गांडूळखत निर्मितीचे तंत्र व शेतीसाठी त्याचे फायदे

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जमिनीचा सुपीक थर होण्यासाठी गांडुळाचे महत्त्वाचे कार्य आहे. गांडुळाच्या शरीरामध्ये प्रोटोलायटीक, सेल्युलो लाटकीक आणि लिग्नो लायटीक एन्झाईम्स असतात . या एन्झाईम्समुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन साध्या सेंद्रिय पदार्थांतील सहजीवी जीवाणू व अॅक्टीनोमायसीटीस बुरशीमुळे लिगनीनयुक्त सहसा लवकर न कुजणार्‍या पदार्थांचे अन्नद्रवीकरण होते.

गांडूळ ह्या प्राण्याचा अॅनिलिडा समूहात व ओलिगोचीटा वर्गात समावेश होतो. आपल्या शेतीसाठी गांडूळ नवीन नाहीत. मराठीत गांडूळ,, दानवे वाळे, शिदोड अथवा केंचवे या नावाने ओळखल्या जाणार्‍या या प्राण्याला इंग्रजीत 'अर्थवर्म' असे नाव आहे. शेतीमधील विषारी किटकनाशकांच्या व रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ तर होतेच परंतु पर्यावरणावर दुष्परिणामही होतो. त्यामुळे जगातील बरेच देश गांडूळांचा वापर करीत आहेत.

आज ठिकठिकाणी चाललेल्या प्रयोगाद्वारे निसर्गशेतीची संकल्पना आज काही प्रमाणात रुजत चालली आहे. त्यात गांडूळ शेतीचा वापर (गांडूळांच्या वापर करून) पालापाचोळा, शेतातील काडी कचरा व जनावरांचे मलमुत्र इ. सेंद्रिय पदार्थाचा वापर करून गांडूळखत बागेत, शेतात अथवा कोणत्याही जागेत तयार करू शकतो. त्यासाठी गांडूळांची शास्त्रशुद्ध माहिती असणे गरजेचे आहे.

गांडूळ हा नाजूक गुळगुळीत, लवचीक शरीर असलेला भूचर असून तो २ इंचापासून दोन फुटापर्यंत लांब असून त्याचे वजन ०.५ ग्रॅम पासून १० ग्रॅमपर्यंत असून शकते. हा रंगाने तांबूस, तपकिरी, लालसर किंवा पांढरट असतो. त्याला हवे ते वातावरण मिळाले की, तो अविश्रांत कार्य करीत असतो. शेण हे गांडूळांचे आवडते खाद्य असून शेणाबरोबर शेतातील काडीकचरा अथवा पालापाचोळा थोडी प्रक्रिया करून दिला तर ते गांडूळांचे उत्तम खाद्य ठरते.

जगात गांडूळांच्या ३०० हून अधिक जाती असल्या तरी त्यांचे मुख्यत: दोन गटांमध्ये वर्गीकरण केले जाते.

१) जमिनीच्या पृष्ठभागावर कचर्‍यात राहून कचरा खाणारी गांडुळे, ह्यांचा वाढीचा व उत्पत्तीचा वेग जास्त असल्यामुळे यांचा वापर मुख्यत: गांडूळखत तयार करण्यासाठी केला जातो. ह्या प्रकारामध्ये मुखत: आयसोनीया फीटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा इ. समावेश आहे.

२) दुसर्‍या प्रकराची गांडुळे जमिनीत खोलवर बिळे तयार करतात. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. ही गांडुळे जास्त प्रमाणात माती खातात व सेंद्रिय पदार्थ खाण्याचे प्रमाण फार कमी असते. जमिनीमध्ये योग्य वातावरण निर्माण केल्यास ही गांडूळे शेतजमिनीत आपोआप तयार होतात.

अर्धवट कुजलेला शेतातील / जैविक विघटनशील काडीकचरा, पालापाचोळा, टाकाऊ सेंद्रिय पदार्थ तसेच कुजलेले शेण इत्यादी पदार्थ कुजविण्यासाठी गांडुळांचा उपयोग केला असता ते पदार्थांचे तुकडे खाऊन चर्वन करतात. त्यांचे पचन करून कणीदार कातीच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतात त्यालाच 'गांडुळखत' असे म्हणतात. या खतामध्ये गांडुळांची लहान पिल्ले आणि अंडकोश यांचाही समावेश असतो.

गांडूळ खत तयार करण्यासाठी पुढील सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा.

१) पिकांचे अवशेष : धसकटे, पेंढा, ताटे, कोंडा, पालापाचोळा आणि गवत.

२) जनावरांपासून मिळणारी उप उत्पादीते : शेण, मूत्र, शेळ्या आणि मेंढ्यांची लीद, कोंबड्यांची विष्ठा, जनावरांची हाडे, काळती इत्यादी.

३) फळझाडे आणि वनझाडांचा पालापाचोळा

४) हिरवळीची खते : ताग, धैंचा, गिरीपुष्प, शेतीतील तण इ.

५) घरातील केरकचरा : उदा. भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न इत्यादी.

६) घरातील सांडपाणी.

गांडुळांची पैदास : गांडुळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी १, लांब १ मिटर रुंद आणि ३० सें. मी. जाडीचा सावकाश कुजणार्‍या सेंद्रिय पदार्थाचा म्हणजे लाकडाचा भुसा, भाताचे तूस, नारळाचा काथ्या, गवत अथवा असाचे पाचत यांचा थर द्यावा . त्यानंतर ३ सें. मी. जाडीचा कुजलेले शेणखत आणि बागेतील मातीच्या मिश्रणाचा थर द्यावा. प्रत्येक थरावर पाणी शिंपडून सर्व थर पाण्याने भिजवून घ्यावेत. वरच्या थरावर पूर्ण वाढ झालेली २००० गांडुळे सोडावीत, त्यावर गांडुळांच्या खाद्याचा १५ सें. मी. जाडीचा थर पसरावा. या खाद्यामध्ये १० भाग भाजीपाल्यांचे अवशेष अथवा कुजलेल्या पालापाचोळ्याचे असे मिश्रण करावे . हे मिश्रण गांडूळांच्या वाढीस पोषक खाद्य ठरते, या थरावर ५० % पाणी शिंपडावे. सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी ही खोकी सावलीत ठेवावीत. शेवट्या थरावर ओला बारदाना अंथरावा. उंदीर, घूस, मुंग्या, गोम, बेडूक यांपासून गांडूळांचे संरक्षण करावे.

८ ते १० दिवसानंतर खाद्याच्या पृष्ठभागावर लहान ढिगांच्या स्वरूपात गांडूळांची कणीदार कात दिसून येईल. ही कात ब्रशच्या सहाय्याने काढून घ्यावी. खाद्य जसजसे कमी होत जाईल तसतसे वरच्या थरावर खाद्य घालत जावे. कात काढल्यावर त्यामध्ये गांडुळे दिसली तर ती पुन्हा खोक्यात सोडावित. साधारणत : आयसीनीया फिटीडा, युड्रीलस युजेनिय या जातीच्या एका जोडीपासून तीन महिन्यानंतर ६० गांडूळांची निर्मिती होते. या गांडूळांचा उपयोग सेंद्रिय खत निर्मितीसाठी करावा. ६ महिन्यानंतर खोक्यातील सर्व थर बदलून वरीलप्रमाणे पुन्हा गांडूळांची निर्मिती करावी.

गांडूळखत करण्याच्या पद्धती : गांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छप्पराची शेड तयार करावी. या शेडची लांबी दोन ढिगांसती ४.२५ मीटर तर चार ढिगांसाठी ७.५० मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची १.२५ ते १.५० मीटर आणि मधल्या खांबांची उंची २.२५ ते २.५० मीटर ठेवावी. छप्परासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा. गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळांची योग्य जात निवडावी.

ढीग पद्धत : ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणत: २. ५ ते ३.० मी. लांबीचे आणि ९० सें.मी. रूंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणार्‍या पदार्थांचा ३ ते ५ सें. मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर ३ ते ५ सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थराचा उपयोग गांडूळांचे तात्पुरते निवासस्थान म्हणून होतो. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत. साधारणत: १०० कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी ७००० प्रौढ गांडुळे सोडावीत.

दुसर्‍या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर ३० ते ४० च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची ६० पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये ४० ते ५० % पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान २५ ते ३० सेल्सिअस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.

खड्डा पद्धत : खड्डा पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी छपराच्या अथवा झाडांच्या दाट सावलीत खड्डे तयार करावेत. खड्ड्यांची लांबी ३ मीटर, रुंदी २ मीटर आणि खोली ६० सें. मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा ३ ते ५ सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणत: १०० कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी ७००० पौढ गांडुळे सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत - जास्त ५० सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तपमाना नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळूवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांनी पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळखत तयार करण्यासाठी वापर करावा.

खत तयार होण्यास लागणारा कालावधी

गांडुळांचा वापर करून खत तयार होण्यास दिड महिन्याचा कालावधी लागतो. लिग्निनचे प्रमाण जास्त असणाऱ्या गवत आणि काजूची पाने यासारख्या सेंद्रिय पदार्थांपासून गांडूळखत तयार होण्यात सर्वाधिक तर घरातील अवशेषांपासून खत तयार होण्यास सर्वांत कमी वेळ लागतो.

गांडूळ खतांत असणारे महत्त्वाचे घटक -

१) गांडूळखतामध्ये मोनोसॅकॅराईडस, डायसॅकॅराईडस व पॉलीसॅकॅराईडस ही पिष्टमय पदार्थ, अमिनोआम्ल व साधी प्रथिने, स्निग्ध पदार्थ, लिग्नीन, न्युक्लीक ऑम्ल व ह्युमस ही कार्बनी रसायन जास्त प्रमाणात असतात.

२) गांडूळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण ४० ते ५० % असते. ह्युमसमध्ये ४० ते ५७% कार्बन, ४ ते ८% हायड्रोजन, ३३ ते ५४% ऑक्सिजन, ०.७ ते ५ % सल्फर व २ ते ५% नत्र असते.

३) गांडुळखतामध्ये १.८ % नत्र, ५७% स्फुरद, १.०% पालाश तसेच मँगनीज, झींक, कॉपर, मंगल, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात असतात.

गांडूळ खतांचे शेतीसाठी फायदे :

१) गांडुळांमुळे जमिनीचा पोत सुधारतो.

२) मातीच्या कणांचा रचणेत उपयुक्त बदल घडविला जातो.

३) गांडुळांची विष्ठा म्हणजे एक उत्तम प्रकारचे खत आहे याला 'ह्युमस' म्हणतात. यातून झाडाच्या वाढीसाठी लागणारे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम व बाकीचे सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडांना सहजासहजी व ताबडतोब उपलब्ध होतात.

४) मुळ्या अथवा झाडांना इज न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.

५) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

६) जमिनीची घूप कमी होते.

७) पाण्याचे बाष्पीभवन फारच कमी होते.

८) जमिनीचा सामू योग्य पातळीत राखला जातो.

९) गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.

१०) उपयुक्त जिवाणूंच्या संख्येमध्ये भरमसाठ वाढ होऊन वरखते आणि पाण्याच्या खर्चात बचत होते.

११) झाडांची निरोगी वाढ होऊन किडींना व रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते.

१२ ) फळांमध्ये टिकावूपणा व चव येऊन त्यांना पक्वता लवकर येण्याचे प्रमाण वाढते. अशाप्रकारे गांडूळ नापीक जमीनसुद्धा सुपीक बनविण्याचे कार्य करते.

गांडूळ खतांचे इतर उपयोग:

१) पक्षी, कोंबड्या, जनावरे आणि मासे यांची विष्ठ अवशेष उत्तम प्रतीचे खाद्य म्हणून गांडूळ वापरतात.

२) गांडूळापासून किंमती अॅमिनो अॅसिडस, एंझाईमस आणि मानवासाठी औषधे तयार करता येतात.

३) पावडर, लिपस्टिक, मलमे यासारखी किंमती प्रसाधने तयार करण्यासाठी गांडुळाचा वापर केला जातो.

४) परदेशात पिझा, आम्लेट, सॅलड यासारख्या वस्तूंमध्ये प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी गांडूळांचा उपयोग करतात.