'गवारगम' कभी ना देगा 'गम'

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


गेल्या काही वर्षांत प्रक्रिया उद्योगाकडून गवारीला चांगली मागणी वाढली आहे. आतापर्यंत हलक्या जमिनीवर आणि कमी पावसाच्या विभागात गवारीची लागवड केली जात होती. परंतु आता प्रक्रिया उद्योगाकडून गवारगमची मागणी वाढल्याने दुर्लक्षित गवार राजस्थान, हरियाणा, गुजरात व मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही चांगला पैसा मिळवून देणारे पीक झाले आहे.

गवार हे शेंगवर्गीय भाजीपाला पीक आहे, गम या इंग्रजी शब्दाचा अर्थ डिंक होतो. या पिकापासून विशिष्ट चिकट पदार्थ मिळविला जातो. तोच गवारगम होय. या गवारगमचा औद्योगिक क्षेत्रात उपयोग केला जातो.

काही वर्षापूर्वी गवारीला प्रति क्विंटल एक हजार रुपये इतका दर मिळत असे. परंतु गवारीचे विविध उपयोग समोर येऊ लागल्यानंतर आता गवारीला वायदे बाजारात १० हजार ते ३० हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. जगभर होणाऱ्या गवारीच्या उत्पादनात भारताचा ८०% वाटा आहे. परदेशात पाळीव जनावरांचे खाद्य म्हणून गवार लागवड केली जाते. भारतात मात्र गवारीची लागवड भाजीपाला म्हणून केली जाते. गवारीमध्ये द्रव्य घट्ट करणारे घटक आहेत. हे घटक जगभरात गवारगम या नावाने ओळखले जातात. भारतात उत्पादित होणाऱ्या गवारीपासून चांगल्या प्रतीचा गवारगम तयार होतो. त्यामुळे भारतीय गवारीला चांगला दर मिळतो आहे. गवारीची मागणी लक्षात घेऊन राजस्थान, हरियाना, गुजरात, मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकऱ्यांनी याच्या लागवडीवर लक्ष केंद्रित केले आहे.

गवारीचे उत्पादन भारतानंतर पाकिस्तान आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. गवारीच्या अनेक उपयोगांमुळे या तिन्ही देशांत गवारीची लागवड वाढत आहे.

गवारगमचा उपयोग

१) कापडाचा रंग पक्का करण्यासाठी

२) नूडल्सचा ओलावा टिकविण्यासाठी

३) कागदाचा पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी

४) आईस्क्रीम घट्ट करण्यासाठी

५) ताजेतवाने वाटणाऱ्या पेयांमध्ये

६) सूप दाट करण्यासाठी, चीजचा स्वाद राखण्यासाठी

७) औषधनिर्मिती उद्योग इ. मध्ये गवारगमचा वापर केला जातो.

जमीन :गवारगम पिकासाठी हलकी ते मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन फायदेशीर ठरते. रेताड जमिनीत खरीप हंगामातील लागवड फायदेशीर ठरते. खारट व चोपण जमिनी तसेच सुत्रकृमी आणि मर रोगाचे जंतू असणाऱ्या जमिनीत या पिकाची लागवड करू नये. हलक्या जमिनीत गवारीची वाढ कमी होते. मात्र शेंगा लवकर लागतात. परंतु कमी दर्जाचे व कमी उत्पन्न मिळते. त्यासाठी गवारीची लागवड करताना पोयट्याच्या, गाळाच्या जमिनी उत्तम ठरतात. गाळाच्या जमिनी सुपीक असल्याने खताची जरुरी कमी भासते व उत्पन्नही चांगले मिळते. भारी जमिनीत गवारीची लागवड उत्पादनाच्या दृष्टिकोनाने फायदेशीर ठरते.

हवामान : गवार हे राजस्थानातील पीक. याला उष्ण हवामान अधिक पोषक ठरते. कडाक्याच्या थंडीमध्ये हे पीक चांगले येत नाही. महाराष्ट्रात या पिकाची लागवड उन्हाळी व खरीप हंगामात केली जाते. यामध्ये उन्हाळी हंगामातील लागवड आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते. या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी १८ ते ३२ डी. सेल्सिअस तापमान. भरपूर व स्वच्छ सूर्यप्रकाश पोषक ठरतो. जास्त पाऊस व दमट हवामानात गवारीवर भूरी रोगाचा प्रादुर्भाव होतो.

बियाणे : पेरणीसाठी एकरी ५ किलो बियाणे पुरेसे होते.

बियाण्याची उगवण : गवारीच्या बियाची उगवण फार विचित्र आहे. साधारणपणे अनेक प्रकारच्या बियांना वाफसा आल्यावर पेरावे लागते किंवा लगेच पाणी तरी द्यावे लागते तेव्हा उगवण झपाट्याने होते. तथापि गवार लागवड करताना बी कोरड्या जमिनीत पेरावे लागते व ३ ते ४ दिवस जमिनीत तापू द्यावे आणि नंतर पाणी द्यावे.

थंडीमध्ये बियाणे उगवत नाही. यासाठी सर्व प्रकारचे बियाणे कोमट पाण्यामध्ये जर्मिनेटर चे द्रावण तयार करून त्यामध्ये बी भिजवून, सुकवून मगच लावावे. म्हणजे उगवण अप्रतिम होऊन गवारीवर भूरी रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो.

बीजप्रक्रिया : जर्मिनेटर २५ मिली + प्रिझम १० मिली + प्रोटेक्टंट १० ते १५ ग्रॅम + १ लि. पाणी या द्रावणात १ किलो गवारीचे बी अर्धा तास भिजवून नंतर सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे.

पेरणी : तिफणीने दीड ते दोन फूट २ तासात अंतर ठेवून पेरणी करावी.

खते : सर्वसाधारणपणे गाळाच्या जमिनीत खतांची जरुरी फारशी भासत नाही. वरकस किंवा काळ्या जमिनीमध्ये एकरी १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत बी लागवडीच्या वेळी द्यावे व उगवणीनंतर २१ ते ३० दिवसांनी खुरपणी झाल्यावर ५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. युरिया शक्यतो देवू नये. कारण युरिया दिल्यामुळे गवारीची पाने रसरशीत, अधिक हरितद्रव्य युक्त मऊ होत असल्याने भुरी रोग व मावा किडीस पीक लवकर बळी पडते.

पाणी : जमिनीच्या प्रकारानुसार या पिकास ८ ते १० - १२ दिवसाच्या अंतराने ७ ते ९ पाण्याच्या पाळ्या पुरेश्या होतात. पाण्याची कमतरता असल्यास स्प्रिंक्लरवरदेखील गवारीचे उत्पादन कमी पाण्यावर चांगल्याप्रकारे विदर्भातील शेतकऱ्यांनी घेतले आहे. (संदर्भ : श्री. मंगेश जोशी, नेर, जि. यवतमाळ . मोबा. ९८८१३०७६६३)

कीडरोग : गवार पिकावर मावा, तुडतुडे या किडींचा तर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा पुढील प्रमाणे वापर केल्यास गवारीचे अधिक, दर्जेदार उत्पादन मिळते.

फवारणी :

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी ) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २०० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४५ ते ६० दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.

काढणी : पीक ३० दिवसांचे झाल्यानंतर फुले येण्यास सुरुवात होते. या अवस्थेत रोपे अधिक जोमाने वाढीस लागतात. ही गवार २॥ ते ४ फूट उंचीची होते. प्रती झाड १०० ते १८० शेंगा लागतात. भाजीवर्गीय गवार शेंगेपेक्षा या शेंगेचा आकार लहान, गोलसर असतो. एक शेंगेत ६ ते ८ दाणे असतात.

विळ्याच्या सहाय्याने झाडांची कापणी करून त्याचे ढीग करावेत. २ ते ३ दिवस ढीग वाळल्यानंतर मळणी यंत्रातून पीक काढून घ्यावे.

उत्पादन : एकरी सर्व साधारणपणे २ ते २॥ क्विंटल गवारगमचे उत्पादन मिळते.

बाजारपेठ : गवारगमला राजस्थानात चांगली बाजारपेठ आहे. तेथील सरकारचा १० हजार रू./ क्विंटल हमी भाव आहे. तसेच या गवारीस वायदे बाजारात १० हजार ते ३० हजार रू./ क्विंटल भाव सध्या मिळत आहे.