कढीपत्त्याची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


प्रस्तावना व महत्त्व : 'कढीपत्ता' म्हणजे परसबागेतील दुर्लक्षित रोपटेच म्हणा ना ! पण त्याचे अस्तित्व घरोघरी आहेच हं ! जसे हळदीबरोबर कुंकू (हळद - कुंकू) हा समास होतो, आल्याबरोबर लसूण, तसे कोथिंबीरीबरोबर कढीपत्ता असे जणू समीकरणच झाले आहे.२० - २५ वर्षापूर्वी काढीत टाकण्यापुरता तो कढीपत्ता. म्हणजे स्वादिष्ट कढी होते एवढ्यापुरता महाराष्ट्राला ढोबळमनाने कढीपत्ता माहिती होता. पण आज कांदेपोहे असो, उपीट असो अथवा कुठलीही सांबर किंवा महाराष्ट्रीय आमटी कढीपत्त्याशिवाय अपूर्णच. एवढे स्वादाचे काम कढीपत्ता करतो. दक्षिणात्य प्रत्येक पदार्थात व चटण्या यांमध्ये कढीपत्ता असतोच. स्वादाबरोबरच कढीपत्ता भूक उदिप्त करतो. असे त्याचे महत्त्व आहे.

सुगंध कडीपत्ता हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ने विकसित केलेला सेंद्रिय कढीपत्ता असून त्याचा पाला चमकदार, हिरवागार आहे, याच्या पानांवरून नुसता हात फिरवला तरी हाताला त्याचा सुगंध येतो एवढा सुवासिक आहे. याच्या पानांमध्ये तेलाचे प्रमाण (उडणद्रव्य) अधिक प्रमाणात आहे. सुगंधा कढीपत्त्यात हरितद्रव्य अधिक असल्याने लोह, चुना, 'क' आणि 'अ'जीवनसत्त्व, तसेच आयोडिनचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे.

कढीपत्त्याने कर्करोग होत नाही. मधुमेहाने प्रमाण कमी होते. कोलेस्टोरॉलचे प्रमाण कमी होते. याचा पाला पोटात गेल्यावर फायबर असल्याने व कॅन्सर विरोधक तत्व यात असल्याने कॅन्सरला प्रतिबंध होतो.

जमीन : सर्वसाधारणपणे कढीपत्त्याची झाडे मध्यम ते भारी हलक्या काळ्या जमिनीत चांगली वाढतात, हे जरी खरे असले तरी सुगंधा कढीपत्ता हा पडीक जमिनीतही जेथे इतर फळझाडे येत नाहीत, तेथे हा कढीपत्ता बऱ्यापैकी येऊ शकतो. मुरमाड, खड काळ जमिनीतही कढीपत्ता बऱ्यापैकी वाढतो. त्यामुळे देशभराच्या पडीक जमिनीतही मध्यम पाण्याची सोय असेल तर सलग कढीपत्त्याची शेती करायला हरकत नाही - नव्हे ते कुटीरोद्योगाचे एक नवीन क्षेत्र, नवे दालन खुले करेल.

दिवसेंदिवस शेत जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे तेव्हा सुगंधा कढीपत्त्याची लागवड बांधाने केली तरी १ एक क्षेत्रावरील बांधावरील या कढीपत्त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकते. तसेच मुख्य पिकाचे वाऱ्यापासून (वींडब्रेक) या बांधावरील कढीपत्त्यापासून संरक्षणही करता येते. आम्ही केलेल्या प्रयोगामध्ये आस्वाद आळूच्या कडेने हा सुंगधा कढीपत्ता लावलेला आहे. कढीपत्त्याची उंची ४ - ५ फुट झाली असल्याने उन्हाळ्यात उन्हाचा त्रास या आळूच्या पानांना झाला नाही. एरवी पाने सुकतात तसेच वाऱ्यामुळे फाटतात. सुगंधा कढीपत्त्याच्या संरक्षणाने तसेच सप्तामृताच्या नियमित फवारण्यांमुळे आळूची पाने अतिशय हिरवीगार, मोठी, चविष्ठ मिळाली.

हवामान : समशीतोष्ण ते उष्ण हवामान कढीपत्त्यास पोषक ठरते. तेव्हा दक्षिणेतील सर्व राज्ये व महारष्ट्राभोवतीच्या सर्व राज्यात हे एक आशादायक पीक ठरू शकेल.

जाती : सर्वसाधारण शेतकरी माणसांना डोंगरातील जंगली, स्वस्त व कमी स्वादाचा आणि परसबागेतील स्वादाचा गावरान असे अनुभवाने दिलेले दोन प्रकार माहिती आहेत. तथापि, डीडब्ल्यूडी - १ व डीडब्ल्यू - २ ह्या धारवाड येथील कृषी महाविद्यालयाने अधिक स्वादाच्या जाती दिल्या असून त्यातील स्वादयुक्त (इसेन्शिअल ऑईल) प्रमाण ४ ते ५ % असते. मात्र याहून वैशिष्टयाने वैविध्यपुर्ण असल्याने हा सुगंधा कढीपत्ता उजवा ठरला आहे.

लागवडीची पद्धत : नेहमीसारखी जमिनीची पूर्व मशागत करून कढीपत्त्याची लागवड करता येते. लागवडीचे दोन प्रकार आहेत.

१) रोपे लावून आणि

२) बी टोकून किंवा फोकून.

१) रोपे लावून : रोपे १ फूट ते २ फूट उंचीची लावता येतात. त्यासाठी १ फूट x १ फूट x १ फूट खड्डा पुरे असतो. कारण हे झाड काटक असल्याने खड्ड्याचा खर्च (नेहमीप्रमाणे ३ फूट ३ फूट) सहज टाळता येतो. तळाशी कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम आणि पुर्ण कुजलेले शेणखत १ ते २ किलो टाकून तोपची पिशवी काडून रोप खड्ड्यात लावून चोहोबाजूने रोप पायाने दाबून घ्यावे व त्याचेभोवती १ लिटर जर्मिनेटर + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १०० लिटर पाणी या द्रावणाचे झाडाचे उंचीनुसार १०० ते २०० मिली (हॉटलचा चहाचा कप ते उंच नेहमीचा उभा ग्लास) एवढ्या द्रावणाची खोडावरून चूळ भरावी. बुंध्याजवळून चूळ भरण्याबरोबर खोडाचे भोवताली ६ इंच ते १ फुटावरून चूळ भरलेल्या अनेक पिकांतील (पपई, टोमॅटो, ढोबळी, मिरची, वांगी, फळझाडे) प्रयोगाचे निष्कर्ष हे फारच किफायतशीर असून यामुळे मृदुजन्य व बीज जन्य , तसेच इतर सूक्ष्म जिवाणूंचे रोगप्रतिबंधक व प्रभावी उपचार म्हणून अत्यंत फलदायी असल्याने ह्या लागवड पद्धतीत एक नवीन तंत्रज्ञानाची दिशा सिद्ध झालेली आहे. कढीपत्त्याला महिन्यातून एकदा वाया गेलेले ताक १०० ते २५० मिली याप्रमाणे देणे फायदेशीर ठरते. रोपासाठी व साधारण १० -१५ वर्षे कढीपत्त्याचे झाड जमिनीत रहावे यासाठी लागवडीचे अन्तर ५ फूट ते १० फूट हम चौरस अंतरही योग्य ठरते.

२) बी टोकून किंवा फोकून : ही पद्धत आंध्रमध्ये पारंपारिक पद्धत आहे. महाराष्ट्रातील काही पडील जमिनीत आंध्रमधील माणसांनी ५ ते १० वर्षाच्या कराराने (एकरी दरसाल २० ते २५ रुपये खंड) अशा पद्धती ने जमिनी भाडेपट्ट्याने घेऊन आंध्रमधून बी आणून फोकतात. मात्र यामध्ये अनेक प्रकारच्या बी उगवणीच्या व रोप वाढीच्या समस्या प्रत्यक्ष लेखकास आढळल्या.

बियांची उगवण होण्यासाठी उपाय : बियांना जर रात्रभर जर्मिनेटरचे द्रावणात बुडवून ठेवले तर लहान जांभळाच्या आकाराच्या दिसणाऱ्या बियांमधून तिसऱ्या दिवशी बारीक कोंब आल्यासारखे दिसून एका बियातून २ ते ३ रोपे बोहेर पडतात. पिशवीत स्वतंत्र लागवड केल्यास हे स्पष्टपणे दिसते.

लागवडीचा काळ : थंडीच्या मोसमातून काकडून रोप चैत्रातील वसंतास जेव्हा सामोरे जावून त्यांचे स्वागत करतात, तेव्हा नवीन पालवी शेंड्यातून कोवळी जांभूळसर, लालसर बाहेर पडल्याचे स्पष्ट जाणवते. चैत्रातील लागवड पाण्याची सोय असल्यास चांगलीच. म्हणजे मृगामध्ये ही लागवड चांगल्या प्रकारे साथ देऊन पुढे दिवाळीपर्यंत चांगल्याप्रकारे वाढू शकते. तथापि, मृगापासून (जून) ते थेट स्वाती नक्षत्र (सप्टेंबर) अखेर ही जर लागवड केली, तर व्यवस्थितरित्या ती मूळ घरते व नैसर्गिक वातावरण अनुकूल असल्याने रोपांची मर होत नाही. यंदाचे वातावरण कढीपत्ता लागवडीस ' अति उत्तम' आहे. विशेष म्हणजे कढीपत्त्याचे झाड संपूर्ण वाळले तरी ते मरत नाही. त्याला या मोसमात पालवी येतेच.

खत पाणी : सुगंधा कढीपत्त्यास साधारणत: एक महिन्याने थोडेसे (२५ ते ५० ग्रॅम) मिश्रखत आळे करून द्यावे. फोकून पेरलेल्या कढीपत्त्यास सर्वसाधारणपणे खुरपून झाल्यावर पालची वाढावी म्हणून कल्पतरू सेंद्रिय खत झाडाभोवती गोलाकार गाडून पाणी दिल्यास जमीन भुसभुशीत होऊन फुटवे व पालवी भरदार व हिरवी निघेल. पाण्याची पाळी महिन्यातून एकदा दिली तरी चालते. रान हलके असल्यास महिन्यातून २ वेळा पाणी द्यावे.

निसर्गशेतातील शेतकऱ्यांनी सरीतील गवत कापून त्याचे अंथरूण (मल्चिंग) करावे व सप्तामृताची फवारणी वर्षातून ३ ते ४ वेळा करावी. म्हंजे कढीपत्त्याची वाढ अतिशय चागंली होत असल्याचे आढळून आले आहे.

कढीपत्त्याच्या चांगल्या वाढीसाठी सप्तामृता फवारणी

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर १५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी :(लागवडीनंतर २ महिन्यांनी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ हार्मोनी १५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ३ महिन्यांनी) : जर्मिनेटर ७५० मिली. + थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. ते १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (वरील फवारणीनंतर प्रत्येक महिन्याला ) : जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. ते १.५ लि. + राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + प्रिझम ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली. + २५० लि.पाणी.

कढीपत्त्याची झपाट्याने वाढ - एक समस्या :कढीपत्ता वर्षातून फक्त २ ते ३ फूट वाढतो.

परसबागेत अथवा फ्लॅटमधील कुंडीतील कढीपत्ता असो, नाही तर शेतातील कढीपत्त्याचे झाड असो इतर बऱ्याच पिकांहून वाढीचेबाबतीत मंदगतीचे हे झाड आहे. तेव्हा त्याची वाढ व्हावी, यासाठी काही लोक आंबट टाक महिन्यातून एकदा १ लि. ताकात ५ लिटर पाणी मिसळून साधारण प्रत्येक झाडास १०० ते २०० मिली द्रावण ओततात. पण मोठ्या क्षेत्रावर हे व्यवहार्य नाही. त्यासाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोनच्या वरीलप्रमाणे फवारण्या ह्या वाढीसाठी व स्वाद व हरितद्रव्याचे प्रमाण तसेच कढीपत्त्याची काढणी केल्यावर नवीन फूट व पल्लेदार फांद्या निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात असा अनुभव आहे.

औषध फवारणी : कढीपत्ता हा प्रत्यक्ष आहारात वापरला जात असल्याने विषारी किटकनाशकांचा वापर न करता वरील सप्तामृताचा वापर केला असता रोग, कीड व इतर समस्या अधिक हितावह आहे. या संदर्भात एक अनुभव मुद्दाम नमूद करण्यासारखा आहे. पुण्यातील एक केरळी व्यक्ती केरळमधून कढीपत्ता काढून विमानाने मुंबईस, दुबई व आखाती देशात निर्यात करीत असे. कढीपत्ता पाठवतांना भोत किंवा किंलतानाचा वापर करत. पण जर विमान चुकले तर किलतानात भरलेला काढीपत्ता फार काळ विमानतळावर तसाच पडून राहिला व पुढे नंतरच्या विमानाने पाठविला गेला तर तो उष्णतेने (किलतानाच्या व हवेतील) काळा पडल्याने दुबईत बाद (रिजेक्ट) केला गेला. या त्याच्या समस्येवर सप्तामृताचा वापर त्या व्यक्तींच्या बंधूनी केरळमध्ये करून मग तो कढीपत्ता पाठविला असता त्याचे आशादायक निष्कर्ष त्याला मिळाले. असे प्रयोग शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी यांनी करावेत. जेनेवरून त्यांचे निष्कर्ष हे देशांतील पारंपारिक व अपारंपरिक पिकांसाठी मार्गदर्शन ठरतील. चर्चेने त्यात आवश्यकतेनुसार बदल, सुधारणाही करता येतील.

तणापासून संरक्षण : कढीपत्त्यावर फिक्कट हिरव्या बदामी आकाराच्या पानांच्या वेलवर्गीय तणाचा प्रादुर्भाव होतो. ह्या वेळचे आगारे कढीपत्त्याच्या कोवळ्या फुटीला वेढा मारतात. परिणामी कढीपत्त्याचे झाड हतबल होऊन वाढ खुंटते. तेव्हा आगरे निघण्यापुर्वी अशी तणे उपटून काढावीत.

कढीपत्त्याची काढणीची वेळ : कढीपत्ता पावसाळ्याच्या हंगामात डोंगरी भागात मुबलक आल्याने जातिवंत कढीपत्त्याचे भाव कोसळतात (३ ते ५ रुपये किलो पाला) हे दर कधीच शेतकऱ्याला परवडत नाहीत. नवीन फूट होण्यासाठी ते काढणे गरजेचे असते. प्रत्यक्ष गौरी - गणपतीपासून ते मे अखेर कढीपत्त्याचे भाव १५ ते २० रुपयांपासून २५ रुपये किलोपर्यंत भारतात मिळू शकतात व हे सहज परवडते. त्यादृष्टीने रोपांची लागवड केलेल्या झाडांपासून दुसऱ्या वर्षापासून कढीपत्ता वर्षातून तीन वेळेस काढणीस येतो व फोकून पेरलेला कढीपत्ता हा कमी दर्जाचा असून निर्यातक्षम नसतो. स्थानिक व भारताल्या शहराजवळपासच्या शेतीपासून १०० किलोमीटरवर असणाऱ्या शहरांसाठी ठिक वाटतो. महणून पुणे, नाशिक अशा शहरांचे परिसरात या पद्धतीने कढीपत्त्याची लागवड मूळ धरू पहात आहे. पण या पद्धतीत कढीपत्त्याचे आयुष्य ५ ते ७ वर्षाहून अधिक असणार नाही.

कढीपत्त्याचे उत्पन्न : फोकून केलेल्या कढीपत्त्याचे उत्पन्न पहिल्या एकरी ५०० ते १००० किलो येते. दुसऱ्यावर्षी ४ कापण्यांपासून ५००० ते ७००० किलोपर्यंत येते व ते साधारण ५ - ७ वर्ष याचे जवळपास राहते.

५ फूट ते १० फूट हम चौरस ( ५ फूट x ५ फूट किंवा १० फूट x १० फूट) ह्या रोपांनी झाडे १५ ते २० - ३५ वर्षापर्यंत राहून याचा पाला जाड, हिरवागार, मसाला उत्पादनास योग्य व निर्यातक्षम असतो. म्हणून निर्यात करू इच्छिणाऱ्यांनी 'रोपाची लागवड' पद्धत अवलंबावी . पहिल्या वर्षी रोपांपासून कढीपत्ता मिळत नाही किंवा कमी मिळतो. मात्र नंतर दुसऱ्या वर्षापासून (१० ते १५ वर्षाचे झाडास ४ कापण्यातून) २५ किलो कढीपत्ता मिळू शकतो.

मार्केट : शहरीकरण वाढले असल्याने व दक्षिणात्य हॉटलमधून मिळणारे पदार्थ घरोघरी होत असल्याने कढीपत्त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांस कढीपत्ता पावसाळी मौसमात ५ रुपये किलो भावाने मिळाला तरी गरजूंना २ रुपयाचा कढीपत्ता २५ ते ४० ग्रॅम एवढाच मिळतो व मुंबईसारख्या कॉस्पोपॉलीटीयन (बहुभाषीय) शहरात उन्हाळ्यात २ रुपयाला १ ते २ काड्या मिळतात, हा अनुभव फार बोलका आहे. खेड्यापासून शहरापर्यंत जसा कोथिंबीरीचा वापर सर्रास होतो. तद्वतच कढीपत्त्याचा होऊ लागला आहे. दक्षिणेतील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ ही राज्ये कढीपत्ता वापरण्यात आघाडीवर आहेत, सप्तामृताचा वापर केल्यावर ४०० ते ५०० मैलांपर्यंत उत्पादन क्षेत्रापासून हा कढीपत्ता आपल्याला संध्याकाळी ट्रकने भरून सकाळी मार्केटला पाठवता येतो.

कढीपत्त्यातील आंतरपिके : ज्यावेळेस कढीपत्ता बी फोकून वा पेरून केला जातो. तेथे आंतरपिकांचा प्रश्नच उद्भवत नाही. तथापि, जेथे सरी वरंब्यावरची लागवड ५ फूट ते १० फूट आहे, तेथे आपण मेथी, कोथिंबीर, पालक, शेंपू, आंबडी, पोकळा अशी पिके सप्टेंबरपासून घेऊन मधल्या जागेत डिसेंबर - नाताळच्या दिवसात उत्पन्न मिळून पहिल्या वर्षी कढीपत्त्याचा खर्च भागवून उत्पन्नात नियोजनबद्ध लागवड पद्धतीने भर घालता येते. लाल बिटाची लागवडही फायदेशीर ठरते. लालाबिट एरवी कांद्यात लावून भाव आल्यास ४० ते ५० रुपये दहा किलो होलसेल भावाने बऱ्यापैकी पैसे होतात. अन्यथा शेतकरी बैलांना ताकद येण्यासाठी खाऊ घालतात. पण बिटापासून आरोग्यास अनेक लाभदायक गोष्टी मिळू शकतात. रक्तातील हिमोग्लोबीन वाढत असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोण ठेवून जनावरांना नुसते खाऊ न घालता. यापासून एखादा 'कॅण्ड फूड' चा (डबाबंद) प्रक्रिया उद्योग उभारता येऊ शकतो काय? याचा जरूर विचार करावा.

कढीपत्त्याची काढणी वर्षातून ३ - ४ वेळा सहज होत असल्याने प्रथमवर्षी १ ते २ महिन्यात येणाऱ्या वर सांगितल्याप्रमाणे पालेभाज्या मार्केट व सिझन बघून कराव्यात, मात्र यासाठी पाण्याची सोय पाहिजे.

प्रक्रिया उद्योग : वर उल्लेख केल्याप्रमाणे कढीपत्त्याची पाने विविध पदार्थांमध्ये वापरली जातात. त्यामुळे जेव्हा भाव नसेल अथवा भाव. असले तरीही कायमस्वरूपी त्यापासून दर्जेदार (सॉफिस्टिकेड) उत्पादन मिळण्याचे दृष्टीने या कढीपत्त्याची पावडर जर तयार करून ती देशभरातील शहरी मार्केटमध्ये विकली गेली तर देशांतर्गत मार्केट बऱ्यापैकी मिळेत. नैसर्गिक पद्धतीने केलेल्या कढीपत्त्यास १००० रुपयांपासून १२०० रू. किलोपर्यंत मार्केट मिळू शकेला. दर्जा (हिरव्या मेंदीसारखी गर्द पावडर व भूक वाढविणारा स्वाद) आपण निर्माण केला तर आपण ठरवू ती किंमत जगभर राहणारे भारतीय व अभारतीय देतील, याची नक्की खात्री बाळगा. यासाठी जिद्द व सतत कार्य व मार्केटचा आंतरराष्ट्रीय अभ्यास याचा ध्यास हवा.

याचा दुसरा फायदा म्हणजे पावडर नाशवंत न राहता अनेक दिवस राहू शकते. एका पोत्यात (५० किलो खताचे पोत्यात) ८ ते १० किलो कढीपत्ता पाला बसतो. याला वाहतूक खर्च अधिक, मात्र पावडर, डबाबंद मालाचे आकारमान १२ ते २०% लागल्याने वाहतूक खर्च व डिझेलमध्ये बचत होऊ शकते. सर्वसाधारणपणे एका किलोपासून ३० ते ३५ ग्रॅम म्हणजे १०० किलोपासून ३ ते ३.५ किलो पावडर तयार होते. नैसर्गिक पद्धतीने कढीपत्ता वाळविता येतो. एरवी कृत्रिम भट्ट्या करून ४५ ते ५० डी. से. कढीपत्ता वाळवता येतो. पण हा खर्च वाचवून नैसर्गिक ऊर्जेचा वापर करून द्राक्षाचे बेदाणे (मनुके) करण्याच्या नवीन पद्धती जशा विकसित होत आहेत, तद्वतच जर सौरऊर्जेचा (सोलर एनर्जी) वापर करून अशा भट्ट्या / तंत्र नैसर्गिक उत्पादनासाठी तयार करण्याचे एक नवे दालन अभियांत्रिक वैज्ञानिकांना मिळेल, त्याचा त्यांनी जरूर विचार करावा. तथापि त्यातील हरितद्रव्य व जीवनसत्त्वे व मुलद्रव्ये प्रमाण व दर्जा कमी होणार नाही हे पहावे. म्हणजे पिढ्यान पिढ्या अज्ञान, निरक्षरता यांत पारंपारिक पद्धतीत जखडलेली शेती मुक्त होऊन जागतिक मुक्त अर्थव्यवस्थेच्या आव्हानाला भारतातील नवीन कृषी क्रांती साद घालेल, अशी आशा आपण करू या. मात्र हा विचार करताना बहुराष्ट्रीय कंपन्याचा प्रवेश नाकारून येथील ग्रामीण व शहरी सुशिक्षित बेरोजगार हा केंद्रबिंदू मानून असे कुटीरोद्योग उभारले तरच महात्माजींचे ग्रामस्वराज्याचे स्वप्न सुराज्यात झाल्याचे आपल्या पुढील पिढीस प्रत्यक्षात अनुभवता येईल - होय नक्कीच येईल. वैज्ञानिकांच्या दोन मागील - पुढील पिढ्या व सरकारचे २५ वर्षाचे सखोल नियोजन हे करू शकेल. अन्यथा कदापिही नाही. म्हणून सर्वांनी दूरगामी विचार करून कटिबद्ध होण्याची नितांत गरज आहे.