३।। एकरात वर्षभरात १६ पिके, गेली २० वर्षे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी उत्तम घेत आहे

श्री. धोंडीभाऊ विष्णुजी नाईकरे,
(से.नि.वि.अ. शिक्षण प.स.खेड), दत्तनिवास, कमान चास, ता. खेड, जि. पुणे.
मो. ९४२०१६१२७७


डॉ. बावसकर सरांशी माझा मागील २० वर्षापासूनचा परिचय आहे. तेव्हापासून मी डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरत आहे. माझ्याकडे एकूण ३.५ एकर शेत जमीन आहे. विहीर बागायत आहे. यामध्ये खरिपात राजमा घेवडा, भुईमूग, सोयाबीन घेतो. रब्बीमध्ये कांदा (गरवा), बटाटा, ज्वारी, गहू, स्विटकॉर्न (शुगर - ७५), गोट कांदा , हरभरा ही पिके घेतो. उन्हाळ्यामध्ये मेथी, धना, शेपू, पालक, उन्हाळी बाजरी (६३ नंबर), उन्हाळी भुईमूग अशी पिके घेतो.

एकरातून ३ पिकांचे ३ महिन्यात ८० ते ९० हजार

या सर्व पिकांना डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरतो. राजमा घेवड्याची शेंग विकतो. एकरी एका तोड्याला २० पोती (५० - ६० किलोची) निघतात. असे २ - ३ तोडे होतात. हे ३ महिन्याचे पीक आहे. ओल्या शेंगेला साधारण ३० -५० रु. किलो भाव मिळतो. एकरी ३ महिन्यात ६० - ७० हजार रु. होतात. भाव नसेल तर त्या शेंगा वाळवून बी (दाणे) तयार होतात. ते बी ७० - ८० रु. किलो भावाने जाते. राजमामध्ये वरंब्यावर मका (शुगर - ७५) हे ही पीक घेता येते. राजमासाठी रान तयार केल्यावर प्रथम त्यात मेथीचे पीक घेता येते. मेथी उगवून ८ - १० दिवसाची झाली की, राजमा बी टोकायचे. म्हणजे राजमा उगवायला आठवडा लागतो आणि त्यानंतर आठवड्याभरातच म्हणजे २१ - २२ दिवसात मेथी निघते. याच पद्धतीने धना ही घेता येतो. कोथींबीर ३० दिवसात निघते. ही पालेभाज्या पिके निघाली की राजमा वाढीस लागतो. राजमा लागवडीच्या वेळीस वरंब्यावर २- ३ फुटावर मका टोकतो. त्यामुळे राजमावरील कीड मक्याकडे जाऊन राजमा सुरक्षित राहतो. मक्याच्या उत्पन्नावर या किडीचा काही परिणाम होत नाही. ही तिन्ही पिके ३ महिन्यात निघतात. ही एकाच वेळी पिके घेत असल्याने खतांवर भर द्यावा लागतो. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्यांसोबत रासायनिक सम्राट (१८:४६), १०:२६:२६ ही खते साधारण एकरी ५ - ६ बॅगा देतो. राजम्याला ही खते पाण्याच्या अगोदर फेकून देतो. परंतु मक्याला खोडाजवळ चिमुट - चिमुट गाडून देतो. त्याचा चांगला फायदा होतो.

राजमावर पाने आकसने (थ्रीप्स) यासाठी रासायनिक किटकनाशकाचाही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीसोबत वापर करतो. मेथी - कोथिंबीरीचे बाजारभावाप्रमाणे १० -२० हजार रु. होतात. मक्याचे १० - १५ हजार रु. होतात. असे एकरातून तिन्ही पिकांपासून ८० -९० हजार रु. एका हंगामात होतात.

विक्रीसाठी पुखराज तर खाण्यासाठी ज्योती बटाटा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने उत्कृष्ट

बटाटा बेणे आणून डोळे पाहून कापून जर्मिनेटरची बेणे प्रक्रिया करून सुकल्यावर ३ फणी यंत्राने ६ इंच खोलीच्या सऱ्या पाडून त्यामध्ये ६ - ७ इंचावर १ - १ फोड पालथी (कापलेली) बाजू खाली व डोळे वरच्या बाजूला राहतील अशी) लावून ते मातीने झाकून त्यावरून कल्पतरू सेंद्रिय खत एकरी २ बॅगा, १०:२६:२६ च्या ६ बॅगा सरीतून देऊन नंतर मधला वरंभा लाकडी नांगरीने फोडून भर लावली जाते व पडलेल्या सरीतून लागवडीनंतर साधारण आठवड्याने पाणी सोडतो. दोन सऱ्यामध्ये १।। फुटाचे अंतर असते. त्यामुळे बटाटा चांगला पोसतो. पुखराज बटाटा ३ महिन्यात काढणीस येतो. ज्योती बटाट्याला ३।। महिने लागतात. ज्योती घरी खाण्यास चांगला (चवीष्ट) असतो. याचे उत्पन्न थोडे कमी मात्र भाव अधिक मिळतात. ज्योतीचे बेण्याच्या आकारानुसार ६ ते ७ क्विंटल. बेणे लागते. एकरी ज्योतीची १५० ते १६० पिशवी (५० - ६० किलोची) निघते. तर पुखराजची २०० पिशवी माल निघतो. गरवी कांद्याला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ३ - ४ फवारण्या घेतो. कांद्याचे उत्पादन एकरी ३०० ते ३५० पिशवी निघते.

स्वीटकॉर्न शुगर - ७५ काढणीस हिवाळ्यात ३।। ते ४ महिने लागतात. चालूवर्षी १।। किलो बी २० - २५ गुंठ्यात लावले आहे. १।। - २ फुट रुंदीची सरी आहे. वरंब्यावर अगोदर धना फेकून नंतर मका बी वरंब्याच्या बगलेत टोकले. मक्याला ३ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या केल्या. लागवडीनंतर १५ दिवसांनी युरीया १ बॅग, झिंक ५ किलो दिले. त्यानंतर कोथिंबीरीला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची फवारणी केली. त्यामुळे कोथिंबीर लवकर काढणीस आली. कोथिंबीर काढल्यावर म्हणजे मका ३५ दिवसाचा असताना खुरपणी करून १०:२६:२६ १ बॅग खत रिंग पद्धतीने प्रत्येक झाडास दिले. नंतर २.५ महिन्याने पोटॅश (विद्राव्य खत) पाण्यातून सोडले. या खत व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्यांमुळे मक्याची कणसे चांगली पोसली.

आज (१० फेब्रुवारी २०१७) ला कणसे पुणे फणसे पुणे मार्केटला विक्रीस आणली आहेत. १२५ पिशवी (४० किलोची) कणसे निघाली. ५ टन माळ निघाला. २ कणसाचे वजन १ किलोच्या पुढे भरत आहे. दर्जेदार आलेली कणसे सरांना दाखविण्यास घेऊन आलो आहे. यातील आंतरपीक कोथिंबीरीचे उत्पादन चांगले मिळाले. मात्र भाव नव्हते तरी त्याचे ५ हजार रु. झाले होते. कणसांचे ४० हजार रु. होतील.