पडीक जमिनीला वरदान ठरणारा कल्पवृक्ष - आकाशिया मँजियम

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


भारतामध्ये लाकडाची मागणी सतत वाढतच आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार सरपण, फर्निचर इमारती व कागद निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर लाकूड वापरण्यात येत आहे. झाडे तोडणे, शेतीचा विकास करणे, खाणींची निर्मिती करणे इत्यादी कारणांमुळे जंगलांचा ऱ्हास होऊ लागला आहे. दरवर्षी २ दशलक्ष हेक्टर जागेतील जंगल नष्ट होऊ लागले आहे.

या परिस्थितीतून जंगलांचा बचाव करण्यासाठी आगामी दशकात अन्न आणि कृषी संघटना तसेज जागतिक बँक वेगाने वाढणाऱ्या झाडांच्या लागवडीला प्रोत्साहन देणार आहेत.

साग : उत्पादनाची मागणी आणि पुरवठा यातील दरी दिवसेंदिवस रुंद होत चालली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आणि मागणी आणि पुरवठा यामधील तफावर नाहीशी करण्यासाठी अकाशिया मँजियम हा एक चांगला पर्याय आहे.

वनस्पती शास्त्रातील या झाडाचे नाव अकाशिया मँजियम असले तरी ते 'ऑस्ट्रेलिया सागवान' म्हणूनच गणले जाते. या झाडची मातृभूमी ही ऑस्ट्रेलिया खंड आहे. 'ऑस्ट्रेलिया सेंटर फॉर इंटरनॅशनल अॅग्रीकल्चरल रिसर्च या संस्थेच्या सर्वेक्षणाप्रमाणे या झाडांची लागवड मलेशिया, इंडोनेशिया, घाना, नायजेरिया तसेच भारतातील काही भागात यशस्वीरित्या सुरू झाली. मँजियम हे ओलावा असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या निकृष्ट जमिनीत वाढते. कोकणासारख्या आम्ल जमिनीत याची वाढ उत्तम होते. ४.२ इतका सामू असलेल्या जमिनीतही हे झाड चांगलेच वाढते.

हवामान व तापमान : १२ डी - १ ६ डी. पासून ३१ डी. - ३४ डी. तापमानात याची वाढ उत्तम होते. १५०० ते ३१०० मि. मी. पाऊसमान असेल तर या वृक्षास मानवते. समुद्रसपाटीपा सून ३० ते १८० मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात हे झाड येते. हलक्या प्रकारच्या पडीक जमिनीत व अत्यल्प पाऊसमान असलेल्या जमिनीत देखील ही झाडे चांगली वाढतात.

जमीन : इतर कामासाठी नको असलेली कोणत्याही प्रकारची जमिन मँजियमसाठी चालते. धुपून गेलेल्या, खडकाळ, मुरमाड किंवा लाल मातीच्या जमिनीत अकाशिया मँजियम चांगले वाढते. या झाडांच्या मुळावर रायझोबियमच्या गाठी असल्याने त्यास नत्रखत (नायट्रोजनयुक्त) मुद्दाम देण्याची गरज नसते. उलट पाला पडून जमीन खतावते. तिचा पोत दिवसेंदिवस अधिकच सुधारतो व त्यावरच झाडाचे पोषण होते.

जमिनीची मशागत व लागवडीची पूर्वतयारी :

लागवड करावयाच्या जमिनीत इतर झाडेझुडपे असल्यास ती काढून घ्यावीत. गवत जाळून टाकावे. त्यानंतर कमीत कमी ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे उन्हाळ्यात खणून घ्यावेत. लागवडीपूर्वी खड्डे जितके दिवस उन्हात तापतील तेवढे उत्तम. कारण नैसर्गिक निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया देखील पूर्ण होते. खड्डे बुजवताना थोडे सुके गवत व पालापाचोळा टाकून त्यावर १०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत टाकावे. त्यानंतर अर्धे ते एक घमेले शेणखत किंवा कंपोस्ट खत व माती मिसळून खड्डे भरून टाकावेत.

१ एकर जमिनीत सुमारे २००० रोपांची लागवड करता येते. प्रत्येक रोप १.३५ x १.३५ मीटर (४.५ x ४.५ फूट) अंतरावर लावता येते. हे झाड सरळ उंच वाढते. एका झाडापासून किमान २५ घनफूट लाकूड मिळते. शेताच्या बांधावर सुद्धा या झाडांची लागवड करता येते.

साधारपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यात लागवड करणे अतिशय योग्य.

आंतरमशागत : लागवडीनंतर पहिल्यावर्षी अवतीभोवती वाढणारे गवत वगैरे काढून टाकून झाडांची काळजी घ्यावी लागते. बुडाशी त्याचे आच्छादन करावे. दोन ओळीमधील गवत फार उंच वाढले असेल तर ते कापून घेऊन त्यांचे जमिनीस आच्छादन करावे. झाडांच्या ९ महिने ते ३ वर्षे वयाच्या बागेत पाल्याचे आच्छादन तयार होते.

जमीन व पाणी : चांगले पाऊसमान व ओलावा धरणारी खोल जमीन असेल तर पाणी द्यावे लागत नाही. परंतु इतर ठिकाणी पावसाळा संपताच पहिल्या दुसऱ्या वर्षी तरी ओलावा राहील असे पाणी द्यावे.

झाडांची वाढ : शास्त्रोक्तपणे योग्य वेळेस योग्य मार्गदर्शनाखाली लागवड केल्यास या झाडांची वाढ अतिशय झपाट्याने होते. दर वर्षास खोडाची जाडी २ ते ३ से.मी. ने वाढते. ९ वर्षांच्या कालावधीमधून ४१५ घनमीटर लाकूड मिळते. हा वृक्ष ३० मीटर उंच वाढतो.

कल्पतरू खत : पहिले २ -३ वर्षापर्यंत जून महिन्यात पाऊस झाल्यानंतर २५० ग्रॅम आणि सप्टेंबरमध्ये २५० ग्रॅम या प्रमाणात खताची मात्र प्रत्येक झाडास द्यावी. नंतर दरवर्षी वरील डोसमध्ये २५० ते ५०० ग्रॅम मात्रा झाडांच्या वाढीनुसार वाढवून द्यावी.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी :

झाडांच्या निरोगी व चांगल्या वाढीसाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट, प्रिझम,न्युट्राटोन प्रत्येकी ३ ते ५ मिली/ लि. पाणी याप्रमाणे पहिले तीन वर्षे जून ते सप्टेंबर या काळात ३ ते ४ फवारण्या महिन्याच्या अंतराने करव्यात.

या झाडांची ऑस्ट्रेलिया बाहेर सर्व प्रथम प्रायोगिक स्वरूपाची लागवड ऑस्ट्रेलियन वनपालक श्री. डी. आय. निकोलसन यांनी १९६६ मध्ये मलेशियात सबाह या ठिकाणी केली. तेथे त्याची विलक्षण वाढ पाहून तेथेच १९७३ मध्ये १५०० हेक्टरवर लागवड केली. या झाडांची वाढ आश्चर्यकारक झाली. १९६९ साली न्युगियानात, १९७६ साली नेपाळात, १९७८ साली बांगला देशात, १९७७ साली हवाई, कॅमेरून येथे व कोस्टारिकात १९८० साली मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली. सर्व ठिकाणी हे झाड उत्तमरित्या वाढते आहे. तसेच अलीकडे इंडोनेशिया, नायजेरिया, घाना तसेच पश्चिम आशियाई राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी लागवडी झाल्या आहेत.

पश्चिम बंगाल राज्यात मँजियमची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी आणि गुजरातचा क्रमांक लागतो.

अर्थात लागवडीच्या वेळी कुठल्या प्रकारच्या बियांपासून रोपे बनवण्यात आलेली आहेत हे ही महत्त्वाचे आहे. जसे जमिनीचा कस वर्षोनुवर्षे कसल्यामुळे कमी होतो, त्याचप्रमाणे बियांच्या कसदारपणावर पुढील रोपाची व कालांतराने वृक्षाची वाढ व प्रत अवलंबून असते.

रोग व किडी : या झाडांवर अल्पशा प्रमाणात काही रोग आढळून येत असले तरी त्यामुळे झाडांचे विशेष नुकसान होत नाही. लागवडीनंतर सुरुवातीला जनावरांचाही त्रास होतो. जनावरे खात नाहीत पण नासधुस करण्याची शक्यता असते. सुरुवातीचे १ वर्षे तरी झाड जनावरांपासून जपावे लागते.

विशेषता व उपयोग : मिळणारे लाकूड उत्तम असते. बाह्य थर अगदी पातळ असून रंग फिक्कट बदामी असतो. आतील लाकूड (हार्डवूड) चॉकलेटी रंगाचे मजबूत व उत्तम टिकाऊ असते. साधारणपणे ३ महिन्यांच्या सिझनिंगनंतर ते वापरतात. लाकडास चिरा पडत नाही, वाकडे होत नाही. टिकाऊपणाची प्रक्रियाही सहजपणे करता येते. सुतारकाम करण्यास हे लाकूड सुलभ असून याच्यापासून सर्व तऱ्हेचे फर्निचर्स, खिडक्या, दरवाजे यांच्या फ्रेम्स, मोल्डिंग व व्हिनर्सही काढता येतात. या लाकडाच्या नैसर्गिक रेषा अतिशय आकर्षक दिसतात.

तसेच पार्टीकल बोर्डस, कागदनिर्मितीसाठीही याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.

याच्या लाकडाचा ५० % लगदा मिळतो. या लगद्यापासून उच्च दर्जाचा शुभ्र कागद तयार होतो. त्यामुळे भविष्यकाळात कागद गिरण्यांसाठी हे झाड महत्त्वाचे ठरेल.

भारतीय सागवान वाढीस लागणारा विलंब प्रमाणापेक्षा जास्त फांद्या या त्रुटींमुळे मँजियम अर्थात 'ऑस्ट्रेलियन सागवान' हा पर्याय म्हणून पुढे आला आहे.