व्यथा शेतकऱ्यांची संपवण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. नितीन सुरेश मानकर (पाटील),
मु. डावजे, पो. सांगरूण, ता. मुळशी , जि. पुणे,
मो. ९४२२६३००२


डॉ. बिना कोकीळ (मोबा. ९३२६१५२५३५) यांची आमच्या शेजारी शेती आहे. ७ - ८ वर्षापुर्वी त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लावला होता. त्यावेळी मी देखील त्यांच्यासोबत ५ झाडे या शेवग्याची लावली. कोकीळ मॅडम वर्षातून एकदा येतात. आम्हीच त्यांची शेती पाहतो. त्या आपल्या 'कृषी विज्ञान' मासिकाच्या वर्गणीदार आहेत. आज (२१ मे २०१४) मी पण वार्षिक वर्गणी भरली आहे. 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या बाबतीमध्ये आमचा अनुभव असा आहे की, आज संकरीत शेवग्याच्या बाजारात अनेक जाती आहेत. त्यांच्या शेंगांच्या चवीपेक्षा या 'सिद्धीविनायक' शेवग्याची चव अतिशय उत्कृष्ट आहे. शेंग दिसायलाही आकर्षक हिरवीगार, २ फूट लांबीची गरयुक्त असल्याने बाजारभाव इतर वाणांच्या शेवग्यापेक्षा अधिक मिळतो.

आमच्या ५ झाडांच्या शेंगा आम्ही नातेवाईकांना, मित्रांना देऊन घरी खात असू. शेंगा चवदार असल्याने गावातील लोक घराशेजारील झाडाच्या शेंगा आम्ही रानात गेल्यावर घरावर चढून शेंगा चोरून नेतात. यामध्ये शेंगा नेण्याचे दु:ख होत नाही, मात्र त्या शेंगा घाई - गडबडीने चोरून काढताना घरावरील कौल फुटून आमचे नुकसान झाले.

व्यथा शेतकऱ्यांची

आज शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. आम्ही सुलतानची ढोबळी मिरची दरवर्षी लावतो. पुर्वी बी खात्रीशीर मिळत असे. त्यामुळे फळांची गुणवत्ता व उत्पादन चांगले मिळे. अलिकडे बियाणे खात्रीशीर मिळत नाही. तोच वाण घेतला तरी उत्पादनात तफावत जाणवते. यावर्षी देखील ढोबळी लावली आहे. तिचा काल तोडा केला असता. ५ पोती (५० किलोची) निघाली ती आज मार्केटला आणली तर ६० रू./१० किलो भाव मिळाला. म्हणजे एका पोत्याचे ३०० रुपये. याला पुणे मार्केटला ४० किमीवरून आणण्यासाठी एका पोत्याला गाडीभाडे ५० रू. हमाली ५ रू. आडत २४ रू., भराई, मापाई ५ रू. हा खर्च वजा करून ५ पोत्याची पट्टी १ हजार रू. लागली. मिरची भरायला (पॅकिंगला) वापरलेल्या बारदाण्याचे पैसे किंवा बारदानाही परत मिळत नाही. आम्हाला मात्र पुन्हा नवीन बारदाना २५ रू, ने आणावा लागतो. ही मिरची तोडायला काल ४ बाया लावल्या. त्यांना १ वेळचे जेवण आणि १५० रू. प्रमाणे अशी ६०० रू. नुसती तोडायची मजूरी लागली. अशा परिस्थितीत कशी शेती परवडणार ? तरी यामध्ये युरीया, सुफला, बियाणे, औत मशागत, स्वत:ची मजुरी, शेतीला लागणारे पाणी धरले नाही. ही आहे मार्केटची आजची परिस्थिती पिवळ्या चट्टे पडलेल्या मिरच्या भाडेही निघत नाही. म्हणून बैलांना घालतो. जादा खायला दिला तर बैलांना बुळकांडी लागते. मोठ्या काकड्या घरी खाण्यास ठेवतो. चांगल्या मिरच्या मार्केटला पाठवितो. १ नंबर गवार आज २० रू. किलोने सकाळी होलसेल भावाने गेली. घेणारा तीच गवार १५ ते २० रू. पावशेरने विकतोय. पैसे कोणाला मिळताहेत?

आज शेतकऱ्याला ठोक भावात मार्केटला माल विकणे परवडत नाही. पुणे शहरात रस्त्यावर किरकोळ विक्री करायची म्हटले तर महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी माल विकू देत नाहीत. त्यांना हप्ते खायची सवय लागलीय, शेतकरी कोठून देणार यांना हप्ते. म्हणून हे लोक माल विकताना सापडले तर माल उचलून नेतात. यांना डोसा, वडापाव, पाणी पुरी, कच्ची दाबेली हे गाडे चालतात. कारण हे लोक हप्ते देतात. आम्ही अशा परिस्थितीत काय करायचे ? शेतकऱ्यांसाठी कोणच काहीच करीत नाही. नुसते बोलले जाते, "शेतकरी जगला तर जनता जगेल" यावेळी सरांनी त्यांचा देखील असाच वाईट अनुभव सांगितला, "सरांच्या फार्मवर स्वीटकॉर्न पाषाण (पुणे) मार्केटला ४ - ५ वर्षापुर्वी मजुरामार्फत विक्री करता नेला असताना महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभाग अधिकाऱ्याच्या मागणीप्रमाणे त्याला पैसे (हप्ता) न दिल्याने त्यांनी स्वीटकॉर्नची २०० ते २५० कणसे उचलून नेले व त्यांच्या ग्रुपमध्ये वाटली."

अंकुरची पुसा ज्वाला मिरची १० वर्षापासून करतोय दिवसाला ५ बाया २ पोती मिरच्या तोडतात. पुणे मार्केटला व्यापारी आंध्र प्रदेशातून १३ रू. किलोने जागेवरून खरेदी करून ट्रकच्या ट्रक भरून आणतात. रविवारच्या पुणे मार्केटला त्यांचा वाहतूक खर्च जाऊन १ रू. किलो जरी शिल्लक भाव मिळाला तरी विकतात. म्हणजे १३ रू. किलो जागेवरील मिरचीचा खरेदी भाव व वाहतूक २ रू. आणि नफा १ रुपया अशा १६ रू./किलो होलसेल भावाने ही मिरची विकतात.

पुण्याच्या जवळच्या भागातील शेतकऱ्यांन १६ रू. भावाने मिरची विकणे परवडत नाही. आज वाटाणा सोडला तर कोणत्याच भाजीपाल्याला भाव मिळत नाही. तेव्हा ज्या - त्या भागातील माल त्या -त्या ठिकाणीच विकला गेला पाहिजे.

शेतकरी शेती परवडेनाशी शेती विकू लागला आहे. मोठे उद्योजक शेती घेऊन तेथे फार्म हाऊस बांधून त्याची राखण करायला दुसरा - तिसरा कोण नसून त्याच शेतीचा मुळ मालक गेटवर उभा असलेला आज दिसतोय. या कृषीप्रधान देशाची काय ही अवस्था ? पुणे परिसरातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी भागातील शेतकऱ्यांची नवीन पिढी शेती सोडून शहरात उपजिवीकेसाठी आली आहे. सर्वांच्या घरी फक्त घरे सांभाळायला म्हातारी माणसे दिसतात. आमच्या गावातील शेतकरी भुसार मार्केटला हमाली करू लागलाय. त्याला विचारले, कारे बाबा घरी एवढी शेती, पाणी असून शेती सोडून हमाली का करतोस ? त्याने मला सांगितले. " तू ३ महिन्यापुर्वी ढोबळी मिरची लावली आहे. तिला आतापर्यंत किती खर्च केला आणि आता उत्पादन चालू झाले. तर काय भाव मिळतात. खर्च तरी निघतोय का? " हे ऐकून मीच स्तब्ध झालो. नंतर त्याने सांगितले, "माझी शरीरयष्टी चांगली आहे. मी हमाली करतो. १६ टायरची गाडी २ तासात गाडीतील कट्टे फाळक्यापर्यंत आणण्याचे ७० ते ८० रू./टन प्रमाणे हमालीचे पैसे मिळतात. म्हणजे ४ तास काम केले तर आम्हाला २ ते २।। हजार रू. रोजचे मिळतात. मग कशाला करू शती ?

अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळतेय. मी मात्र नुकसान झाले तरी शेती सोडणार नाही. कायम शेतीच करणार आहे. शेती उत्पादन घेण्यामध्ये मी मागे हटत नाही मात्र विक्री व्यवस्था आमच्या हातात नाही. तेव्हा यावर आता नवीन सरकारच काहीतरी करेल अशी आशा आहे.