'कृषी विज्ञान' मधील यशोगाथा देतात ऊर्जा आंबा, भात व कांदा पिकासाठी सरांचे तंत्रज्ञान

श्री. मधुकर गोपाळ कुंटे
(वय ७२ वर्षे) मु.पो. कुंट्यांची गोठी, ता. अलिबाग, जि. रायगड.
मो. ९५५२५२५५९४आमची गावी कोकणात १.५ एकर जमीन आहे. तेथील शेती अतिशय पारंपारिक. मी पुण्यामध्ये नोकरी करीत असल्याने बंधु शेती करत. शेतीची मला लहानपणापासूनच आवड होती. त्यामुळे नियमित सकाळी दूरदर्शनवर शेतीविषयक कार्यक्रम पहायचो. निवृत्तीनंतर 'कृषी विज्ञान' मासिक चालू केले. त्यातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा उर्जा देत असत. वाचताना त्यातून प्रोत्साहन मिळून आपणही तेवढ्याच जोमाने शेती करावी असे वाटे. इकडची शेती प्रगतशील आहे. कोकणात अजूनही पारंपारिकच पद्धत तेथील लोक जागृत नाहीत. सुधारित तंत्रज्ञान, संकरीत वाण याबद्दल कल्पनाच नाही. सर्व पारंपारिक पद्धतीने करतात आणि पुढेही तसेच करत राहतात. तेथे मुख्य पीक भात. पावसाळ्यात भात करतात.

मी देखील पहिले २ -३ वर्षे याचप्रमाणे शेती केली. १५ गुंठ्यातून जेमतेम १.५ खंडी भात होत असे. त्यातून उत्पादन खर्चदेखील निघत नसे. त्यानंतर गेल्या ५ वर्षापुर्वी ३० x ३० फुटावर हापूस आंबा लावला. त्यामध्ये १० - १० फुटावर 'कृषी विज्ञान' मधील माहितीच्या आधारे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने 'सिद्धीविनायक' शेवगा लावला. झाडे चांगली आली, मात्र नंतर पावसाळ्यामध्ये ज्यादा पावसाने झाडे गेली. मग नाराज झालो. बांधावरील ५ - ६ झाडे फक्त चांगले उत्पदान देत होती. मधली गेलेली झाडे काढून टाकली.

आज (२९ मार्च २०१४) सरांशी या शेवग्याबद्दल चर्चा करताना सरांनी सांगितले की, "शेवग्याची झाडे काढणायची तुम्ही घाई केली. कारण शेवग्याची मुळी ही गाजरासारखी असते. ती कधीच मरत नाही. शेवग हे पीक आरोग्यच्या दृष्टीने एवढे अनमोल आहे की, यापासून ३०० प्रकारचे आजार बरे होतात. पानांची पावडर केली तर १५०० रू. किलोने निर्यात होते. शेवग्याचा डिंक कॅन्सरवर गुणकारी आहे." यावेळी माझ्या अनुभवाप्रमाणे मी सरांना सांगितले की, शेवग्याच्या खोडाची साल उगाळून विंचू दंशावर वरून खाली लावले असता विष निघून जाते आणि त्यावर शेवग्याचा पाला बांधला असता आराम पडतो.

या आंब्याच्या जमिनीतील शेवगा काढल्यावर भात करू लागलो. तर कल्पतरूमुळे जमिनीची पोषकमुल्य वाढून माती भुसभुशीत झाल्याने जेथे सलग पीक करून देखील १।। खंडी भात होत होता तेथे या आंतरपिकापासून २.५ खंडी भात मिळू लागला.

हापूस आंब्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे स्प्रे घेतो. कल्पतरू सेंद्रिय खत वापरतो. झाडे चांगली डवरली आहेत. या आंब्याला तिसऱ्यावर्षी मोहोर लागला. पहिल्या वेळेचा मोहोर काढून टाकला. नंतर ४ थ्या वर्षी मोहोर धरला. ५० झाडांपैकी ३२ - ३५ झाडांनाच मोहोर लागला. त्यामुळे फळे साधारणच जेमतेम ३५० मिळाली. मात्र फळांचा दर्जा उत्तम प्रतीचा होता. ती घरी व नातेवाईकांना खाण्यासाठी वापरली. चालूवर्षी सध्या मोहोर चांगला लागलेला आहे. मात्र एवढ्यात माझे गावी जाणे झाले नाही.

कल्पतरूने जमीन भेगाळून पाणी मुरत नाही

कोकणातील जमीन अतिशय कडक. थोडी वाळली तर लगेच भेगा पडतात. २ x १ ।। फुटाचे सारे पडून त्यात कांदा लागवड करतात. दिवसाद बादलीने विहिरीतील पाणी शेंदून दिले जाते. तसे ४ दिवसांनी दिले तरी चालते. मात्र दांडाने पाणी जायचे म्हटले की, सुरुवातीच्या १० -१२ बादल्या पाणी दांडातच मुरते. त्यामुळे दिवसाड पाणी देतात. यामध्ये मेहनत (श्रम) खूप होते. त्यामुळे ४० - ५० वाफे म्हटले तर खूप क्षेत्र समजले जाते.

दरवर्षी या क्षेत्राला कल्पतरू सेंद्रिय खत ५० किलो देतो. त्यामुळे कडक मातीची जमीन मऊ होऊन भेगाळत नाही. त्यामुळे पाणी कमी लागते. अन्यता भेगाळलेल्या जमिनीला पाणी शेंदूण द्यायचे म्हटले तर ओतलेल्या जागीच मुरून खोलवर पाणी कोठे जाते समजत नाही.

१५ गुंठ्यातून पांढऱ्या (अलिबाग) कांड्याचे २३ हजार

मी दरवर्षी पावसाळा संपल्यावर साधारण डिसेंबरअखेर प्रथम जमीन वाफश्यावर असताना नांगरट करून कोकणातील माती कडक असल्याने लोड फिरवून माती बारीक करून घेतो. त्यानंतर २ x १.५ फुटाच्या वाफ्याला ५ किलो शेणखत व कल्पतरू थोडे (१५ गुंठ्याला ५० किलो) मिसळून कांदा बी पेरतो. अलिबागचा पांढरा कांदा असतो. यासाठी बोअर घेऊन वीज लीन टाकण्यासाठी मोठ्या चिकाटीने प्रयत्न करून कनेक्शन घेतले आहे. कांद्याला स्प्रिंक्लरने पाणी चौथ्या दिवशी २ तास देतो. स्प्रिंक्लमुळे जमिनीत वरच्या थरात (२ ते ३ इंच) ओल राहते. पाणी वाया जात नाही. शिवाय रोगराई धुवून जाते. त्यामुळे कोणतीच फवारणी करीत नाही. तर १५ गुंठ्यातून साधारण ४ - ४ कांद्याच्या ४० डबल माळांचा १ मण याप्रमाणे १५० मण उत्पादन मिळाले. याला १५० ते १७० रू./मण भाव व्यापारी जागेवरून देतो. १५ गुंठ्यातून २२ ते २५ हजार रू. उत्पन्न मिळते. सुरूवातीची तोट्यातील शेती आता कुठे उत्पादन देवू लागली आहे. आज पुण्यातील परसबागेसाठी १० किलो कल्पतरू खत घेवून जात आहे.

भाताच्या एका काडीला ४७ ते ५७ फुटवे

मी नवीन शेती करीत असताना असाच सह्याद्री भाताचा एक प्रयोग केला होता. विद्यापीठाचे सह्याद्री वाणाचे बी आणून धाड टाकली. दीड एकराला पारंपारिकतेपेक्षा हे बी १५% च (धाड) होती. ती पाहून शेजारचे म्हणत, "एवढ्याशा धाडीवर तुम्ही लागवड कशी करणार. यापुर्वी या क्षेत्रासाठी याच्या ७ - ८ पट धाड असायची. त्यामुळे ही धाड तुम्हाला पुरणार नाही व शेत रिकामे राहील." त्या शेतकऱ्याला पारंपारिक घरचे बी वापरण्याशिवाय माहिती नव्हती. त्यामुळे ते पारंपारिकतेने जादा धाड टाकून एका ठिकाणी ७ - ८ रोपे लावत. यातील काही रोपे नपुसक लहान राहून ओंब्या लागत नसत व ५०% रोपांनाच ओंब्या लागत. त्याही बारीक राहत. त्या रोपांना फुटवे निघत नव्हते. यामुळे जादा रोपे लावली जात.

मी केलेल्या सह्याद्री वाणाची एका ठिकाणी एकच काडी लावायची असल्याने पूर्ण क्षेत्राला तेवढी धाड पुरली. ती लागवड पाहून शेजारचे म्हणाले, "एक काडी लागवडीवर पूर्ण प्लॉट वाया जाणार." मी अगदी शांत रहायचो. कारण सुरुवातीला मी हे सर्व सांगायचे म्हटले, की ते चेष्टा करायचे. या भाताला कल्पतरू सेंद्रिय खत १०० किलो वापरले होते. पुढे या एका काडीला ४७ पासून ५२ ते ५७ फुटवे पाहून शेजारचे लोक आश्चर्यचकीत झाले. त्यांनी गावातील सरपंचांना सांगितले तर तेही म्हणाले शक्य आहे का? तो शहरातून आला आहे. त्याने कधी शेती केलीय का ? बऱ्याच शेतकऱ्यांनी सरपंचांना सांगितल्यावर ते प्लॉट पाहण्यास आले व पीक पाहून आश्चर्यचकित झाले. आता शेजारचे मला वेड्यात काढणारेच म्हणतात, "भाऊ तुम्ही काय केले ते आम्हालादेखील सांगा. आता माझ्याबरोबर तेही सुधारित शेती करू लागले आहेत.