उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिके

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


शेतकऱ्यांच्या दृष्टीने तसेच भाजीपाल्याच्या अभ्यासकाला लागवडीच्या हंगामानुसार भाजीपाल्याचे वर्गीकारण फारच उपयुक्त व सोईचे असते. विशिष्ट हंगामात ज्या भाज्यांची वाढ चांगली होऊन भरपूर उत्पन्न मिळते त्या हंगामातच अशा भाज्यांची लागवड केली जाते. या दृष्टीने भाज्यांचे तीन हंगामात उदा. उन्हाळी, पावसाळी (खरीप) आणि हिवाळी (रबी) हंगामातील भाज्या असे तीन विभाग होतात. महाराष्ट्रात उन्हाळी हंगाम प्रामुख्याने कलिंगड, खरबुज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, चवळी, घेवडा, कोथिंबीर, कांदापात, मेथी, राजगिरा, माठ, पोकळा इ. उन्हाळी भाजीपाला घेतला जातो.

उन्हाळी हंगामात प्रतिकुल वातावरण (जादा तापमान व कोरडी उष्ण हवा) आणि पाणीटंचाई यामुळे भाजीपाला लागवड अतिशय मर्यादित स्वरूपात होत असल्याकारणाने भाजीपाला पिकास चांगले बाजारभाव मिळतात व शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. यासाठी भाजीपाला पिकांची योग्य निवड करून त्याचे दर्जेदार उत्पादन घेणे महत्त्वाचे असते.

उन्हाळी हंगामातील भाजीपाल्याची लागवड करण्यापूर्वी दर्जेदार व अधिक उत्पादन मिळविण्यासाठी तांत्रिक बाबींचा बारकाईने विचार करून सुयोग्य नियोजन करणे आवश्यक असते. उन्हाळी भाजीपाला करीत असताना त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवर्जुन करणे फारच गरजेचे असते. त्यामध्ये प्रामुख्याने अधिक सेंद्रिय कर्ब व पाणी साठवून ठेवणारी, परंतु उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या सुपीक जमिनीची निवड, रोग व कीड प्रतिकारक चांगले दर्जेदार उत्पादन देणाऱ्या जातीची निवड, जमिनीवरील आच्छादनाचा वापर, कोरडे व उष्ण वारे यापासून संरक्षणासाठी शेताच्या चारही बाजूंनी शेवरीसारख्या पिकाची अथवा वाफ्याभोवती मक्याची दाट लागवड, पाण्याचे सूक्ष्म पद्धतीद्वारे (ठिबक किंवा फवारे) व्यवस्थापन, रासायनिक व सेंद्रिय खतांचे योग्य संतुलन, जादा पर्णगुच्छ असणाऱ्या जातींची निवड व त्याद्वारे फुलांचे व फळांचे उन्हापासून संरक्षण, फुलोऱ्यात संजीवकांचा वापर, रोपवाटिकेपासून ते फळधारणा होईपर्यंत रोग व किडींच्या संरक्षणासाठी जैविक व रासायनिक औषधांचे एकात्मिक नियोजन, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा (डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी) वापर, उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सच्छिद्र प्लॅस्टिक जाळीचा (शेट नेट) वापर, पाण्याचा योग्य वापर - विशेषत: फुलोरा ते फळ काढणीच्या काळात एकसारखा पाणीपुरवठा आणि तोसुद्धा पहाटे, सकाळी आणि संध्याकाळी व रात्रीच्या वेळी (भर उन्हात पाणी देणे टाळावे), फळांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी तसेच स्वच्छ ठिकाणी प्रतवारी व पॅकिंग, साठवण व योग्य वेळी मालवाहतुक (पहाटेच्या वेळी) या बाबींचा नियोजनपुर्वक एकत्रित वापर केल्यास उन्हाळी भाजीपाल्याची उत्तम प्रत साधून अधिक उत्पादन घेणे शक्य होईल व मालाची प्रत आणि उत्पादन यांची सांगड घातल्यामुळे उन्हाळी भाजीपाल्याची लागवड अधिक किफायतशीर होऊ शकेल.

भेंडी, गवार: भाजीपाला पिकांची उन्हाळी हंगामात लागवड करताना पिकानुसार ठराविक काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. भेंडी व गवार या महत्त्वाच्या भाज्या उन्हाळ्यात घेतल्या जातात. त्यांना मागणीसुद्धा भरपूर असते. भेंडीची लागवड करताना हळद्या रोगास प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी तसेच गवारीची लागवड करताना भुरी रोगास प्रतिकारक्षम व भरपूर उत्पादन देणारी जात निवडावी. भेंडी व गवार पिकांसाठी शेणखत व वरखतांच्या मात्र वेळीच द्याव्यात व या पिकांना मातीची भर द्यावी. म्हणजे फळांच्या ओझ्यांनी झाडे कोलमडणार नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसात या पिकांना पाणी वेळेवर द्यावे. या पिकांची तोडणी वेळेवर व दिवसाआड करावी, म्हणजे कोवळी फळे बाजारात विक्रीस नेता येतील व कोवळ्या परंतु पक्व झालेल्या अशा फळांना शेंगाना चांगले बाजारभाव मिळतील.

वेलवर्गीय भाज्या : वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका व घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते. यामध्ये प्रमुख्याने बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे ही कामे फारच महत्त्वाची आहेत. दर्जेदार आणि चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन मिळण्याकरीता वेलाला मंडप किंवा तारेच्या ताटीच्या आधाराने वाढविणे गरजेचे आहे. कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिके आहेत. वेलींना आधार दिला असता त्यांची वाढ चांगली होते. नवीन फुटीला सतात चांगला वाव राहतो आणि त्यामुळे फलधारणा चांगली होते. याउलट जमिनीवर पहिले काही मर्यादित फुटवे आल्यानंतर नवीन फुटवे येत नाहीत आणि वेली केवळ एकदा दोनदाच फळे देतात. मंडपावर वेली ६ ते ७ महिने चांगल्या राहतात तर जमिनीवर लवकरच खराब होतात किंवा जास्त काळ टिकत नाहीत.

आधारासाठी मंडप किंवा ताटी पद्धत: वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यामुळे फळे जमिनीपासून ४ - ६ फूट उंचीवर वाढतात. त्यामुळे पाने आणि फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागत नाही. त्यामुळे ते सडत नाहीत तसेच कीड व रोगांचे प्रमाण कमी राहते. फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो. फळांची तोडणी, औषध फवारणी ही कामे सुलभ होतात. दुधी भोपळा मंडपावर घेतल्यास जमिनीवर घेतलेल्या पिकापेक्षा उत्पादनामध्ये अडीच ते तीन पट वाढ होत असल्याचे प्रयोगाअंती दिसून आले आहे. याशिवाय फळांचा एकसारखा आकार, त्यावरील बारीक लव इजा न होता तशीच राहिल्यामुळे फळे ताजीतवानी दिसतात. मंडप पद्धतीमुळे औषध फवारणी चांगल्याप्रकारे करता येते. दुधी भोपळा मंडपावर घ्यावयाचा असेल तर महिको वरद, सम्राट किंवा त्यासारख्या दंडगोल आकाराच्या जाती मंडपावर घेऊ नयेत, कारली, दोडका व घोसाळी या पिकांना ताटी पद्धत वापरणे सोईस्कर असते. वेलवर्गीय पिकांना पाण्याचा ताण देवू नये. त्यांना वेळच्यावेळी पाणी द्यावे. तसेच वेलांना वळण व आधार दिल्यानंतर पिकास मातीची भर द्यावी व गरजेप्रमाणे वरखतांच्या मात्रा द्याव्यात. रोग व किडी आटोक्यात ठेवण्यासाठी वेळच्या वेळी औषध फवारणी करावी. फळांची काढणी योग्य वेळी करावी, म्हणजे फळांना चांगले बाजारभाव मिळतील.

मिरची, वांगी, टोमॅटो: मिरची, वांगी, टोमॅटो यासारख्या पिकांची डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात गादी वाफ्यावर बियाने पेरून जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड केली जाते. या पिकांमध्ये विषाणु रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सप्तामृत औषधांची फवारणी रोपवाटिकेपासून फळधारणेपर्यंत व तेथून पिकाचा कालावधी संपेपर्यंत नियमित ठराविक अंतराने घ्यावी. म्हणजे पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळू शकते. रोप लागवडीनंतर शाकीय वाढ चांगल्या रितीने होण्यासाठी कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करून पाणी व्यवस्थापनाबाबत चांगली काळजी घ्यावी. झाडावरील जुनी व रोगट पाने काढावीत. फुलोऱ्याच्यावेळी खतांची वरमात्रा देवून छोटीशी खांदणी करून पिकांना भर द्यावी, म्हणजे वाढ चांगली होईल.

टोमॅटो पिकासाठी वाण निवडतांना प्रामुख्याने तो वाण अधिक पाने असणारा, उष्ण तापमानात फळधारणा होणारा, बोकड्या रोगास सहनशील व फळांना तडे न जाणारा निवडावा. म्हणजे अपेक्षित उत्पादन मिळू शकते. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी. कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी होते.

मिरचीची लागवड अशी करावी की उन्हाळ्यात (मार्च ते मे) मार्केटमध्ये येईल. या तंत्रज्ञानाने करावी म्हणजे या काळात मिरचीचे पैसे होतात. हा देशभरातील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मिरचीसाठी वाण हा उंची शाकीय वाढ असणारा, फांद्या जास्त असणारा, पोपटी ते गर्द हिरव्या रंगाच्या लांब मिरच्या असणारा असावा. मिरचीमध्ये फुले ज्योती या जातीमध्ये मिरच्या झुपक्यात येतात व झाडावर दाट पाने असतात. वांगी या पिकासाठी उंच व डेरेदार वाढ असणारा काटेरी देठ, जांभळ्या, पांढऱ्या व हिरव्या रंगाची छटा एकत्र असणाऱ्या चकाकीदार गोल किंवा उभट गोल फळे येणाऱ्या वाणाची निवड करावी तसेच वांग्यामध्ये रंग व आकार यानुसार विविध भागात विविधता आढळून येते. वांगी पिकास शेणखत व रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा तसेच उन्हाळी हंगामात योग्य वेळी पाणी द्यावे म्हणजे चांगले उत्पादन मिळू शकते, तसेच या पिकाची फळांची तोडणी ५ - ६ दिवसांनी करावी. चांगली, एकसारखी फळे बाजारात पाठवावीत म्हणजे बाजारभाव चांगले मिळून चांगला फायदा होईल.

कोथिंबीर: उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबीरीचे पीक कमी कालावधीत चांगले पैसे देवून जाते. यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर आठ दिवसाच्या अंतराने ५ ते १० गुंठ्यामध्ये कोथिंबीरीचे प्लॉट भारतभर करावेत.

कांदापात :महाशिवारात्रीस कांद्याचे रोपे टाकून कांद्यांची पात गुढीपाडव्यास लावावी म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी एकादशीपर्यंत पातीचे पैसे होतात.

राजगिरा, पोकळा, माठ, मेथी: उन्हाळी भाजीपाल्यामध्ये पालेभाज्या महत्त्वाच्या आहेत. पालेभाज्या आपल्या आहारातील खनिजे, क्षार आणि जीवनसत्त्वांचा पुरवठा करणारे अगदी स्वस्त आणि सहजसुलभ नैसर्गिक स्त्रोत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पालेभाज्या ह्या थोड्याशा भांडवलावर कमी जागेत व कमी वेळात येणाऱ्या अशा भाज्या आहेत. त्यापैकी काही भाज्या ठराविक हंगामातच चांगल्या येतात. यशस्वी पालेभाज्या लागवडीतील महत्वाची बाब म्हणजे पाण्याचा हमखास व सतत पुरवठा आणि जवळची बाजारपेठ व वाहतुकीची चांगली सोय असणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने राजगिरा, पोकळा, माठ, मेथी इ. पालेभाज्या घेतल्या जातात. पालेभाज्यांच्या टिकण्याचा कालावधी कमी असल्यामुळे त्या ताबडतोब बाजारपेठेत पाठविणे हिताचे असते.

अशाप्रकारे उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकांची उदा. मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, गवार, कारली, काकडी, दुधी, भोपळा, दोडका, घोसाळी, पालेभाज्या इ उन्हाळी भाज्यांची योग्य प्रकारे काळजी घेऊन वेळच्या वेळी सर्व बाबी केल्यास उत्पादनामध्ये चांगली वाढ होऊन बाजारभाव चांगले मिळून शेतकरी बांधवांना उन्हाळी भाजीपाला पिकांपासून चांगला फायदा होवू शकतो.