अति पाऊस व थंडीचा केळी पिकावर होणारा दुष्परिणाम व त्यावरील उपाय

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


अतिवृष्टी व टिश्युकल्चर केळी : अतिवृष्टी अथवा काही कारणाने बागेत पाणी जास्त झाल्यास बागेतून पाणी काढून देणे व जमिनीचा संपूर्ण निचरा होणे हे अत्यंत आवश्यक आहे.

१) लागवडीनंतर पहिला महिना : या कालावधीमध्ये रोपे जमिनीत स्थिरावणे गरजेचे असते, परंतु याचवेळी पाणी जास्त झाल्याने मुळ्यांची वाढ होत नाही. मुळ्यांच्या आजुबाजूस हवा खेळत नाही. त्यामुळे रोपांची मर होण्याची व पुढील परिणाम होण्याचो शक्यता असते.

उपाय :

अ) समतोल चर खोदून पाणी काढणे, जमिनीचा वापसा अत्यंत महत्त्वाचा

ब) रोपांजवळील माती थोडी उकरून खालीवर करावी.

क) मुळ कूज रोखण्यासाठी १०० लि. पाण्यामध्ये ३०० ग्रॅम बावीस्टीन व ४०० ते ५०० मिली जर्मिनेटरचे मिश्रण तयार करून प्रत्येक रोपास २०० ते २५० मिली द्यावे.

२) लागवडीनंतर चौथा - पाचवा महिना - या कालावधीमध्ये केळीच्या खोडात घडाची निर्मिती होत असते. जास्त पाण्यात मुळ्या उघड्या पडल्या असतील तर त्यावर त्वरीत माती, चांगले कुजलेले शेणखत, पालाश, स्फुरद टाकावे, पुढील केळीफुल योग्य वेळी बाहेर येण्यास व घडास चांगले वजन येण्यासाठी ह्या शेणखत, पालाश, स्फूरदचा चांगला फायदा होईल.

३) सातवा - आठवा महिना - साधारण ह्या वेळेस केळफुल बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू असते. अतिपावसाने फणीमध्ये घाण साचते. त्यामुळे घड काळे पडतात. जास्त आर्द्रतेमुळे आणि ऊन नसल्याने जमिनीवर, झाडावर अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ओलाव्यामुळे झाडांच्या मुळांची पकड ढिली होते व झाड पडण्याची शक्यात असते. त्यामुळे झाडाभोवती माती लावून घेणे. त्यांना आधार देणे त्याबरोबर खतांची मात्रा पावसाने दिलेली खते वाहून गेल्याने नेहमीपेक्षा जास्त द्यावी. पुढील होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून एखादे चांगले किटकनाशक व बुरशीनाशक तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारावे.

थंडीचा केळी पिकावर होणारा दुष्परिणाम : केळी हे उष्ण कटिबंधीय फळपीक असून चांगल्या वाढीसाठी १६ डी. ते ४० डी. सेल्सिअस तापमानाची गरज असते. हिवाळ्यात तापमान १६ डी. से. च्याही खाली जाते. अशा कमी तापमानाचा केळीच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होती.

१) उतिसंवर्धीत रोपांच्या लागवडीवर होणारा परिणाम : रोपे चांगल्याप्रकारे सेट होण्यासाठी तापमान १४ ते ३० डी. सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. कांदेबाग लागवड ही सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यातच करावी. जसजसा लागवडीस उशीर होईल तसतसे थंडी वाढल्याने रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

२ ) नवीन मुळांवर होणारा परिणाम : उतिसंवर्धीत रोपे लागवडी नंतर त्यास भरपूर प्रमाणात नवीन मुळ्या यावयास पाहिजेत. परंतु थंडीमुळे मुळांची संख्या व लांबी कमी होते. तसेच कमी तापमानामुळे मुळांच्या अन्न व पाणी शोषण्याच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो. परिणामी झाडाची वाढ मंदावते.

३) पानांच्या वाढीवर होणार परिणाम : सर्वसाधारणत: केळीला सरासरी प्रति महिना ३ ते साडेतीन पाने येतात. थंडीच्या काळात पाने येण्याचा वेग मंदावतो, त्यामुळे प्रति महिना २ ते अडीच पाने येतात. थंडीच्या काळात पाने कमी अंतरावर येतात. त्यामुळे पानांचा गुच्छ तयार होतो. अशा परिस्थितीत पानांचा फारच कमी भाग सुर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो, त्यामुळे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. थंडी मुळे नैसर्गिकरित्या केळफुल बाहेर निघण्यास अडचण येते. तापमान ७ अंश से. पेक्षा कमी झाल्यास पानातील हरितद्रव्यांचे प्रमाण कमी होते, अशी पाने अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत पूर्ण क्षमतेने उपयोगी पडत नाहीत, परिणामी झाडाची वाढ खुंटते आणि उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.

४) केळीच्या झाडाच्या वाढीवर परिणाम : कमी तपमानामुळे झाडाची वाढ मंदावते, वाढ कमी झाल्यामुले केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो, परिणामी केळी निसवण्याचा कालावधी लांबतो, त्यामुळे एकूण उत्पादन खर्चात वाढ होते.

५) फळवाढीवर होणारा परिणाम :थंडीच्या काळात घडातील केळीची वाढ फार हळूवार होते, परिणामी घड पक्क होण्याचा कालावधी ३० ते ४० दिवसांनी वाढती, त्यामुळे घड कापणीस जास्त काळ लागतो.

६) बुंध्यावर व घडावर होणारा परिणाम : कमी तपमानामुळे केळीच्या बुंध्यावर व घडाच्या दांड्यावर काळपट तपकिरी चट्टे पडतात. हे चट्टे वाढत जाऊन पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो तसेच घड सटकतो.

अ) उतिसंवर्धन केलेल्या रोपांची लागवड, असल्यास चांगली वाढ झालेली, योग्य हार्डनिंग झालेली, १ फुट उंचीची रोपे निवडावीत.

ब) रोपांची लागवड केल्यानंतर बुरशीनाशक औषधांची फवारणी व आळवणी करावी.

क) बागेच्या चोहो बाजूने वारासंरक्षक उंच वाढणाऱ्या वनस्पती २ ते ३ ओळीत दाट लावाव्यात. त्यामुळे थंड वारे अडवले जाते.

ड) शेतात शिफारशीप्रमाणे शेणखत अथवा कंपोस्ट खत वापरावे.

इ) रासायनिक खतांचा योग्य वापर करावा, प्रामुख्याने पालाश योग्य प्रमाणात द्यावे.

ई) केळीची कार्यक्षम पाने कापू नयेत, फक्त रोगग्रस्त पाने कापावीत. सुकलेली पाने बुंध्याभोवती तशीच राहू द्यावीत. त्यामुळे बुंध्याचे थंडीपासून संरक्षण होईल.

उ) खोडालगत आच्छादन करावे, जेणेकरून कमी तापमानाचा मुळांच्या वाढीवर परिणाम होणार नाही.

ए) थंडीच्या काळात पाणी शक्यतो रात्री द्यावे.

ऐ) फळांची वाढ जलद होण्यासाठी घड पूर्ण निसवल्यानंतर केळफुल कापावे. जास्तीच्या फण्यांची विरळणी करावी. त्यामुळे घडाचे वजन वाढते, तसेच केळी चांगल्या प्रतिची येते.

ओ) रात्रीच्या वेळेस बागेच्या चोहोबाजूने काडीकचरा जाळून धुर करावा.

औ) हिवाळ्यात हमखास येणाऱ्या सिगाटोका, लिफस्पॉट व जळका चिरूट या रोगांचे प्रभावी उपाययोजना करून नियंत्रण करावे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर व फायदा : अशा परिस्थितीत दर महिन्याला एकरी १ लि. जर्मिनेटर २०० लि. पाण्यातून सोडावे. त्यामुळे पांढरी मुळी सतत कार्यक्षम राहते. त्यामुळे अन्न, पाणी शोषण करण्याची क्षमता वाढते. परिणामी झाडांची वाढ थंडीतही जोमाने होते, तसेच या कालावधीत सप्तामृतामध्ये क्रॉंपशाईनर प्रति लि. पाण्यासाठी ४ ते ५ मिली प्रमाण घेऊन फवारणी करावी. क्रॉंपशाईनरमुळे झाडची पाने, खोड, घड (केळी) यावर मेणचट अवरण तयार झाल्याने त्याचे थंडीपासून संरक्षण होते. त्यामुळे पानांच्या, झाडाच्या आणि घडाच्या वाढीवर त्याचा परिणाम न होता उत्पादन व दर्जा उच्च प्रतिचा मिळतो.