खरीपातील भात लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक असून, या पिकाखाली सुमारे १४.७४ लाख हे. क्षेत्र आहे व त्यामधून २५.९७ लाख टन तांदळाचे उत्पादन होते. भात हे मुख्यत: उष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. विभागनिहाय तपशिलात विदर्भात ६.८२ लाख हेक्टर, कोकण विभाग ४.०९ लाख हेक्टर, पश्चिम महाराष्ट्र ३.१८ लाख हेक्टर तर मराठवाडा विभागात ०.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर भात पिकवला जातो. आपल्या राज्याची तांदळाची सरासरी उत्पादकता १६८२ किलो प्रति हेक्टरी असून पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांच्या तुलनेत ती खूपच कमी आहे. गेल्या १० वर्षातील स्थिर उत्पादकता पाहता तांदळाची उत्पादकता वाढविणे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्यक आहे.

अ. क्र.   प्रदेश   क्षेत्र(लाख हे.)   राज्यातील क्षेत्राची
टक्केवारी  
उत्पादन
(लाख टन)  
उत्पादकता
(कि.ग्रॅ./हे.)  
१.   कोकण   ४.०९   २७.७५   ९.८८   २४१०  
२.   विदर्भ   ६.२   ७६.२७   १०.५१   १५४०  
३.   प.महाराष्ट्र   ३.४   २१.५७   ५.३४   १६८०  
४.   मराठवाडा   ०.६५   ४.४१   ०.२७   ४१०  
  एकूण   १४.७४   - -   २५.९७   १७६०  


खरीप भात लागवड करताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी :

१) भाती जातीची निवड व बियाणे,

२) शेतीची पूर्वमशागत,

३) भाताची पेरणी व लावणी करणे,

४) रोपवाटिकेतील भात लावणीवेळी व नंतरचे खत व्यवस्थापन,

५) भात रोपवाटिकेतील व भात पिकातील तण नियंत्रण,

६) भात पिकातील पाणी व्यवस्थापन,

७) रोप वाटिकेतील भात पिकांतील रोग व किडीचे नियंत्रण,

८) भात पिकाची कापणीची वेळ,

१) भाती जातीची निवड व बियाणे : राज्यात हळव्या प्रकारातील १५, निमगरव्या प्रकारातील १६, गरव्या प्रकारातील ७, सुवासिक प्रकारातील ५, जास्त क्षारतेस सहनशील असणारे ३, भारी काळ्या जमिनीसाठी पावसाच्या पाण्यावर येणारे ७, असे एकूण ५५ भाताचे सुधारित वाण तर २ हळवे आणि २ गरवे असे ४ संकरित वाण लागवडीसाठी प्रसारित करण्यात आलेले आहेत. या शिवाय राष्ट्रीय स्तरावर प्रसारित व महारष्ट्रासाठी हळव्या गटातील ३, निमगरव्या गटातील ७ व गरव्या गटातील ४ अशा एकूण १४ भात जातींची शिफारस केलेली आहे. सर्वसाधारपणे हळव्या जातीस ११५ - १२० दिवस, निमगरव्यासाठी १२० - १३५ दिवस व गरव्या जातींना १४० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो.

महारष्ट्र राज्यातील विविध संशोधन केंद्रामार्फत विविध जमिनीस व हवामानास योग्य असणाऱ्या प्रसारित जातींचा तपशील पुढील तक्त्यामध्ये देण्यात आलेला आहे.

२) शेतीची पूर्वमशागत : भाताचे पहिले पीक काढताच दोन वेळा उभी व आडवी नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. शेतातील भाताची धसकटे वेचून एकत्र करून जाळून नष्ट करावीत. त्यानंतर १० टन चांगले कुजलेले शेणखत लावणी अगोदर ३ - ४ आठवड्यापूर्वी प्रति हेक्टरी शेतात समप्रमाणात पसरावे किंवा १० टन हिरवळीची खते लावणीपूर्वी २- ३ दिवस अगोदर द्यावीत.

महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या विभागासाठी भात जातींचा तपशील

भात जातीचे नाव   संकर   शिफारस केलेले विभाग   दाण्याचा प्रकार   उत्पादन (ट./हे.)   पक्वतेचा कालावधी   वैशिष्टचे  
कर्जत -१८४

 
तायचुंग स्था. x
कोळंब -५४०  
कोकण विभाग,
वरकस जमिनीसाठी  
मध्यम बारीक   ३ ते
३.५  
१०० ते १०५ दिवस   करपा रोगास प्रतिकारक  
कर्जत -१४-७   आय. आर. -८ x
झिनीया १४९  
गरव्या जमिनीसाठी   लांबटबारीक   ४.५   १४० ते १४५ दिवस   पाणथळ जमिनीस योग्य,
करपा रोगास प्रतिकारक.  
कर्जत-१   होलमालडिगा x आय. आर. - ३६   कोकण विभाग, वरकस जमिनीसाठी   आखूड जाड   ३.५ ते ४.५   १०५ ते ११० दिवस   करपा, कडा करपा रोगासाठी प्रतिकारक
तसेच तुडतुड्यांना प्रतिकारक  
कर्जत -२   आर. पी. डब्ल्यू - ६ - १७ x
आर. पी.-४-१४  
राज्यातील निमगरव्या व गरव्या जमिनीसाठी   लांबट बारील   ४ ते ४.५   १३५ ते १४० दिवस   करपा रोगास प्रतिकारक, पाणथळ जमिनीसाठी  
कर्जत - ३   आय. आर ३६ x कर्जत - ३५ - ३   कोकण विभाग, निमगरव्या जमिनीसाठी   आखूड जाड   ४.५ ते ५.०   ११५ ते १२० दिवस   करपा रोगास व गादमाशीस प्रतिकारक  
कर्जत -४   आय. आर. २२ x झिनीया - ६३   कोकण विभातातील चार जिल्हे (ठाणे, रत्नागिरी, रायगड व सिंधुदूर्ग)   आखूड अति बारीक   ३ ते ३.५   ११५ ते १२० दिवस   अतिबारीक दाणा, खोडकिडीस साधारण बळी पडते, वरकस जमिनीस उपयुक्त.  
कर्जत - ५   बी. आर. ८२७ मघून निवड   राज्यातील भात पिकविणाऱ्या निमगरव्या भागासाठी   लांबट जाड   ४.५ ते ५.०   १२५ ते १३० दिवस   पान करपा रोगास प्रतिकारक, भातावरील टुंग्रो विषाणूस साधारण प्रतिकारक  
कर्जत - ६   हिरा x कर्जत १८४   राज्यातील भात पिकविणाऱ्या भागासाठी   आखूड बारीक   ४.० ते ४.५   १३० ते १३५ दिवस   मान करपा रोगास प्रतिकारक, पाने गुंडाळणाऱ्या अळीस साधारण प्रतिकारक  
सह्याद्री   आय. आर - ५८०२५ x
बी. आर. - ८२५ -३५ -३ -१-१-१ आर.  
महाराष्ट्रातील भात पिकविणारे सर्व जिल्हे   लांबट बारीक   ६.५ ते ७   १२५ ते १३० दिवस   जास्त उत्पादन देणारी संकरित जात.  
सह्याद्री -२   आय. आर - ५८०२५ अ x
के. जे. टी. आर -२  
महाराष्ट्रातील भात पिकविणारे सर्व जिल्हे   लांबट बारीक   ५.५ ते ६.५   ११५ ते १२० दिवस   हळवी, जास्त उत्पादन देणारी,
करपा व कडाकरपा रोगास तसेच
आभासमय काजळीस प्रतिकारक.  
सह्याद्री -३   आय. आर. - ५८०२५ अ x के. जे. टी. आर - ३   राज्यातीली भात पिकविणाऱ्या भागासाठी   लांबट बारीक   ६.५ ते ७.५   १२५ ते १३० दिवस   मानकरपा रोगास प्रतिकारक,
पाने करपा रोगास साधारण प्रतिकारक,
पाने गुंडाळणाऱ्या अळीस प्रतिकारक.  
सह्याद्री - ४   आय. आर - ५८०२५ अ x
के. जे. टी. आर - ४  
राष्ट्रीय पातळीवर प्रसारित, देशातील पंजाब,
हरियाणा, पश्चिम बंगाल,
उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या पाच राज्यासाठी
लावणी करून पीक घेण्यासाठी
तसेच खरीप हंगामासाठी  
लांबट बारीक   ५.५ ते ६.५   ११५ ते १२० दिवस   पाने करपा, मान करपा,
भातावरील टुंग्रे विषाणूस साधारण प्रतिकारक,
जास्त उत्पादन देणार हळवा संकरिता वाण.  
आंबेमोहर (Improved)   स्थानिक निवड   पावसाच्या पाण्यावर, वरचढ जमिनीस योग्य   मध्यमबारीक   २.५ ते ३.०   १०५ ते ११० दिवस   सुवासिक  
इंद्रायणी   आंबेमोहोर -१५७ x आय. आर - ८   पश्चिम महाराष्ट्रातील भात पिकवणारे जिल्हे   लांबटबारील   ४ ते ४.५   १३० ते १३५ दिवस   सुवासिक वाण, करपा रोगास प्रतिकारक  
भोगावती   आर. पी. एस. पी. ३२८ (Introduction)   कोकण, पश्चिम घाट झोन व इतर भात पिकवणा महाराष्ट्रातील विभाग   लांबटबारीक   ३.५ ते ४.०   १३० ते १३८ दिवस   सुवासिक वाण,
रोगास प्रतिकारक,
पान करपा रोगास साधारण प्रतिकारक  


३) भाताची पेरणी व लावणी करणे

अ) गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार करणे : भाताचे पहिले पीक काढताच मशागत करून जमीन भुसभुशीत करावी व त्यामध्ये १०० -१२० से. मी. रुंद व १० ते १५ सें. मी. उंच आणि आवश्यक त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत. ज्या ठिकाणी शक्य नसेल तेथे रोप तयार करण्यासाठी उंचवट्याची जागा निवडावी व रोपवाटिकेच्या चहूबाजूंनी खोलगट चरी काढावी. त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होण्यास मदत होईल व रोपे मारण्याचे प्रमाण अल्प राहील. गादीवाफे तयार झाल्यावर दर चौ. मी. क्षेत्रावर २- ३ किलो या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखताचा अथवा कंपोस्ट खताचा थर द्यावा. नंतर वाफ्यावर प्रती गुंठ्यास १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत, १ किलो युरिया किंवा २ किलो अमोनियम सल्फेट, ४०० ग्रॅम स्फुरद आणि ५०० ग्रॅम पालाश द्यावे. गादीवाफ्यावर ७ ते ८ सें.मी. अंतरावर ओळीत २ - ३ सें.मी. खोल प्रती चौरस मीटरला ३५ -४० ग्रॅम याप्रमाणे बी पेरून मातीने झाकावे. पेरणीनंतर झारीने पाणी घालावे. उगवणीनंतर ८ - ८ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी २५० मिलीची १०० लि. पाण्यातून २ वेळा फवारणी करावी. म्हणजे रोपे जोमाने वाढून लवकर लागवडीस येतात. साधारण: १ हेक्टर लागवडीसाठी १० आर (१० गुंठे) क्षेत्रावर बी पेरणे आवश्यक आहे.

ब) भात पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण व रोपवाटिकेची काळजी : बारीक दाण्याच्या जातीचे प्रती हेक्टरी २५ किलो बियाणे, मध्यम दाण्यासाठी २५ ते ३० किलो व जाड दाण्यासाठी ३५ ते ४० किलो तर अतिजाड दाण्याच्या जातीचे ४५ - ५० किलो प्रति हे. बियाणे लागते.

पेरणीनंतर एक आठवड्याने व नंतर गरजेनुसार रोपवाटिकेची बोणणी करावी किंवा पेरणीनंतर २ दिवसात ब्युटाक्लोर किंवा अॅनिलोफॉस तणनाशकांचा वापर करावा. तणनाशक वापरताना रोपवाटिकेमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे. रोपावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसल्यास दाणेदार फोरेट १० % १० किलो प्रती हेक्टरी किंवा दाणेदार कार्बोफ्युरान ३ टक्के १६.५ किलो प्रती हे. वापरावे. दाणेदार कीटकनाशके वापरताना जमिनीत ओल असणे आवश्यक आहे. खरीप हंगामात रोपवाटिकेवर करपा रोग आढळून आल्यास थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी २५० मिली + कॉपर ऑक्झीक्लोराईट ५० टक्के (पाण्यात मिसळणारे) १०० ग्रॅम यांची १०० ते १५० लि. पाण्यातून फवारणी करावी. रोपांना सहावे पान आल्यावर म्हणजे सुमारे २१ -२५ दिवसांनी रोप लावणीस तयार झाले असे समजावे.

भाताची लावणी :

अ) सुधारित भात जातींची लागवड पद्धती : शेतीची मशागत केल्यानंतर १० टन शेणखत किंवा कंपोस्ट किंवा चिखलणीच्या वेळी १० टन गिरीपुष्पाचा पाला शेतामध्ये गाडावा, म्हणजेच भातशेतीला सेंद्रिय खताचा पुरवठा होऊन जमिनीचा पोत सुधारतो आणि त्याचबरोबर नत्रांचा अधिक पुरवठा होतो. खरीप हंगामात जातीपरत्वे लावणीचे अंतर ठेवावे. हळव्या भात जातीची लागवड १५ x १५ सें. मी. प्रमाणे करावी. तसेच निमगरव्या व गरव्या जातींची २० x १५ सें.मी. प्रमाणे लागवड करावी. १५ x १५ सें. मी. प्रमाणे लागवड करत असताना प्रति चौरस मीटरमध्ये ४४ ते ४५ चूड बसतील याची काळजी घ्यावी तसेच २० x १५ सें.मी. प्रमाणे लागवड करताना ३३ चूड प्रति चौरस मीटर प्रमाणे लावावीत.

ब) संकरित भात जातींची लागवड पद्धती: संकरित भात जातींच्या लागवडीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागते. संकरित भात लागवडीसाठी २५ दिवसांचे रोप वापरावे. २ रोपातील अंतर १५ सें.मी. तसेच २ ओळीतील अंतर १५ ते २० सें. मी. ठेवावे. प्रत्येक चुडात १ किंवा २ जोमदार रोपे लावावीत. प्रत्येक चौरस मीटर जागेत ३३ ते ३५ रोपे लावावीत. संकरित भात जातीची लागवड करताना प्रत्येक वेळेस नवीन बियाणे वापरणे आवश्यक आहे. सह्याद्री - २ व सह्याद्री - ४ हे संकरित वाण हळव्या तर सह्याद्री व सह्याद्री -३ हे वाण निमगरव्या लागवडीस घ्यावेत.

४) भात रोपवाटिकेतील व भात पिकातील तण नियंत्रण :

भात पिकातील व रोपवाटिकेतील तण नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तणामुळे लागवड करून घेतलेल्या भात पीक उत्पादनात एकूण १५ - ४० टक्के घट होते. चिखलावर पेरणी करून घेतलेल्या भात पिकाच्या उत्पादनात ३० - ५५ टक्के घट येते. तर वरकस पावसाच्या पाण्यावर आधारित भात पीक होणाऱ्या भागात पेरणी करून भात पीक घेतल्यास तणामुळे ५० - ८० टक्के उत्पादनात घट येते. म्हणून भात रोपवाटिकेची पेरणीनंतर एक आठवड्याने व नंतर गरजेनुसार बेणणी करावी. कारण बेणणी न केल्यास भात रोपांबरोबर गवत शेतात लावले जाण्याची शक्यता जास्त असते. तसेच रोपवाटिकेतील तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर ४ - ५ दिवसांनी ब्युटाक्लोर + सॅफनर १ किलो १० गुंठ्यास वाळूमधून मिसळून द्यावे किंवा पेरणीनंतर ८ - १० दिवसांनी राफ्ट ८ - १० मि. ली. प्रति १० लिटर प्रमाणे फवारावे. लावणीनंतर तण नियंत्रणासाठी ५ ते ७ दिवसांनी हेक्टरी १.५ किलो ब्युटाक्लोर किंवा अॅनिलोफॉस वाळूमध्ये मिसळून सुरवातीच्या ३ - ४ दिवसात चिखलावर पसरावे तसेच आवश्यकतेनुसार १ किंवा २ वेळा बेणणी करावी.

५) पाणी व्यवस्थापन : रोपवाटिकेस दररोज झारीने हलके पाणी द्यावे. लावणीनंतर ३० दिवसांपर्यंत शेतातील पाण्याची पातळी २ - ३ सें.मी. इतकी ठेवावी. नंतर फुटवा येण्याच्या कालावधीपर्यंत ५ - १० सें.मी. पर्यंत पाण्याची पातळी स्थिर ठेवावी. पाणी सारखे बांधून ठेवू नये. कापणीपूर्वी १० दिवस अगोदर शेतातील पाण्याचा पूर्णपणे निचरा करावा. वाफसा आल्यानंतर पाणी दिल्याने उत्पादनात वाढ झाल्याचे आढळते आहे.

६) खत व्यवस्थापन : एक गुंठा रोपवाटिकेच्या क्षेत्रास २५० किलो शेणखत, १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत, १ किलो नत्र (२ किलो युरिया) ४०० ग्रॅम स्फुरद (३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५०० ग्रॅम पालाश (१ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) याप्रमाणे द्यावे. तसेच रोप लावणीसाठी काढण्यापूर्वी रोपावटिकेस प्रति ४० चौ. मीटरप्रमाणे २ किलो डाय अमोनियम फॉस्फेट द्यावे. जेणे करून रोपांच्या मुळास उपटताना इजा होणार नाही. लावणीपूर्वी १०० ते १५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत, ५० किलो नत्र (१०८ किलो युरिया) ५० किलो स्फुरद (३१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) + ५० किलो पालाश (८७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी भात शेतास द्यावे किंवा हेक्टरी ३३ किलो सुफला (१५:१५:१५) द्यावे. खताच्या माती परीक्षणानुसार देणे अधिक उपयुक्त आहे.

भातावरील किडी :

१) खोडकिडा : या किडीचा पतंग पिवळसर असून मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. मादीच्या पुढील पंखांच्या जोडीवर मध्यभागी एक-एक काळा ठिपका असतो. अळी प्रथम पानाच्या कोवळ्या भागावर उपजिवीका करते आणि नंतर खोडामध्ये शिरून आतील भाग खाण्यास सुरुवात करते. किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत म्हणजेच पीक पोटरीवर येण्यापूर्वी झाला तर मधला गाभा वरून खाली सुकत येतो. याला 'गाभा जळणे' असे म्हणतात. कीड जर पीक पोटरीवर आल्यानंतर पडली तर दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात. याला 'पळींज' म्हणतात.

२) गादमाशी : गादमाशी आकाराने डासासारखी असून गुलाबी असते. अळी रोपाच्या आत शिरून अंकूर कुरतडून खाते. त्यामुळे अळीच्या भोवतालच्या अंकुराचा भाग फुगतो आणि त्याची नळीच्या आकारासारखी वाढ होते. ही नळी कांद्याच्या पातीसारखी परंतु पांढरट - पिवळसर रंगाची असते. यालाच 'नळ' किंवा 'पोंगा' असे म्हणतात. अशा कीडग्रस्त रोपांची वाढ खुंटते व अशी रोपे पोसवत नाहीत.

३) तुडतुडे : ही कीड ज्या जमिनीत पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही आणि जेथे नत्र खतांच्या मात्र वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात दिल्या जातात त्या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येते. मादी तुडतुडे व त्यांची पिल्ले भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात. परिणामी भाताची पाने पिवळी पडतात आणि पूर्ण रोप वाळते. विशेषत: शेताच्या मध्यभागी ठिकठिकाणी तुडतुड्यांनी करपून गेलेले भाताचे पीक दिसते. अशा रोपांमधून लोंब्या बाहेर पडत नाहीत. जरी पडल्याच तर दाणे पोचट होतात.

४) निळे भुंगेरे : भुंगेरे गर्द निळ्या रंगाचे असून अळी भुरकट रंगाची असते . या किडीची अळी अवस्था आणि प्रौढावस्था या दोन्ही हानिकारक आहेत. ही कीड पानाचा हिरवा भाग कुरतडून खाते. शेवटी संपूर्ण पीक वाळते.

५) लष्करी अळी : या किडीच्या अळ्या दिवसा पानाच्या फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात आणि रात्री पाने खातात. पाने कडेपासून मध्यशिरेपर्यंत खात जात असल्यामुळे नुकसानीवरून कीड चटकन ओळखून येते. किडीचा खरा उपद्रव मात्र पीक काढणीच्यावेळी होतो. या किडीच्या अळ्या लोंब्या कुरतडतात, त्यामुळे दाणे जमिनीवर गळून नुकसान होते.

६) खेकडे : खरीप हंगामात भाताचे खेकड्यांपासून बरेच नुकसान होते. खेकडे दिवसा बिळामध्ये राहतात आणि रात्री भाताची रोपे जमिनीलागत कापून बिळामध्ये खाण्यासाठी घेऊन जातात. परिणामी भाताच्या रोपांची संख्या कमी होऊन प्रति हेक्टरी उत्पादनात बरीच घट होते. क्वचितप्रसंगी बांधालगत भाताची पुन्हा लावणी करावी लागते. याशिवाय खेकडे भात खाचराच्या बांधास मोठ्या प्रमाणात छिद्रे पाडतात. परिणामी भात खाचरात पाणी साठविणे कठीण जाते. तसेच बांधाची वरचेवर दुरुस्ती करावी लागते.

भातावरील रोग:

१) कडा करपा (बॅक्टेरियल ब्लाइट) : या रोगाचे जीवाणू रोपे उपटताना मुलांना होणारी इजा, नैसर्गिक कारणांमुळे पानांना होणारी इजा, लावणीपुर्वी रोपांची पाने खुडण्याची प्रथा आणि त्यामुळे पानांना होणारी इज आणिपानांवरील नैसर्गिक छिद्रे इत्यादींमुळे रोपांच्या शरीरात प्रवेश करतात आणि रोगाची लागण होते. रोगाची लक्षणे दोन प्रकारात मोडतात. पहिल्या प्रकारात लावणीनंतर साधारणत: एक महिन्याने रोगाची सुरुवात चुडातील खालच्या पानांवर होते आणि कालांतराने रोग वरच्या पानांवर पसरतो. प्राथमिक अवस्थेत रोगग्रस्त पानांच्या एका किंवा दोन्ही कडांवर शेंड्याकडून खोडाकडे फिकट पिवळसर हिरवट रेषा निर्माण होतात. कालांतराने ह्या रेषा वरून खाली आणि पानाच्या आतील बाजूला मध्यशिरेकडे वाढतात आणि पानांवर राखाडी किंवा तांबूस रंगाचे पट्टे निर्माण होतात. अशा पट्ट्यांच्या कडा नागमोडी असतात. पुढे पाने करपून वाळतात.

दुसऱ्या प्रकारात रोगाचे जीवाणू तुटलेल्या मुळांतून किंवा खुदालेल्या पानांतून अन्न नलिकेत प्रवेश करतात आणि अणूजीव आंतरप्रवाही होतात. रोगग्रस्त चुडांची पाने हिरवट करड्या रंगाची होऊन दोन्ही कडांकडून आतील भागाला पुंगळीसारखी मोडतात. चुडातील संपूर्ण पाने करपून फाटतात आणि संपूर्ण चुडाची मर होते. याला रोगांची 'केसेक' अवस्था म्हणतात.

२) करपा : करपा हा बुरशीजन्य रोग आहे. रोगाची लक्षणे झाडांच्या पानांवर, पेरांवर आणि लोंबीच्या देठांशी दिसून येतात. रोगाची सुरुवात पानांवर बारील हिरवट पिवळसर आणि भिजट ठिपके पडून होते. कालांतराने ठिपक्याचे आकारमान वाढत जाते. पूर्ण वाढलेले ठिपके हे आकाराने लांबट गोल, भिंगाकृती असून त्यांच्या कडा गर्द तपकिरी रंगाच्या असतात, ठिपक्यांचा आतील भाग राखाडी रंगाचा असतो. रोगास जास्त बळी पडणाऱ्या जातींवर ठिपक्यांची संख्या आणि आकार मोठा असून दोन किंवा अधिक ठिपके एकत्र मिसळून पानांवर राखाडी रंगाचे चट्टे पडतात आणि संपूर्ण पान करपते.

३) शेंडे करपा (लिफस्काल्ड ) : हा बुरशीजन्य रोग आहे. रोगग्रस्त पानांचे शेंडे वरून खाली करपतात आणि रोगग्रस्त पान सुर्यप्रकाशात धरल्यास रोगट भागावर सुपारी कातरल्यासारखी नक्षी दिसते. रोगाची लक्षणे कधी कधी पानांच्या पृष्ठभागावर कडेला धरून कुठेही उद्भवतात आणि रोगग्रस्त भागावर वरीलप्रमाणे सुपारी कातरल्यासारखी नक्षीदार लांबट गोलाकार डाग दिसतात.

वरील कीड रोगांना प्रतिबंधक उपाय म्हणून तसेच उत्तम दर्जाचे जास्तीत - जास्त उत्पादन मिळण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात :

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ) : जर्मिनेटर ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २०० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ६० ते ७० दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली + न्युट्राटोन ७५० मिली + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.

अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधून तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.

भात पिकाची कापणी, मळणी व साठवण

१) भात कापणीची योग्य वेळ : भात कापणीची वेळ ही भरडणीसाठी महत्त्वची ठरते. भात पीक कापणी झाल्यानंतर जास्त दिवस शेतात ठेवल्यास भरडणीनंतर तांदळाच्या तुटीचे प्रमाण जास्त होते. कारण दिवसाचे वाढते तापमान व रात्रीचे कमीत कमी तापमान तसेच त्यावर पडलेले दवबिंदू या तफावतीमुळे भात दाण्यास तडा जातो. त्यामुळे भरडणीनंतर तांदळाच्या तुटीचे प्रमाण वाढते. यासाठी भात जातीची योग्य वेळी म्हणजे लोंबीतील ९० ते ९५ टक्के दाणे पक्व झाल्यानंतर आणि लोंबीतील काही दाणे पिवळसर हिरवट असताना कापणी करावी. कापणीनंतर त्याच किंवा दुसऱ्या दिवशी मळणी करावी. ओला पेंढा स्वतंत्र वाळवावा.

२) नियंत्रित वाळविणे : कापणीनंतर भात नियंत्रित परिस्थितीत उन्हाखाली किंवा यंत्राच्या सहाय्याने वाळवावा अतिशय कडक तापमानात दाण्याच्या पृष्ठभागावरील आर्द्रता तेवढ्या कमी कालावधीत पृष्ठभागावर स्थलांतरीत होण्यास असमर्थ ठरते. अशा परिस्थितीत पृष्ठभागावरील तापमान व दाण्यातील आर्द्रता या तापमानातील तफावतीमुळे दाण्याला तडे जातात व अशाप्रकारे वाळविलेले दाणे भरडणी करताना हमखास तुटतात.

३) भरडणी करतेवेळी भातातील पाण्याचे प्रमाण : भरडणी वेळी दाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण दाण्याच्या बळकटीच्या गुणधर्माच्या व्यस्त असते. जेवढे भातातील आर्दतेचे प्रमाण जास्त तेवढा दाणा जास्त कमकुवत असतो. अशा प्रकारचा भात सहज तुटतो. साधारणत: भात भरडताना भातामध्ये १२ ते १४ टक्के आर्द्रतेचे प्रमाण असणे आवश्यक असते. जर यापेक्षा भातात आर्द्रतेचे प्रमाण कमी असेले तर भरडणीवेळी भात दाणा साफ होतो व परिणामत: तुटीचे प्रमाण कमी होते.

४) भाताची योग्य साठवण : गोदामात भाताची साठवणूक करत असताना भातावरील आर्दतेचे प्रमाण १२ ते १४ टक्के असणे आवश्यक असते. जर यापेक्षा आर्द्रतेचे प्रमाण जास्त असेल तर भातास किडी व बुरशी लागण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत किडीच्या व बुरशीच्या उपद्रवामुळे भातास इजा होते व त्यामुळे भात भरडल्यानंतर कणीचे प्रमाण वाढते. तसेच गोदामात भात साठवला असताना आर्द्रतेचे प्रमाण व तापमानात अतिशय जास्त तफावत असते, अशा वेळीही भातास तडा जातो. त्यामुळेही भात भरडताना कणीच्या प्रमाणात वाढ होते.

तरी शेतकरी बंधुंनी खरीप भात लागवड करताना वरील सर्व बाबींचा अवलंब करून दर्जेदार व अधिक उत्पादन घ्यावे.