हिरवळीचे खत

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जमिनीचा पोत टिकविण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीच्या खताला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ होत आहे. रासायनिक खतांच्या अवाजवी व अयोग्य वापरामुळे जमिनीची सुपिकता व उत्पादनक्षमता बिघडली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खताची गरज भागवावयाची असेल तर हिरवळीची खते हा योग्य पर्याय आहे.

हिरवळीचे खत म्हणजे वनस्पतीचे हिरवे अवशेष जमिनीत वाढवून किंवा बाहेरून आणून जमिनीत गाडणे किंवा वनस्पतींच्या हिरव्या अवशेषावरून तयार झालेले खत होय.

हिरवळीच्या खतांचे फायदे :

१) हिरवळीच्या खतांमध्ये ह्युमस नावाचे सेंद्रिय द्रव्य असते, त्यामुळे मातीला काळा रंग येतो.

२) हिरवळीच्या खतामधील सेंद्रिय द्रव्यांमुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणुंना अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. परिणामी जिवाणुंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमाने वाढते. जमिनीतील पोषक द्रव्ये रासायनिक क्रियेने विरघळून ती पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात.

३) लवकर कुजणारी हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदचे प्रमाण आणी अॅझोटोबॅक्टरसारख्या जिवाणुंचे प्रमाण वाढते.

४) जमिनीत टिकून राहणाऱ्या कणसमूहांचे प्रमाण वाढते.

५) जमिनीची जलधारणा क्षमता वाढते. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूपही कमी होते.

६) सेंद्रिय पदार्थांमुळे माती रवेदार होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत साचून न राहता. त्याचा निचरा लवकर होतो. हलक्या जमिनीत देखील सेंद्रिय पदार्थांमुळे पाणीधारण करण्याची क्षमता वाढते.

७) द्विदल वर्गातील हिरवळीची पिके ही हवेतील नत्र शोषून घेतात आणि ते नत्र जमिनीत साठविले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते.

८) क्षार जमिनीत हिरवळीचे पीक गाडण्यामुळे जमिनीतील क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीखाली आणता येतात.

९) हिरवळीच्या खताची पिके जमिनीत असेंद्रिय स्फुरदाचे सेंद्रिय स्फुरदात रूपांतर करतात व जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.

१०) हिरवळीच्या पिकांच्या दाट वाढीमुळे तणांचा नायनाट होण्यास मदत होते.

हिरवळीच्या खतांसाठी योग्य असलेली पिके:

१) ताग : जमिनीचे एक प्रकारचे पुन:रूज्जीवन करण्याकरिता आपल्या देशामध्ये ताग मोठ्या प्रमाणावर पेरतात. मान्सूनच्या पावसावर तयार होणारे हे पीक आहे. हे पीक फारच झपाट्याने वाढते. १।। ते २ मीटर उंच वाढण्यासाठी जास्तीत जास्त ६ ते ८ आठवड्यांचा कालावधी पुरेसा होतो. जमिनीत ओलावा भरपूर असल्यास हे पीक लवकर कुजते.

असे हे तागाचे पीक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या संशोधन केंद्रावर उन्हाळ्यात 'सम्राट' सिताफळ आणि 'सिद्धीविनायक ' शेवग्यामध्ये घेतले होते. या पिकाच्या दाट हिरवळीमुळे जमिनीत ओलावा कायम टिकून रहात आहे. तसेच आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. याचा फायदा शेवग्याची शेंग पोसण्यासाठी होत आहे. शेंगेला उन्हाळ्यातही हिरवीगार राहून रसरशीतपणा वाढतो आहे.

त्याचबरोबर जमिनीत आर्द्रता वाढल्याने एरवी जे दक्षिणेकडील उन्हाच्या तिरपीने सिताफळाचे नाजूक फुल वाळून वाऱ्याने ते गळून जाते ते या हिरवळीच्या पिकाच्या ओलाव्याने बागेत आर्द्रतायुक्त (मायक्रो क्लायमेंट) तयार झाल्याने फुल न गळता त्याचे पोषण होऊन फळात रूपांतर होते. असे हे हिरवळीच्या खताबरोबरच बहुउद्देशीय तागाचे पीक फायदेशीर ठरत आहे. (या प्रयोगाचा संदर्भासाठी कव्हरवर फोटो दिलेला आहे. )

२) चवळी : चवळी, कुलथी, जंगली इंडिगो आणि तूर ह्याही पिकांचा थोड्या फार प्रमाणात हिरवळीच्या खतांसाठी वापर होतो. ही पिके द्विदल व दाळवर्गीय असल्याने यांच्या मुळांवर गाठी असतात व त्यामुळे नत्र स्थिरीकरण चांगले होते.

३) धैंचा : हिरळीचे खत तयार करण्यासाठी ताग व चवळी नंतर हे तिसरे महत्त्वाचे पीक आहे. हे पीक अनुकूल परिस्थिती नसतानाही उत्तम वाढते. ज्या जमिनी जास्त क्षारयुक्त किंवा ओलावा धरून ठेवतात अशा जमिनीत देखील हे पीक जोमाने वाढते व याचे उत्तम प्रकारचे हिरवळीचे खत तयार होते.

४) गवार : गवार ह्या डाळवर्गीय पिकाच्या खतापासून पिकांच्या मुळावरील गाठीतील जीवाणू वातावरणातील नत्राचे रूपांतर दुसऱ्या स्वरूपात करून तो इतर पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम करते. तसेच हिरवळीच्या खताने जमिनीमधील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.

अ.न. हिरवळीची पिके   हेक्टरी बियाणे (किलो)   जमिनीचा प्रकार   हंगाम   सरासरी (टन/ हे.)   प्रति हेक्टरी उपलब्ध नत्र (किलो)  
१   ताग   ७५   कोणत्याही प्रकारची पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन   उन्हाळा पावसाळा   १९   ८० ते ९०  
२   धैंचा   ४५   खारवट/ चोपण   उन्हाळा पावसाळा   १७   १५० ते १८०  
३   चवळी   ३५   हलकी ते मध्यम काळी   उन्हाळा पावसाळा   १३   ५० ते ६०  
४   उडीद,
मुग  
२०
२५  
हलक्या प्रकारची   पावसाळा   ८   ५० ते ६०  


हिरवळीचे खत तयार करण्याची पद्धत : हिरवळीच्या खतपिकांपासून जास्तीत - जास्त फायदा करून घ्यावयाचा असल्यास पीक पेरण्यापासून ते जमिनीमध्ये गाडेपर्यंत ज्या निरनिराळ्या मशागती कराव्या लागतात, त्याबाबतची संपुर्ण माहिती असणे आवश्यक आहे. कारण यावरच पुढील पीक चांगले येणे अवलंबून असते.

१) हिरवळीच्या खत पिकांची पेरणी अशावेळी केली पाहिजे की ते पीक जमिनीत दाबल्यावर कुजून जाऊन पुढील पिकाला त्यापासून जास्तीत जास्त फायद होईल. पिकाची प्रेरणी व जमिनीत दाबणी अशावेळी व्हावयास हवी की जेणेकरून हिरवळीच्या खतापासून मिळणारी मुलद्रव्ये जमिनीतून निचऱ्याद्वारे अथवा अन्य कारणांनी निघून जाणार नाहीत, तसेच हिरवळीच्या खत पिकांची कुजण्याचीही क्रिया होईल.

हिरवळीचे खत चांगले होण्यासाठी फोकावयाचे वा पेरावयाचे बी जर्मिनेटर व प्रोटेक्टंटच्या द्रावणामध्ये प्रक्रिया करून वापरावे म्हणजे उगवण व वाढ लवकर एकसारखी होते. कल्पतरू एकरी १०० किलो वापरावे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी खालीलप्रमाणे २ फवारण्या कराव्यात

१) पहिली फवारणी : (उगवून आल्यावर १५ ते २१ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ३५० मिली. + क्रॉंपशाईनर ४०० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० ते १२५ लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवून आल्यावर ३५ ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० ते ७५० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + राईपनर ५०० मिली + १५० ते २०० लि. पाणी.

पीक उगवून १५, ३० व ४५ दिवसाचे झाल्यावर २५०,५०० व ७५० मिली १०० ते १५० लि. पाण्यातून सप्तामृत फवारावे

२) पेरण्याची वेळ : ताग, धैंचा, उडीद, मूग या हिरवळीच्या खत पिकांची पेरणी करण्यास उत्तम वेळ म्हणजे जून किंवा जुलैची सुरुवात होय. मान्सून चालू होण्याअगोदरच पीक जोमाने वाढले म्हणजे मान्सूनच्या पावसामुळे ते जमिनीवर लोळणार नाही.

३) हिरवळीचे खतपीक जमिनीत गाडण्याची वेळ सर्वसाधारणपणे पीक फुलोऱ्यात यावयास लागल्यानंतर गाडणे हितकारक ठरते. कारण त्यावेळी पीक सर्वसाधारणपणे आठ आठवड्यांचे असून त्याची भरपूर वाढ झालेली असते व झाडे टणकही झालेली नसतात.

४) हिरवळीचे खत कुजण्याची क्रिया: हिरवळीचे खत जमिनीत गाडल्यानंतर अनेक प्रकारच्या जिवाणूंच्या कार्यामुळे हे पीक सडून जाते. जलद कुजण्याची क्रिया ही पुढील गोष्टींवर अवलंबून असते.

अ) पावसाळ्याच्या प्रमाणावर व केव्हा पाऊस पडतो यावर

ब) हिरवळीच्या पिकांची घटक द्रव्ये

क) जिवाणूंना जमिनीतील लागणाऱ्या असेंद्रिय अन्न द्रव्यांच्या प्रमाणावर अवलंबून असते.

ड) तसेच पीक किती खोलवर दाबले यावर कुजण्याच्या क्रियेचा वेग अवलंबून राहतो. हलक्या जमिनीमध्ये पीक थोडे जास्त खोलवर गाडावे.

५) हिरवळीचे खत पीक गाडणे व दुसरे पीक पेरणे यामधील अनुकूल कालावधी. हिरवळीचे पीक गाडणे व दुसरे पीक पेरणे यामधील कालावधी फार महत्त्वाचा आहे. सेंद्रिय पदार्थ संपुर्णपणे व्यवस्थित कुजून नत्राचे रूपांतर नायट्रेटमध्ये झाल्यानंतर दुसऱ्या पिकाची पेरणी करणे योग्य ठरते. संशोधनावरून असे दिसून आले आहे, की व्यवस्थित कुजण्यास आठ आठवड्यांचा तरी कालावधी लागतो. पण कुजण्याचा कालावधी हा पिकांच्या लुसलुसीत व कोवळेपणावर अवलंबून असतो.

उत्तम हिरवळीच्या खताच्या पिकांचे गुणधर्म :

१) हिरवळीचे पीक कमी कालावधीत वाढणारे आणि भरपूर पालेदार व हिरवेगार असावे.

२) पीक सुरुवातीच्या वाढीच्या काळात भरपूर वाढणारे असावे, जेणेकरून तणांचा नायनाट होण्यास मदत होईल.

३) पिकांचे खोड कोवळे आणि लुसलुसीत असावे, म्हणजे कुजण्याची क्रिया लवकर होते.

४) हिरवळीचे पीक द्विदल वर्गातील असावे, म्हणजे वातावरणातील नत्र स्थिर होण्यास मदत होते.

५) पिकांची मुळे खोलवर जाणारी असावीत, जेणेकरून जमिनीखालच्या थरातील अन्नद्रव्ये वरच्या थरांपर्यंत शोषून आणतील.

६) पीक हलक्या जमिनीवर व कमी पाण्यावर जोमाने वाढणारे असावे.

अशाप्रकारे वरील सर्व बाबींचा विचार करता शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खतांचा वापर केल्यास पिकांच्या उत्पादनात निश्चितच वाढ होईल. त्यामुळे हिरवळीची खतपिके घेणे ही काळाची गरज आहे. शेतकरी बंधुंनी कमीत कमी ३ वर्षातून एकदा हिरवळीचे पीक जमिनीत गाडल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होऊन जमिनीतील अन्न घटक पिकास सहज उपलब्ध होतील.