केळीचे विविध उपयोग

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


धार्मिक कार्यक्रमात केळीचे खुंट अतिशय उपयुक्त असते. केळीच्या पानामधील आहार हा पवित्र, प्रसन्न व पर्यावरण समृद्ध मानला जातो. ही पाने जेवणानंतर जनावरांना खाद्य म्हणून देशातील विविध भागामध्ये दिली जातात. केळीचे फुल, कच्चे कमळ व कच्ची केळी याच्या दक्षिण भारतामध्ये भाज्या केल्या जातात. यामध्ये लोह, पालाश, विटामिन 'ए' हे अन्नघटक जास्त असतात. केळी ही विकसनशील राष्ट्रामध्ये प्रामुख्याने अन्न म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो. विविध राष्ट्रामध्ये उपवासामध्ये चालणारे फळ म्हणून याचा उपयोग होतो.

केळीची पाने, खोड हे घडाची काढणी केल्यानंतर दुभत्या व कामाच्या जनावरांना खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. वाळलेली पाने ही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरिबांना स्वस्त जळण म्हणून वापरता येते. वाळलेली केळीची खोडे आणि वाळलेल्या पानाचे सोपट (sheaths) हे ग्रामीण भागामध्ये जळण म्हणून प्रचलित आहे.

नवीन निरिक्षणामध्ये केळीच्या अंगभुत गारव्याच्या गुणधर्मामुळे खोडांचे छोटे तुकडे करून फळबागांच्या भोवती आच्छादन अथवा मुख्य खड्ड्यामध्ये कंपोस्ट म्हणून केले तर कंपोस्ट खत तर होतेच शिवाय एकूण गांडूळांची संख्या नैसर्गिकरित्या वाढते. केळीचे औषधी गुणधर्म हे तर अतिशय उपयुक्त आहेत. जसे अशक्तपणा, उच्च रक्तदाब, स्मृतीभ्रंष, मानसिक नैराश्य छातीतील जळजळ, सकाळचा आळस, मानसिक दुर्बल्य अवस्था, अकल्पीत शरीराची वाढ (Obesity), अल्सर (आतड्याचे व्रण) या विविध रोगामध्ये केळी अतिशय उपयोगी आहे. केळ्यामधील उच्च पालाशच्या प्रमाणामुळे ज्यांचे शरीरातील पालाशचे प्रमाण कमी आहे. यांना केळी खाण्याची शिफारस केली जाते. तसेच केळामध्ये अ, ब, क जीवनसत्वे आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि जास्त या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. या गुणधर्ममुळे केळी हे कुपोषित लहान मुलांची प्रकृती सुधारण्यामध्ये एक आदर्श फळ म्हणून गणले गेलेले आहे. केळीचे खोड शिजून उकडल्यानंतर त्यातील घटकद्रव्ये जीवनसत्त्वे. मुलद्रव्यांचे प्रमाण किंचीत वाढते. तथापि त्यातील प्रथिने व धाग्याचे प्रमाण (Fiber) हे केळफळाएवढेच असते.

केळीचे खोड व पाने गार (थंड) असल्यामुळे ज्याप्रमाणे औदुंबराच्या झाडाचे पाणी ग्राईप वॉटरमध्ये वापरून लहान मुलांचे दातदुखी व पोटदुखी थांबविण्यासाठी उपयोग होतो. त्याचप्रमाणे केळीच्या खोडाचे व पानांचे पाणी मुत्रपिंडाचे विकार यावर सारक म्हणून हमखास उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे केळीच्या खोडातील पाण्यामुळे गोवर, कांजण्या, कडकी यासारखे उष्णतेचे विकार बरे होतात. या खोडाचे पाणी मुतखडा झाल्यावर सारक म्हणून वापरल्यास लघवीद्वारे विष बाहेर काढण्याचे कार्य करते.

पापड तयार करताना पीठ भिजविण्यासाठी केळीचे पाणी वापरतात, तसेच ते अनके विकारांवर गुणकारी आहे.

केळीचे विविध उपयोग जसे अन्न, धागा, जळण आणि औषधी अशा उपयोगामुळे केळी हे फळ प्रचलित होत आहे. त्यामुळे केळी हे 'कल्पतरू' म्हणून संबोधले जाते.