वकिलीपेक्षा चिकूतील आंतरपीक 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ३।। लाख रू. ने आत्मिक समाधान!

अॅड. देविदास शंकरराव खिलारे,
मु.पो. सोनवडी, (बु.), ता. फलटण, जि. सातारा,
मोबा. ९६२३३००४२



मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर गेल्या २० वर्षापासून करत आहे. मी 'कृषी विज्ञान' मासिकाचा जुना वाचक आहे. आतापर्यंत मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर 'सिद्धीविनायक' शेवगा, ऊस, गहू, मका या पिकांवर केला आहे. २००६ साली १ एकर मध्यम ते हलक्या प्रतिच्या जमिनीत २५ x २५ फुटावर कालीपत्ती चिकू लावला आहे. चिकू लागवडीपासून फळे लागेपर्यंत ५ ते ६ वर्ष लागणार होते तेव्हा चिकूला फक्त पाणी देऊन पोसणे परवडत नाही म्हणून ४ महिन्यांनी २००६ साली ऑगस्टमध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ६०० 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची लागवड सरांच्या तंत्रज्ञानाने केली होती. शेवग्याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे छाटणी. ज्याला छाटणी वेळेवर जमणार नाही, त्याने शेवगा लावू नये, हे माझे स्पष्ट मत आहे. आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे छाटणीचे तंत्र पूर्णपणे सांभाळले. शेवगा पुस्तकात जरी ७ महिन्यांनी शेंगा तोडणीस येतात, असे लिहिले असले तरी आमच्या शेंगांचा तोडा ६ व्या महिन्यातच झाला. फेब्रुवारी २००७ मध्ये चालू झालेला माल २ - ३ महिने दररोज चालू होता. त्यावेळी उन्हाळा असल्याने आम्ही उसासारखे मोकाट पाणी पूर्ण गारा होईपर्यंत असू देत. मात्र त्यामुळे बरीच तुटाळ झाली. ४०० - ५०० च झाडे राहिली. आम्हाला पहिल्या बहाराला छाटणीचे तंत्र अवगत झाले, मात्र पाण्याचे नियोजनात आम्ही मार खाल्ला. त्यामुळे उत्पादन सरांनी सांगितल्याप्रमाणे मिळाले नाही, तरी मिळालेले उत्पादन आमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच होते, शिवाय बाजारभावही २० ते ३० रू./किलो मिळाल्याने त्यावेळी चांगले पैसे झाले.

काम कामाचा गुरू

पहिल्या बहारात आमच्या ज्या चुका झाल्या त्या आम्ही आमच्या अनुभवातून तसेच सरांच्या सल्ल्यानुसार दुसऱ्या बहाराच्या वेळी दुरुस्त केल्या. 'काम कामाचा गुरू' या उक्तीप्रमाणे मोकाट पाण्यामुळे गेल्यावर्षी जी शेवग्याची खोडे सडून तुटाळ झाली तसेच उत्पादनात काही प्रमाणात घट आली, त्यावर उपाय म्हणून छाटणी केल्यानंतर झाडांच्या ओळीला खोडापासून १।। फुटावरून दोन्ही बाजूने तास मारून खोड ३ फूट रुंदीच्या वरंब्यावर घेऊन दोन्ही बाजुच्या दांडाने पाणी सोडत होतो. सबमर्शिबल ५ हॉर्सपॉवरची मोटर आहे आणि पूर्ण शेवग्याच्या प्लॉटला १२ दांड होते. शेंगाची तोडणी ऑगस्ट २००७ पासून चालू झाल्यापासून या दांडाने आठवड्यातून एकदा जानेवारीपर्यंत पाणी देत होतो. १ तासात पूर्ण क्षेत्राच्या सऱ्या ओल्या होत असत. पाणी देऊन होईपर्यंत मागे शेतात एक थेंबही पाणी साचत नसे. शिवाय खोडाला अजिबात पाणी लागत नसे, त्यामुळे सतत वाफसा अवस्था राहिल्याने शेंगा हिरव्यागार रसरशीत निघत. अशा शेंगांना ऑगस्ट ते जानेवारी २००८ पर्यंत ३० ते ३५ रू. भाव फलटण मार्केटला मिळत असे. पुण्यापेक्षा किलोमागे साधारणपणे ५ रू. भाव कमी मिळतो. मात्र पुण्याला माल पाठवायचे झाले, तर ५ रू. हून अधिक खर्च पट्टीतून वजा होतो. म्हणून स्थानिक मार्केट परवडते. आम्ही शिंदे बंधु व्हिजीटेबल फ्रुट मर्चंट गाळा नं २० कृ.उ.बा.स. मार्केटयार्ड, फलटण यांच्याकडे माल पाठवितो. उन्हाळा असूनही पाण्याच्या नियोजनामुळे शेंग हिरवीगार, चमकदार मिळत होती.

तोडा दररोज करत होतो. दुपारी ४ नंतर मी आणि माझी पत्नी शेंगा तोडायचो. ३० - ४० किलो शेंगा (मार्च) महिन्यात दररोज निघत होत्या, थंडीत शेंगा २० - २५ किलो निघत, मात्र बाजारभाव ३० ते ३५ रू. किलो मिळायचा फेब्रुवारीपासून ऊन चालू झाल्याने शेंगा जादा ३० - ४० किलो दररोज निघत, मात्र भाव कमी १३ ते १५ रू. किलो मिळू लागला. तरी दररोज कोणताही खर्च नसताना ६०० - ७०० रू. मिळत होते. थंडीत उत्पादन २० ते २५ किलो मिळून दर ३० रू. प्रमाणे ६०० रू. उत्पन्न मिळत होते. तेच उन्हाळ्यात ३० ते ४० किलो उत्पादन मिळाल्याने त्याला १५ रू. किलो भाव मिळाला तरी ४५० ते ६०० रू. होत असे. म्हणजे भावात चढउतार झाला तरी उत्पादन वाढल्याने उन्हाळ्यातही थंडीत मिळाले तेवढेच पैसे दररोज मिळतात. उन्हाळ्यात आठवड्यातून २ - ३ वेळा इंडाने पाणी देत होतो. रानाला उतार असल्याने पुर्ण १२ इंडाला थोडे - थोडे पाणी लावत असे. त्यामुळे पाणी चांगले मुरायचे. तरी १ तासात पूर्ण क्षेत्र भिजवून मुळाजवळ पाणी न दिल्याने सतत वापसा अवस्था राहत होती. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. बाजार जून ते ऑगस्ट या महिन्यांत ३० ते ३५ रू. किलो, ऑगस्ट ते जानेवारी २० ते २५ रू. किलो तर जानेवारी ते मे १० ते १५ रू. किलो असा (फलटणला) असतो. तसेच जेव्हा टोमॅटोला २ रू. किलो भाव असतो. तेव्हा शेवग्याला १५ ते २० रू. भाव असतो. त्यामुळे शेवग्याएवढा भाव कोणत्याच भाजीला मिळत नाही. अगदी वाटाण्याला देखील मिळत नाही, हा माझा अनुभव आहे.

हा शेवग प्लॉट पाहण्यासाठी त्यावेळी १ हजाराहून अधिक लोक आले होते. फलटणचे श्री. बाबुलाल गांधी वय वर्ष ८० यांची शेती पाहण्यासाठी महाराष्ट्रातून शेतकरी येतात आणि ते जेव्हा आमचा शेवगा पाहण्यासाठी शेतावर आले तेव्हा मनोमनी आनंद वाटून आपण कुठेतरी डॉ. बावसकर तंत्रज्ञानाने चांगल्या वाटेवर आहोत, याचे समाधान मिळाले. वकिलीत मन रमत नसल्याने ८५ साली वकिली सोडून शेती करू लागलो. परंतु ३० वर्षाच्या या काळात शेतीतून असा अनुभव आम्हाला त्यावेळी पहिल्यांदाच या तंत्रज्ञानामुळे आला. वकिलीच्या पैशापेक्षा कष्टाने ह्या शेवग्यातून मिळालेल्या पैशाने आत्मिक समाधान मिळाले.

पीक लागवडीपासून ५ वर्ष शेवग्याचे भरघोस उत्पादन घेतले. डॉ. बावसकर तंत्रज्ञानामुळे या शेवग्यापासून एकूण ३ ते ३।। लाख रू. उत्पादन मिळाले. त्यानंतर २०११ साली चिकू पिकाची संपूर्ण वाढ झाल्यावर शेवगा पीक काढून टाकले. त्यावेळी शेवग्याचीही उत्पादन क्षमता कमी झाली होती.

भाव कमी असूनही डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीने चिकूचे उत्पादन व उत्पन्न समाधानकारक !

चिकूला आवश्यकतेनुसार डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताची फवारणी व कल्पतरू खत रिंग पद्धतीने देत होतो. जर्मिनेटरची आळवणी चालूच होती. त्यामुळे चिकू पिकाची समाधानकारक वाढ झाली होती. २०११ मध्ये चिकू पिकाला प्रथम फुले लागण्यास सुरुवात झाली. मात्र ती फुले न धरता झाडे वाढीस प्राधान्य देऊन ती काढून टाकली. त्यावर्षी सप्तामृत फवारण्या व कल्पतरू खत वापरून झाडाची जोमदार वाढ करून घेतली. नंतर २०१२ साली फळे धरली. तर या तंत्रज्ञानाने फळे एकदम मोठी मिळाली. संपूर्ण तोडणी पासून १।। टन माल निघाला. जागेवरून व्यापारी २० रू. किलो प्रमाणे स्वत: मालाची काढणी, पॅकिंग करून नेत असे. पहिल्यावर्षी या चिकूपासून ३० हजार रू. उत्पन्न मिळाले. २०१३ ला पुन्हा सप्तामृताच्या फवारण्या नियमित चालू होत्या, त्यामुळे फुलधारणा चांगल्याप्रकारे होऊन मादी फुलांची संख्या अधिक असल्याने पानोपान फळांचे गुच्छ लागले होते. सप्तामृताने फळे पोसण्यास मदत झाली. त्यामुळे मागील वर्षापेक्षा दुप्पट म्हणजे ३।। टन माल निघाला. यावेळी मार्केटमध्ये भाव एकदम कमी होते. तरी त्या बहारापासून ४५ हजार रू. उत्पन्न मिळाले. नोव्हेंबर, डिसेंबर (२०१३), जानेवारी (२०१४) मध्ये १ हजार किलो माल २० रू. किलो भावाने विकला. दुसऱ्या तोड्याचा १।। टन माल १२ रू. किलोने गेला असून अजून शेतात तेवढाच माल शिल्लक आहे. यावर्षी ३५ हजार रू. उत्पन्न आतापर्यंत मिळाले आहे.

२ एकरात ८० क्विंटल मका

गेल्या १३ वर्षापासून रासायनिक खत पुर्णपणे बंद केले असून फक्त डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून उत्पादन घेत आहे. गेल्यावर्षी मका बियाला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केली होती. त्यामुळे उगवण जोमाने झाली उगवणारा कोंब (मोड) भरीव, तेजदार होता. त्यानंतर १५ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रोपशाईनर प्रत्येकी ५०० मिली आणि प्रोटेक्टंट पावडर ५०० ग्रॅम १५० लि. पाण्यातून फवारले. त्यामुळे वाढ वेगाने सुरू झाली. कोणत्याही रोगाला पीक बळी पडू नये. म्हणून दर १५ ते २० दिवसांनी पुन्हा २ वेळा थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनची फवारणी केली. एवढ्या ३ फवारण्यावर पिकाची सुरूवातीपासूनच निरोगी वाढ होत होती. तसेच प्रत्येक मक्याला २ कणसे होती, दोन्ही कणसातील दाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यामुळे गच्च, ठसठशीत भरल्यामुळे काढणीनंतर या २ एकरातून ८- क्विंटल मक्याचे उत्पादन मिळाले.

२ एकरात ४० क्विंटल गहू

गहू २ एकर मध्यम प्रतीच्या जमिनीत केला होता. त्यालादेखील बीजप्रक्रियेपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला. बीजप्रक्रियेमुळे उगवण अतिशय चांगली थंडीतही जोमाने झाली. तसेच उगवणीनंतर १५ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमची १५० लि. पाण्यातून फवारणी केली. त्यामुळे फुटवे भरपूर फुटून, मावा किडीचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यानंतर गहू पोटरी अवस्थेत (निसवण्यापुर्वी) थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोन, प्रोटेक्टंटची फवारणी केली. त्यामुळे गहू निसवून ओंबीची लांबी वाढली. त्यानंतर दाणे दुधाळ अवस्थेत असताना थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. २०० लि. पाण्यातून फवारल्याने दाणे खालून वरपर्यंत एकसारखे पोसले. दाणे वजनदार होते. त्यामुळे २ एकरातून ४० क्विंटल गहू मिळाला. हे सर्व उत्पादन पुर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे त्यातील ८ क्विंटल सेंद्रिय गहू शेडगे नावाच्या व्यक्तीने ४० रू. किलोने घेतला. कल्पतरू खत टाकल्यामुळे शेतात सर्वत्र गांडूळ वाढले असल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढली आहे.