भातावरील कीड - रोग आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


आपल्या देशातील ६५ % लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश असतो. भाताची प्रति हेक्टरी उत्पादकता फारच कमी आहे. ती वाढविण्यासाठी अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती, रासायनिक, जैविक सेंद्रिय खतांचा योग्य वापर या बरोबरच किडी व रोगांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पीक संरक्षणाची एकात्मिक उपाय योजना आवश्यक आहे.

अ) भात पिकांवरील किडी व त्यांचे नियंत्रण: पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. उदा. किडींच्या नियंत्रणासाठी पीक संरक्षणाच्या निरनिराळ्या पद्धतीचे ज्ञान, किडींचा प्रादुर्भाव, उपायांची योग्य वेळ, योग्य किटकनाशकांची निवड, पिकांची अवस्था इत्यादी.

१) खोडकिडा : या किडीचे पतंग पिवळसर असून मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. मादीच्या पुढील पंखांच्या जोडीवर मध्यभागी एक - एक काळा ठिपका असतो. अळी प्रथम पानाच्या कोवळ्या भागावर उपजिवीका करते आणि नंतर खोडामध्ये शिरून आतील भाग खाण्यास सुरुवात करते. किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजेच पीक पोटरीवर येण्यापूर्वी झाला तर मधला गाभा वरून खाली सुकत येतो, याला 'गाभा जळणे' असे म्हणतात. कीड जर पीक पोटरीवर आल्यानंतर पडली तर दाणे न भरलेल्या पांढऱ्या ओंब्या बाहेर पडतात, त्याला 'पळीज' म्हणतात.

खोडकिडीचे नियंत्रण कोणत्याही एका उपायाने होणे अशक्य आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा एकत्रितपणे अवलंब करावयास हवा. त्यापैकी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिकाच्या काढणीनंतर शेतातील धसकटे काढून ती जाळून टाकावीत. तसेच पिकाची कापणी करताना शक्यतो जमिनीलगत करावी. कापणीसाठी कोकण कृषि विद्यापीठाने तयार केलेला 'वैभव' विळा वापरावा. भडस, कोळंब, झिनिया, पटणी अशा स्थानिक गरव्या जाती या किडीस जास्त बळी पडतात, म्हणून या जाती घेऊ नयेत. त्याऐवजी सुधारीत व संकरीत जातींची लागवड करावी. रोपवाटिकेत पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रति हेक्टरी १६.५० किलो कार्बोफ्युरॉन किंवा १० किलो फोरेट किंवा १५ किलो क्विनॉलफॉस यापैकी कोणत्याही एका दाणेदार किटकनाशकाचा वापर करावा. किटकनाशके वापरताना जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे. जमिनीत पुरेशा ओलाव्याअभावी किंवा उताराच्या जमिनीत दाणेदार किटकनाशके वापरणे शक्य नसल्यास प्रवाही किटकनाशकांची फवारणी करावी. त्यासाठी प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात २५० मि. लि. फॉस्फोमिडॉन किंवा ८०० मि.लि. फेनिट्रोथिऑन किंवा १६०० मि. लि. क्विनॉलफॉस किंवा ८०० मि.लि. फेन्थोएट किंवा कराटेप स्प्रे ५० % पावडर ०.३ किलो ५०० लिटर पाण्यात प्रति हेक्टर किंवा मोनोक्रोटोफॉस ३८ डब्ल्यू.एस.सी. हेक्टरी ०.५ किलो प्रमाणे फवारणी करावी. लावणीनंतर गरजेनुसार किटकनाशके वापरावीत. हळव्या जातींसाठी फवारणीची गरज पडत नाही.

लावणीनंतर शेतात ५% कीडग्रस्त फुटवे आढळलयास किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडीपुंज आढळल्यास किंवा प्रकाश पिंजऱ्यात या किडीच्या पतंगांची संख्या सतत पाच दिवस वाढत्या क्रमाने आढळलयास निमगरव्या आणि गरव्या जातींसाठी दाणेदार किटकनाशकाची एक मात्र लावणीनंतर २५ दिवसांनी द्यावी अथवा दोन फवारण्या कराव्यात. गरव्या जातींसाठी लावणीनंतर २५ आणि ५० दिवसांनी अशा दाणेदार किटकनाशकाच्या दोन मात्र द्याव्यात अथवा एकूण चार फवारण्या कराव्यात. वेळोवेळी कीडग्रस्त फुटवे अथवा पळीज काढून टाकावेत. २) गादमाशी : गादमाशी आकाराने डासासारखी असून गुलाबी असते. अळी रोपाच्या आत शिरून अंकूर कुरतडून खाते. त्यामुळे अलीच्या भोवतालच्या अंकुराचा भाग फुगतो आणि त्याची नळीच्या आकारासारखी वाढ होते. ही नळी कांद्याच्या पातीसारखी परंतु पांढरट - पिवळसर रंगाची असते. यालाच 'नळ' किंवा 'पोंगा' असे म्हणतात. अशा कीडग्रस्त रोपांची वाढ खुंटते व अशी रोपे पोसवत नाहीत.

या किडीच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेत खोडकीडीच्या नियंत्रणासाठी सांगितलेल्या दाणेदार किटकनाशकाची मात्र द्यावी. 'विक्रम' ही जाड दाण्याची तसेच 'फाल्गुना' ही बारीक दाण्याची जात या किडीस पूर्णपणे प्रतिकारक आहे म्हणून या जाती वापराव्यात. नळग्रस्त रोपे उपटून जाळावीत. लावणीनंतर १० दिवसांनी १०% दाणेदार फोरेट हेक्टरी १० किलो या प्रमाणात जमिनीत द्यावे. त्यानंतर दुसरा हप्ता २० दिवसांनी द्यावा.

३) तुडतुडे: ही कीड ज्या जमिनीत पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही आणि जेथे नत्र खतांच्या मात्रा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात दिल्या जातात त्या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येते. मादी तुडतुडे व त्यांची पिल्ले भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात. परिणामी भाताची पाने पिवळी पडतात आणि पूर्ण रोप वाळते. विशेषत: शेताच्या मध्यभागी ठिकठिकाणी तुडतुड्यांनी करपून गेलेले भाताचे पीक दिसते. अशा रोपांमधून ओंब्या बाहेर पडत नाहीत. जरी पडल्याच तर दाने पोचट होतात.

या किडीच्या नियंत्रणासाठी कमी बळी पडणाऱ्या आय. आर. २६, आय. ई. टी. - ७५७५ व आय. आय. - ३२ या जातींची लागवड करावी. रोपे अत्यंत दाट लावू नयेत. दोन ओळीतील अंतर २० सें. मी. आणि दोन चुडांतील अंतर १५ सें.मी. पुरेसे आहे. नत्र खतांच्या मात्रा वाजवी प्रमणात द्याव्यात. कीड नियंत्रणासाठी कीड प्रदुर्भावावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जर एका बुंध्यावर ५ ते १० तुडतुडे असतील तर किटकनाशकांचा वापर करावा. फवारणीसाठी ५०० लिटर पाण्यातून प्रोतेक्टंट १ किलो आणि फॉस्फोमिडॉंन २०० मि.ली. किंवा फेनिट्रोथिऑन ५०० मि. लि. किंवा मॅलेथिऑन १००० मि. लि. किंवा फेन्थोएट ५०० मि. लि. किंवा मोनोक्रोटोफॉस ६२५ मि.लि. प्रति हेक्टरी फवारावे. किटकनाशकाचा फवारा बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी.

४) निळे भुंगेरे : भुंगेरे गर्द निळ्या रंगाचे असून अळी भुरकट रंगाची असते. या किडीची अळी व्यवस्था आणि प्रौढावस्था या दोन्ही हानिकारक आहेत. ही कीड पानाचा हिरवा भाग कुरतडून खाते. शेवटी संपूर्ण पीक वाळते.

या किडीच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट १ किलो आणि पाण्यात मिसळणारी कार्बारील भुकटी १ किलो किंवा एन्डोसल्फॉन ७५० मि.लि. या किटकनाशकाची फवारणी प्रति हेत्कारी ५०० लिटर पाण्यातून करावी. ही कीड भात पिकानंतर बांधावरील गवतांवर उदा. चिमणचारा, बारडी, हारकी, वाळा, निवळ पॅराग्रास, मारवेल, गजराज इत्यादी गवतांच्या फुटव्यांवर उपजिवीका करते आणि पुढील हंगामात भात पिकास उपद्रवकारक होते म्हणून बांधावरील गवतांचा भात लावणीनंतर नायनाट करावा. या किडीचा सतत प्रादुर्भाव होत असलेल्या भागात कापणीनंतर शेताची नांगरट करून चोथ्याचा नाश करावा, म्हणजे पाणथळ जमिनीत फुटवा येणार नाही आणि कीड प्रसारास प्रतिबंध होईल. जमिनीत पाणी जास्त काळ न साठता निचरा होईल याची काळजी घ्यावी.

५) लष्करी अळी : या किडीच्या आळ्या दिवसा पानाच्या फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात आणि रात्री पाने खातात. पानेकडेपासून मध्यशिरेपर्यंत खात जात असल्यामुळे नुकसानीवरून कीड चटकन ओळखून येते. किडीचा खरा उपद्रव मात्र पीक काढणीच्यावेळी होतो. या किडींच्या अळ्या ओंब्या कुरतडतात. त्यामुळे दाणे जमिनीवर गळून नुकसान होते.

या किडीच्या नियंत्रणासाठी एका चुडात एक अळी आढळताच मिथिल पॅराथिऑन भुकटी हेक्टरी २० किलो याप्रमाणे सकाळी वारा नसताना धुरळावी किंवा प्रवाही मोनोक्रोटोफॉस ३६% १४०० मि. लि. किंवा प्रवाही सायपरमेथ्रीन २५ % १२० मि.लि. ५०० लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टर पिकावर फवारावे. तसेच अंडीपुंज आणि अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. त्यामुळे सुप्तावस्थेतील कोष नष्ट होतात.

६) खेकडे : खरीप हंगामात भाताचे खेकड्यांपासून बरेच नुकसान होते. खेकडे दिवसा बिळामध्ये राहतात आणि रात्री भाताची रोपे जमिनीलगत कापून बिळामध्ये खाण्यासाठी घेऊन जातात. परिणामी भाताच्या रोपांची संख्या कमी होऊन प्रति हेक्टरी उत्पादनात बरीच घट होते. क्वचित प्रसंगी बांधालगत भाताची पुन्हा लावणी करावी लागते. याशिवाय खेकडे भात खाचाराच्या बांधास मोठ्या प्रमाणात छिद्रे पाडतात. परिणामी भात खाचरात पाणी साठविणे कठीण जाते. तसेच बांधाची वरचेवर दुरुस्ती करावी लागते.

खेकड्यांच्या नियंत्रणासाठी पावसाला सुरू झाल्यानंतर २ - ३ दिवसात रोज रात्री कंदीलाच्या सहाय्याने बांधावरील खेकडे पकडून त्यांची संख्या कमी करावी किंवा विषारी अमिषाचा वापर करून खेकड्यांचे नियंत्रण करता येते. त्यासाठी एक किलो शिजवलेल्या भातामध्ये ४० मि.लि. क्लोरोपायरीफॉस आणि ५० ग्रॅम गूळ मिसळून विषारी अमिष तयार करावे. या मिश्रणाच्या साधारणपणे सुपारीच्या आकाराच्या १०० गोळ्या तयार कराव्यात आणि प्रत्येक बिळाच्या तोंडाशी एक गोळी ठेवावी. रात्री खेकडे बाहेर आमिष खातील आणि त्यांचा नाश होईल. दुसऱ्या दिवशी जी बिळे उकरली जातील अशा बिळात परत अमिष वापरावे.

ब ) भात पिकांवरील रोग आणि त्यांचे नियंत्रण :

पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी ज्याप्रमाणे चांगले बी - बियाणे, नव्या लागवड पद्धती, पिकांची योग्य काळजी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे पिकाचे रोगांपासून संरक्षण कसे करावे याविषयी माहिती शेतकऱ्यांना असणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

१) कडा करपा (बॅक्टेरियल ब्लाइट) : या रोगाचे जीवाणू रोपे उपटताना मुळांना होणारी इजा, नैसर्गिक कारणांमुळे पानांना होणारी इजा, लावणीपूर्वी रोपांची पाने खुडण्याची प्रथा आणि त्यामुळे पानांना होणारी इजा आणि पानांवरील नैसर्गिक छिद्रे इत्यादींमुळे रोपांच्या शरीरात प्रवेश करतात आणि रोगाची लागण होते. रोगाची लक्षणे दोन प्रकारात मोडतात. पहिल्या प्रकारात लावणीनंतर साधारणत: एक महिन्याने रोगाची सुरुवात चुडातील खालच्या पानांवर होते आणि कालांतराने रोग वरच्या पानांवर पसरतो. प्राथमिक अवस्थेत रोगग्रस्त पानांच्या एका किंवा दोन्ही कडांवर शेंड्याकडून खोडाकडे फिकट पिवळसर हिरवट रेषा निर्माण होतात. कालांतराने ह्या रेषा वरून खाली आणि पानाच्या आतील बाजूला मध्यशिरेकडे वाढतात आणि पानांवर राखाडी किंवा तांबूस रंगाचे पट्टे निर्माण होतात. अशा पट्ट्यांच्या कडा नागमोडी असतात. पुढे पाने करपून वाळतात.

दुसऱ्या प्रकारात रोगाचे जीवाणू तुटलेल्या मुळांतून किंवा खुडलेल्या पानांतून अन्ननलिकेत प्रवेश करतात आणि अणूजीव आंतरप्रवाही होतात. रोगग्रस्त चुडांची पाने हिरवट करड्या रंगाची होऊन दोन्ही कडांकडून आतील भागाला पुंगळीसारखी मोडतात. चुडातील संपूर्ण पाने करपून फाटतात आणि संपूर्ण चुडाची मर होते, याला रोगांची 'केसेक' अवस्था म्हणतात.

२) करपा : करपा हा बुरशीजन्य रोग आहे. रोगाची लक्षणे झाडांच्या पानांवर, पेरांवर आणि ओंबीच्या देठांशी दिसून येतात. रोगाची सुरुवात पानांवर बारीक हिरवट पिवळसर आणि भिजट ठिपके पडून होते. कालांतराने ठिपक्याचे आकारमान वाढत जाते. पूर्ण वाढलेले ठिपके हे आकाराने लांबट गोल, भिंगाकृती असून त्यांच्या कडा गर्द तपकिरी रंगाच्या असतात. ठिपक्यांचा आतील भाग राखाडी रंगाचा असतो. रोगास जास्त बळी पडणाऱ्या जातींवर ठिपक्यांची संख्या आणि आकार मोठा असून दोन किंवा अधिक ठिपके एकत्र मिसळून पानांवर राखाडी रंगाचे चट्टे पडतात आणि संपूर्ण पान करपते.

३) शेंडे करपा (लिफस्काल्ड) : हा बुरशीजन्य रोग आहे. रोगग्रस्त पानांचे शेंडे वरून खाली करपतात आणि रोगग्रस्त पाने सूर्यप्रकाशात धरल्यास रोगट भागावर गर्द तपकिरी पट्टे ठराविक अंतराने दिसतात. दोन पट्ट्यांमधील भाग फिक्कट तपकिरी रंगाचा असतो. रोगग्रस्त भागावर सुपारी कातरल्यासारखी नक्षी दिसते. रोगाची लक्षणे कधी - कधी पानांच्या पृष्ठभागावर कडेला धरून कुठेही उद्भवतात आणि रोगग्रस्त भागावर वरीलप्रमाणेच सुपारी कातरल्यासारखे नक्षीदार लांबट गोलाकार डाग दिसतात. भातावरील कीड - रोगांवर प्रतिबंधक उपाय म्हणून तसेच दर्जेदार अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या (प्रत्येकी ५०० मिली/१०० ते १५० लि. पाणी ) लागवडीनंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.

भातावरील रोगांच्या नियंत्रणासाठी पीक संरक्षणाचे उपाय

रोगाचे नाव/रोग येण्याच्या
वेळेस पिकाची अवस्था  
उपाय योजना  
करपा/कडाकरपा/ शेंडेकरपा (बियाणे)   १) १,३०० ग्रॅम मीठ १० लिटर पाण्यात विरघळून घ्यावे. द्रावणात भात बियाणे ढवळून घ्यावे. तरंगणारे बियाणे/पळींज गोळा करून नष्ट करावे. तळाचे बियाणे पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे.
२) वरील बियाण्यास दर किलो मागे २५ मिली जर्मिनेटरबरोबर २.५ ग्रॅम पारायुक्त बुरशीनाशक किंवा कॅप्टॉंन किंवा थायरम पेरणीपूर्वी चोळावे
३) धसकटे गोळा करून जाळावीत.
 
करपा/ शेंडेकरपा
(रोपावस्था ते पीक फुलोऱ्यावर येईपर्यंत )  
हेक्टरी ५०० लिटर पाण्यात १ लि. थ्राईवर + ७५० मिली हार्मोनी किंवा १२५० ग्रॅम बावीस्टीन किंवा डायफोलेटॉंन किंवा ५०० मि.लि. एडीफेनफॉस यापैकी कोणत्याही एका औषधाची फवारणी रोगाची लक्षणे दिसतात करावी व नंतर रोगाची तीव्रता बधून दर पंधरा दिवसांनी नंतरच्या फवारण्या कराव्यात  
कडाकरपा
(फुटवे आणि फुलोरा)  
१) धसकटे गोळा करून नष्ट करावीत.
२) बांधबंदिस्ती आणि बांधावरील गवत व इतर तणे काढावीत.
३) रोग प्रतिकारक किंवा रोगास कमी बळी पडणाऱ्या भात जातींची लागवड करावी.
४) नत्र खताचा योग्य वापर करावा.