केळीचे टिकाऊ पदार्थ

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


केळी हे शक्तीवर्धक व स्वस्त फळ आहे. गोरगरीबांनाही आर्थिकदृष्ट्या परवडणारे ते फळ आहे. केळी हे एक उत्तम अन्न आहे. केळीमध्ये साखर, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आहे. चुना, लोह, स्फुरद ही खनिजे आणि 'क' व 'अ' ही जीवनसत्त्वे केळीमध्ये आहेत. केळी हे पचायला सोपे फळ असून त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.

केळीच्या फळाचे अनेक टिकाऊ पदार्थ व लगेच खाण्याचे पदार्थ तयार होऊ शकतात. हे पदार्थ बनविल्यास शेतकऱ्यांना भरपूर आर्थिक फायदा मिळेल. विशेषत: ज्यावेळेस केळीला रास्त भाव मिळत नाही त्यावेळेस हे पदार्थ केल्यास फारच आर्थिक फायदा होईल. त्यामुळे केळीचे विविध पदार्थ तयार करण्यास खूप वाव आहे.

१) वेफर्स (चिप्स, क्रीप्स): दक्षिण भारतात विशेषत : केरळ राज्यात केळीपासून वेफर्स बनविणे हा मोठा कुटीर उद्योग स्वयंरोजगार झालेला आहे. वेफर्ससाठी कोणत्याही जातीची केळी घेतली तरी चालते. परंतु राजेळी जातीची केळी वेफर्स बनविण्यासाठी सर्वोत्कृष्ट समजली जाते.

कृती :

१) पूर्ण वाढ झालेली १० % परिपक्क अशी केळी निवडावी.

२) ही केळी स्वच्छ पाण्याने घुवून किंवा ओल्या, स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावीत.

३) स्टीलच्या चाकूने फळांची साल काढावी. केळी सोलण्याचे मशीन विकसीत करण्यात आले आहे. ह्या मशीनमध्ये ताशी ४५० किलो (८० टक्के परिपक्व असलेली) केळी एका दिवसात सोलण्याची क्षमता आहे.

४) मशीनच्या सहाय्याने ०.३ ते ०.५ मि. मी. जाडीच्या चकत्या कापाव्यात. मशीन उपलब्ध नसल्यास स्टीलच्या चाकूने गोल, पातळ काप करावेत. साध्या चाकूने काप केल्यास ते काळे पडतात.

५) काप काळसर पडू नये व ते पांढरेशुभ्र होण्यासाठी ते ०.१ टक्के सायट्रीक अॅसीड (लिंबू भुकटी) किंवा पोटॅशियम मेटॅबाय सल्फाईडच्या द्रावणात (अॅण्टी ऑक्साईड) १५ ते २० मिनीटे बुडवून ठेवावेत.

६) नंतर चकत्या उकळत्या पाण्यात ४ ते ५ मिनीटे थंड करून (ब्लाचींग करून) प्रती किलो चकत्यास ४ ग्रॅम ह्या प्रमाणात गंधक घेऊन त्याची धुरी द्यावी.

७) ह्या चकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये सुकवाव्यात.

८) जर ड्रायरमध्ये चकत्या सुकवायच्या असतील तर ड्रायरमधील तापमान ५० ते ५५ अंश से.ग़्रे. एवढे ठेवावे.

९) ह्या चकत्या हाताने दाबल्या असता मोडल्यास, त्या तयार झाल्या आहेत असे समजावे व सुकविण्याचे काम थांबवावे.

१०) विक्रीसाठी किंवा जास्त दिवस टिकविण्यासाठी हे वेफर्स हाय डेन्सीटी पॉलीथीन पिशव्यात घालून हवाबंद डब्यात साठवाव्यात.

वेफर्सचा वापर :

१) बटाटा बेफार्स प्रमाणे तळून खावे.

२) त्याची भुकटी करून वेफर्स व इतर खाद्य पदार्थात वापरावी.

२) भुकटी (पावडर) :

कृती : केळीच्या भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे. त्यापासून आपणास परकीय चलनही मिळू शकते.

१) पुर्ण पिकलेली फळे घ्यावीत.

२) फळांच्या साली सोलून घ्याव्यात.

३) हा गर स्प्रे ड्रायरमध्ये किंवा ड्रम ड्रायरमध्ये वाळवून भुकटी तयार करतात.

४) स्प्रे ड्रायरमध्ये साधारणपाने ७० किलो भुकटी प्रति तास ह्या प्रमाणात मिळते. स्प्रे ड्रायरमध्ये ताज्या केळीच्या ८ ते ११ टक्के उतारा मिळतो. तर ड्रम ड्रायरमध्ये ११ टक्के उतारा मिळतो.

५) केळी फळामध्ये ग्लुकोज व फ्रुक्टोज या साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुले ती स्प्रे ड्रायरच्या आतील भागास चिकटते. त्यामुळे ड्रायरमधून भुकटी बाहेर व्यवस्थित पडत नाही. हे टाळण्यासाठी भुकटी करतांना केळीच्या गरात १० टक्के दुध भुकटी टाकावी, त्यामुळे वाळविण्याची क्रिया सोपी होते.

६) वरील सर्व प्रकिया स्वच्छ व निर्जंतुक वातावरणात व्हायला पाहिजेत अन्यथा ही वाळविण्याच्या किंवा पॅकींगच्या वेळेस हवेतील बाष्प शोषून घेऊन सॅल्मोनेला या जिवाणुमुळे खराब होते.

भुकटीचा वापर :

१) लहान मुलांच्या आहारात केला जातो.

२) बिस्कीटे व बेकरीमध्ये

३) आईस्क्रीममध्ये केळीची भुकटी वापरतात.

३) केळांचे पीठ : स्वस्थावार्धक पेये, शिशु आहार तसेच बेकरी उद्योगात केळांचे पीठ वापरले जाते.

कृती : पहिली पद्धत :

१) केळीची कच्ची फळे घ्या

२) ती फळे ७० ते ७५ अंशा से. तापमानाच्या गरम पाण्यात ५ मिनीटे बुडवून साल काढा.

३ ) गराचे बारीक तुकडे करा.

४ ) गंधकाची धुरी देवून ७ ते ८ तास ड्रायरमध्ये वाळविल्यानंतर ग्राईडरमध्ये दळून त्याचे पीठ तयार करा. या प्रक्रिया पदार्थात ८ % पाण्याचा अंश असतो.

दुसरी पद्धत :

१) कच्ची केळी घ्या.

२) त्यांची साल काढा.

३) त्यांचे बारीक काप करून उन्हात वाळवून घ्या.

४) वाळल्यानंतर मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडर (चक्की) मध्ये दळून त्याचे पीठ करा.

५) केळींची साल काढल्यावर ती थोडीशी काळी पडतात. त्यासाठी स्टेनलेस स्टीलचीच साहित्ये वापरावीत.

६) नंतर ती पोटॅशियम मेटाबायसल्फाईडच्या द्रावणात बुडवून घ्यावी.

केळी पिठाचा वापर :

१) केळीच्या पिठामध्ये ७० ते ८० % स्टार्च असते. त्यामुळे विविध पदार्थात फीलस म्हणून वापर करता येतो.

२) त्याचप्रमाणे शेव, चकली, गुलाबजाम इत्यादी उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

४) प्युरी : प्युरी म्हणजे काय ?

पिकलेल्या ताज्या फळांतील गर, रस किंवा लगद्यावर विशिष्ट प्रक्रिया करून सॉसप्रमाणे त्याचे स्वरूप बदलवले जाते. त्यामध्ये ताज्या फळांचा मूळ स्वाद, रंग, सुगंध कायम राहील याची दक्षता घेतली जाते. प्युरीया वापर मिल्कशेक, आईस्क्रीम, फळांचा रस इत्यादी विविध पदार्थत केला जातो.

कृती :

१) पिकलेल्या केळांचा गर पल्पर मशीनमधून काढून लगदा हव विरहीत करतात.

२) पाश्चराईज्ड करून हवाबंद डब्यात भरून ठेवतात.

३) गर टिकविण्यासाठी त्यात कोणत्याही प्रकारचे परिरक्षक अथवा साखरेचा वापर केला जात नाही.

प्युरीचा वापर :

१) विविध फळांच्या रसांमध्ये याचा वापर करतात.

२) बिस्कीट, रस किंवा इतर पेये बनविण्यासाठी प्युरीचा वापर करतात.

३) प्युरीची निर्यात परदेशात केली जाते. कोणत्याही जातीची केळी प्युरी बनविण्यास योग्य आहेत. परंतु आपल्याकडे बसराई या जातीचा वापर करतात.

५) सुकेळी :

कृती :

१) सुकेळीसाठी ताजी, पिकलेली पण टणक फळे घ्यावीत. (अपक्क अगर जास्त पिकलेली फळे सुकेळी बनविण्यास अयोग्य असतात. )

२) साल काढलेली संपूर्ण केळी त्यांचे काप सुकेळी करण्यासाठी वापरतात.

३) साधारणत: १ किलो केळीसाठी २.५ ग्रॅम गंधक ह्या प्रमाणात धुरी देण्यासाठी वापरावे.

४) धुरी देताना आर्द्रता राहावी म्हणून त्याठिकाणी पाणी ठेवणे आवश्यक असते. या धुरीमुळे केळी जास्त दिवस टिकण्यास मदत होते. तसेच सुकेळींना आकर्षक सोनेरी पिवळी छटा येते.

५) धुरी दिल्यानंतर ती केळी कोवळ्या उन्हात वाळवितात. उन्हात वाळवितांना ती पातळ मलमलच्या कापडाने झाकावी. त्यामुळे त्यांच्या वर धूळ बसणार नाही किंवा ती काळी पडणार नाहीत.

६) केळी डीहायड्रेटेडमध्ये वाळवायची असल्यास १४० अंश फॅरनाईट तापमानावर वाळवावीत. सुमारे १५ तासानंतर उष्णतामान कमी करावे. ही सुकविण्याची क्रिया करताना फळे २ - ३ वेळेस पालटावी लागतात.

७) अशा रितीने तयार झालेली सुकेळी उघड्यावर ठेवल्यास ती झटपट खराब होतात. त्याकरीता तयार झालेली सुकेळी काचेच्या बंद बाटलीत किंवा पॉलीथीनच्या कागदात गुंडाळून किंवा पॉलीथीनच्या पिशव्यात भरून ठेवावीत. राजेळी जातींची केळी सुकेळी तयार करण्यास चांगली असते. कोकण विभागात सुकेळी जास्त प्रमाणात केळी जाते.

६) केळीचा जॅम :

कृमी :

१) पूर्ण पिकलेली केळी घ्या.

२) १ किलो गरात १ किलो साखर, ३ ग्रॅम सायट्रीक अॅसीड (लिंबू भुकटी), ५ ग्रॅम पेक्टीन व खाद्य रंग टाकावे.

३) नंतर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे.

४) शिजवितांना ते स्टीलच्या पळीने सतत हलवावे. म्हणजे गर करपत नाही व जॅम चांगल्या प्रतीचा तयार होतो.

५) मिश्रणाचा ब्रीक्स ६८ ते ७० आल्यास जॅम तयार झाला असे समजावे व तयार झालेला जॅम कोरड्या व निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या बरण्यात भरावे.

७) चॉकलेट (टॉंफी): केळीच्या गरापासून टॉंफी तयार करता येते.

कृती :

१) १ किलो गरामध्ये १ किलो साखर, २० ग्रॅम मक्याचे पीठ व १२० ग्रॅम वितळलेले वनस्पती तूप मिसळून शिजवावे.

२) मिश्रणातील घन पदार्थाचे प्रमाण ७० अंश ब्रीक्स इतके आल्यावर २ ग्रॅम मीठ व २ ग्रॅम सायट्रीक अॅसीड (लिंबू पावडर) टाकावे.

३) शिजविण्याची क्रिया ८२ ते ८३ अंश ब्रीक्स येईपर्यंत चालू ठेवावी.

४) नंतर हे मिश्रण अगोदर वनस्पती तूप लावलेल्या ट्रे मध्ये किंवा परातीत ओतावे. साधारणत: १ सें. मी. जाडीचा थर येईपर्यंत ते एकसारखे पसरावे.

५) थंड झाल्यानंतर स्टीलच्या सुरीने योग्य आकारमानाचे काप घ्यावेत.

६) टॉंफी ड्रायरमध्ये ५० ते ६० डी. से. तापमानाला अशा प्रकारे सुकवाव्यात की, जेणे करून त्यामध्ये पाण्याचे प्रमाण ५ ते ६ टक्के राहील.

सर्वसाधारणपणे १ किलो गरापासून सव्वा किलो टॉंफी तयार होते.

८) केळी - पपई मिश्र पापड :

कृती :

१) पिकलेली केळी घ्या.

२) त्यांची साल काढा.

३) ही साल काढलेली केळी १.५ टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाईडच्या द्रावणात ५ मिनीटे बुडवून ठेवा. म्हणजे ती काळी पडणार नाहीत.

४) केळी व पपई यांचा गर १:४ या प्रमाणात घ्यावा.

५) हा केळी व पपईचा मिश्र गर एकजीव करून घ्या.

६) हे मिश्रण ट्रेमध्ये किंवा स्टीलच्या ताटात १.५ सें. मी. जाडीचा थर होईल या बेताने टाकावा. गर ताटात किंवा ट्रेमध्ये टाकण्याच्या अगोदर ट्रे किंवा स्टीलच्या ताटाला तूप किंवा ग्लीसरीन चोळून घ्यावे. म्हणजे ते पापड चिटकणार नाहीत.

९) साखरेच्या पाकातील केळीचे काम (सिलबंद डब्यातील पाकविलेली केळी) : चांगल्या जातीच्या पिकलेल्या केळीचे कप साखरेच्या पाकात घालून हवाबंद डब्यात साठविता येतात. ती लांबच्या बाजारपेठेत किंवा निर्यातीसाठी सुद्धा वापरता येतात.

कृती :

१) पिकलेली (जास्त पिकलेली नको) केळी याकरिता निवडून त्यांची साल काढून घ्या.

२) त्यांचे स्टीलच्या चाकूने काप करा.

३) एका स्टीलच्या पातेल्यात २५ ते ३० टक्के साखरेचा पाक व २ टक्के सायट्रीक अॅसीड द्रावण घ्यावे.

४) केळीचे तुकडे निर्जंतुक केलेल्या कॅनमध्ये (डब्यामध्ये) भरावे.

५) त्यावर वरीलप्रमाणे तयार केलेला साखरेचा गरम पाक डब्याच्या वरच्या काठापासून ६ मि. मी. (पाव इंच) सोडून भरावा.

६) असे भरलेले डबे गरम पाण्याने भरलेल्या पसरट भांड्यात ठेवावेत. त्यामुळे डब्यातील हवा निघून जाईल.

७) नंतर हे डबे कॅन सीलर मशीनच्या सहाय्याने सिलबंद करावेत.

८) सिलबंद केलेले हे कॅन निर्जंतुक करण्यासाठी प्रेशरकुकरमध्ये २० ते २५ मिनीटे ठेवावे. त्यानंतरही हे डबे थंड पाण्यात थंड करून कोरड्या व बंद जागेत ठेवावेत.

१० ) केळीचे सुके अंजीर :

कृती :१) पूर्ण पिकलेली केळी सोलून घ्या.

२) पोटॅशियम मेटाबायसल्फाईडच्या १ टक्के द्रावणात बुडवून घ्या.

३) नंतर त्याचे २.५ मि. मी. काप बनवून उन्हात वाळवा. किंवा ५० डि.से. तापमानाला २४ तास ओव्हनमध्ये किंवा ड्रायरमध्ये ठेवून वाळवा.

४) पॉलीथीनच्या पिशव्यांमध्ये हवाबंद करून ठेवल्यास ४ ते ६ महिने सहज टिकतात.

सुक्या अंजीरप्रमाणे ही अंजीर अत्यंत चविष्ट लागतात.

११) केळी बिस्कीट :

कृती :

१) केळी पीठात ३० टक्के मैदा मिसळा.

२) त्यामध्ये साखर, वनस्पती तूप, बेकींग पावडर, दूध पावडर, इसेन्स गरजेप्रमाणे मिसळा.

३) योग्य प्रमाणात पाणी घेऊन त्यांच्या लगदा करावा.

४) हा लगदा साच्यात टाकून ओव्हनमध्ये ठेवून द्यावे. ही बिस्कीटे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतात.

१२) केळीचे पेठे:

कृती :

१) केळीचे पेठे तयार करण्यासाठी ५ ते १० मि. मी. आकाराचे पूर्ण पक्क केळीचे तुकडे घ्या.

२) हे तुकडे ०.०५ टक्के सोडीयम मेटाबायसल्फाईट किंवा पोटॅशियम मेटाबायसल्फाईट या रसायनामध्ये १५ मिनिटे भिजवावीत. त्यामुळे केळी तपकिरी तपकिरी होण्याचे टाळता येईल.

३) हे तुकडे ब्लीच करून खाण्याच्या तेलात तळून घ्यावेत .

४) हे तळलेले तुकडे मंद आचेवर ठेवून गुळाच्या पाकात मिसळावेत.

५) थंड झाल्यावर हे केळीचे पेठे प्लॅस्टिकच्या पिशवीत भरावीत.

६) ह्या पिशव्या थंड व कोरड्या जागेत साठवाव्यात.

१३ ) केलीचा रस :

कृती :

१) खाण्यास योग्य अशी पूर्ण पिकलेली केळी घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

२) नंतर त्यांची साल काढून त्यांचा पल्पर मशीनमध्ये अथवा मिक्सरमध्ये गर काढा.

३) या गरात १०० पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईडच्या व ०.२ टक्के पेक्टीनेज एन्झाईम टाकून ते मिश्रण ४ तासापर्यंत ३० डी. से. तापमानाला ३० मिनीटे तापवावे.

४) चार तासानंतर गर सेंट्रीफ्युज करून त्यातील घन पदार्थ वेगळे करावेत म्हणजे शुद्ध रस मिळेल.

५) हा तयार झालेला रस ८० डी. से. तापमानाला ३० मिनीटापर्यंत तापवावा व निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरून बाटल्या सीलबंद कराव्यात.

६) ह्या रसाच्या बाटल्या थंड व कोरड्य वातावरणात साठवाव्यात.

साधारणत : १ किलो केळीच्या गरापासून ६०० ते ६८० मि. मी. रस मिळतो. या रसाची गोडी २४ ते २६ टक्के ब्रीक्स असते. या रसापासून सरबत, स्क्वॅश, सायरप, मद्य, ब्रॅन्डी इत्यादी पदार्थ तयार करता येतात.

१४) रसापासून मद्य (वाइन) : केळीच्या रसापासून चांगल्या प्रकारचे मद्य तयार करता येते.

कृती :

१ ) मद्य तयार करण्यासाठी रसातील साखर व आम्लता यांचे योग्य प्रमाण असावे लागते. यासाठी रसामध्ये साखर व सायट्रीक अॅसीड टाकून २३ डी. ब्रीक्स तर आम्लतेचे प्रमाण ०.७ टक्के आणावे.

२) रसामध्ये ०.०५ % डायआमोनीयम हायड्रोजन फॉस्फेट व १२५ पीपीएम (१२५ मि. ग्रॅम प्रति लिटर) इतके पोटॅशियम मेटाबायसल्फाईट मिसळावे.

३) नंतर हा रस ७० डी. से. तापमानाला ३० मिनीट निर्जंतुक करावा.

४) नंतर ह्या रसात ४८ तासापुर्वी केळीपुर्वीच्या रसात तयार केलेले यीस्टचे मुरवण प्रति लिटरला २० मिली मिसळावे.

५) हे मिश्रण ३० डी. से. तपमानास आंबविण्यास ठेवावे. आंबविण्यासची प्रक्रिया २- ३ आठवड्यात पुर्ण होते.

६) त्यानंतर ०.१ % बेन्टोनाईट टाकून आंबविलेला रस रात्रभर स्थिर होण्यासाठी ठेवावा. मग तो सेंट्रीफ्युज करून किंवा गाळून स्वच्छ मद्य मिळवावे.

७) हे मद्य निर्जंतुक केलेल्या स्वच्छ व कोरड्या बाटल्यांमध्ये भरून झाकणे लावून हवाबंद करून ठेवावे.

१५) केळीची ब्रॅन्डी :

कृती :

१) पक्क फळाच्या गरापासून पेक्टीनेज एन्झाईम वापरून रस काढतात.

२) रस ४ ते ५ दिवस आंबवून डिस्टीलेशन करतात. ३) त्यापासून ब्रॅन्डी मिळवतात.

१६) शिरका :

कृती :

१) अतिपक्क व खाण्यास योग्य नसलेल्या फळापासून व्हिनेगार बनविता येते.

२) केळीचा गर पाण्यात मिसळून त्याचे असे मिश्रण करावे की, जेणे करून त्या मिश्रणात १० % साखरेचे प्रमाण येईल.

३) ह्या मिश्रणात यीस्ट (सॅकॅरेमायसी सिरीव्हीसी) टाकून ४८ तास स्थिर ठेवावे.

४) नंतर हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे.

५) या मिश्रणात ४८ तासापूर्वी केळीच्या रसात तयार केलेले माल्ट व्हिनेगाराचे मुरवण प्रति लिटरला २० ते ३० मि. ली. या प्रमाणात मिसळावे.

६) हे मिश्रण ३० डी. से. तापमानाला आंबविण्यास ठेवावे.

७) ही रासायनिक क्रिया (अॅसीटीफिकेशन) २- ३ आठवड्यात पूर्ण होते.

८)त्यानंतर सेंट्रीफ्युज करून व्हीनेगार वेगळे करावे.

९) हे व्हिनेगार निर्जंतुक केलेल्या स्वच्छ बाटल्यांत भरून हवाबंद करून साठवावे.

नाविन्यपुर्ण पदार्थ :

मद्रासी वेफर्स : वेफर्ससाठी कच्ची केळी ४ ते ५ घेऊन ती तळण्यासाठी रिफाईड तेल, मसाला, २ चमचा साजूक तूप, हिंगाचा लहान डबा, सुक्या लाल मिरच्या आणि थोडे मीठ लागते.

कृती : एकावेळी एकाच केळीच्या (साल काढून) चकत्या (वेफर्स) करून लगेच तळून घ्या. पुन्हा दुसरे केळ सोलून चकत्या करून तळा. साजूक तुपावर हिंगाचा खडा व मिरच्या मिरच्या परता. मिठाबरोबर कुटून वेफर्सवर टाकून हलवून घ्या. तन्त्र ते खाण्यासाठी वापरावे.

कच्च्या केळाचे वडे : वडे बनविण्यासाठी ४ - ५ कच्ची केळी , ४ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद मोहरी, मीठ, तेल लागते.

वडे बनविताना प्रथम केली सोलून लहान तुकडे करून पाणी न घालता वाफवून घ्या. हे काम कुकरवर भाताच्या ताटलीवर ठेवून करता येते. लगदा करून घ्या. मोहरी, लाल मिरच्यांची फोडणी देऊन त्यामध्ये केळाचा लगदा परता. गार झाल्यावर हिरव्या मिरच्या व आले जाडसर वाटून घाला. मीठ घाला. बटाटेवडे बनवताना डाळीचे पीठ भिजवतो त्या प्रमाणे भिजवा. केळाच्या मिश्रणाचे वडे बनवून बेसनात बुडवून तळून घ्या. तयार झालेले वडे खोबर्‍याच्या चटणीबरोबर खाण्यास वापरावे.

कच्च्या केळाची भाजी : भाजी बनविण्यासाठी कच्ची केळी (मोठी) साल काढून लहान तुकडे करून पाण्यात घाला. मसाल्यासाठी - अर्धा नारळ, भाजलेल्या ५ - ६ सुक्या मिरच्या, १ चमचा धने भाजून पाऊण चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, २ लसणाच्या पाकळ्या.

फोडणीसाठी - थोडे तेल, मोहरी, कढीपत्त्याची पाने, ७ - ८ लसूण पाकळ्या ठेचून १ सुकी लाल मिरची एवढे साहित्य लागते. भाजीसाठी प्रथम मसाला साहित्य वाटून घ्या. थोडे पाणी, चिंचेचा कोळ व मीठ घेऊन त्यात केळ्याचे तुकडे शिजवा. त्यात मसाल्याची पेस्ट घाला. १० - १५ मिनीटे शिजवा वरून फोडणी द्या.