आंबा निर्यातीसाठी आवश्यक बाबी

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


आंब्याचे जगतील उत्पादनाच्या निम्मे उत्पादन हे भारतात होत असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला वाटा जेमतेम ६ टक्के आहे. जागतिक बाजारपेठेतील मागणी बघता निर्यातीस मोठा वाव असून त्यासठी विशिष्ट गुणवत्तेचे फळ लागते. निर्यातक्षम आंब्याला केवळ परदेशी नव्हे तर देशांतर्गत बाजारपेठेतही चांगली मागणी असते. त्याकरिता निर्यातक्षम आंब्यासाठी पायाभुत गुणवत्ता ही खालीलप्रमाणे हवी.

* भौतिक प्रमाण : यात आब्याच्या बाह्यारूपाचा समावेश होतो. आंबा दिसायला कसा आहे. ही बाब महत्त्वाची असते. तो पूर्ण परिपक्व असावा. निरोगी, कडक आणि खाण्यायोग्य असावा. आंबा स्वच्छ आणि ठिपके विरहित असला पाहिजे. आंब्यावर कोणत्याही प्रकराचे ओरखडे नसावेत आणि त्याला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नसावी. फळ जीवजंतुपासून मुक्त असले पाहिजे व त्यावर जीवजंतुंचा प्रादुर्भाव नसावा. फळ बाहेरच्या उष्णतेपासून मुक्त असले पाहिजे. शीतगृहातून आंबा काढल्यानंतर त्यावर पाण्याचे थेंब नसावेत. फळाचे देठ १ सें. मी. हुन अधिक लांब देठ नसावे. तसेच ते निरोगी असावे आणि ते फळ करपा रोगापासून मुक्त असावे. फळ पूर्ण विकसित आणि पिकलेले असावे.

* आकार, वजन, रंग : निर्यातक्षम आंब्यासाठी आकार जाणीवपूर्वक तपासाल जातो. त्यामुळे योग्य आकाराची व शक्यतो एकसारखी फळे असावीत. निर्यातीसाठी केशर आंबा फळाचे वजन २५० ग्रॅम असावे. त्यात फार तर १० टक्के घट चालते. आंबे पाठविताना पेटीतून पाठवावे लागतात. एकसारखी फळे एका पेटीत ठेवावीत. निर्याती साठी रंग महत्त्वाचा घटक आहे. निर्यात केलेला आंबा ग्राहक किंवा बाजारपेठेत पोहोचतो, तेव्हा तो एकसारखा पिवळ्या रंगाचा असावा.

* रासायनिक प्रमाण : आंब्यावर किंवा झाडावर अनेक प्रकारची किटकनाशके आणि औषधे फवारावी लागतात. त्यांचा अंश अपरिहार्यपणे फळांत येतो. असे अंश किती व कोणत्या प्रमाणात असावेत, याचे निकष आयात करणाऱ्या देशाने निश्चित केले आहेत. ज्या देशात निर्यात करायची आहे. तेथील निकषांच्या अधीन राहूनच आपले फळ असले पाहिजे. समजा त्या देशात बंदी घातलेले कीटकनाशक आपल्या फळांत असले तर तो देश आंबा स्वीकारणार नाही. फळातील सर्व प्रकारची भारी तत्त्वेही त्या देशाने निश्चित केल्यानुसार असावीत.

* निर्यातीसाठी महत्त्वाचे मुद्दे :

* फळ पेटीत भरताना ते एकसारखे असावे. प्रत्येक फल सारख्या गुणवत्तेचे व दर्जाचे असावे. एका पेटीत एकाच जातीची फळे असावीत.

* निर्यात करताना आंबा सुरक्षित त्या देशात पोहोचला पाहिजे, अशा प्रकारे त्याचे पॅकिंग करावे लागते. पेटीला करण्यता येणाऱ्या पेकिंगला बारीक छिद्रे असावीत. त्यामुळे हवा खेळती राहते. पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य स्वच्छ आणि चांगल्या गुणवत्तेचे असले पाहिजे.

* प्रत्येक पॅकिंगवर ओळख चिन्ह, पळाचे नाव आणि माहिती, उत्पादनाचे स्थळ, वजन, पॅकिंग केल्याची तारीख आणि कोड नंबर असावा.

* निर्यातीची दिशा : योग्य प्रकारे नियोजन केल्यास नजीकच्या काळात भारतातून दरवर्षी ४४ हजार टन आंबा निर्यात होऊ शकतो. ही निर्यात समुद्रामार्ग किंवा विमानाने शक्य आहे.