सरांच्या तंत्रज्ञानाने मका व गव्हाचे विक्रमी दर्जेदार उत्पादन

अॅड. देवीदास शंकरराव खिलारे,
मु. पो. सोनवडी बु।।, ता. फलटण, जि. सातारा.
मोबा. ९८२२७३०६३७


आमची २००६ मध्ये लावलेल्या 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून चांगली भरभराट झाली. त्यापूर्वी शेतीतून जेमतेम उत्पादन खर्च निघणेही अवघड जात होते. मात्र डॉ.बावसकर सरांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ५ - ६ वर्षापासून शेवगा व इतर धान्य पिकांपासून विक्रमी उत्पादन घेत आहे. (शेवग्यासंदर्भातील सविस्तर मुलाखत - शेवगा पुस्तक, पान नं. ३९ वर 'वकिली करण्यापेक्षा शेवग्याची शेती देते कष्टाचा पैसा व आत्मीक समाधान' पहावी.)

दोन एकरमध्ये खरीप हंगामात २ जुलै २०१० रोजी पिनाकॉल मका केली होती. त्याला प्रथम कल्पतरू सेंद्रिय खत ४ बॅगा, गांडूळ खत १०० किलो आणि देशी गाईचे शेणखत १०० किली एकत्र मिसळून मशागतीनंतर रानात समप्रमाणात फोकले आणि नंतर मका पेरली.

सप्तामृताची या मका पिकास १ महिनाचा प्लॉट असताना पहिली फवारणी केली, नंतर ४० -४५ दिवसांचा प्लॉट असताना दुसरी फवारणी केली. एवढ्या २ फवारण्या व वरील खतांच्या मात्रेवर २ एकरात आम्हाला ७६ क्विंटल ३३ किलो उतारा मिळाला.

मका केल्यावर मूग, मेथीचे बेवड

मका काढल्यानंतर रानाची मशागत करून २ एकर क्षेत्रामधील १ एकरमध्ये मूग आणि १ एकरमध्ये मेथी केली आणि ही पिके महिन्याची झाल्यानंतर जमिनीत गाडली. त्याच्या बेवडावर आणि कल्पतरू सेंद्रिय खत पुन्हा ४ बॅगा, गांडूळखत १०० किलो व देशी गाईचे शेणखत १०० किलो एकत्र मिसळून देऊन ५ डिसेंबर २०१० रोजी गोल्डन - २३ गहू पेरला, या गव्हाला फुटवे निघण्यासाठी सप्तामृताची पहिली फवारणी केली. नंतर ओंबी निघतेवेळेस दुसरी फवारणी केली. एवढ्यावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव न होता गव्हाचे पीक अतिशय जोमदार आले. (संदर्भासाठी कव्हरवर फोटो दिला आहे) दोन एकरात ३९ क्विंटल ४० किलो गव्हाचा उतारा मिळाला.

एकदल पिकावर एकदल पीक घेतले जात नाही, कारण उत्पादन मार खाते. मात्र वरील तंत्रज्ञानाने दोन्ही पिकांचे विक्रमी उत्पादन घेण्यात आम्ही यशस्वी झालो.

आता त्याच रानात चवळीचा बेवड करून सरांच्या मार्गदर्शनाखाली आल्याची लागवड करणार आहे.