कांदा उत्पादनाचे तंत्रज्ञान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर



भारतीय लोकांच्या आहारात कांद्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. शाकाहारी तसेच मांसाहारी लोकांच्या आहारात कांद्याचा वापर दररोज केला जातो. कोशिंबीर, चटणी आणि मसाला तसेच केचप आणी सॉस यामध्ये कांद्याचा नेहमी वापर केला जातो. कांद्याची पावडर करून आणि कांद्याचे उभे काप किंवा चकत्या करून ते वाळवून वर्षभर वापरता येतात. कांद्यामध्ये 'ब' आणि 'क' जीवनसत्त्वे, कर्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, कॅल्शियम आणि लोह ही खनिजे असतात. कांद्याला येणारा उग्र आणि तिखटपणा हा 'अलिल प्रोपिल डायसल्फाईड' या हवेत उडून जाणाऱ्या तेलकट पदार्थामुळे येतो. कांद्याचा लाला रंग हा' अँथोसायनीन' या रंगद्रव्यामुळे येतो.

कांद्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. कांदा उत्तेजक, चेतनाप्रद असून त्यात गोड, आंबट, तिखट, कडवट आणि तुरट असे पाच निरनिराळे स्वाद आहेत. पित्त आणि वातशामक म्हणून कांद्याचा वापर केला जातो. थकवा, मरगळ, उष्माघात आणि रक्तवाहिन्यांतील दोष या विकारांवर कांदा अत्यंत गुणकारी आहे.

कांद्याच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात अन्नघटकांचे प्रमाण : पाणी - ९० %, प्रोटीन्स - १.९ %, खनिजे - ०.४%, लोह - ०.००१ % , पोटॅशियम - ०.१२७% , जीवनसत्त्व 'क' - ०.०११% , निकोटिनिक अॅसिड - ०.०००४, कार्बोहायड्रेटस - ६.४%, फॅटस - ०.२%, तंतुमय पदार्थ - ०.६%, कॅलिश्यम - ०.०४७% , फॉस्फरस - ०.०५%, जीवनसत्त्व 'ब' - ०.०००१%, उष्मांक (कॅलरी) - ५०.

हवामान : कांदा हे प्रामुख्याने थंड (हिवाळी) हंगामातील पीक आहे. महाराष्ट्रा कांद्याचे पीक खरीप आणि हिवाळी हंगामात घेतले जाते. नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये कांद्याची उन्हाळी लागवड केली जाते. कांद्याच्या उत्तम वाढीसाठी ५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ७० % आर्द्रता पोषक असते. जास्त पाऊस, अतिदमट आणि ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

कांद्याची वाढ आणि बिजोत्पादन हे तापमान आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी (लहान आणि मोठा दिवस) यावर अवलंबून असते. कांद्यामध्ये लहान दिवसांत वाढणाऱ्या (शॉर्ट डे) आणि मोठ्या दिवसांत वाढणाऱ्या (लाँग डे) अशा दोन प्रकारच्या जाती असतात. म्हणूनच खरीप आणि रब्बी हंगामात लागवडीसाठी वेगवेगळ्या जाती निवडणे आवश्यक असते. लहान दिवसात वाढणाऱ्या जाती मोठ्या दिवसांत चांगल्याप्रकारे वाढू शकतात. परंतु मोठ्या दिवसांत वाढणाऱ्या जाती लहान दिवसात लावल्या तर त्यांची फक्त पालेवाढ होते आणि कांदे चांगले पोसत नाहीत. दिवसाच्या लांबी इतकाच तापमानचादेखील कांदा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे दिवसाची लांबी आणि तापमान याचा एकत्रित विचार करून कांद्याला हवामान पोषक आहे किंवा नाही, हे ठरवावे लागते.

कांदा पिकाच्या लागवडीनंतर गाठ थोडी मोठी होत असताना १२ ते १५ अंश सेल्सिअस, कांदा पोसत असताना १५ ते २० अंश सेल्सिअस आणि कांदा काढणीच्या वेळी २५ ते ३० अंश सेल्सिअस असे तापमान कांद्याच्या वाढीला अनुकूल असते. कांदे पोसण्याच्या कालावधीमध्ये म्हणजे लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांत तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली बराच काळ राहिल्यास कांदा पोसण्याऐवजी त्यामधून डेंगळे येण्याची प्रवृत्ती वाढते.

जमीन : कांदा पिकासाठी हलक्या आणि मध्यम भारी जमिनी उपयुक्त ठरतात. पाण्याचा उत्तम निचर होणाऱ्या आणि सेंद्रिय पदार्थांचे भरपूर प्रमाण असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत कांद्याचे पीक चांगले येते. कांद्याच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ पर्यंत असावा. कांद्याची वाढ जमिनीच्या वरच्या थरात होत असल्याने आणि त्याची मुळे २४ - ३० सेंटिमीटर खोलीपर्यंत वाढतात म्हणून कांद्याच्या लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचा वरचा थर किमान २५ ते ३० सेंटिमीटरपर्यंत भुसभुशीत असावा. कांद्याच्या मुळाभोवतीच्या जमिनीत भरपूर ओलावा आणि खेळती हवा असल्यास कांद्याची वाढ चांगली होते. यासाठी जमिनीच्या वरच्या थरात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असावे. चोपण किंवा भारी काळ्या जमिनीत कांद्यानी पालेवाढ जास्त प्रमाणात होते. मात्र कांदे त्या प्रमाणात पोसत नाहीत. याशिवाय चोपण किंवा काळ्या जमिनीत कांद्याचा आकार वेडावाकडा होतो.

जाती: कांद्याच्या लागवडीसाठी जातीची निवड करताना या जातींमध्ये पुढील गुणधर्म असणे आवश्यक आहे. कांदा आकाराने गोलाकार असावा. बुडख्याचा किंवा मुळाचा भाग आत दबलेला नसावा. कांद्याचा आकार मध्यम (जाडी ४.५ ते ६.५ सेंमी) असावा. जातीनुसार लाल, गुलाबी, विटकरी, पांढरी इत्यादी रंगाची चकाकी साठवणीत टिकून राहावी. कांद्याची मान बारीक असावी आणि आतील मांसल पापुद्रे एकमेकांना घट्ट चिकटलेले असावेत. कांदा चवीला तिखट ते मध्यम तिखट असावा, परंतु त्यास उग्र वास नसावा. अशा जातीची उत्पादनक्षमता हेक्टरी किमान ३० ते ३५ टन असावी. काढणीसाठी सर्व कांदे एकाच वेळी तयार व्हावेत आणि कांदा साठवणीत चांगला टिकून राहावा. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असावी. अशा प्रकारे उत्तम जातीचे सर्व गुणधर्म एकाच जातीमध्ये मिळणे अशक्य असले तरी निवडक महत्त्वाचे गुणधर्म असलेली जाती लागवडीसाठी निवडाव्यात.

खरीप हंगामासाठी जाती :

१) एन - ५३: नाशिक येथील स्थानिक वाणातून ही जात १९६० मध्ये विकसित केलेली आहे. या जातीचे कांदे गोलाकार परंतु थोडे चपटे असतात. या जातीच्या कांद्याचा रंग जांभळट लाल असतो आणि चव तिखट असते. ही जात खरीप हंगामातील लागवडीसाठी चांगली आहे. या जातीचे कांदे लागवडीपासून १०० ते ११० दिवसांत काढणीसाठी तयार होतात. या जातीचें उत्पन्न हेक्टरी २० ते २५ टन इतके मिळते. घन पदार्थांचे प्रमाण ११ -१२% एवढे आहे.

२) बसवंत - ७८०: महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही जात स्थानिक वाणांतून खरीप हंगामासाठी १९८६ मध्ये विकसित केली आहे. या जातीचे कांदे गोलाकार आणि शेंड्याकडे थोडे निमुळते असतात. या जातीच्या कांद्याचा रंग आकर्षक लाल असून तो काढणीनंतर ३ ते ४ महिने चांगला टिकून राहतो. डेंगळे आणि जोड कांदे यांचे प्रमाण एन -५३ या जातीच्या तुलनेत अतिशय कमी असते. या जातीचा कांदा लागवडीपासून १०० ते ११० दिवसांत काढणीसाठी तयार होतो. या जातीचे उप्तादन हेक्टरी २५ ते ३० टन इतके मिळते. घन पदार्थांचे प्रमाण १२% एवढे आहे.

३) अॅग्रीफाऊंड डार्क रेड : नाशिक येथील एन. एच. आर. डी. एफ. (ए.ए.डी.एफ.) या संस्थेने ही जात स्थानिक वाणांतून १९८७ मध्ये विकसित केली आहे. या जातीचे कांदे आकाराने गोल, मध्यम आकाराचे असतात आणि त्याचा रंग गर्द लाल असतो. या जातीचे कांदे लागवडीनंतर ९० - ११० दिवसांनी काढणील येतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी ३० ते ४० टन मिळते. घन पदार्थाचे प्रमाण १२ - १३%, साठवणीस मध्यम, खरीप हंगामास योग्य, निर्यातीसाठी योग्य. पेरणी करूनही कांदा पिकाचे उत्पादन घेण्यास योग्य वाण आहे.

४) अर्का कल्याण : बंगलोर येथील भारतीय बागवानी संस्थेने ही जात नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील स्थानिक वाणांतून निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीचे कांदे गोलाकार, मध्यम आकाराचे आणि गर्द लाल रंगाचे असून चव तिखट असते. या जातीचे कांदे ९० ते ११० दिवसात काढणीला तयार होतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी २५ ते ३० टन मिळते. घन पदार्थांचे प्रमाण ११ -१२ % एवढे आहे.

रब्बी हंगामासाठी जाती :

१) एन २-४-१ : १९६० च्या दरम्यान निफाड येथील संशोधन केंद्राने विकसित केलेला हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्राने रब्बी हंगामासाठी वाढवला आहे. या जातीचे कांदे गोलाकार, मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात. कांद्याचा रंग विटकरी लाल असून साठवणीमध्ये कांद्यावर एक प्रकारची चकाकी येते. साठवणीसाठी ही जात अत्यंत चांगली आहे. निर्यातीसाठी ही जात चांगली आहे. या जातीचे कांदे लागवडीनंतर १२० दिवसांनी काढणीला येतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ टन इतके मिळते. घन पदार्थंचे प्रमाण १२ - १३% एवढे आहे. ह्या वाणाचे पीक रांगडा कांद्यासाठीही घेता येते.

२) पुसा रेड : नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्थेन रब्बी हंगामासाठी ही जात निवड पद्धतीने १९७५ मध्ये विकसित केली आहे. या जातीच कांदा गोलाकार चपटा आणि गर्द लाल रंगाचा असतो. या जातीचे कांदे लागवडीनंतर १२५ ते १४० दिवसांत काढणीसाठी तयार होतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी २५ ते ३० टन इतके मिळते. घन पदार्थांचे प्रमाण १२ -१३ % आहे. महराष्ट्रात रांगडा आणि रब्बी हंगामास योग्य वाण आहे.

३) अर्का निकेतन : बंगलोर येथील भारतीय बागवानी संशोधन संस्थेने ही जात नाशिक येथील स्थानिक वाणांतून १९८७ मध्ये विकसित केली आहे. या जातीचे कांदे गोलाकार, बारीक मानेचे आणि आकर्षक गुलाबी रंगाचे असतात. कांद्याची चव तिखट असून साठवणीसाठी चांगला राहतो. सर्वसाधारण तापमानाला ११० ते १२० दिवसात काढणीसाठी तयार होतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ टन येते. रब्बी आणि रांगडा या दोन्ही हंगामात या जातीची लागवड करता येते. घन पदाथांचे प्रमाण १२ - १४% आहे .

४) अॅग्रीफाऊंड लाईट रेड : रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी ही जात नाशिक येथील एन. एच. आर. डी. एफ. या संस्थेन विकसित केली आहे. या जातीचे कांदे फिकट लाल, गोल आणि मध्यम ते मोठ्या आकाराचे कांद्याची चव तिखट असते. या जातीचे उत्पादन हेक्टरी ३० ते ३२ टन इतके मिळते. या कांद्यामध्ये डेंगळांचे प्रमाण कमी असते. साठवणीसाठी ही जात चांगली आहे. प्रामुख्याने नाशिक भागासाठी आणि निर्यातीसाठी ही जात योग्य आहे. घन पदार्थांने प्रमाण १३ -१४ % आहे.

५) एन - २५७ -९१ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही जात रब्बी हंगामासाठी विकसित केली आहे. या जातीचा कांदा पांढरा , मध्यम, गोल आणि चपटा असतो. या जातीचे कांदे साठवणीत चांगले राहतात. कांदे लागवडीनंतर ११० ते १२० दिवसांत काढणीसाठी तयार होतात. उत्पादन हेक्टरी २५ ते ३० टन मिळते.

६) अॅग्रीफाऊंड व्हाईट : राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास प्रतिष्ठान (एन. एच. आर. डी. एफ ) नाशिक ह्या संस्थेने ही जात मध्यप्रदेश राज्यात निमाड भागातील रब्बी हंगामात उत्पादन केल्या जाणाऱ्या स्थानिक वाणातून निवड पद्धतीने विकसित केली आहे. कांदे गोलाकार, वरचे आवरण घाटत असलेले, आकर्षक पांढरा रंग, ४ - ६ सेंमी व्यासाचे असून घन पदार्थांचे प्रमाण १४ -१५% एवढे असते. साठवणक्षमता चांगली असून पीक पेरणीपासून १६० -१६५ दिवसांत तयार होते. सरासरी उत्पन्न २० -२५ मे. टन प्रति हेक्टर एवढे असून खरीप व रब्बी दोन्ही हंगामात लागवडीसाठी योग्य वाण आहे.

७) फुले सफेद: महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा वाण कागल भागातील पांढऱ्या कांद्याच्या पिकामधून विकसित केला आहे. १९९४ मध्ये हा वन प्रसारित झाला. कांदे पांढरे, गोलाकार, मध्यम आकाराचे निर्यातीस योग्य, घन पांढरे, गोलाकार, मध्यम आकाराचे निर्यातीस योग्य, घन पदार्थांचे प्रमाण १३% आहे. सरासरी उत्पादन हेक्टरी २५ - ३० टन एवढे मिळते.

८) फुले सुवर्णा: हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठा ने विकसित केला असून १९९७ साली महाराष्ट्रातील तिन्ही हंगामांत घेण्यास शिफारस केली आहे. यलो टेक्सास आणि एन २-४-१ ह्या वाणांच्या संकरातून हा वाण विकसित केला आहे. कांदे पिवळ्या, किंचित विटकरी रंगाचे, गोलाकार, घट्ट, मध्यम तिखट, निर्यातीस व साठवणीस योग्य, ११० दिवसांत सरासरी २३ -२४ टन प्रति हेक्टर उत्पादन मिळते.

याशिवाय कांद्याचे पुसा माधवी, पुसा रत्ना, पुसा व्हाईट राऊंड आणि लहान कांद्यामध्ये अर्का बिन्दू आणि अॅग्रीफाऊंड रोझ हे विकसित वाण आहेत. मल्टिप्लायर कांद्याचे को - ३, को -४, अॅग्रीफाऊंड रेड इत्यादी सुधारित वाण आहेत.

हंगाम आणि लागवडीचे अंतर : महाराष्ट्रात कांद्याची लागवड प्रमुखाने खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामांत केली जाते. खरीप हंगामासाठी मे - जून महिन्यांत रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड जून - जुलै महिन्यांत करतात. जुलै - ऑगस्ट ह्या काळात तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस असते, त्यामुळे कांदा तयार होण्यास मदत होते. सप्टेंबर - ऑक्टोबर या काळात दिवसाचे उष्ण तापमान आणि आतात भरपूर पाऊस यामुळे करपा या रोगाचा कांद्यावर मोठ्या प्रमाणात पादुर्भाव होतो. तसेच फुलकिड्यांचाही उपद्रव वाढतो. काढणीच्यावेळी पाऊस झाल्यास कांद्याची काढणी करणे, तो पातीसह सुकविणे, पात कापणे ही कामे करणे कठीण होते. या हंगामातील कांद्याला काढणीनंतर लगेचच कोंब येतात. या सर्व बाबींमुळे खरीप कांद्याची साठवण करता येत नाही. त्यामुळे खरीपातील कांदा लगेच विक्रीसाठी काढावा लागतो.

खरीप हंगामातील कांद्याला 'पोळ कांदा' असे म्हणतात. तर रब्बी हंगामातील कांद्याला 'रांगडा कांदा' असे म्हणतात.

रोपे तयार करणे : १ हेक्टर कांदा लागवडीसाठी अंदाजे १० गुंठे जमिनीत रोपांसाठी बी टाकावे. ह्या जमिनीत ४ ते ५ गाड्या कुजलेले शेणखत, १० ते १५ किलो कल्पतरू सेंद्रिय खत व ५ किलो स्फुरद द्यावे. पेरणीसाठी ३ मी. x १ मी. आकाराचे गादीवाफे करावे. पेरणी ओळीमध्ये ५ सेंमी. अंतरावर व २ सेंमी खोल करावी. बियाणे फार दाट पेरू नये. म्हणजे रोपांची वाढ सारखी होऊन नर्सरीची देखभाल सुलभतेने करता येते.

बीजप्रक्रिया : कांद्याचे एक किलो बी २५ मिली जर्मिनेटर आणि २० ग्रॅम प्रोटेक्टंटचे १ लि. पाण्यात द्रावण तयार करून त्यामध्ये ४ ते ६ तास भिजवून नंतर सावलीत सुकवून रोपासाठी किंवा पेरणीसाठी वापरावे.

लागवड पद्धती : निरनिराळ्या भागांत कांद्याची लागवड वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. काही भागांत बी शेतात कायम जागी पेरून लागवड करतात, तर अनेक ठिकाणी गादीवाफ्यांवर रोपे तयार करून नंतर त्यांची पुनर्लागवड करतात. रोपांची पुनर्लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी - वरंब्यावर करतात. काही भागांत रोपांची पात कापून लागवड करतात, तर काही भागांत पात न कापता लागवड करतात.

एका रोपापासून एकच कांदा मिळतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य प्रमाणावर राखणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. खरीप हंगामात रोपे १५ x २० सेंटिमीटर अंतरावर आणि रब्बी किंवा उन्हाळी हंगामात रोपे १२ x १० सेंमी अंतरावर लावावीत. सारी -वरंब्यावर लागवड करावयाची झाल्यास ३० सेंमी रुंदीची सरी पाडून सरीच्या दोन्ही बाजूंवर १० सेंमी अंतरावर एकाच ओळीत रोपे लावावीत. गादीवाफे ६० सेंमी रूंदीचे करावेत. १० x ७.५ सेंमी अंतरावर लागवड करावी. लागवडीसाठी शक्यतो रूपांचा खालील भाग फुगीर झालेल्या अशा रोपांची निवड करावी. लहान रोपांची लागवड केल्यास नांगे मोठ्या प्रमाणात पडतात. त्यामुळे उत्पादनात घट येते. अशावेळी आंबवणी देताना नांगे साधून घ्यावे. रोपे लागवडीच्या अगोदर जर्मिनेटर १०० मिली + प्रोटेक्टंट १०० ग्रॅमचे १० लि. पाण्यात द्रावण तयार करून त्यामध्ये रोपांची मुळे बुडवून लागवड करावी.

खते : वाढलेला दर सापडावा म्हणून, कांदा लवकर वाढावा व पोसावा म्हणून रासायनिक खताचा जादा वापर करू नये. त्यामुळे कांदा सडतो. करपा, ताक्या, पर्पल ब्लॉच (Purple Blotch) हे रोग येतात. त्यामुळे शक्यतो कल्पतरू खातच वापर (शेणखतासोबत एकरी १०० किलो किंवा कंपोस्ट खत न वापरल्यास एकरी १५० किलो) करावा . नुसता युरिया, अमोनियम सल्फेट, कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट देऊ नये. जमीन हलकी असेल तर कल्पतरू वापरून सप्तामृतचे ३ ते ४ फवारे १२ -१५ दिवसांचे अंतराने द्यावेत.

या औषधाचे बाबतीत काही शेतकऱ्यांनी असे सांगितले की, एन - ५३ (हळवा) कांदा अडीच ते तीन महिन्यात तयार होतो. एन -५३ हा कांदा गुलाबी, सिंगल पट्टीचा असून पाती माना टाकतात. असा कांदा विळ्यावर खुडल्यावर २४ तासाचे आत मार्केटला न्यावा लागतो नाहीतर दुसर्या दिवशी गुलाबी रंगाची साल सटकते व आतील पांढरा भाग दिसतो. ८० ते ९० % आर्द्रता असल्याने आठ दिवसांचे आत पूर्ण कांदा साडू शकतो. परंतु वरील सप्तामृताच्या फवारणीमुळे सिंगल पत्तीचा डबल पत्ती कांदा तयार झाला व १५ ते २० % जादा भाव सापडला. ही जागतिक कृषी क्षेत्रातील नवीन क्रांती आहे. गरवा कांद्याचे काढणीस वेळ झाल्यास किंवा अकाली पावसामुळे सडल्यास या कांद्याचे भाव कडाडतात व दुष्काळी भागातील लोकांना अमाप पैसे होतात.

पाणी : भारी जमिनीत १० दिवसांचे अंतराने, तर रब्बी, उन्हाळ्यामध्ये ७ ते ८ दिवसाचे अंतराने पाणी द्यावे.

महत्त्वाची कीड आणि नियंत्रण :

फुलकिडे (थ्रिप्स) : कांद्यामध्ये फुलकिडे किंवा टाक्या, मुरडा या किडींचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. प्रामुख्याने खरीप व रब्बी हंगामात फुलकिडे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. कोरडी हवा आणि २५ - ३० अंश सेल्सिअस तापमानात ही कीड झपाट्याने वाढते. फुलकिडे आकाराने अत्यंत लहान असतात. पूर्ण वाढलेल्या फुलकिड्याची लांबी १ मिलीमीटर असते. फुककिड्याचा रंग पिवळसर तपकिरी असून त्याच्या शरीरावर फुलीच्या आकाराचे गर्द चट्टे असतात. या किडीची मादी पानावर पांढऱ्या रंगाची अंडी घालते. अंड्यातून ४ ते १० दिवसांत पिले बाहेर पडतात. पिले आणि प्रौढ कीटक रात्रीच्यावेळी पाने खरडून पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पांढुरके ठिपके दिसतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यास पाने वाकडी होतात आणि वाळतात. दिवस ही कीड तापमान वाढल्यामुळे पानाच्या बेचक्यात खोलवर जाऊन बसते किंवा बांधावरील गवतामध्ये लपून राहते. या किडीने केलेल्या जखमांमधून करपा रोगाच्या जंतूंच्या प्रसार होतो. त्यामुळे करपा रोगाचे प्रमाण वाढते

महत्त्वाचा रोग आणि त्याचे नियंत्रण :

करपा रोग (अल्टरनेरिया ब्लाईट): या बुरशीजन्य रोगाचे प्रमाण उष्ण आणि दमट हवामानात म्हणजे खरीप हंगामात जास्त प्रमाणात दिसून येते. खरीप हंगामातील ढगाळ हवामानात आणि पाऊस यामुळे करपा रोगाचा प्रसार ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत होतो, तर रब्बी हंगामात या रोगाचा प्रसार ३८ टक्क्यांपर्यंत होतो. बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या कांद्याच्या पातीवर सुरुवातीला खोलगट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मध्यभाग जांभळट रंगाचा असतो. चट्टे पडण्याची सुरुवात शेंड्याकडून होते. चट्ट्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पाने शेंड्याकडून वाळू लागतात आणि संपूर्ण पात जळाल्यासारखी दिसते आणि शेवटी सुकून गळून पडते. हा रोग रोपाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात आल्यास पात जळून गेल्यामुळे पिकाची वाढ चांगली होत नाही. कांदा पोसत नाही आणि चिंगळी कांद्याने प्रमाण वाढते. कांदे पोसण्याच्या काळात रोग आल्यास बुरशीचा प्रादुर्भाव कांद्यापर्यंत होतो आणि कांदा सडतो.

कांद्याची निरोगी जोमदार वाढ होण्यासाठी पात रसरशीत हिरवीगार राहून कांद्याचे चांगले पोषण होण्यासाठी खालीलप्रमाणे फवारणी करावी.

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ राईपनर १०० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर ३०० ते ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २०० मिली + स्प्लेंडर २०० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ५ ० ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ७५ ते ८० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली + स्प्लेंडर ४०० मिली + २०० ते २५० लि. पाणी.

काढणी, उत्पादन आणि विक्री : कांद्याची काढणी केल्यानंतर त्याची प्रतवारी करणे, कांदा सुकविणे, पात कापणे, बाजारभाव मिळेपर्यंत कांद्याची तात्पुरती साठवण करणे या गोष्टींकडे अनेकदा नीट लक्ष दिले जात नाही. केवळ कांद्याच्या लागवडी नंतर जात आणि हवामानानुसार कांदा ३ ते ५ महिन्यात काढणीस तयार होतो. कांदा पक्व झाल्यावर नवीन पाने येण्याचे थांबते. पानांतील अन्नरस कांद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होऊ लागतो. पात पिवळसर होऊ लागते आणि, गड्ड्याच्या वर आपोआप वाकून खाली पडते. यालाच 'माना पडणे' असे म्हणतात. या वेळी कांद्याची मुळे सुकू लागतात आणि त्यांची जमिनीची पकड सैल पडू लागते. साधारणपणे ३० ते ४० % झाडांच्या माना पडल्यानंतर कांदा काढणीस तयार झाला असे समजावे.

सर्व कांदा एकाच वेळी काढणीला तयार होत नाही. मान पडल्यानंतर आणि पात सुकल्यावर कांदा काढावा. कांदा जसजसा तयार होईल तसतसे काढण्याचे काम खरीप हंगामात करतात. कारण खरीप हंगामात माना लवकर पडत नाहीत. कांदा पक्व झाला तरीही पातीची वाढ चालूच राहते. अशावेळी पक्व कांदा बधून काढावा. परंतु रांगडा किंवा उन्हाळी कांदा काढणीला एकाच वेळी तयार होतो. या कांद्याची काढणी जानेवारी ते मे महिन्यापर्यंत चालते. या कांद्याच्या माना आपोआप पडतात. सर्व माना पडल्यानंतर कांदा एकाचा वेळी काढावा. कांद्याची पात ओलसर असतानाच कांदा उपटून काढावा. पात वाळली तर कांदा उपटून निघत नाही. अशा वेळी तो खुरप्याने किंवा कुदळीने काढावा लागतो. कांदा काढणीच्या १५ दिवस अगोदर प्रोटेक्टंट २ ते ३% आणि ०.१% बाविस्टीनची फवारणी द्यावी. म्हणजे कांद्याचे साठवणीतील नुकसान कमी होते.

अधिक माहितीसाठी खालील संदर्भ पहावेत

हळव्या कांद्याला दलालाने दिला फुरसुंगीचा भाव

श्री. सुरेश ज्ञानेश्वर लंघे (गुरुजी) , मु. पो. सविंदणे, ता. शिरूर, जि. पुणे, मोबा. ९८२२८६०५४०

(संदर्भ - कृषी विज्ञान, फेब्रुवारी २००५, पान नं.२५ )

जुने कांद्याचे बियाच्या उगवणीसाठी जर्मिनेटर प्रभावी

श्री. नारयण बाबूराव काळे

मु. पो. कुंदेवाडी, ता. निफाड, जि. नाशिक.

(संदर्भ - कृषी विज्ञान, फेबुवारी २०० ५, पान नं. १२)

फक्त आंबवणी चिंबवणीवर कांदा आला

श्री. पोपट जगदाळे, मु. पो. न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे.

(संदर्भ - कृषी विज्ञान, जानेवारी २००५ पान नं. ८)

कांदा बिजोत्पादन

बिजोत्पादनासाठी दोन प्रकारचे (हळवा कांदा, गरवा कांदा) कांदे वापरले जातात. हळव्या कांद्यापेक्ष गरवा कांद्याचे बिजोत्पादन महत्त्वाचे आहे. मुळातच कांदा बिजोत्पादन ही नाजूक बाब आहे. साधारणपणे एक वर्षापुर्वीचे बी पेरणीसाठी चालत नाही. चार महिन्यानंतर बियांची उगवण क्षीण होते. तेव्हा या बाबी टाळणेसाठी बिजोत्पादन चांगल्या पद्धतीने करणे आवश्यक आहे.

हलव्याचे गोट : एकरी ८०० किली गोटकांदे लागतात. लागवडीचे गोटाचे शेंडे (तिसरा भाग) कापल्यानंतर एक लिटर जर्मिनेटर + १०० लिटर पाणी या प्रमाणातील द्रावणात बुडवून सरी/ वरंब्याच्या बगलेत ४ - ४ इंच अंतरावर लावावे. लागवडीसाठी मध्यम आकराचे साधारण ५० ते ६० ग्रॅम वजनाचे कांदे निवडावेत. १० ते १५ दिवसात उगवण पुर्ण होते. लागवडीच्यावेळी २ टन शेणखत + १५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत वापरावे. महागडी रासायनिक खते वापरू नयेत. तसेच नत्रयुक्त खताची आवश्यकता नसते. मिश्रखत आवश्यक असल्यास १ महिन्याने व ४५ दिवसानंतर डोस (मात्रा) द्यावा. त्यामुळे गोटातून निघणारे तुऱ्याचे दांडे चांगले निघतात. यामध्ये सप्तामृताच्या ३ ते ४ फवारण्य केल्यास फुलोऱ्याचे दांडे टपोरे निघून बियांचा दाणा स्पष्ट भरला जातो आणि वजन चांगले भरल्याने होणारे बी चांगल्या प्रतिचे मिळते.

नवीन / ताजे बी कसे ओळखावे ?

१) जुने बी विस्तवावर टाकल्यास तडतड आवाज येतो.

२) जुन्या बियांच्या तुऱ्यातील काड्या करड्या, पिवळसर रंगाच्या सुरकुतलेल्या असतात. तर नवीन बियांच्या तुऱ्यातल्या काड्या स्वच्छ पांढऱ्या रंगाच्या असतात.

३) नवीन वजनदार बी जर्मिनेटरमुळे ३ ऱ्या दिवशी उगवून येते, तर जुने बियांची उगवण उशिरा होते. जुन्या बियांची उगवण व्यवस्थित होण्यासाठी 'जर्मिनेटर' हा एकमेव पर्याय आहे. ह्यामुळे कोट्यावधी रूपयांचे बी जगभर वाचविता येते. साप्तामृताचा वापर केल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याची लागवड करता येते. हळव्या कांद्याचे तुरे मार्च महिन्यामध्ये निघता.

ढगाळ हवामानामध्ये (धुई, धुके) असल्यास व साप्तामृत न वापरल्यास तुरे पोकळ निघतात. फलधारणा होत नाही. याकरीता फुलपाखरे, मधमाशा यांचे प्रमाण आवश्यक आहे. ढगाळ आभाळ आल्यानंतर विषारी किटकनाशके वापरून नुकसानीत भर घालण्यसारखे आहे. सप्तामृतमध्ये प्रोटेक्टंट ह्या आयुर्वेदिक पावडरचे प्रमाण थोडे वाढवून ४ ते ६ फवारण्या केल्यास उत्कृष्ट प्रतीचे बी तयार होते.

महाराष्ट्रातील खानदेश भागातील श्री. पंढरीनाथ येवले (B.E. Civil. Rd Ex. Engi.) या प्रगतीशील शेतकऱ्यांनी बिजोत्पादनासाठी सप्तामृताचा वापर करून उत्कृष्ट प्रतीचे बियाणे घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा पद्धतीने तयार केलेले बी एक वर्षानंतर देखील सप्तामृताचा वापर करून यशस्वीरित्या वापरत येऊन अधिक व दर्जेदार उत्पादन घेता येते. या पद्धतीने तयार केलेले बी ७०० ते १००० रू. किलो दराने बिजोत्पादन कंपन्या शेतकऱ्यांना देतात. घरगुती बी म्हणून १२०० ते ३००० रू. पायली या दराने विकले जाते.

अधिक माहितीसाठी खालील संदर्भ तसेच कृषी मार्गदर्शिका पान नं. १२६ ते १२८ पहा -

घरचे घरी खात्रीशीर कांदा बिजोत्पादन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने

श्री. जगन्नाथ सुदाम पाडेकर ,

मु. संतवाडी, पो. आळे, ता. जन्नर, जि. पुणे

मो. ९९७०३४६०१५ (संदर्भ : कृषी विज्ञान, ऑक्टोबर २००९, पान नं. १९)