भारतातील म्हर्शीच्या जाती

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जगातील सर्व म्हर्शीपैकी निम्याहून जास्त (५४%) म्हशी भारतातच आहेत. त्यावरून आपणास भारतीय म्हर्शीचे महत्त्व समजून येईल. गॅकग्रेगॉर्म या शास्त्रज्ञाने म्हशींची विभागणी दलदलीय आणि नद्या (जल) म्हशी अशा दोन गटात केलेली आढळू येते. नद्या किंवा जल म्हर्शीमध्ये भारत, पाकिस्तान आणि बंगलादेशातील दुधाळ म्हर्शीचा समावेश होतो. तर दलदलीय म्हशी ह्या विशिष्ट वंशाच्या असून त्यांचे भिन्न रंगाचे व आकाराचे अनेक स्थानिक प्रकार आढळून येतात.

म्हैस हा बहुगुणी प्राणी असून निसर्गत : अर्धजलचर व निशाचर प्राणी आहे. त्यांना पाण्यात किंवा चिखलात लोळण्याची व डुबण्याची आवड व सवय असते. दलदलीय म्हशी साधारणत: चिखलात पडून राहणे पसंत करतात. तर जल (नद्या)म्हशी डबकी, तळी किंवा संथ वाहणारे पाणी पसंत करतात.

आशियातील निरनिराळ्या भागात म्हशी वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. उदा. फिलीपाईन्समध्ये 'काराबावो' व मलेशियात 'काराबो' या नावाने म्हशी ओळखल्या जातात. म्हैस हा प्राणी भारतात सर्वत्र आढळून येतो. दुध उत्पादनात म्हर्शीचा वाटा गाईपेक्षा जास्त आहे. गाईपेक्षा म्हशीच्या दुधात मलईचे प्रमाण अधिक असल्यामुळे (७.५%) खवा व तूप दुधापासून जास्त मिळते. त्यामुळे म्हशीच्या दुधाला जास्त मागणी असते.

*म्हशींच्या जाती: भारतात म्हशींच्या अनेक, जाती आढळून येत असल्या तरी दुग्धउत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या जात खालीलप्रमाणे आहेत
१) मुऱ्हा
२) सुरती
३) जाफराबादी
४) मेहसाणा
५) नागपूरी
६) पंढरपूरी.

१) मुऱ्हा : या जातीच्या म्हशीची शिंगे वाकलेली (हिन्दी - मुडा हुवा) असल्यामुळे हिला मुडा, मुऱ्हा ह्या नावाने संबोधले जाते. याच जातीच्या म्हशींना दिल्ली हे दुसरे नाव आहे. मुऱ्हा म्हशीचे मुळस्थान पंजाब, दिल्लीच्या आसपास हरियाणा व उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग आहे.

वैशिष्ट्ये : मुऱ्हा म्हशीचा रंग काळा असतो. या जातीच्या म्हशी भारी वजनाच्या व मजबूत झाडा पेराच्या असतात. पाठ काहीशी रुंद, मान इतर शरीराच्या मानाने पातळ व मोठे शीर असते. नावाप्रमाणे या जातीच्या म्हशींची शिंगे आतल्या बाजूने गोलाकार वाकलेली असतात. शेपूट लांब व पांढरा गोंडा असलेली व गळ्यावर दोन पांढरे पट्टे. एक जबड्याखाली व दुसरा पुढच्या पायाजवळ असतो. कास व स्तन भरदार, मोठी हे या जातीचे वैशिष्ट्ये दुग्धव्यवसाय एक उत्तम जोडधंदा आहे. दुध उत्पादनाच्या दृष्टिने मुऱ्हा जात भारतातील म्हर्शीच्या सर्व जातींमध्ये उत्कृष्ट समजली जाते. या म्हशी प्रतिवेत २५०० ते ३००० लि. दूध देतात.

२) सुरती : गुजरात राज्यात सुरतच्या आसपास ही जात आढळून येत असल्यामुळे या जातीला सुरती हे नाव पडले आहे. गुजरात राज्यातील साबरमती व मही नद्यांच्या मधल्या प्रदेशांत या जातीच्या म्हशी आढळून येतात. सुरत व खेडा जिल्ह्यांत आनंद व चरोत्तर प्रदेशात या म्हशीचे मूळस्थान आहे.

वैशिष्ट्ये : या जातीच्या म्हशीचा रंग काळा किंवा करडा असून चेहरा, कपाळ व शेपटीचा गोंडा यावर पांढरे ठिपके असू शकतात. या जातीच्या म्हशी मध्यम आकाराच्या व कमी उंची असलेल्या असतात. या म्हशी स्वभावाने शांत असून तरतरीत दिसतात. डोळे गोल, पाणीदार व किंचित बटबटीत वाटतात. शिंगे मध्यम लांबीची असून विळाच्या आकाराची असतात. म्हशीच्या सर्व जातीमध्ये सुरती जातीच्या म्हशीची पात अधिक सरळ असते. या म्हशीची कास मध्यम आकाराची असून स्तर चौरस अंतरावर असतात. सर्व म्हशीच्या जातीत सुरती म्हशी फायदेशीर दुध उत्पादक समजल्या जातात. मध्यम आकारामुळे त्यांचा आहार कमी असतो. या जातीच्या म्हशीचा दुसरा गुण म्हणजे यांचा वेत बराच लांब असतो व एका वेतात दुधाच्या उत्पादनात फारसा चढ उतार नसतो.

३) जाफराबादी : गुजरात राज्यातील काठेवाड भागांत असलेल्या जाफराबाद या गावावरून या म्हशींना जाफराबादी हे नाव पडले आहे. भारताच्या पश्चिम भागांत विशेषत: गुजरात राज्याच्या काठेवाड भागातील गीर जंगलाच्या आसपास या जातीचे मूळस्थान आहे.

वैशिष्ट्ये : या म्हशींचा रंग साधारणपणे काळा असतो. मोठे शरीर, भरदार हाड सरळ व रुंद पाठ हे या जातीचे वैशिष्टये आहे. जाफराबादी म्हशीचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची शिंगे ही खूप रुंद, चपटी व गळयापर्यंत खाली आलेली असून वजनदार असतात. जाफराबादी म्हशी आकाराने मोठ्या असून चारा जास्त खातात. दुधात चरबीचे प्रमाणहि जास्त असते. ह्या म्हशी नियमित विणाऱ्या व दोन वेतामध्ये जास्त अंतर असणाऱ्या असतात. या म्हशी प्रतिवेतास १८०० ते २५०० लि. दूध देतात.

४) मेहसाणा : गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्हा व त्याच्या आसपासचा भाग हा या जातीचे मूळस्थान आहे. गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात या म्हशी आढळून येतात. त्यावरून या जातीचे नाव मेहसाणा पडले आहे.

वैशिष्ट्ये : या जातीच्या म्हशी मध्यम आकाराच्या व सरळ पाठीच्या असतात. रंग काळा ते करडा असतो. मेहसाणा जातीची जनावरे मुऱ्हा आणि सुरती यांच्या संकरापासून झालेली असल्यामुळे या जातीच्या जनावरात मुऱ्हा आणि सुरती या दोन्ही जातीची शारीरिक वैशिष्ट्ये आढळून येतात. शिंगे चपटी व मागे वाकलेली असून मध्यम आकाराची असतात. कास भरदार व मध्यम आकाराची असून स्तन माठे असतात. मेहसाणा जातींच्या म्हशी लवकर माजावर येणाऱ्या नियमितपणे विणाऱ्या व दिर्घकालपर्यंत दूध देणाऱ्या म्हणून नावाजलेल्या आहेत. या म्हशी प्रतीवेतास २२०० - २७०० लि. दूध देतात.

५) नागपूरी : नागपूरच्या आसपासचा डोंगराळ भाग, वर्धा जिल्हातील आर्वी तहसील, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट विदर्भ, नागपूर, मराठवाडा व लगतचा मध्यप्रदेश या भागात सर्वत्र आढळून येतात. या जातीच्या म्हशींना, नागपूरी अचलपूरी, वऱ्हाडी, गावरानी किंवा फाटाडी असेही म्हणतात.

वैशिष्ट्ये : नागपूरी जातीच्या म्हशी आकाराने लहान, रंग काळा, भुरका किंवा करडा असतो. तोंडावर, शेपटीवर व पोटाच्या खालच्या भागावर पांढरे डाग सर्व सामान्यपणे असतात. आकोट भागात असणाऱ्या म्हशी तांबूस रंगाच्या असतात. नागपूरी म्हशींची शिंगे खूपच लांब व टोकदार असून मागे वळलेली असतात. काही म्हशीची शिंगे पाठीच्या मध्याच्या पुढे पर्यंतही गेलेली असतात. या जातीच्या म्हशीची खुरे खूप टणक असल्यामुळे त्यांना डोंगराळ भाग व कठीण भूभागावर चालणे सहज शक्य होते. नागपूरी, म्हशीमध्ये अनेक उपजाती आहेत. त्यांच्या रंगात फरक असतो. नागपूर जवळच्या भागांत या जातीचा 'पाला' म्हणून एक प्रकार आहे. या प्रकारच्या म्हशीत तोंड पाय, डोळे यांच्या आसपासचा भाग व शेपूट पांढऱ्या रंगाचे असते. या जातीच्या म्हशी जरी दूध कमी देत असल्या तरी त्या परवडणाऱ्या आहेत, कारण निकृष्ट प्रकारचा चारा त्यांना चालतो. तसेच कोठेही चरून पोट भरण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे कमी पाऊसमान असणाऱ्या भागास वरदान ठरली आहे. या म्हशी प्रतीवेतास १८०० ते २२०० लि. दूध देतात.

६) पंढरपूरी : ह्या म्हशी महाराष्ट्रातील पंढरपूर, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्यातील लगतच्या भागात आढळून येतात.

वैशिष्ट्ये : या म्हशी आकाराने मध्यम पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोहचणारी लांब व पिळवटलेली शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे. शरीर मध्यम बांध्याचे असून लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ असतो. पहिल्या वेताच्या वेळी कमी वय असून उत्तम प्रजोत्पाद व दुग्धोत्पादन क्षमता असते. शिवाय या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे दुग्ध उत्पादनाचे सातत्य असल्याने दुधासाठी उत्तम जात आहे. या जातीचे शरीर मध्यम असून हलक्या ते मध्यम प्रतीच्या आहारावरही चांगले दुग्धोत्पादन मिळते. हे सर्व गुण एकत्रितपणे या जातीत असल्याने दुष्काळी भागास ही जात वरदान ठरली आहे. या म्हशी एका वेताला १८०० ते २००० लि. दूध देतात.