ८० ते ८५ दिवसाचा आहे. तेलांचे प्रमाण ३८ - ४० % असते. एकरी ६ ते ७ क्विंटल उत्पादन येते. कमी कालावधीत लवकर येणारी जात आहे.

८ ) पी. ए. सी. ३६ : या जातीचा कालवधी १०० ते १०५ दिवसाचा आहे, या जातीत तेलाचे प्रमाण ३८ - ४० % आहे. एकरी ६.५ ते ७.५ क्विंटल उत्पादन येते. अधिक उत्पादन क्षमता आहे.

९ ) ज्वालामुखी : या जातीचा कालावधी ९० ते ९५ दिवसाचा आहे. तेलाचे प्रमाण ३८ - ४०% आहे. या जातीचे एकरी सरासरी उत्पादन ५.५ ते ६.५ क्विंटल येते. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे.

१०) सुर्या : या जातीची कालावधी ९० ते १०० दिवसाचा आहे. या जातीत तेलाचे प्रमाण ३६ ते ३८% आहे. या जातीचे एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन येते. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे.

विरळणी व आंतरमशागत : सुर्यफुल पिकात दर एकरी रोपांची संख्यायोग्य ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. शेतकरी सुर्यफुलाची पेरणी बहुतेक वेळी तिफणीने करतात. त्यामुळे रोपांची संख्या ही कमी अधिक होते. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलेल्या प्रात्यक्षिक प्रयोगात, तसेच अपेक्षित उत्पादन वाढीच्या विशिष्ट तंत्रज्ञानामध्ये विरळणीस अनन्य साधारण महत्त्व असल्याचे दिसून येते. विरळणीचा परीणाम खताच्या मात्रेएवढा महत्त्वाचा दिसून येतो. म्हणून पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करावी. एका ठिकाणी एकच जोमदार रोप ठेवावे. पहिली खुरपणी पेरणीनंतर पहिल्या पंधरा दिवसात आटोपुन घ्यावी. पीक ४० दिवसांचे होईपर्यंत दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी ४० दिवसांनी करावी.

पाण्याचे व्यवस्थापन : पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे झाल्यास या पिकाचे अधिक उत्पादन घेण्यास चांगला प्रतिसाद मिळतो. अधिक उत्पादन देणारे वाण, शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा वापरून व आवश्यकतेनुसार पाणी दिल्यास सुर्यफुलाचे उत्पादन प्रति एकरी १.२५ टनांपर्यंत मिळू शकते. सुर्यफुलाचे उत्पादन वाढीमध्ये पाणी व्यवस्थापनाला फार महत्त्व आहे. एक ते तीन संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या देऊन सुर्यफुलाच्या उत्पादनात वाढ करता येते. एका पाण्याच्या पाळीची सोय असेल तर ते पाणी बोंडे धरण्याच्या अवस्थेत द्यावे. दोन वेळा पाण्याच्या पाळ्यांची सोय असेल तर एक पाणी बोंड धरण्याच्या व दुसरे पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत द्यावे. जर तीन पाण्याच्या पाळयांची सोय असेल तर पहिले पाणी बोंड धरण्याच्या अवस्थेत, दुसरे पाणी फुलोऱ्यात व तिसरे पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत द्यावे. उन्हाळी हंगाममध्ये जमिनींच्या प्रकारानुसार पाण्याचा पाळ्या १० ते १५ दिवसांचे अंतराने द्याव्यात.

सुर्यफुलाचे दाणे भरणे (सिड सेटिंग) : सुर्यफुल ही वनस्पती स्वपरागसिंचीत नसल्यामुळे कृत्रिमरित्या परागीकरण घडवून आणल्यास उत्पादनात भरीव वाढ होते. त्यासाठी मधमाशांचे पोळे शेतात त्यांच्या घरट्यात ठेवल्यास मधमाशा मध गोळा करीत असताना त्यांच्या पायाला व अंगाला परागकण चिकटून एका फुलावरून दुसऱ्यावर नेऊन टाकले जातात व त्यामुळे बीजधारणेस मदत होते. तसेच ७ ते ८ दिवस फुल उमलल्यानंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत फुलावरून हात फिरविल्यास किंवा एक फुल दुसऱ्या फुलावर घासल्यास बाह्य परागीकरणास मदत होते. त्यामुळे दाणे चांगले भरण्यास आपोआप मदत होते व उत्पादनात २० ते २५% वाढ होते.

कीड व रोग नियंत्रण : सुर्यफुल या पिकावर तुडतुडे, पांढरी माशी, पाने खाणारी अळी, तंबाखूवरील अळी, केसाळ अळी, फुलावरील घाटे अळी या किडी पडतात. रोगामध्ये प्रामुख्या ने पानावरील व खोडावरील करपा, तांबेरा, केवडा येतो. ह्या किडी व रोगांना प्रतिबंध म्हणून तसेच त्यांचे नियंत्रणासाठी आणि भरघोस, दर्जेदार उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : २५० मिली. जर्मिनेटर + २५० मिली. थ्राईवर + २५० मिली. क्रॉंपशाईनर + १०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १०० मिली. प्रिझम + १०० मिली हार्मोनी + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर १५ ते ३० दिवसांनी) : ५०० मिली. थ्राईवर + ५०० मिली. क्रॉंपशाईनर + २५० मिली. प्रिझम + २५० मिली. हार्मोनी + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० ते ४५ दिवसांनी) : ७५० मिली. थ्राईवर + ७५० मिली. क्रॉंपशाईनर + ५०० मिली. राईपनर + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + ५०० मिली. प्रिझम + ५०० मिली. न्युट्राटोन + ३०० ते ३५० मिली हार्मोनी + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ४५ ते ६० दिवसांनी) : १ लि. थ्राईवर + १ लि. क्रॉंपशाईनर + ७५० मिली. ते १ लि. राईपनर + ७५० ग्रॅम प्रोटेक्टंट + ७५० मिली. न्युट्राटोन + ३०० ते ३५० मिली हार्मोनी + २०० लि.पाणी.

काढणी व मळणी : सुर्यफुलाची पाने पिवळी दिसू लागली व फुलांचा मागील भाग पिवळा पडू लागला म्हणजे पीक काढणीला तयार झाले असे समजावे. मळणी यंत्राच्या सहाय्याने मळणी व उफणणी ही दोन्ही कामे करून घ्यावीत. फुले चांगली वाळलेली असतील तर मळणी यंत्राच्या बोल्टाच्या संख्येत ३ ते ४ ने घट करावी. तसेच चांगल्या वाळलेल्या फुलावर थोडे पाणी शिंपडावे, त्यामुळे दाणे फुटण्याचे प्रमाण कमी होते.

उत्पादन : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कोरडवाहू सुर्यफुलाचे ४ ते ५ क्विंटल तर बागायती सुर्यफुलाचे ७ ते ८ क्विंटल एकरी उत्पादन येते.