उशीरा गहू लावून लवकर काढून अर्ध्या एकरात ८॥ पोती गहू

श्री. गोपाल नामदेवराव डफर,
मु. पो. मांगलादेवी,ता . नेरपरसोपंत, जि. यवतमाळ.
मोबा.७३५०७५९४७७


मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे माहितीपत्रक आमच्या गावातील एका शेतकऱ्याकडे मिळाले. त्यातील फोन नंबर घेऊन पुणे ऑफिसला संपर्क साधला. तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी विषयी सविस्तर माहिती मिळाली व कृषी विज्ञान मासिकासंदर्भात माहिती व वर्गणी समजल्यावर २०० रू. मनीऑर्डरने पाठवून कृषी विज्ञान मासिक चालू केले. अंक वाचत असताना प्रगतीशील शेतकऱ्यांच्या मुलाखती वाचून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत घेतलेले उत्पादन पाहून त्यांच्याशी संपर्क साधून माहित घेत. यातून मला समाधान मिळत होते व आपणही त्यांच्याप्रमाणे डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून उत्पादन घेऊ अशी खात्री वाटू लागली. त्यावरून कृषी प्रदर्शन पुणे येथून अजून माहिती घेऊन सप्तामृत औषधे डिसेंबरमध्ये आणली. त्यावेळी कापूस पिकाची वेचणी पूर्णता संपून पीक काढून मशागतीचे काम चालू होते. नंतर ७ जानेवारी २०१३ ला २० किलो गहू (अजित १०२ वाण) अर्धा एकरमध्ये पेरला लागवडीचा काळ उलटून गेला होता, मात्र घरी खाण्यासाठी काही मिळेल तेवढ्या उत्पन्नावर आम्ही असमाधान मानणार होतो.

या गव्हाला युरीया १ पोते डी.ए.पी. अर्धे पोते आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एकूण ४ फवारण्या केल्या. एवढ्यावरच ७ जानेवारील पेरलेला गहू १५ एप्रिलला तर काढला. त्यापासून ८.५ पोती उत्पादन मिळाले. आमच्या सोबत (उशीरा) ज्यांनी गहू केला होता. त्यांना एकरी ३ पोती फक्त गहू मिळाला. एवढा फरक आम्हाला प्रकर्षाने जाणवला. म्हणून चालू हंगामात ३ एकर कापसाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सुरूवातीपासून वापरून विदर्भातील आदर्श मॉडेल होण्याचा माझा प्रयत्न आहे.