भारतीय कपाशीच्या जातींच्या विकासाची वाटचाल

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोरडवाहू कपाशीच्या जातीमध्ये जरीला जातीचा कापूस कमी लांबीचा धागा पण मांजरपाट, सैन किंवा हरकसाठी उपलब्ध असायचा. मांजरपाट हे दणकट, जाडेभरडे, रंग साधारण पिवळसर मळकट झाक असलेला असा कष्टकरी, खेडेगावातील लोक, कामगार वर्ग वापरत असत. हरक हे कापड पांढरे स्वच्छ, कडक, चिकनंचोपडं दिसाव म्हणून याला खळ लावत असत. या कपड्याचे डबल कपचे लांब शर्ट त्याला पत्र्याच्या गुंड्या आणि दिडफुट रुंदीचा ढगळ पायजामा शिवायचे. हा वर्ग म्हणजे शिकलेला, शिक्षक, हेडमास्तर, तलाठी, तालुक्याच्या कचेरीवरील कर्मचारी, कोतवाल, सरपंच, व्यापारी व गावातील ७ वी पर्यंत शिकलेले लोक होते. ते ह्या हरकचा शर्ट आणि पायजमा हे दोन्ही एकाच प्रकारच्या कापडापासून बनवत असत. कारण त्याचा पन्हा डबल असे. हे पहिल्यांदा धुतल्यावर खळ सर्व निघुन मऊ पडत असे. तेव्हा त्याला कोळश्याच्या इस्त्रीने इस्त्री करत असत. कुठे बाहेरगावी जाताना धोब्याकडे भट्टी केलेला वापरत असत. त्यावेळेस जाड कापडाची काळ्या, ग्रे. निळ्या, चॉकलेटी, पांढऱ्या, पिवळसर रंगाची फुल पॅन्ट व हाप पॅन्ट वापरली जात असे. त्याकाळी न्यायाधीश, अति प्रतिष्ठीत लोक इंपोर्टेड मॅन्चेस्टरचे धोतर, डोक्यावर काळी टोपी आणि अमुल बटर कलरचा कॉटनचा कोट व पांढरा शर्ट वापरत असत. त्याकाळी वुलनचा वापर होत नसे. अति श्रीमंत लोक पारशी किंवा खिश्चन हे लोक गॅबरेडीन वुलनचे कोट व पॅन्ट वापरत असत. काही नट लोकांनी त्याकाळी नॅरोबॉटमची फॅशन आणली.

जरीला व बोरी कापूस ही लागवड कोरडवाहू भागात होत असे. जरीला पेक्षा बोरी कापसाचे बोंड मोठे व कापूस तलम असायचा. याचे बोंडच्या टोकाला काटा असल्यासारखे असायचे. त्यामुळे भटकी गुरे ही बोरी कपाशीची बोंडे खात नसत. पण जरीलाच्या कपाशीच्या पात्या लांब व भेंडी पिकाच्या सदृष्य असायच्या. तेव्हा वढाळ जनावरे ती खात असत. बोरी हलक्या जमिनीत तर जरीला ही मध्यम ते भारी जमिनीत चांगली येत असे. यांचे एकरी २ ते ३ मण (४० शेराचा मण) उत्पादन मिळायचे. या जरीलाला फांद्या कमी असत कारण त्याकाळी फक्त शेणखत वारपले जात असे. कंपोस्ट तर माहीत नव्हते, मग रासायनिकचा प्रश्नच नव्हता. जरीलाचे फुल पिवळे असायचे. झाडावर १५ ते २० फुले असायची. याची पेरणी १।। फुट x ९ इंच वर व्हायची. यासाठी एकरी २० ते २५ किलो बी लागायचे. पेरताना हे बी तंतुमय धाग्याचे असल्याने पाभरीत अडकत असे. त्यामुळे एकसारखी पेरणी न होता एकदम एकाच जागी पुंजक्याच्या स्वरूपात बी पडायचे. म्हणून काथ्याने विणलेल्या खाटेवर चोळले जात असे व खाली पडलेले तंतुविरहीत बी गोळा करून त्याच्यावर पातळ शेण व मातीचा सडा घमेल्यात तयार करून जयाप्रमाणे सांजोऱ्या किंवा करंज्याला गहू भिजवतो त्याप्रमाणे ते लावले जात असे. आणि त्यानंतर पाभरीने किंवा मोघडवर सुकलेले बी पेरले जात असे.

भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर १९५२ साली बोरी जात प्रचलित झाली. १९५४ ते १९५७ साली कोईमतूर १ व कोईमतूर २ ह्या लांब घाग्याच्या जाती प्रचलित झाल्या. याची लागवड २।। x २।। फुटी सरीवर होत असे. या जातीच्या कापसापासून इंडोनेशियन जातीसारखे तलम कापड तयार होत असे. १९७० च्या काळी वरलक्ष्मी ही जात उसाच्या सरीवर ४ x २ वर सरीच्या दोन्ही बगलेत लावली जाऊ लागली. पाने रुंद, चवडी पोपटी रंगाची, कडेला लालसर छटा असलेली, वळणदार, पानाच्या कडा आखीवरेखीव व देठ लालसर जांभळट, फांद्या भरपूर असलेले छातीबरोबर उंच असायचे. या जातीचे फुले पांढरट, पिवळसर आणि नरसाळ्याच्या आकाराची असत. किंचीत पिंक कलरची छटा असलेली असत. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या कॉटन थ्राईवरचे प्रयोग प्रथम या जातीवर झाले व याला १०० ते १२५ बोंडे लागलेली दिसली.

नंतर एच - ४ ही जात विकसीत झाली. या जातीनी उत्पादनामध्ये क्रांती केली. याचे उत्पादन एकरी १० ते १५ क्विंटल येऊ लागले. त्यानंतर ब्रम्हा, सावित्री व राशी -२ या जाती आल्या. राशी - २ या संकरीत कापसाचे नर आणि मादी बिजोत्पादनाचे प्रयोग शेतकऱ्यांच्या शेतावर करण्यात आले व त्याला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून संकरीत बियाचे दर्जेदार, अधिक उत्पादन मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फायदा झाला. ही गोष्ट १९७४ - ७५ सालची. मग ही जात १९७५ ते ९५ पर्यंत प्रचलित राहिली. त्यानंतर जसे या संकरित जातींना बोंड अळीचा त्रास जास्त होऊन त्यांच्या नियंत्रणावर अफाट पैसे खर्च करूनही नियंत्रण न झाल्याने उत्पादनात घट आली आणि घेतलेल्या सावकारी कर्जावर व्याज वाढल्याने सावकारांचे व बॅंकांचे तगादे वाढल्याने १९८० साली आंध्र परदेशमधील ७८ लोकांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेस पेपरमध्ये वाचली आणि मग मी शेतकऱ्यांना कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी उच्च पदावरील नोकरी सोडली आणि आता हे तंत्रज्ञान १०० हून अधिक पिकांना व २० हून अधिक अपारंपरिक व्यापारी पिकांसाठी देशभर, श्रीलंका व तत्सम देशात वापरले जात असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे.

भारतातील बी. टी. कॉटनचा इतिहास

१० मार्च १९९५ साली ट्रांझॅनिक कोकर -३१२ ही जात अमेरिकेतील मोन्सँटोने आणली. एप्रिल १९९८ मध्ये मोन्सँटो व महिको यांनी संयुक्तपणे छोट्या प्रमाणात भारतात जैव तंत्रज्ञान विभागाला (D.B.T.) १०० ग्रॅम लावायला दिली. नंतर ८ जानेवारी १९९९ मध्ये आर. सी. जी. एम. (R.C.G.M.) प्रायोगिक तत्वावरील ४० ठिकाणचे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्या निष्कर्षावर १२ एप्रिल १९९९ ला १० ठिकणी महिकोला लागवडीस परवानगी दिली.

२००० ते २००२ मध्ये अखिल भारतीय कापूस परिषद (AICCIP) या सेंटरला मध्य भारत आणि दक्षिण भारत या ठिकणी प्रयोग करण्यास परवानगी दिली. २० फेबूरावरी २००२ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने भारतीय पर्यावरण मंत्रालयाला बी. टी. कॉटनवर होकारार्थी निष्कर्ष आल्याचे कळविले आणि पर्यावरण मंत्रालयाने अनुवंशीक स्थापत्य शास्त्र (Genetic Engineering & Approval Committee -GEAC) यांनी एका महिन्यात व्यापारी उत्पादनासाठी तत्वतः मान्यता दिली. २५ मार्च २००२ मध्ये (GSAC) महिकोला व्यापारी तत्वावर लागवडीस परवानगी दिली आणि भारतामध्ये बी.टी. कॉटन खालील २००२ मधील २९ हजार ३०७ हेक्टर पर्यंतचे क्षेत्र वाढून २००५ मध्ये १२ लाख ५० हजार ८३३ हेक्टर झाली. बिज उदोगाच्या निदर्शनाप्रमाणे २००६ मध्ये ३० लाख हेक्टर एवढे वाढले. पुढे एकूण क्षेत्राच्या ४०% क्षेत्र (१ कोटी एकर) कापसाखाली आले. या १ कोटी एकराकरीता ४० लाख पाकिटे बी लागते. त्याची किंमत ६४० कोटी रु. होते. भारतामध्ये अशा प्रकारे बी. टी. कापसाच्या ५२ जाती विकसीत झल्या आहेत.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने घेतलेल्या बी. टी. कॉटनच्या प्रयोगातून असे निदर्शनास आले की २००१ ते २००५ या काळामध्ये तीनही विभागात घेतलेल्या बी. टी. कॉटनला चालू कपाशीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. कापसाच्या बिया व्यतिरीक्त प्रत्येक बी.टी. कॉटनच्या झाडावर बोंडांची संख्या आणि बोंडांचे वजन तसेच बियाची व रुईची प्रत आणि जिनींग केल्यानंतर निर्माण होणाऱ्या कापसाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले.

भारतातील कापसाखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता

राज्याचे नाव   क्षेत्र (दशलक्ष हेक्टर)  उत्पादन (दशलक्ष टन)   उत्पादकता/हेक्टरी (किलो) 
  २०१२-१३   २०१३-१४   २०१४-१५   २०१५-१६   २०१२-१३   २०१३-१४   २०१४-१५   २०१५-१६   २०१२-१३   २०१३-१४   २०१४-१५   २०१५-१६  
पंजाब   ०.४८   ०.४५   ०.४२  ०.४५  ०.३६  ०.३६   ०.२०  ०.१९  ७४३.७५  ८००.४५   ४८५.७१   ४१५.५६  
हरियाणा   ०.६१   ०.५४   ०.६५   ०.५१   ०.४४  ०.४१  ०.३५  ०.३२  ७१९.८७  ७६१.१९  ५३८.६४  ५५०.९१ 
राजस्थान   ०.४५  ०.३९   ०.४९   ०.४१  ०.२९   ०.२४  ०.२९   ०.२७   ६४२.२२  ६०५.६  ५९३.४३  ६६९.१५ 
दक्षिण विभाग   १.५४   १.३८   १.५५   १.४४   १.०१   १.००  ०.८४   ०.७८  ७०४.६६  ७२९.४५   ५४१.५१   ५४२.१९ 
गुजरात   २.५०   २.५२   ३.०१   २.७६  १.५८   २.११   १.८४  १.७९  ६३३.१६  ८३६.८४  ६०९.९७  ६४६.५ 
महाराष्ट्र   ४.१५   ४.१९   ४. १९   ३.८२  १.३८   १.४३  १.३३  १.३६  ३३२.१३  ३४०.६५  ३१६.३२  ३५५.६५ 
मध्यप्रदेश   ०.६१   ०.५१   ०.५७   ०.५५  ०.३२   ०.३२  ०.३१   ०.३१  ५३१.२५  ६२८.४   ५३३.१   ५५९.४१ 
मध्य विभाग   ७.२५   ७.२३  ७.७८  ७.१३  ३.२८   ३.८६  ३. ४७   ३.४५   ४५२.४९   ५३४.१२  ४४५.९९  ४८३.८८ 
तेलंगणा   २.४०   २.३९  १.७२  १.६९  १.४३  १.३३  ०.९७  १.००  ५९५.००  ५५५.०४   ५६३.३७  ५९३. ८४ 
आंध्राप्रदेश   २.४०  २.३९   ०.८२  ०.६६  १.४३  १.३३  ०.४६  ०.३९  ५९५.०   ५५५.०४   ५५९.७६  ५९०.६३ 
कर्नाटक   ०.४९  ०. ६६  ०. ८७  ०.५९  ०.२९  ०.३९  ०.५४  ०.४१  ५९५.८८  ५९०.६३  ६१६.२३  ६९५.०६ 
तमिलनाडू   ०.१३  ०.१५  ०.१९   ०.११   ०.१०   ०.०९   ०.०९   ०.०९   ७९६.८८  ५५९.२१  ४५६.९९  ८०९.५२ 
उत्तर विभाग   ३.०१   ३.२०  ३.६०  ३.०४   १.८२   १.८०   २.०५  १.८९  ६०३.७२  ५६२.६  ५६९.८२   ६३०.११  
ओरिसा   ०.१२  ०.१२  ०.१३  ०.१३  ०.०७  ०.०७  ०.०७   ०.०५   ५७१.४३   ५४८.३९   ५३५.४३  ४०८ 
इतर   ०.०५  ०.०३  ०.०३  ०.०२   ०.०३  ०.०३   ०.०३   ०.०३   ६६६.६७   १०३०.३  १०९६.७७  १६१९.०५ 
एकूण   ११.९८  ११.९६  १३.०८  ११.७६  ६.२९   ६.७७  ६.४६  ६.२१  ५२५.१३  ५६५.७२  ४९३.७७  ५२७.४९