खरीपातील कडधान्ये (तूर, उडीद, मूग) पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


शेती आणि आहारात कडधान्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पिकांच्या मुळावरील गाठीतील रायझोबीयम जीवाणू हवेतील नत्र शोषून घेतात. त्यामुळे पिकाची नत्राची गरज परस्पर भागविली जाते. विविध पीक पद्धतींमध्ये कडधान्याचा समावेश केल्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहतो. शिवाय कडधान्यानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवड तयार होतो.

मानवी आहाराच्या दृष्टीने कडधान्यास विशेष महत्त्व आहे. कडघान्यांमध्ये २० ते २५ % प्रथिने असतात. त्यामुळे रोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. प्रथिनांमुळे शरीराची होणारी झीज भरून निघते व ती प्रथिने कडघान्यांमधून सहज उपलब्ध होतात.

महाराष्ट्र राज्यामध्ये कडधान्य पिकाखाली ३६.०६ लाख हेक्टर क्षेत्र असून २२.०९ लाख टन उत्पादन मिळते. तर प्रति हेक्टरी उत्पादकता ६१३ किलोग्रॅम इतकी आहे. कोणत्याही पिकांपासून जास्तीत - जास्त उत्पादन काढायचे असेल तर अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची. निवड, बियाण्यांचे हेक्टरी प्रमाण वेळेवर पेरणी, योग्य तंत्रज्ञानाचा वापर, योग्य खतांचा शिफारशीप्रमाणे वापर, वेळीच तण नियंत्रण योग्य पाणीपुरवठा , टोग व किडींचे प्रभावी नियंत्रण या बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या अनुषंगाने कडधान्य लागवडीविषयी. सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे.

जमीन : मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन, तूर, मूग, उडीद, या पिकांन योग्य ठरते. चोपण, पाणथळ क्षारयुक्त जमिनीत कडधान्य पिके चांगली येत नाहीत. आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जिवाणुंच्या ग्रंथीची वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात व उत्पादनात घट येते. जमिनीत स्फुरद, कॅल्शियम मँग्नीज गंधक या द्रव्यांची कमतरता नसावी. साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकांन योग्य असते.

हवामान : तूर, मूग, उडीद, या पिकांना २१ ते २५ डी. से. तापमान चांगले मानवते. फुले येणाऱ्या आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे हवामान पिकांना अधिक उपयुक्त असते. स्वच्छ सूर्यप्रकाश पुरेसा ओलावा आणि कोरडे हवामान या पिकांना आवश्यक असते. ढगाळ आणि दमट हवामानात फुलगळ फार होते. दाने भरत नाहीत, किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पादनात घट येते. कडधान्य पिके सरासरी ७५० ते १००० मिमी वार्षिक पर्जन्यमानात चांगली येतात.

पूर्व मशागत : तूर, मूग व उडीद ही कडधान्ये मध्यम ते भारी जमिनीत घेतवी जात असल्याने जमिनीची खोल नांगरट करून जमीन भुसभुशीत करणे आवश्यक असते. पुर्वीचे पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल नांगरट करावी. नांगरणीच्या वेळी पुरेशी ओल नसल्यास मोठी ढेकळे निघतात. यासाठी लोड अथवा जाड फळी फिरवून ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर तिफणीच्या सहाय्याने काकऱ्या माराव्यात म्हणजे पुर्वीच्या पिकाची धसकटे ढेकळापासून वेगळी होतील. ही धसकटे काडी कचरा व्यवस्थित वेचून घ्यावा. कुळवाच्या एक दोन पाळ्या द्याव्यात म्हणजे जमीन भुसभुशीत होऊन पेरणीयोग्य होईल. पेरणीपूर्वी हेक्टरी १२ ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

पूर्व मशागतीकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा पिकाच्या उगवणीवर व रोपाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. पुर्वमशागतीमुळे जमीन उन्हाळ्यात चांगली तापते व मर रोगास कारणीभूत ठरणाऱ्या व इतर हानिकारक बुरशी, जिवाणू आणी किटकांचा काही अंशी नाश होण्यास मदत होते.

पेरणीची वेळ : मान्सूनचा पहिला पेरणी योग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वापसा येताच, म्हणजे जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान खरीप कडधान्याची पेरणी पूर्ण करावी. पाऊस अनियमित पडल्यास पेरणीस उशीरा होतो व उत्पादनात घट येते. उशीरा पेरलेल्या पिकासही लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या कायिक वाढीस पुरेस अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले कमी येऊन शेंगांची संख्या कमी होते व उत्पादनात घट येते. १५ जुलैनंतर खरीप कडधान्यांची पेरणी करणे टाळावे.

बियाण्याचे प्रमाणे : पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. त्यासाठी प्रति हेक्टर बियाण्याचे प्रमाण पुरेसे आणि योग्य वापरणे महत्त्वाचे ठरते. पिकाच्या दाण्याच्या आकारानुसार बियाणे पेरणीसाठी वापरावे लागते. हेक्टरी पेरणीसाठी लागणाऱ्या बियाचे प्रमाण खाली तक्त्यामध्ये दिलेले आहे.

बीज प्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रति किलोग्रॅम बियाण्यास २५ मिली जर्मिनेटर आणि २० ग्रॅम प्रोटेक्टंट १ लि. पाण्यात घेऊन त्यामध्ये २५ ते ३० मिनिटे बी भिजत ठेवावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे सर्व बियांची उगवण लवकर, एकसारखी होते. बुरशीजाण्य रोगास अटकाव होतो. तसेच कडधान्याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेण्यास मदत होते.

कडधान्ये पिकाच्या विविध वाणानुसार वापरावयाचे बियाणे प्रमाण व लागवडीचे अंतर

अ.क्रं.   पीक   कालावधी (दिवस)   लागवड पद्धत   हेक्टरी बियाणे (कि.ग्रॅ.)   लागवड अंतर (सेंमी)   शिफारस केलेले वाण  
१.   तूर   १२५ दिवसांमध्ये कमी (अति हळवे वाण)
१२५ ते १४५ (हळवे वाण)  
सलग

सलग  
२५


२०  
४५ x १० किंवा
३० x १०
४५ x २०
 
आयसीपी एल ८७,
आयसीपी एल - १५१, टीएटी - १०,
टी. विशाख १, एकेटी - ८८११  
  तूर   १५५ ते १६५ (निमगरवा)
 
सलग
आंतरपीक  
१५
५  
६० x २०
९० x २०
बीडीएन १, बीडीएन २,
बीएसएमआर ७३६
आशा आय.सी.पी.एल ८७११९
२)   मूग   ६० ते ६५   सलग   १५ - २०   ३० x २०   जे - ७८१, एस - ८, फुले एम - २,
बी.एम. - ४, टीएआरएम १८  
३.   उडीद   ६५ ते ७०   सलग   १५ -२०   ३० x १०   टी - ९, टीपीयू - ४ टीएयू -१
टिएयू - २  


कडधान्याचे सुधारित वाण व त्यांची वैशिष्ट्ये

मूग :सुधारित वाण व त्यांची वैशिष्ट्ये

अ.क्रं.   वाण   पक्वतेचा कालावधी   उत्पादन क्विं./हे.   वैशिष्ट्ये  
१.   कोपरगाव   ६० - ६५   ८-१०   टपोरे हिरवे, चमकदार दाणे  
२.   जे- ७८१   ६५ - ७०   ८ -१०   टपोरे हिरवे, चमकदार दाणे  
३.   एस - ८   ६० - ६५   ९ - १०   हिरवे, चमकदार दाणे खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य  
४.   के - ८५१   ६० - ६५   १० -१२   टपोरे हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य  
५.   फुलेएम -२   ६० - ६५   १० -१२   हिरवे, मध्यम दाणे खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य  
६.   बीएम -४   ६५- ७०   १०-१२   मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य  
७.   टीएआर एम -१८   ६५ - ७०   १० -१२   भुरीरोग प्रतिकारक्षम वाण  


उडीद : सुधारित वाण व त्यांची वैशिष्ट्ये

अ.क्रं.   वाण   पक्वतेचा कालावधी   उत्पादन क्विं./हे.   वैशिष्ट्ये  
१.   टी- ९   ६० - ६५   ११ -१२   मध्य काळे दाणे, हळवा वाण, खरीप व रब्बी हंगामासाठी योग्य  
२.   टीपीयू - ४   ६५ - ७०   ११ -१२   मध्यम टपोरे काळे दाणे  
३.   टीएयू -१   ७० - ७५   १० -१२   टपोरे काळे दाणे  
४.   टीएयू -२   ६५ - ७०   ११ -१२   बुटका, लवकर तयार होणारा, टपोरे काळे दाणे  


तूर : सुधारित वाण व त्यांची वैशिष्ट्ये

अ.क्रं.   वाण   पक्वतेचा कालावधी   उत्पादन क्विं./हे.   वैशिष्ट्ये  
१.   बीडीएन - १   १५५ -१६५   १४ -१६   मर रोग प्रतिकारक आंतरपीक पद्धतीस योग्य, तांबडे टपोरे दाणे  
२.   बीडीएन -२   १५५ -१६५   १४- १६   मर रोग प्रतिकारक्षम, आंतरपीक पद्धतीस योग्य टपोरे पांढरे दाणे  
३.   टी - विशाखा - १   १३५ -१४०   १५ -१६   हळवा वाण, सलग तसेच दुबार पीक पद्धतीस योग्य  
४.   टीएटी - १०   ११५ - १२०   १२ -१४   अति हळवा वाण कोरडवाहू लागवडीस योग्य, लाल मध्यम दाणे  
५. प्रगती (आयसी पीएल) १२० - १२५ १५ -१६
२० - २५ (उत्पादन क्षमता)
प्रचलित उपलब्ध
वाणामध्ये सर्वाधिक लवकर तयार होणारा दुबार पीक पद्धतीस योग्य, तांबडे मध्यम दाणे  
६.   जागृती   ११५ -१२० (आयसी पीएल १५१)   १२ -१४   अती हळवा वाण, पांढरे मध्यम दाणे  
७.   बिएसएम आर १७५   १६० -१७०   १५ -१६   मर व वांझ रोग प्रतिकारक्षम, पांढरे दाणे  
८.   बिएसएम आर ७३६   १६० - १७०   १५ -१६   मर व वांझ रोग प्रतिकारक्षम, लाल टपोरे दाणे, खरीप तसेच रबी हंगामात लागवडीस योग्य  
९.   आशा (आयसीपी) एल ८७११९)   १७० -२००   १५ -१६   मर व वांझरोग प्रतिकारक्षम, लाल टपोरे दाणे  
१०.   एकेटी ८८११   १३० -१४०   १५ -१६   हळवा वाण, सलग तसेच दुबार पीक पद्धतीस योग्य  


लागवडीचे अंतर : तुरीच्या अति हलक्या वाणासाठी ४५ x १० सेंमी किंवा ३० x १५ सेंमी, हलक्या वाणांसाठी ४५ x २० सेंमी, निम - गरव्या वाणांसाठी ६० x २० सेंमी तर गरव्या वाणांसाठी ६० x २५ सेंमी अंतर ठेवून पेरणी करावी. मूग व उडीद या पिकांसाठी ३० x १० सेंमी अंतरावर पेरणी करावी.

खते : चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट १० -१५ बैलगाड्या प्रति हेक्टरप्रमाणे पेरणी अगोदर शेवटच्या कुळवणीच्यावेळी पसरावे. तूर या पिकास पेरणीच्यावेळी २०० ते २५० किलो तर मूग व उडीद या पिकांना हेक्टरी १५० ते २०० किली कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.

आंतरमशागत : पीक सुरूवातीपासूनच तण विरहीत ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक बाब आहे, पीक २० -२५ दिवसांचे असतान पहिली आणि ३० -३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणीमुळे जमीन भुसभुशीत होते. जमिनीमध्ये हवा खेळती राहते. बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल टिकून राहते. कोळपणी नंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी खुरपणी करावी. पीक हे ३० -३५ दिवसांपर्यंत तणविरहीत ठेवावे. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात.

पाणी व्यवस्थापन : खरीप कडधान्ये प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर येतात, परंतु पावसाळ्यात पाऊस कमी झाल्यास आणि जमीन मध्यम उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकून राहत नाही. जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला आणि फुले लागल्यावर उशीरा पाणी दिल्यास तुरीची मोठ्या प्रमाणावर फुलगळ होते. हे टाळण्यासाठी फुले येण्याच्या सुरवातीलाच संरक्षित पाणी द्यावे. पावसाची शक्यता नसेल तर पहिले पाणी फुलकळी लागताना. दुसरे पीक फुलोऱ्यात असताना आणि तिसरे शेंगात दाने भरताना द्यावे. तुरीला ३५ ते ४० सेंमी पाण्याची गरज असते. ६ ते ७ सेंमी पाण्याच्या तीन पाळ्या पुरेशा होतात.

मूग व उडीद ही पिके सर्वस्वी पावसावर अवलंबून असतात. पाऊस नसेल तर फुले येण्याच्या व शेंगा भरण्याच्या काळात पाणी द्यावे.

कीड व्यवस्थापन : तूर पिकाचे नुकसान पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत आढळून येणाऱ्या आणि प्रत्यक्ष फुलांवर अथवा शेंगेतील कोवळ्या दाण्यावर उपजीविका करणाऱ्या घाटे अळी, पिसारी पतंगाची अळी, शेंगेवरील काळी माशी या प्रमुख किडींपासून होते. या किडीचे वेळीच नियंत्रण केले नाही तर उत्पादनात ३० ते ४० % घट येते. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा अवलंब करावा.

एकात्मिक कीड व्यवस्थापन : एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने मशागतीय, भौतिक, तांत्रिक, रासायनिक, जैविक, अनुवांशिक, पर्यावरणनिष्ठ पद्धतीचा अशारितीने एकत्र वापर करावयाचा प्रयत्न असतो की, जेणेकरून या पद्धती परस्पर पूरक राहून निसर्गाचा समतोल राखून परिणामकारक ठरू शकतात. त्यासाठी उन्हाळ्यात खोल नांगरट करणे, पिकाची वेळेवर पेरणी, जैविक कीड नियंत्रण, परोपजीवी किडींचा वापर, गरजेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर, प्रति हेक्टरी झाडांची योग्य संख्या, खडे अथवा पट्टा पद्धतीने कीटकनाशकांचा वापर, वनस्पतीजन्य औषधांचा वापर इ. बाबींचा अवलंब होतो. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या विविध अंगापैकी जैविक नियंत्रणाच्या पद्धतीला विशेष महत्त्व आहे. जैविक कीड नियंत्रण म्हणजे कीटकांच्या नैसर्गिक शत्रुचा म्हणजे परोपजीवी कीटक, जिवाणू, विषाणू यांचा वापर करून त्यांचा नाश करणे, परोपजीवी कीटक आपली अंडी पिकास हानीकारक असलेल्या किडींनी घातलेल्या अंड्यामध्ये किंवा अळ्यांच्या शरीरात किंवा किडींच्या अंड्यातील किंवा अळीच्या शरीरातील किंवा कोषावस्थेतील पदार्थांवर उपजीविका करतात, आणि किडींना नष्ट करून टाकतात. जैविक नियंत्रणाचे उपाय खालीलप्रमाणे-

१) ट्रायकोग्राम : हा गांधीलमाशी वर्गातील परोपजीवी कीटक असून मादी अळीच्या अंड्यामध्ये आपली अंडी घालते व त्यात आपली उपजीविका पूर्ण करते. त्यामुळे घाटे अळ्यांची अडी उबवत नाहीत व अळ्यांची उत्पत्ती होत नाही. बाजारात ट्रायकोग्रामा 'ट्रायकोकाड' स्वरूपात उपलब्ध आहे.

२) क्रायसोपा : क्रायसोपा हा हिरव्या रंगाचा पतंग भक्षक कीटक आहे. हा कीटक घाटे अळीची अंडी नवजात अळ्या, मावा, तुडतुडे फुलकिडे यावर उपजीविका करतो.

३) एचएनपीव्ही : हा न्युक्लीअस पॉलीहायड्रॉसीस विषाणू असून हा विषाणू घाटे अळीच्या पोटात गेल्यास अळ्या रोगग्रस्त होतात व झाडावर उलट्या टांगलेल्या अवस्थेत दिसून येतात. अशा मृत विषाणूग्रस्त अळ्या पिकातून जमा करून त्या अळ्या ठेचून गाळून विषाणू काढला जाते हे द्रावण परत फवारणीसाठी वापरता येते. एचएनपीव्ही विषाणू द्रावण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी प्रमुख कीटकशास्त्र विभाग यांचेकडे चौकशी करावी.

४) बॅसिलीस थुरिनजिसी : हा जिवाणू घाटे अळीवर प्रभावी असल्याचे निदर्शनास आले आहे. हा जिवाणू घाटे अळीच्या शरीरात गेल्यास अळ्या रोगग्रस्त होऊन मरतात. बाजारात हा जिवाणू पावडर स्वरूपात उपलब्ध आहे.

५) याशिवाय साळुकी, बगळे, कावळे, चिमण्या, कोळसा पक्षी किडीच्या अळ्यांवर उपजीविका करतात. यासाठी दर २० मीटरवर एका उंच काठीला आडवी काठी बांधून शेतात लावावी. जेणेकरून पक्षी त्यावर बसतीत.

६) फेरोमोन ट्रॅप्स : फेरोमन्स ही एक प्रकारची रसायने असतात. ही रसायने कीटक आपल्या प्रजातीच्या किटकांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी शरीराबाहेर टाकतात. त्यामुळे स्वजातीय/लैंगिकक्षम कीटक एकमेकांकडे आकर्षिले जाऊन सापळ्यात आडकतात व दुसऱ्या दिवशी नष्ट करता येतात. या सापळ्यास वरच्या बाजूस पतंग पकडण्यासाठी पिशवी जोडलेलो असते. एका दिवसात सापळ्यात ७ - ८ पतंग आढळल्यास कीटकनाशकांची फवारणी करावी.

जैविक कीड नियंत्रणाचे विविध फायदे.

१) या पद्धतीमुळे विस्तृत प्रदेशावर कीड व्यवस्थापन करता येते. एकदा नैसर्गिक शत्रुची वाढ आणि ते त्या वातावरणात एकरूप झाले की, त्या आणि आजुबाजुच्या क्षेत्रावर ते कार्यरत राहतात व किडीचा बंदोबस्त करतात.

२) वर्षानुवर्षे किडींचे नियंत्रण होते.

३) या पद्धतीमुळे किडींचे पूर्णत : नियंत्रण करता येते. किडीचे नैसर्गिक शत्रू यांचा नाश करतात.

४) या पद्धतीमुळे पर्यावरण सुरक्षित ठेवण्यास मदत होते.

घाटे अळीचे नियंत्रण : तूर पिकाचे घाटे अळीमुळे अतोनात नुकसान होते. ही अळी शेंगातील कोवळे दाणे खाते.

पीक पेरणीपूर्वी :

१) जमिनीची खोलवर नांगरणी करून कुळवाच्या १ - २ पाळ्या देऊन काडीकचरा वेचून घ्यावा. त्यामुळे मागील हंगामातील किडीचे कोष पृष्ठभागावर येतात व प्रखर सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतात.

२) तुरीच्या पिकाबरोबर मोहरी, जवस अथवा कोथिंबीर ही मिश्र अथवा आंतरपिके म्हणून घेतल्यास घाटे अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.

३) पेरणीपूर्वी बियाण्यास जर्मिनेटर ची बीजप्रक्रिया केल्याने मर रोगास प्रतिबंध होतो.

४) ज्या जमिनीत वाळवीचा उपद्रव होत असेल तेथे ४% सेव्हीडॉंल भुकटी २५ किलोग्रॅम प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावी.

पीक रोपावस्थेत व शेंगा भरताना.

१) पीक रोपावस्थेत असताना रस शोषणाऱ्या मावा, तुडतुडे व फुलकिडे यांचे नियंत्रण कीटकनाशकाची फवारणी करावी.

२) फेरोमोन सापळ्याचा वापर करावा.

३) शेंगा भरताना घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास एचएनपीव्ही द्रावण (हेलिओकील) ५०० मिली. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टर फवारावे. विषाणुची फवारणी सायंकाळी ३ - ४ च्या नंतर करावी.

४) निंबोळी अर्क ५% अथवा निंबोसिडीन ०.२% साबणाचा चुरा ५०० लिटर पाण्यातून एक हेक्टरवर फवारावे.

५) बॅसिलस थुरिनजियंसीस (बी.टी.) पावडर ५०० ग्रॅम, ५०० लिटर, पाण्यातून एक हेक्टरवर फवारावी. यामुळे घाटेअळीचे चांगल्याप्रकारे नियंत्रण होते व परोपजीवी किडींचे वाढीस मदत होईल

मूग व उडीद पिकासाठी वरीलप्रमाणे किडींचा बंदोबस्त करावा.

रोग नियंत्रण :

तूर : मर आणि वांझ हे तुरीवरील महत्त्वाचे रोग आहेत. वर्षानुवर्षे एकाच शेतात रोगाला बळी पडणाऱ्या वाणांची लागवड केल्यास फ्युजेरीयम नावाच्या बुरशीची जमिनीत वाढ होते व मर रोग उद्भवतो. त्यामुळे पीक दोन महिन्याचे असताना पाने व फांद्या सुकू लागतात आणि नंतर संपूर्ण झाड वळून जाते. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगांना प्रतिकारक वाणांची लागवड करावी. रोगग्रस्त झाडे शेतातून उपटून नष्ट करावीत. पेरणीपूर्वी बियाण्यास जर्मिनेटर सोबत प्रोटेक्टंट किंवा ट्रायको या परोपजीवी बुरशीची ५ ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणेप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच उन्हाळयात जमीन खोल नांगरावी. त्यामुळे सूर्यप्रकशामुळे बुरशी मरून जाईल.

मूग व उडीद : या पिकांवर भुरी आणि पिवळा विषाणू या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. भुरी रोगामुळे पिकाच्या खालीली पानांवर पांढरे ठिपके दिसून येतात. तसेच पिवळा विषाणू रोगाचा प्रसार पांढरी माशी या किडीमार्फत होतो. यामुळे कोवळ्या पानावर पिवळे ठिपके पडतात.

तूर, उडीद, मुगावरील रोग व किडीवर प्रतिबंधक उपाय म्हणून तसेच प्रतिकुल परिस्थितीत खात्रीशीर, दर्जेदार अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर ८ ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर १ महिन्यांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर १५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २०० ते २५० मिली + स्प्लेंडर २०० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर १.५ महिन्यांनी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + २०० लि.पाणी.

वरील प्रमाणे फवारण्या घेतल्यावर उडीद, मूग हे २ ते २॥ महिन्यात काढणीयोग्य होते. तर तुरीसाठी घाटेआळीच्या नियंत्रणासाठी व शेंगा पोषणासाठी अजून खालीप्रमाणे २ फवारण्यांची गरज भासते.

४) तुरीसाठी चौथी फवारणी : (उगवणीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ५०० मिली + स्प्लेंडर ५०० मिली + २५० लि. पाणी.

५) पाचवी फवारणी : (उगवणीनंतर ४ ते ४.५ महिन्यांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ५०० मिली + स्प्लेंडर ५०० मिली + २५० लि. पाणी.

या दोन्ही फवारण्यामध्ये आमच्या कृषी विज्ञान केंद्रावरील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रासायनिक किटकनाशकांचा वापर केला तरी चालते.

काढणी, मळणी साठवण : तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे व खळ्यावर काठीच्या सहाय्याने किंवा पेंढ्या झोडपूर शेंगा व दाणे अलग करावे. मुगाच्या शेंगा ७५% वाळल्यावर पहिली तोडणी व त्यानंतर ८ - १० दिवसांनी राहिलेल्या शेंगा तोडाव्यात. उडीदाची कापणी करून खळ्यावर आणून त्याची काठीच्या सहाय्याने झोडणी करून दाणे अलग करता येतात. शक्य असल्यास कडधान्यास १ टक्का निंबोळी किंवा मोहरीचे तेल किंवा करंज तेल चोळावे किंवा कडुनिंबाचा पाला (५ टक्के) धान्यात मिसळून साठवावे. म्हणजे कडधान्याचे विविध प्रकारच्या किडींपासून संरक्षण होऊन त्यांची टिकाऊक्षमता वाढते.

डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने घ्यावयाच्या वरील पिकांच्या दर्जेदार अधिक उत्पादनासाठी कृषी विज्ञानचे अंक संदर्भासाठी पहावेत किंवा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा.