८ महिन्यात ऊस कारखान्याकडे, कमी पाण्यावर त्याचा ५ महिन्याचा खोडवा उत्तम

श्री. प्रसन्न तबीब, (B. E. IT Engr.),
मु. पो. डोमगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद,
मोबा. ९५२७७१८१३४


मागील वर्षी फेब्रुवारी २०१२ अखेरीस ३ एकर जमिनीमध्ये ८६०३२ उसाची लागण केली. जमिनीत गाळाची माती भरली आहे. पाणी कमी असल्याने उसाला ठिबक केली आहे. कल्पतरू सेंद्रिय खत एकरी २ बॅगा लागवडीपुर्वी जमिनीत मिसळले. उसाचे २ डोळ्याच्या कांड्या जर्मिनेटर १ लि. + अॅझोटोबॅक्टर + शेणखत १० किलो + गोमुत्र + ईएमचे दुय्यम द्रावण १० लि. या सर्वांचे १०० लि. पाण्यामध्ये द्रावण तयार करून त्यामध्ये कांड्या अर्धातास बुडवून ठेवल्या. त्यानंतर लागवड केली.

उगवण महिन्याभरात होऊन कोंब जोमदार दिसू लागले. मात्र काही ठिकाणी मजुरांकडून लागवडी च्यावेळी गाळाची जमीन असल्याने कांड्या पायाने दाबल्यामुळे १ फुटापर्यंत खोल काही ठिकाणी गुडघ्या एवढ्या खोल गेल्याने तेथे तुटाळ झाली.

त्यानंतर उगवून आलेले कोंब १ महिन्याचे झाल्यावर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट आणि प्रिझमची केली. त्यामुळे उगवणीत जरी तुटाळ वाटत होती, तरी फुटवे चांगले निघाले. काही ठिकाणी २० -२० फुटवे निघाले. सरासरी १० ते १२ फुटवे सर्वत्र होते.

नंतर दुसरी फवारणी वरीलप्रमाणेच २ ते सव्वादोन महिन्याचा प्लॉट असताना केली. तेवढ्यावरच छोट्या बांधणीस ऊस आला. एवढी वाढ झाली. छोट्या बांधणीला सुपर फॉस्फेट १ बॅग आणि युरियाची १ बॅग दिली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची तिसरी फवारणी ४ महिन्याचा ऊस असताना केली. दरम्यानच्या काळात २ - २ महिन्याच्या अंतराने जर्मिनेटर एकरी १ लि. २०० लि. द्रावणाचे ड्रेंचिंग केले. जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केल्यानंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने २ वेळा ई. एम. चे दुय्यम द्रावण १० लि./एकरी सोडले. पक्क्या बांधणील सुपर फॉस्फेट २ बॅगा आणि युरीयाच्या २ बॅगा खताचा डोस दिला.

एवढ्यावर ८ महिन्यातच २० - २२ कांड्याचा ऊस झाला. ३ नोव्हेंबर २०१२ रोजी आठ महिन्याचा ऊस असताना कारखाने नेला. तर एवढी तुटाळ पडून देखील ४० - ४२ टन एकरी उतारा मिळाला.

ऊस कारखान्याला देण्याचा उद्देश एवढाच होता की, उशीरा जानेवारी - फेब्रुवारीत जर ऊस तुटला असता तर ऐन उन्हाळ्यात उसाला पाणी कमी पडत असल्याने खोडवा फुटणार नाही. म्हणून या उसाची नोव्हेंबरमध्येच तोडणी करून उन्हाळ्यापर्यंत तो स्थिरावेल.

जोरदार खोडवा

सध्या खोडवा ऊस ५ महिन्याचा आहे. त्याला उद्याप काहीच वापरले नाही. ज्या ठिकाणी पाणी चांगले बसले आहे. तेथे उसाची वाढ अतिशय चांगली झाली आहे. त्या ठिकाणी माणूस उभा राहिला तरी दिसत नाही. मात्र काही ठिकाणी पाणी कमी पडल्याने वाढ मंदावली आहे. त्यासाठी आज (२४ एप्रिल २०१३) डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्यासाठी तसेच पुढील हंगामात केळी लागवडीसाठी डॉ.बावसकर सरांचा सल्ला घेण्यासाठी आज २४ एप्रिल २०१३ रोजी इथे आलो आहे.