लिंबू पिकातील खत व पाणी व्यवस्थापन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


दरवर्षी पीक पोसण्यासाठी जमिनीतून घेण्यात येणारी द्रव्य त्याप्रमाणात खताद्वारे जमिनीत टाकली जात नाहीत. त्यामुळे जमीन निकस होत आहे. जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांची योग्य मात्र पुरवणे जरुरी आहे. लिंबू हे पीक संवेदनशील असल्यामुळे आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी पडल्यास त्याचा झाडावर विपरीत परिणाम लगेच दिसून येतो व उत्पादनात घट येऊ शकते. दिलेल्या खताचा परिपुर्ण उपयोग झाडासाठी होण्यास खताच्या योग्य मात्रा, योग्य वेळ आणि योग्य पद्धत या बाबतची सविस्तर माहिती लिंबू बागायतदारास असणे आवश्यक आहे.

नत्राची आवश्यकता : नत्र हे अन्नद्रव्याचे संतुलन चक्र समजले जाते. कारण नत्रामुळे इतर अन्नद्रव्य उपलब्ध होतात. लिंबूला बहार येण्यासाठी नत्राची आवश्यकता आहे. बहार येते वेळी पानातील नत्र हा फुलामध्ये जातो. त्यामुळे फुले टिकून राहतात व फळधारणा होते. नत्रामुळे झाडाची वाढ जोमाने होते. पानांचा रंग गर्द हिरवा होतो आणि अधिक उत्पादन मिळते.

नत्राच्या कमतरतेची लक्षणे : झाडाची पाने व शिरा पिवळ्या पडतात. झाडाची वाढ खुंटते, झाडावर सल येते, कळ्यांचा आकार लहान होऊन उत्पादनात घट येते. झाडाचे आयुष्य कमी होऊ शकते.

स्फूरदाची आवश्यकता : स्फुरद उपलब्ध असल्याने लिंबू झाडाला नवीन पालवी फुटते पेशीची निर्मिती होते. मुळाची भरपूर वाढ होते फळांचा आकार मोठा होऊन उत्तम प्रतीचे अधिक उत्पादन मिळते.

स्फुरदाची कमतरता : कमतरतेमुळे अन्नरस निर्माण होण्याची क्रिया मंदावते व त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. फळधारणा कमी होते. फळाची प्रत बिघडते. अपरिपक्व फळाची गळ होते. कळ्या सुप्त अवस्थेत राहून सुकतात झाडाची पाने निस्तेज दिसतात.

पालशची आवश्यकता : पेशींचे विभाजन करण्यासाठी पालशची गरज आहे. पालाशमुळे रोगास किंवा किडीस बळी पडत नाही. पाण्याचा ताण व कडाक्याची थंडी सहन करण्याची क्षमता वाढते. फळाची प्रत सुधारते व उत्पादन वाढ होते.

पालाशची कमतरता : पालाशच्या कमतरतेमुळे पानगळ होते. मोठ्या झाडात शेंड्याकडील वाढ खुंटते आणि लहान झाडात कमजोर फुटवे फुटतात. जास्त कमतरता असल्यास पाने वाकडी होतात व अपरिपक्व फळे गळतात.

कॅल्शियम : कमतरतेमुळे पानातील शिरा पिवळ्या पडतात पाने परिपक्व होण्याअगोदर गळून पडतात.

गंधक : कमतरतेमुळे लिंबू झाडाची पाने पिवळी पडतात. फळांची साल जाड दिसून येते. फळे रसविहरीत होतात.

तांबे : कमतरतेमुळे झाडाची पाने व शिरा रंगहीन बनतात.

लोह : कमतरतेमुळे फळावर काळे ठिपके दिसून येतात. पानाचा आकार लहान होऊन पाने गळतात.

बोरॉन : कमतरतेमुळे पाने कोमेजतात वाकडी होऊन पडतात. फळे लहान व कठीण होतात.

मँगेनीज : कमतरतेमुळे फिकट रंगाचे पानावर गर्द हिरव्या रंगाच्या शिरा येतात.

लिंबू झाडाची खत मात्रा झाडाचे वय, जमिनीचा प्रकार, आम्लविम्ल निर्देशांक आणि होणारी फळधारणा यावर अवलंबून आहे.

खत व्यवस्थापन : खालीलप्रमाणे खते देतांना १ ते ५ वर्षापर्यंत पुर्ण शेणखत मे च्या शेवटच्या किंवा जुनच्या पहिल्या आठवड्यात, रासायनिक व कल्पतरू सेंद्रिय खते जून, सप्टेंबर व फेब्रुवारी या महिन्यात तीन समान हप्त्यात विभागून घ्यावीत. सहा वर्षे व त्यावरील झाडांना खते देताना नत्राची अर्धी मात्रा + शेणखत, कल्पतरू, स्फुरद व आवश्यकतेनुसार पालाशचा पुर्ण हप्ता बहारासाठी पाण्याचा ताण संपताना आणि उरलेली नत्राची अर्धी मात्रा फळे वाटण्याएवढी झाल्यावर (एक ते दीड महिन्याची) घ्यावी. शेणखतासोबत ७.५ किलो निंबोळी ढेप द्यावी.

झाडाचे वय (वर्ष)   खताची मात्र/झाड  
कल्पतरू   शेणखत (किलो)   नत्र (ग्रॅम)   स्फुरद (ग्रॅम)   पालाश (ग्रॅम)  
१   ५०० ग्रॅम   ५   १००   ५०   --  
२   १ किलो   १०   १५०   ७५   --  
३   १ किलो   १५   २००   १००   --  
४   १.५ किलो   २०   २५०   १२५   --  
५   २ किलो   २५   ५००   २५०   --  
६ वर्षे व त्यापुढे   २ ते ३ किलो   ३० ते ४५   ६००   ३००   ३००  


खते देण्याची पद्धत : खते देताना झाडाखाली न देता झाडाच्या घेराखाली जमिनीत ३ - ४ से. मी. खोल मातीत मिसळून द्यावीत. रासायनिक खते मिसळून दिली तरच त्याचा परिणाम चांगला होतो. झाडाची क्रियाशील मुळे झाडाच्या घेरासारखी असतात. म्हणून खते ही घेराखालीच दिली गेली पाहिजेत.

कल्पतरू, शेणखत, गांडूळखतांचे फायदे

सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकल्यामुळे मातीच्या भौतिक - रासायनिक गुणधर्मावर चांगले परिणाम होतात. सेंद्रिय खत जमिनीत वाढणाऱ्या पिकांना समतोल अन्न पुरवतात. त्या सोबतच जमिनीत असणाऱ्या असंख्य सुक्ष्म जिवाणुंना लागणारे अन्न व ऊर्जा पुरवतात. त्यामुळे हे सुक्ष्म जिवाणु जमिनीत क्रियाशील राहतात.

१) कल्पतरू सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील मातीच्या कणाची घडण रवेदार (रवाळ) राहण्यास मदत होते. त्यामुळे लिंबू झाडाच्या मुळाशी हवा खेळती राहून झाडाची वाढ जोमाने होते व त्याचा योग्य परिणाम उत्पादन वाढीवर होतो.

२) लिंबू बागेला नेहमी ओलीत करावी लागते. त्यामुळे जमिनीत पत बिघडतो, हा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर आवश्यक आहे.

३) सेंद्रिय पदार्थांपासून सॅलिसीलिक आम्ल तयार होते. हे आम्ल तयार होते. हे आम्ल चिलेटिंग एजंट म्हणून काम करते. त्यामुळे स्फुरद आणि सुक्ष्म अन्न द्रव्ये लिंबू झाडास सहज उपलब्ध होतात.

४) सेंद्रिय खतापासून जमिनीत अँटीबायोटिक्स तयार होऊन लिंबू झाडाचे जिवाणुपासून होणाऱ्या रोगांचे संरक्षण होते.

५) सेंद्रिय खतामुळे संजिवकांची निर्मिती होऊन बहार येण्यास मदत होते.

पाणी व्यवस्थापन : लिंबू झाडांना पाणी देण्याचे प्रमाण हे बहार काळावर अवलंबून असते. ज्या काळात बहार नसतो. त्या काळात पाण्याचा एकदम ताणही लिंबू झाडास सहन होत नाही. मृग बहाराची फळे धरल्यास, पावसाच्या पाण्याखेरीज पाणी देण्याची गरज भासत नाही. तथापि पावसाचा ताण पडला तर फळे तडकून मोठे नुकसान होते. याशिवाय फळगळीचाही धोका वाढतो. यावर उपाय म्हणजे पाण्याचा ताण पावसाळ्यातही पडू देऊ नये.

बहार नसलेल्या काळात लिंबू झाडे पाण्याचा ताण सहन करू शकतात. तथापि हलक्या जमिनीतील झाडे मोठ्या ताणास टिकू शकत नाहीत. लिंबू झाडास ठिबक पद्धतीने पाणीपुरवठा केल्यास ते अधिक किफाईतशीर ठरते. मात्र ठिबक सिंचनावरील लिंबू बागा बहार नसलेल्या काळातही पाण्यावर अवलंबून असतात.