खर तर अन्न, पाणी यानंतर वस्त्रासाठी (कपड्यासाठी) 'कापूस' पीक हे अग्रस्थानी येते

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


कापूस हे भारतासारख्या उष्ण कटीबंध देशातील अतिशय महत्त्वाचे व्यापारी पीक आहे आणि आपल्या देशाच्या कापड उद्योगाच्या ७५% गरजा कापूस पीक भागविते. म्हणजे भारतातील ६ कोटी लोकांना हे पीक रोजगार देते. भारतामध्ये सर्वात जास्त क्षेत्र हे कोरडवाहू कपाशीखाली असून त्याचे सरासरी उत्पादन हे सगळ्या जगापेक्षा कमी आहे आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे कापसाखालील अधिक कोरडवाहू क्षेत्र आणि कमी निविष्ठा वापर होय. त्याचबरोबर या पिकाला ज्या निविष्ठा वापरल्या जातात त्यामध्ये शेतकरी व दुकानदारांना पिकावर रोग आहे की कीड हेच समजत नाही आणि शेतकरी त्यावर सरसकट किटकनाशक मागतात. शेतकऱ्यांचा साथी, सोबती, तंत्रज्ञान, कृषी शिक्षण घेतलेला, संशोधनाचा किंवा त्यांच्या प्रत्यक्ष पिकाला रोग किंवा कीड याचा अभ्यास न करता जे किटकनाशक अतिशय महागडे असते ते बहुतेक करून उधारीवर देतो. त्याला दिलेली निविष्ठा योग्य की अयोग्य हे पहात नाही व त्याचा वापर केल्यावर चांगल्या परिणामाऐवजी दुष्परिणामच होतो. मग शेतकरी पुन्हा दुकानदाराकडे जातो व पिकपरिस्थितीत सुधारणा नसल्याचे सांगतो. मग पुन्हा दुकानदार ज्या औषधावर कमीशन जास्त असते ते देऊन त्याच्या खात्यावर मांडून ठेवतो. अशा प्रकारे ५ - १० हजार रु. ची उधारी होईपर्यंत काही बोलत नाही. कारण त्याला माहीत असते की हा शेतकरी पुन्हा आपल्याकडेच येणार आहे आणि ज्यावेळेस १० हजार रु. च्या वर उधारी जाते तेव्हा तो सुप्त व गुप्त सुचना करतो की भाऊ पुढच्यावेळी यातील काही पैसे घेऊन या. येथे मला एक गोष्ट आठवते, मे १९९६ साली इस्त्राईलमध्ये अॅग्रीटेक प्रदर्शन बघायला गेलो होतो. तेव्हा तेलअव्हिव येथील राजधानीच्या शहरी दुकानदाराची भेट झाली. तेव्हा त्यांना मी विचारले की इथले अर्थशास्त्र कसे आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की येथील दुकानदार व ग्राहक यांचे नाते सलोख्याचे असते आणि ग्राहक हा सतत उधारच माल नेतो. कमी किमतीचे रोखीने तर नोकरदार प्लॅस्टिक मनी स्वाईप (Swipe) करून वस्तु खरेदी करतो. ३- ४ वेळा उधार नेल्यानंतर ५ व्या वेळी उधार देताना तो त्या ग्राहकाला मृदुस्वरात म्हणतो कि मागच्या ४ वेळची उधारी बऱ्यापैकी झालेली आहे पण हरकत नाही, आपण या वेळीपण निश्चितपणे घेऊन जा. म्हणजे त्याचे मन तो दुखावत नाही आणि अशारितीने त्या दुकानदाराला उधार नेणाऱ्या मालावरील विशिष्ट व्याज व नफा त्यावर तो दुकानदार त्याचा उदरनिर्वाह चालवतो. इस्त्राईल व्याजावरच जगते असे त्याने सांगितले आणि जगभर हीच पद्धत आहे. तेव्हा भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये व्याज आणि नफा हे व्यवसायाच्या गाडीची २ अक्षम्य चाके आहेत. जी शेतकऱ्यांना दारिद्र्याच्या चिखलात रुतून ठेवतात. परंतु भारतीय शेतीच्या इतिहासामध्ये शेतकरी हा कायम कर्जबाजारी होऊन त्यात तो अखंड डुबलेला असतो. त्याला उसंतही मिळत नाही व मोकळा श्वासही घेता येत नाही. मरणासन्न वेदना होत असतात आणि त्या कमी म्हणून कि काय त्याला चुकीचे मार्गदर्शन देऊन काही अशिक्षीत, अर्धशिक्षीत दुकानदार हे त्याच्या अज्ञानाचा व गरीबीचा गौरफायदा घेत असतात. म्हणजे रोग पडला असताना किडीचे औषध देतात आणि कीड पडली असता रोगाचे औषध देतात. मग त्याचा शेतकऱ्याला लाभ होवो वा न होवो त्याच्याशी त्याला काहीही घेणे - देणे नसते, पण ज्याच्यामध्ये त्याला कमिशन जास्त असते ते शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते आणि "आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी" अशी अवस्था होते. म्हणजे शेतकऱ्याच्या हतबलतेने तो कायम नुकसानीतच जातो. असे हे विदारक चित्र आपल्या दृष्टीपथास स्वातंत्र्यापुर्वीपेक्षा स्वातंत्र्यानंतर जास्त जाणवत आहे. कारण स्वातंत्र्यापुर्वी लोकसंख्या मर्यादीत होती. २० ते २५ कोटी लोकांना अत्यावश्यक अन्नधान्य, डाळी, गळीत धान्य, खाद्यतेल पुरत असे. त्यामुळे असणारे उत्पन्न हे विपुल वाटत असे. चांगल्या सुपीक जमिनीत ही पिके घेतली जात असत आणि जनावरांना चरणायसाठी बरड व गायरान असे. बरडाची जमीन भुईमूगाखाली आणून भरपूर उत्पादन घेतले जात असे. कारण त्या काळामध्ये हवामान व पाऊस हे पेरलेल्या पिकाला १००% साद घालत असे. त्यामुळे धनधान्य, डाळवर्गीय, गळीत धान्य यांची विपुलता प्रचंड होती आणि महागाई नसल्याने त्याचे आलेले उत्पादन परवडण्यासारखे होते. परंतु आजच्या सर्व प्रकारच्या बिकट परिस्थितीत देशाचे अर्थमंत्री म्हणाले, "शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेती असमर्थ आहे." हे यथार्थ मत अनुमान म्हणून प्रकट केले आहे. हे किती रास्त आहे याची आपणास कल्पना येईल.

एका बाजुला बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे आणि दुसऱ्या बाजुला शेतमजुर मिळत नाही म्हणून मजुरी महाग आहे. यासाठी यांत्रिक युगाची पहाट होणे गरजेचे आहे. मग ती कपाशीची पेरणी, निंदणी, कोळवणी, डवरणी, भर देणे, खत देणे, फवारणी करणे, विद्राव्य खते व पाणी (Fertigation) देणे आणि कापसाची वेचणी करणे या सर्व कामासाठी शेतकऱ्यांना परवडतील अशी सोलरवर चालणारी किंवा इथेनॉलवर चालणारी स्वस्त परवडणारी व गुणवत्ता पुर्वक क्रियाशील अवजारे ही नैनी (अलाहाबाद) येथील भारतीय कृषी अवजार संशोधन व निर्मिती करणाऱ्या केंद्राने पिकावर निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच देशभर त्याचे योग्य भावात वितरण व विक्री पश्चात तत्पर सेवा अत्यावश्यक आहे.

भारतातील कापसाखालील क्षेत्र पाहता ते जगात सर्वात जास्त आहे व उत्पादनात ते चीनच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये सूत गिरणीसाठी (कापड कारखानदारीमध्ये) Gossypium Hirsutum G. barbadense, G. arboreum आणि चौथी G. herbaceum ह्या जाती सर्वसाधारण पणे लागवडीसाठी प्रचलित आहेत. सेंद्रिय कापसाखालील लागवड एकूण उत्पादन क्षेत्राच्या ४५% वर आहे. तर त्यापासून एकूण कापूस उत्पादनाच्या ५५% कापूस उत्पादन मिळते आणि हा भारतीय कापूस शेतकऱ्यांच्या यशामध्ये मैलाचा दगड आहे. भारतीय शेतीमध्ये दर्जा व एकूण उत्पादन यामध्ये बराच बदल झालेला आहे. १९४७ - ४८ साली असणाऱ्या कापसाच्या २७ लाख ९० हजार गाठीवरून (एक गाढ १७० किलोची) ते २००५ - ०६ मध्ये वाढून २ कोटी ४० लाख गाठी इतके झाले. स्वातंत्र्याच्या वेळेस कमी लांब व मध्यम लांब धाग्याचा कापूस उत्पादीत होत असे. परंतु आज भारतात अनेक प्रकारच्या कापसाचे उत्पादन घेतले जात असून त्याचा काउंट ६ ते १२० पर्यंत असून कापड गिरणीत न वापरणारा, जाडा - भरडा ते मध्यम लांब, आणि लांब आणि सुपर फाईन तलम प्रकारचा धागा मिळू शकणार हा देश झाला आहे. मागच्या दशकापर्यंत कापसाची उत्पादन क्षमता ही ३०० ते ३३० किलो/हेक्टरी रुई (Lint) एवढी सरासरी होती. आता मात्र त्यामध्ये सुधारणा होऊन ती ४६० किलो/हेक्टरी रुई वर स्थिरावली आहे.

कापसावरील किडी

कापूस हे पीक अनेक किडीला प्रकर्षाने बळी पडते आणि त्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. कपाशीच्या किडीचे २ प्रकारात वर्गीकरण करता येईल. त्यामध्ये रस शोषणाऱ्या किडी (मावा, तुडतुडे, पांढरी माशी) आणि दुसऱ्या प्रकारामध्ये कुरतडणाऱ्या किडी (पाने कुरतडणाऱ्या अळ्या, बोंड अळी) ह्या किडी नियंत्रणात आणण्याकरता भारतामध्ये एकूण वापरल्या जाणाऱ्या किटकनाशकाच्या प्रमाणापैकी ४५% किटकनाशके ही कापूस पिकावर वापरली जातात. आता मात्र हा वापर कमी करण्यासाठी अनुवंशीक किडप्रतिबंधक जाती निर्माण करण्याच्या दृष्टीने देशभर व जगभर शास्त्रज्ञ क्रियाशील आहेत. एकात्मिक किड नियंत्रण (IPM) आणि एकात्मिक प्रतिबंधात्मक व्यवस्थापन (IRM) यांची शिफारस शास्त्रज्ञ करत आहेत. सध्याच्या काळात मात्र बी. टी. कॉटन तंत्रज्ञान हे बऱ्यापैकी प्रचलित असून बोंड अळी नियंत्रण करण्यासाठी ते यशस्वी ठरत आहे हे फार महत्त्वाचे आहे. तथापि काही जैविक शास्त्रज्ञांच्या मते (Biotech Scientists) अजूनही बोलवर्मवर प्रभावी नियंत्रण सापडले नाही असा त्यांचा दावा व अनुभव आहे.

बी. टी. कॉटनची गरज का निर्माण झाली

अनुवंशीक प्रतिकार शक्ती हा कीड व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा टप्पा आहे. कापसाचे संयोगीकरणामध्ये उपयुक्त व उपलब्ध असून रस शोषण करणाऱ्या किडींसाठी उपलब्ध आहेत. तसेच पांढरी माशी अधिक प्रतिकारक्षम व प्रतिकार करणारे व प्रतिप्रहर प्रतिबंध करणाऱ्या सहनशील जाती भारतामध्ये निर्माण झालेल्या आहेत. परंतु अशा प्रकारची प्रतिबंधात्मक आकडेवारी ही बोंडअळी संदर्भात उपलब्ध नाही. म्हणून पर्यायी उपाय शोधण्याकरीत संकरण (Cloning) करणे गरजेचे आहे. असा जो विषारी स्फटीक बीटा - एंडो टॉक्सीन B-endo toxin हे प्रथिन मातीतील जिवाणू बॅसिलस थूरीजेन्सीस (Bacillus Thurigiensis) यामार्फत निर्माण करायचा आहे.

अमेरिकेतील मोन्सॅन्टो कंपनीने पर्यायी यशस्वी बी. टी. कॉटन अमेरिकेमध्ये बोलगार्ड ऑफ मोन्सॅन्टो ही निर्माण केली आहे. ही मात्र पिकवाढीच्या पहिल्या ९० दिवसपर्यंतच बोंड अळी कंट्रोल करू शकतो.

प्रथमच बॅसिलस थुरीजेन्सीस (Bacillus Thurigiensis) या जिवाणुपासून क्राय १ ए.सी. (Cry १ Ac) हा सुत्रगुण मोन्सॅन्टो कंपनीने व्यापारी बी. टी. कॉटनसाठी शोधून काढला आहे. बी.टी. कॉटन ही जगातील अनेक देशांमध्ये जसे चीन, ऑस्ट्रेलिया, मॅक्सीको, दक्षिण अफ्रिका, अर्जेंटीना, भारत, इंडोनेशिया इ. देशामध्ये प्रचलित आहे आणि दिवसेंदिवस जगभर बी. टी. खालील क्षेत्र हे वाढतच आहे. एकंदरीत जगाच्या १२% कपाशीखालील क्षेत्र हे जी. एम. कापसाखाली नंतर संकरित जी.एम.ओ. आणि आय.सी.ए.सी. ह्यांनी अंदाज केला आहे की येत्या ५ - ७ वर्षात हे क्षेत्र ५०% वाढू शकते.

गेल्या ४ - ५ वर्षामध्ये दुदैवाने मान्सून हा असफल व तुरळक झाल्याने कपाशी क्षेत्रासाठी व एकरी उत्पादन व एकरी दर्जेदार उत्पादनामध्ये लक्षणीय घट आल्याने भारतीय शेतकऱ्यांना कापूस हे पीक वरदान नसून शाप ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था चिखलातून कमळ तोडण्याकरीता रुतलेला पाय काढण्याकरीता दुसरा पाय जाऊन तो नुसता कर्जबाजारी न होता कर्जबाजारीपणाची पारंपारिकाता त्याच्या इतकी अंगवळणी पडली की, यावर्षी जर निसर्गाने कृपा केली व दर्जेदार अधिक उत्पादन वेळेवर मिळून कापसाला ६ ते ७ हजार रु./क्विंटल चा दर मिळाला तर तो हे खरेच झाले का म्हणून दिवसा स्वप्नवत होऊन स्वतःला चिमटा काढून तो हे सत्य आहे का हे पडताळून प्रथम तो परमेश्वराचे आभार मानेल. म्हणजे त्याने टाहो फोडल्यावर परमेश्वराला कंठ फुटेल अशी परिस्थिती होईल.

भारतीय शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रतिकूल व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विदर्भ व मराठवाडा तसेच इतर कापूस पिकवणाऱ्या भागात यशस्वीपणे वाटचाल केलेल्या यशोगाथा ओयासीस, सलाईन, जिवनसत्व वाटाव्यात यासाठी 'कृषी विज्ञान' मधून छापल्या व त्याच्या प्रतिक्रिया वैशिष्ट्यपुर्ण व इतर शेतकऱ्यांना अनुकरणीय झाले हे आम्हाला कळविले, तेव्हा आमच्या संशोधनाचे सार्थक झाले पण म्हणून आम्ही विसाव्यासाठी थांबा घेतला नाही तर आपणास ही सहावी आवृत्ती तुमच्या मार्गदर्शनासाठी व इतरांना तुमच्या प्रेरणा मिळण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आम्हाला आनंद होत आहे. त्याचा उपयोग प्रगतीशील शेतकरी, १० वी, ११ वी, कृषी बेसीक शाळा, शेतीशाळा देशातील शेती महाविद्यालय, शेती विद्यापिठे, क्रॉपहाजबंडरी व डेअरी हे विषय घेतलेले विद्यार्थी, स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी, कृषी विकास क्षेत्रातील कार्यकर्ते, देश विदेशातील कापूस उत्पादक शेतकरी व सेवाभावी, सरकारी संस्था यांना उपयुक्त ठरेल.