भुईमूग पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

श्री. के. एम. जाधव, श्री. एस. टी. शिंदे, डॉ. बी. बी. भोसले
किटकशास्त्र विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.भुईमूग हे आपल्या भागातील महत्त्वाचे तेलबिया पीक असून या पिकाची लागवड खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात होत असते. या पिकावर येणाऱ्या काही महत्त्वाच्या किडींचा बंदोबस्त केल्यास उत्पादनात व नफ्यामध्ये वाढ होते. यापैकी तुडतुडे, केसाळ अळी , पाने गुंडाळणारी अळी, घाटे अळी, उंट अळी, तंबाखुची पाने खाणारी अळी, पांढरी माशी, हुमणी इ. प्रादुर्भाव वेगवेगळ्या अवस्थेत दिसून येतो. तेव्हा सदर लेखात भुईमूग पिकावरील महत्त्वाच्या किडी कशा ओळखायच्या व त्याचे एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावयाचे याबद्दल मार्गदर्शन करावयाचा प्रयत्न केला आहे.

१) मावा : हे किटक लहान आकाराने असून नेहमी पानाच्या खालील बाजूस आढळून येतात. ते पानातील रस शोषण करतात. त्यामुळे झाडांची वाढ खुंटते व उत्पन्नात घट येते. त्याशिवाय शरीरातून बाहेर टाकलेल्या मधासारख्या चिकट गोड पदार्थावर काळी बुरशी वाढते. मावा पानातून व कोवळ्या शेंड्यातून रस शोषून घेतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते, शिवाय मावा मधासारखा द्रव झाडावर टाकतात. त्यावर काळी बुरशी तयार होते व ही कीड विषाणुजन्य रोग पसरवते.

२) फुलकिडे : आकाराने लहान व लांबट, रंगाने फिक्कट पिवळसर असून लांबी १ मिमी किंवा त्यापेक्षाही कमी असते. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस किंवा कोवळ्या शेंड्यात आढळतात. पाने खरडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. त्यामुळे पानांवर प्रथम पांढुरके चट्टे व नंतर तपकिरी ठिपके दिसून येतात. या किडीमुळे पाने आकसतात. झाडाची वाढ खुंटते परिणामी उत्पादनात घट येते. फुलकिडे रस शोषणाशिवाय शेंडेमर या रोगाचा प्रसार सुद्धा करतात.

३) तुडतुडे : पाचरीच्या आकाराचे असून पानाच्या खालच्या बाजूस असतात. प्रौढ व पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने पानातील रस शोषण करतात.

४) पाने गुंडाळणारी / पोखरी अळी : ही हिरव्या रंगाची असून डोके गर्द काळे असते. अळी प्रथम भुईमूगाची पाने पोखरते, त्यामुळे पानावर फिक्कट ठिपक्यासारखा फोड दिसतो. नंतर अळी पानाची गुंडाळी करून पाने खाते. यामुळे झाडाची वाढ खुंटते, तसेच झाडावर शेंगा लहान लागतात व शेंगा भरत नाहीत. जास्त प्रादुर्भाव झालेले पीक जळाल्यासारखे दिसते. पानाच्या गुंडाळीत अळी अथवा कोष आढळतो. खरीप पिकावर या किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो.

५) लाल केसाळ अळी: पुर्ण वाढ झालेली केसाळ अळी २.५ ते ३ सेमी लांब असून तिच्या शरीरावर लांब - लांब केसाचे अनेक झुपके असतात. लहान - लहान अळ्या झाडाचे कोवळे शेंडे खातात तर पुर्ण वाढ झालेल्या अळ्या संपुर्ण झाडाची पाने खाऊन फस्त करतात. ही कीड शेतामागून शेत फस्त करीत इतस्तत: फिरत असते.

६) तंबाखूची पाने खाणारी अळी : या किडीला शास्त्रीय भाषेत स्पोडोप्टेरा लिटूरा या नावाने ओळखतात. या किडी, पतंग, अंडी, अळी व कोष अशा चार अवस्थात असतात. किडीचा पतंग मजबूत बांध्याचा, २२ मिमी लांब असून त्याचा पंख विस्तार ४० मिमी असतो. पुढील पंख सोनेरी व करड्या - तांबड्या रंगाचे असून त्यावर नागमोडी पांढऱ्या खुणा असतात. मागील पंख पांढरे असून कडेला तांबडी झालर असते. लहान अळी पांढुरकी हिरवी व थोडीशी पारदर्शक दिसते. पुर्ण वाढलेली अळी ५० मिमी लांब आणि वेगवेगळ्या रंगाची असते. त्यामध्ये जास्तीत जास्त पिकावर ती काळपट रंगाची ते पांढऱ्या रंगाची असून तिच्या पाठीवर काळे ठिपके व रेषा, तर शरीराचे बाजूवर पांढरे पट्टे दिसून येतात. पुर्ण वाढ झालेली अळी जमिनीत कोषावस्थेत जाते. कोष काळपट लाल रंगाचा दिसतो. तर अंडी पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्याने आढळून येतात व ती शरीराच्या केसांनी आच्छादलेली असतात. या किडीची मादी पतंग पानाच्या खालच्या बाजूने पुंजक्यानी अंडी घालतो. एका अंडी पुंजामध्ये सहसा ८० - १०० अंडी असतात. एक मादी तिच्या संपूर्ण आयुष्यात सरासरी ३०० ते ४०० अंडी घालते. अंडी अवस्था ३ ते ४ दिवस तर अळी अवस्था २१ -२२ दिवस असते. पुर्ण वाढ झालेली अळी जमिनीत कोषावस्थेत जाते. कोषावस्था ९ -१० दिवस असते. प्रौढावस्था जवळ - जवळ ६ - ७ दिवसांची असते. मादी प्रौढ कोषातून बाहेर येताच पानाच्या खाली अंडी घालणे सुरू करतात. एक पिढी पुर्ण होण्यास साधारणपणे ३२ ते ६० दिवस लागतात. पिकांवर असताना ही पिढी साधारणपणे ३५ ते ४० दिवसात पुर्ण होते. या किडीने पुंजक्यात घातलेल्या अंडीमधून लहान - लहान अळ्या समुहात बाहेर पडतात व प्रथमत: त्याचे पानातील हरीतद्रव्य मागील बाजूने राहून खातात. त्यामुळे पाने जाळीदार व कागदी होऊन पांढरी होतात. त्यावर किडींच्या विष्टेचे कण सुद्धा दिसतात. अशा प्रकारचे नुकसान इतरत्र आढळते. ह्याच अळ्या नंतर मोठ्या होऊन स्वतंत्रपणे पाने तसेच कोवळे शेंडे, फुले व कोवळ्या शेंगा खातात व पिकाचे नुकसान करतात. ही अत्यंत खादाड कीड असल्यामुळे संख्या वाढताच अतोनात नुकसान करतांना दिसून येते.

७) हुमणी : या किडीची अळी जमिनीमध्ये राहून पिकाच्या मुळांवर उपजीविका करते. ही कीड ज्वारी, बाजरी, ऊस, भात, भुईमूग, उडीद, मूग या पिकांवर सातत्याने आढळून येत.

व्यवस्थापन :

१) पीक फेरपालटीसाठी गहू, मका, ज्वारी, कांदा इ. पिके घ्यावीत.

२) जमिनीची खोलवर नांगरट व कुळवणी करून काडी, कचरा, धसकटे वेचून शेत साफ ठेवावे.

३) भुईमूगाची लवकरात लवकर पेरणी करावी.

४) बाजरी, ज्वारी, तूर, मका ही अंतरपिके एकास तीन या प्रमाणात घ्यावीत, पिकाभोवती, एरंडी ही सापळा पिके लावावीत. म्हणजे केसाळ अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी यापासून भुईमूगाचे संरक्षण होईल.

५) पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी १० ते १२ पक्षीथांबे लावावेत.

६) ५% निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

७) परोपजीवी किटक ट्रायकोग्रामा चिलोनीस ५०,००० अंडी/ हेक्टर (२ ते ३ ट्रायकोकडिस) ७ ते १० दिवसांच्या अंतराने २ वेळेस अथवा ब्रॅकॉन हिबेटर ५०००/हे. सोडावेत.

८) तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळीच्या संनियंत्रणासाठी/कीड सर्वेक्षणासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे जमिनीपासून १ मीटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळ्यामध्ये ८ - १० पतंग प्रति सापळा सतत ३ दिवस आढळल्यास कामगंध सापळ्यांची संख्या वाढविणे आवश्यक ठरते. अशा वेळी या अळीच्या नियंत्रणाकरिता प्रति हेक्टरी २० ते २५ कामगंध सापळे लावावेत.

९) तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच बॅसिलस थुरीनजीएन्सीसची पाण्यात

विरघळणारी भुकटी १ ते १।। किलो प्रति हेक्टरी ५०० लि. पाण्यात किंवा एस.एल.एन.पी. व्ही. विषाणू २५० एल.ई./हे. याप्रमाणे फवारणी करावी.

१० ) भुईमूगावरील तुडतुडे आणि फुलकिडे यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी किडीनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यावर लिंबोळीचा ५% अर्क किंवा अॅझाडीरेक्टीन १५०० पी.पी.एम. २ मिली/लि. या प्रमाणात प्रथम फवारणी आणी पंधरवाड्यानंतर दुसरी फवारणी करावी.

११) स्पोडोप्टेरा अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ डब्ल्यू.एस.जी. (२ ग्रॅम/१० लि. पाणी) किंवा स्पिनोसॅड ४५ एससी (३ मिली/ १० लि. पाणी) या किटकनाशकाची फवारणी करावी.

१२) ५% निंबोळी अर्क अथवा बी.टी. पावडर १ ते १।। किलो किंवा स्पोडोप्टेरा व घाटे अळीचा विषाणू २५० एल.ई./हेक्टर सोडावेत.

१३) ट्रायकोग्रामा चिलोनिस ५०,००० अंडी/ हेक्टर ७ ते १० दिवसाच्या अंतराने २ वेळेस अथवा ब्रॅकॉन हिबेटर ५०००/ हे. सोडावे.

१४) हुमणीचा प्रादुर्भाव वारंवार आढळणाऱ्या क्षेत्राकरिता प्रतिबंधात्मक बिजप्रक्रिया करण्याकरिता क्लोरोपायरीफॉस २०% प्रवाही किंवा क्विनॉलफॉस २५% प्रवाही २ लि. प्रति ८० किलो बियाण्यासाठी वापरावे. पहिल्या पावसानंतर जेव्हा भुंगे बाहेर येतात तेव्हा ०.१% कार्बरील १००० ग्रॅम/हे. ५०० लि. पाण्यात मिसळून प्रति हेक्टर याप्रमाणे तयार केलेल्या द्रावणाची फवारणी करावी. तसेच सातत्याने कीड येणाऱ्या भागकरिता बाभूळ, कडूलिंब आणि बोर यासारख्या झाडांवर किटकनाशकांची पहिली फवारणी करावी. जर भुंग्याची संख्या प्रत्येक झाडावर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त असेल तर फवारणी मोहिम स्वरूपात राबवावी. किटकनाशकांचा वापर करताना मजुरांना संरक्षक साधने पुरवावीत. गरज भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर ३ आठवड्यांनी करावी. किटकनाशक जमिनीमध्ये चांगल्या रितीने मिसळावे किंवा भुकटी जमिनीत पेरावी. फवारणी केलेल्या झाडांची पाने १० दिवसापर्यंत जनावरांना खाऊ घालू नयेत. पुर्वमशागतीच्या वेळेला क्विनॉलफॉस ५% दाणेदार/हेक्टर २५ किलो किंवा फोरेट १० % दाणेदार/हेक्टर २५ किलो किंवा कार्बोफ्युरॉन ३% दाणेदार/हेक्टर २५ किलो जमिनीत टाकावे.

१५) गरज भासल्यास रासायनिक किटकनाशकांची पट्टा/खंड फवारणी करावी.

कीड   किटकनाशक   मात्रा/१० लि. पाणी  
पाने गुंडाळणारी अळी,
नाग अळी
स्पोडोप्टेरा (तंबाखुवरील पाने खाणारी अळी)  
डेल्टामेथ्रीन २.८% प्रवाही किंवा
क्विनॉलफॉस २५% प्रवाही किंवा
मिथिल पॅराथिऑन २% भुकटी किंवा
कार्बारील ५० % प्रवाही किंवा
सायपरमेथ्रीन २५% प्रवाही किंवा
फेन्व्हलरेट २०% प्रवाही किंवा
मोनोक्राटोफॉस ३६% प्रवाही किंवा
मॅलॅथीऑन ५% भुकटी किंवा
क्विनॉलफॉस १.५% भुकटी किंवा
फॉसेलॉन ४% भुकटी
क्विंनॉलफॉस २५ ईसी किंवा
क्लोरोपायरीफॉस २० ईसी किंवा
इमामॅक्टीन बेन्झोटीक ५ ग्रॅम किंवा
स्पिनोसॉड ५ एसजी
इनडॉक्झाकार्ब ७५ एसपी
मिथोमिल ४० एसपी किंवा
थायोडीकार्ब ७५ एसपी
१० मिली
१६ मिली
२० किलो/हेक्टरी
४० ग्रॅम
४ मिली
१० मिली
१६ मिली
२० किलो/हेक्टरी
२० किलो/हेक्टरी
२० किलो/हेक्टरी
२० मिली
२० मिली
४ ग्रॅम
४ ग्रॅम
१० मिली
२० मिली
१५ मिली
 


१६) वरील किडींचे विषारी किटकनाशकाशिवाय डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे स्प्लेंडर हे सेंद्रिय किटकनाशक २०० ते २५० मिली/१०० लि. पाण्यातून किडीच्या प्राथमिक अवस्थेत फवारले असता कीड पिकास नुकसान पोहोचविण्यापुर्वीच नियंत्रणात येते. तसेच प्रतिबंधक उपाय म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृतासोबत स्प्लेंडर पीक उगवणीनंतर नियमित १५ दिवसांच्या अंतराने फवारणे हितावह ठरते.