कोकणच्या आदिवासी भागात सरांच्या 'सिद्धीविनायक' शेवग्याची यशस्वी लागवड

श्री. पुरुषोत्तम सुर्यकांत आगाशे,
एस.एस्सी.पीएच.डी. (आरोग्यशास्त्र), व्ही -३, चैतन्यनगरी, वारजे, पुणे -५८.
मोब. ९४२२३२०७३८



मी पुणे विद्यापीठातून २००५ साली आरोग्य शास्त्रामध्ये पीएच.डी. केली असून त्यानंतर ग्रामभारती समाज परिवर्तन संस्थेला सचिव म्हणून आदिवासी ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात गेली ५ - ६ वर्षापासून कार्य करीत आहे. तेथील आदिवाशी कुटुंबांना भाजीपाला लागवडीसंदर्भात बियाणे पुरविणे, त्यांच्याकडून त्याची जोपासना करून आरोग्यदायी भाजीपाला उत्पादन करून त्यांचे कुपोषण थांबविण्यासाठी तसेच त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. यामध्ये गेल्यावर्षी ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी 'सिद्धीविनायक' शेवग्याची टप्प्याटप्प्याने अशी एकूण १० पाकिटे नेऊन प्रसार केला आहे. यापुर्वी दुसरा शेवगा नेत असे. मात्र त्याची उगवण ५०% च होत असे, त्याचे उत्पादनही कमी होते. म्हणून हा 'सिद्धीविनायक' शेवगा गेल्यावर्षी दिला. त्याची काही आदिवासी शेतकऱ्यांकडे ७०% उगवण झाली तर काहींनी चांगली जोपासना केली त्यांची १००% उगाण झाली आहे. आता सध्या हा शेवगा फुलकळी, शेंगाच्या अवस्थेत आहे. त्याचे उत्पादन आता चालू होईल.

कोकणपट्टी भागात २ वेळा शेवग्याची लागवड करता येऊ शकते. एक म्हणजे जून - जुलैमध्ये मोठा पाऊस पडून गेल्यानंतर ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये याची लागवड करता येते आणि दुसरी म्हणजे फेब्रुवारीमध्ये लागवड करता येते. फेब्रुवारीतील लागवडीची रोपे जून - जुलैमधील पाऊस सुरू होण्यापुर्वी २ - ३ फुट उंचीची सशक्त तयार झाल्यावर पावसाळ्यात तग धरतील अशी तयार होतात. जव्हार भागात माकडांचा प्रादुर्भाव नसल्याने तेथे शेवगा लागवडीस काही अडचण येत नाही. कोकणातील जमीन तांबडी असल्याने त्यात आयर्न घटक जादा असल्याने त्याची कमी काळात जास्त जोमाने वाढ होते.

शेवग्याला आदिवासी लोक कळशीने पाणी देतात. शेवग्याबरोबरच सरांनी आळू कंदाची लागवड करण्यास सांगितले. प्रत्येकाने २ - ३ कंद जरी लावले तरी त्यापासून ५ - १० पाने मिळून घरच्यापुरती भाजी होते. तसेच २- ३ कंदांपासून पुन्हा प्रसार होऊन अनेक कंद मिळतात, असे कंद त्यांना १० रू. प्रमाणे विकता येतील. आळूला मात्र अंघोळीच्या, भांड्याच्या किंवा कपड्याच्या साबणाचे पानी टाकू नये. कारण त्या साबणाचा अंश आळूच्या पानांत येऊन अशी भाजी खाल्ल्यावर मुतखड्याचा प्रादुर्भाव १।। ते २ पटीने वाढेल. आळूला खरकट्या भांड्याचे (अन्नाचे अंश असलेले) पाणी टाकले तर ते चालते. आज (१४ फेब्रुवारी २०१५) मी पुन्हा 'सिद्धीविनायाक' शेवग्याची ८ पाकिटे बी घेऊन जात आहे. लुपीन ह्युमन डेव्हलपमेंट लि. चे धुळे, नंदुरबार, शहादा भागात चांगले काम आहे.