तिखट मिरचीने वाढविली आमच्या शेतीची चव !

श्री. मनोहर शांतीनाथ वाजे (७ वी)
मु. वाजेवाडी, पो. करंदे, ता. शिरूर, जि. पुणे.
मोबा. ९९२२८०१४१६


माझ्याकडे एकूण ३।। एकर जमीन आहे. जमीन मध्यम काळी, निचऱ्याची आहे. पाणी चास - कमान कॅनॉलचे तसेच १ विहीर आहे.

मे - जून महिन्यातील मिरची लागवडीस ३ ते ३।। महिन्यांनी माल चालू असताना झाडांवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. शेंडे मुरडतात, पाने आकसतात, मिरची ऐन बहारात असताना प्लॉट पुर्णपणे वाया जाऊन उत्पादन खर्चही निघत नाही. यावर रासायनिक औषधांच्या फवारण्या केल्या तरी तो आटोक्यात येत नाही. असाच जून २०१० मध्ये लावलेल्या १ एकर सितारा मिरचीवर बोकड्या आला होता. त्याला रासायनिक औषधांच्या २ - ३ फवारण्या केल्या, मात्र तो आटोक्यात आला नाही.

मेथीचे २२ दिवसात २ हजार गड्डी १० हजार

याच काळात मला मेथीचा अनुभव आठवला. कारण उन्हाळ्यात मेथी केली की ती हमखास मरत असे, मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने मेथीची मर न होता २० किलो मेथी बियापासून २२ दिवसात २ हजार गड्डी मिळून १० हजार रू. झाले होते. या काळात गावातील इतरांचे प्लॉट जळाले होते. तेव्हा त्या अनुभवातून मिरचीवरील बोकड्या नियंत्रणासाठी सप्तामृत औषधे घेऊन गेलो. त्यांची फवारणी केली असता तिसऱ्या दिवशी २५ ते ३०% बोकड्या आटोक्यात आला म्हणून लगेच आठवड्याने दुसरी फवारणी केली तर बोकड्या पुर्णपणे जाऊन पाने रुंद, हिरवीगार झाली. झाडांची फूट वाढली. मिरच्या पोसू लागल्या.

१ एकरामध्ये साधारण १०० सारे असले की दररोज २० सर्यांमधील मिरच्या तोडत असे. म्हणजे पुन्हा आठवड्यात दुसरा तोडा होतो. ही सितारा मिरची ३ ते ३।। महिने चालली. माल चाकण, शिक्रापूर मार्केटला विकत असे. सप्तामृताच्या फवारण्यांमुळे झाडे ३ - ३।। फुटापर्यंत वाढली होती. फुटवा ही भरपूर होता. पाने हिरवीगार असल्याने मिरच्या पोसल्या जात होत्या. मिरची हिरवीगार, लांबट, चमकदार, एकसारखी असल्याने चाकण, शिक्रापूर मार्केटमध्ये मालास उठाव असे. इतरांपेक्षा लवकर विकली जाऊन किलोमागे २ रू. भाव जादा मिळत होता. सुरुवातीला चाकणला २० रू./किलो दराने मिरची विकली. नंतर १४ - १५ रू./किलो भाव मिळाला. पुढे मिरचीची आवक खूपच वाढल्याने ८ ते १० रू. भावाने मिरची विकली. सुरुवातीला ८ टन माल निघाला होता. पुढेही सप्तामृत फवारण्या केल्याने पुन्हा ४ टन अशी एकूण १२ टन मिरची १ एकरात झाली होती. या मिरचीचे १। लाख रू. उत्पन्न मिळाले. याला एकूण २५ - ३० हजार रू. खर्च आला होता.

पुढील वर्षी मजुरांच्या समस्येमुळे ऊस शेतीकडे वळालो. २ एकर ऊस व बाकी बाजरी, गहू अशी पिके घेऊ लागलो. या पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरली नाही. २०१० ते २०१५ पर्यंत ही पीक पद्धती अवलंबली. एकरी ६० टन ऊस उतारा मिळत होता. ऊस साई कृपा सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा आणी नाथ मास्कोबा सहकारी साखर कारखाना, पाटेठाण येथे पाठवित होतो. मात्र सध्या ऊस तुटून गेलेल्याला २ महिने झाले. तरी पेमेंट झाले नाही. त्यामुळे ऊस कमी करून यावर्षी पुन्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने तरकारी पिकाकडे वळत आहे.

आज (२५ मे २०१५) रोजी सितारा मिरचीच्या १० ग्रॅमच्या ५ पुड्या (२००० बी) ३५० रू./पाकिट प्रमाणे घेतल्या आहेत. याचबरोबर किमया फ्लॉवरच्या ३ पुड्या, नयनची कारली २ पुड्या, कोबीच्या २ पुड्या बी घेतले आहे. या सर्व तरकारी पिकांसाठी आज सप्तामृत प्रत्येकी १ लि. घेतले आहे.

मिरचीसाठी आम्ही सुरूवातीला नांगरट पाळी दिल्यावर एकरी २ ट्रॉली शेणखत विस्कटून देतो. शेणखत दिल्यानंतर रोटावेटरने वखरपाळी (काकरणी) मारतो. त्यानंतर ३ फूट रूंदीचे ट्रॅक्टर सारे पाडतो. एकरी सारे पाडायला ७०० रू. ट्रॅक्टरवाले घेतात. या सार्यांच्या वरंब्याच्या बगलेत २ - २ फुटावर मिरचीचे जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून टोकतो. ८ - ९ व्या दिवशी बी उगवते. २० - २२ दिवसात झाडे वीतभर झाल्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पहिली फवारणी घेतो. पहिली खुरपणी झाल्यावर युरीया व सम्राट खत देतो.

६० दिवसांनी फुले लागतात तेव्हा झाडे २।। फूट उंचीची असतात. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीमुळे पाने रुंद होतात. चमक येते. पुनर्लागवडीत ४ - ४.५ महिन्यात फुल लागते मात्र माल कमी लागतो. म्हणून आम्ही थेट बी लागवड पद्धत अवलंबतो. जागेवर बी टोकलेले झाड काटक, सशक्त तयार होते. त्यामुळे रोगराईला शक्यतो बळी पडत नाही. ९० दिवसात तोडे झाडे तरी ३ महीने माल मिळतो. एकरी १२ टन उत्पादन घेतले आहे. जूनची लागवड असल्यास सप्टेंबरमध्ये माल चालू होऊन डिसेंबरपर्यंत चालतो. एका झाडापासून साधारणपणे १ किलो माल निघतो. चाकण, शिक्रापूरला माल जातो. सरांनी सांगितल्यावर सरांनी सांगितले, "सितारा मिरचीचाही आपण खोडवा घेवू शकतो. असा प्रयोग वलसाडच्या भारतभाई पटेल (मो. ०९४२७४६२४९०) यांची मिरची उन्हाळ्यात संपूर्ण जळाली होती. त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले तर पुन्हा बहरून एकूण ५ लाख रू. झाले होते. (संदर्भ : कृषी विज्ञान, जुलै २०१०, पान नं. ३८) असे सरांनी सांगितले." या पद्धतीने निविष्ठांची बचत होऊन मिरचीचे डबल उत्पादन घेता येते. मिरची हे बहुआयामी पीक असल्याने रंकापासून रावापर्यंत घरटी तेल, दूध, साखर, चहा नसेल तर चालते मात्र मिरची लागतेच. कारण मिरची शिवाय जेवणास चव नाही. जसे मिठाशिवाय जेवण आळणी होते. तसे तिखटतेला, स्वादाला सारकतेला (बद्धकोटता न होणे) यासाठी मिरची अत्यावश्यक आहे. मिरचीशिवाय जेवण सपक (Insipid) लागते. म्हणून बहुआयामी, बहुउपयोगी, स्वस्त, आरोग्य सुदृढ ठेवणारे असे हे पीक आहे. म्हणून मिरची हे पीक आम्ही करतो.

भारतीय मिरचीला युरोप मार्केट व जगभर फार मोठी मागणी आहे. युरोपमध्ये मागच्यावर्षी मिरचीमध्ये किटकनाशकाचे अंश सापडल्याने निर्यात बंद झाली. परंतु सरांनी सांगितले, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मिरचीवरील रोग किड आटोक्यात राहून उत्पादन व दर्जा वाढतोच शिवाय मिरचीमध्ये विषारी अंश येत नाही त्यामुळे अशी मिरची निर्यात होऊन जादा भाव मिळून चांगले पैसे होतात.

बऱ्याच लोकांनी त्यावेळेस माझा मिरचीचा प्लॉट पाहिला व आताही पाहण्यास येतील. मिरची रोज थोडी थोडी तोडत होतो. आठवड्यात पुर्ण राऊंड (वेढा) होतो. घरच्या माणसांबरोबर ४ - ५ मजूर (बाया) घ्याव्या लागतात. तेव्हा कुठे तोडे उरकतात. दररोज १५० - २०० किलो माल विक्रीस पाठवितो. बाया ११ वाजता कामावर येतात. त्यानंतर कपडे बदलणे, स्वत:ची शेळी बांधणे, तिला गवत टाकणे, मशेरी लावणे. त्यानंतर १.३० ते २.३० वाजता जेवण, पुन्हा मध्ये ४ वाजता १० मिनीटांची विश्रांती की, लगेच ५ वाजता सुट्टी होते. १ बाई दिवसभरात २५ किलो मिरची तोडते. १०० रू. हजेरी घेते. म्हणजे किलोला तोडायलाच ४ रू. मजूरी लागते. वाजेवाडी ते चाकण १८ किलो मीटर अंतरासाठी वाहतूक २५ रू. /पिशवीला घेतात. आडत, हमाली, बारदाना असा खर्च धरला तर ७ - ८ रू./किलोला खर्च येतो. तेव्हा २० - २५ रू. च्या खाली भाव परवडत नाही. सध्या भाव चांगले आहेत. २५ रू. पासून ४० रू./किलो भाव मिळू शकतो. तेव्हा मिरची डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी करणार आहे.

सरांनी सांगितले, "निष्णांत वैद्य हे मला भेटले होते. तेव्हा त्यांनी सांगितले मिरची ही आहारात, आरोग्यात जशी महत्त्वाची आहे तशीच ती आयुर्वेदातही महत्त्वाची आहे." अलिकडे भाज्यांची भाव कडाडलेले असल्याने मिरची ही गरीबाला पाव किलो १५ रुपयाला जरी मिळत असली तरी ४ माणसांचे कुटूंब ४ दिवस त्याचा ठेचा करून खाऊ शकते. म्हणजे मिरची हा गरीबांचा व श्रीमंतांचा सर्वांचाच आहारातील महत्त्वाचा घटक आहे. तेव्हा मिरचीला शेतकऱ्याला होलसेल २५ ते ३० रू. किलो बाजारभाव जरी मिळाला तरी परवडते.