रताळी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


भारताच्या बहुतेक भागात रताळ्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोल्हापूर सातार, पुणे, सांगली, परभणी, अमरावती इत्यादी जिल्ह्यांत रताळ्याची लागवड केली जाते.

रताळ्यामध्ये 'अ', 'ब' आणि 'क' ही जीवनसत्त्वे तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. रताळ्यामध्ये १६% स्टार्च आणि ४% साखर असते. रताळ्याचा उपयोग उपवासाच्या दिवशी खाद्य पदार्थ म्हणून केला जातो. रताळी उकडून किंवा भाजून खातात. रताळ्याच्या वेलाचा उपयोग पशुखाद्य म्हणून केला जातो.

हवामान आणि जमीन - रताळ्याच्या पिकाला उष्ण हवामान पोषक आहे. ज्या ठिकाणचे हवामान उबदार असून भरपूर सूर्यप्रकाश असतो आणि दिवस व रात्रीच्या तापमानात फारसा फरक नसतो, अशा ठिकाणी रताळ्याचे पीक चांगले येते. रताळ्याच्या पिकाच्या योग्य वाढीसाठी २७ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास वेलांची वाढ खुंटते. तसेच धुक्याचाही या पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. ज्या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान ७०० ते १,००० मिलीमीटर (३० ते ४० इंच) असते, अशा ठिकाणी रताळ्याचे पीक चांगले येते. रताळ्याच्या पिकाच्या वाढीच्या कालावधीत कमीत - कमी ५०० मिलीमीटर (२० इंच) पाऊस असणे आवश्यक असते.

रताळ्याचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत चांगले येते. भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, भुसभुशीत आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन ह्या पिकास मानवते. सर्वसाधारणपणे भुसभुशीतपणा असलेल्या खोल जमिनीत कंदांची वाढ चांगली होते. भारी काळ्या जमिनीत वेलांची वाढ जोमाने होते. परंतु कंद चांगले पोसले जात नाहीत. त्यामुळे उत्पादन कमी येते. म्हणून मध्यम प्रतीची, भुसभुशीत आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन रताळ्याच्या लागवडीसाठी निवडावी. लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ इतका असावा.

* रताळ्याच्या जाती :

१) वर्षा : ही जात द्विगुणित संकरातून विकसीत केली आहे. खरीप हंगामात लागवडीसाठी उपयुक्त आहे. या जातीचे कंद लाल रंगाचे, मोठे असून आकाराने लांबट व दोन्ही टोकांस निमुळते असतात. गरांचा रंग पिवळसर असतो. रताळ्याच्या बेण्याची लागवड केल्यापासून चार महिन्यांनी कंद काढणीस तयार होतात. या जातीचे हेक्टरी सरासरी उत्पादन २० - २५ टन इतके मिळते. हा वाण पाण्याचा ताण सहन करू शकतो.

२) व्ही - ३५ : ही जात रब्बी किंवा उन्हाळी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त आहे. ह्या जातीचे कंद पांढऱ्या रंगाचे असून ते आकाराने गोल असतात. पीक लागवडीनंतर चार महिन्यांनी कंद काढणीस तयार होतात. ह्या जातीचे उत्पादन हेक्टरी १३ टन इतके मिळते.

३) सम्राट : ही जात खरीप आणी रब्बी या दोन्ही हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असून बेण्याच्या लागवडीनंतर ९० ते १०५ दिवसांत कंद काढणीसाठी तयार होतात. ह्या जातीचे उत्पादन हेक्टरी १० टनांपर्यंत मिळते.

४) कालमेघ : ही लवकर तयार होणारी जात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात लागवडीसाठी योग्य आहे. ह्या जातीचे कंद गव्हाळ रंगाचे असून आकाराने गोल असतात आणि पिकाच्या लागवडीनंतर ९० ते १०५ दिवसांत काढणीसाठी तयार होतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी २६ ते ३२ टनापर्यंत मिळते. नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्थेने रताळ्याच्या सुधारीत जातीची शिफारस केली आहे.

१) पुसा सफेद : ही जात तैवानमधून आणलेल्या जातीमधून एफ. ए. १७ या निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीची रताळी मध्यम आकाराची असून वेलांच्या लागवडीपासून १२० ते १३५ दिवसांनी काढणीसाठी तयार होतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी २३ ते २६ टन मिळते.

२) पुसा लाल : ही जात 'नोरिन ' या जपानी जातीपासून निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. या जातीचे कंद लाल रागाचे असून गर स्वच्छ पांढरा असतो. या जातीची रताळी मध्यम आकाराची असून टोकाकडे निमुळती आणि मध्ये जाड असतात. या वाणाची साठवणक्षमता चांगली आहे.

३) पुसा सुनहरी : ही जात अमेरिकेतील वाणापासून विकसीत करण्यात आली आहे. ह्या जातीच्या कंदाचा गर फिकट नारिंगी रंगाचा असतो आणी त्यात 'अ' जीवनसत्त्वाचे प्रमाण पांढऱ्या गराच्या जातीपेक्षा जास्त असते.

* बेणे तयार करणे : रताळ्याची लागवड प्रामुख्याने वेलाचे तुकटे (छाट) वापरून केली जाते. सर्वसाधारणपणे आधीच्या हंगामातील पिकाचे छाट काढून नवीन पिकाची लागवड केली जाते. ह्यासाठी वेलाचे ३० ते ४५ सेंमीमीटर लांबीच तुकडे तयार करतात. ज्या ठिकाणी आधीच्या हंगामातील लागवड उपलब्ध नसेल, अशा ठिकाणी रोपवाटीकेत स्वतंत्रपणे बेणे तयार करतात. यासाठी योग्य आकाराचे (२ x ३ मीटर) वाफे करून, निवडक बेणे जर्मिनेटर १०० मीटर मिली + १० लि. पाणी या द्रावणात बुडवून ४५ x ३० सेंटीमीटर लांबीचे छाट लागवडीसाठी निवडतात. लागवडीच्या वेळेसही जर्मिनेटर च्या वरीलप्रमाणे द्रावणात बुडवून लागवड केल्यास सर्व छाट लवकर रुजून डोळे एकसारखे फुटतात.

एक हेक्टरी लागवडीसाठी ३० ते ४५ सेंटिमीटर लांबीचे ४०,००० ते ६०,००० छाट लागतात. प्रत्येक छाटाला किमान चार डोळे असावेत. वेलाच्या मध्यभागातील अथवा टोकाकडील बाजूचा वापर छाट तयार करण्यासाठी वापरावा.

* हंगाम आणि लागवडीचे अंतर : महाराष्ट्रात रताळ्याची लागवड प्रामुख्या ने खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. खरीप पिकाची लागवड जून - जुलै महिन्यात अथवा पाण्याची सोय असणाऱ्या ठिकाणी एप्रिल - मे महिन्यात करतात.

रब्बी हंगामातील लागवड ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात करतात. रताळ्याला विशेषत: उपवासाच्या दिवशी जास्त मागणी असते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेचा विचार करून महत्त्वाच्या उपवासाच्या दिवशी रताळी तयार होतील, अशा तऱ्हेने रताळ्याची लागवड करावी. रताळ्याची लागवड करताना दोन ओळींतील अंतर ६० सेंटिमीटर आणि दोन छाटांमधील अंतर ३० सेंटिमीटर ठेवावे.

* लागवड पद्धत : रताळ्याची लागवड ६० सेंटिमीटर अंतरावर सऱ्या वरंबे पडून करावी. वरंब्याच्या बगलेत छाट लावताना त्याच्या मध्यभागावरील दोन्ही डोळे जमिनीत झाकले जाऊन टोकाकडील दोन्ही डोळे जमिनीवर राहतील याची काळजी घ्यावी. छाटांच्या लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. सर्वसाधारणपणे अपेक्षित काढणीच्या ३ ते ४ महिने आधी छाटांची लागवड करावी.

* खते आणि पाणी व्यवस्थापन : रताळीची लागवड करताना शेतात मशागतीच्या वेळी दर हेक्टरी १५ टन शेणखत जमिनीत मिसळावे. त्याचबरोबर हेक्टरी १५० ते २०० किलो कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करावा.

रताळ्याच्या पिकाला खरीप हंगामात पाणी देण्याची आवश्यकता नसते, परंतु कमी पावसाच्या प्रदेशात पाणी देणे आवश्यक असते. रब्बी आणि उन्हाळी हंगामात जमिनीच्या मगदुराप्रमाणे दर ४ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. साधारणपणे पिकाच्या कालावधीत पाण्याच्या १२ ते १४ पाळ्या द्याव्यात.

* आंतरमशागत : लागवडीनंतर नवीन फुटवे येऊन रताळ्याचे वेल वाढू लागतात आणि थोड्याच कालावधीत सर्व जमीन वेलांनी झाकून जाते. त्यामुळे या पिकाला तणांचा फारसा उपद्रव होत नाही. तरी आवश्यकतेप्रमाणे पिकांमध्ये खुरपणी करावी. पीक अडीच ते तीन महिन्यांचे झाल्यावर पिकाला भर देणे जरूरीचे असते. पिकाला मातीची भर दिल्यामुळे जमिनीतील कंद चांगले पोसतात आणि ते झाकले गेल्यामुळे त्यांची वाढही चांगली होते.

रताळ्याच्या पिकामध्ये मशागतीचे एक महत्त्वाचे काम म्हणजे 'वेलांची पालटणी' करणे होय. रताळ्याचे वाढणारे वेल २ ते ३ वेळा उलटून टाकावे लागतात. वेलांची पालटणी न केल्यास वेलांच्या पेरातून सर्वत्र बारीक मुळे वाढून ती जमिनीतील अन्न आणि पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे फक्त वेलांची भरघोस वाढ होते आणि रताळ्याचे कंद चांगले पोसले जात नाहीत. म्हणून वेलांची पालटणी योग्य वेळी करणे महत्त्वाचे आहे.

* किडी :

पाने खाणारी अळी : (लिफ इटिंग कॅटरपिलर) :

ही अळी रताळ्याची पाने खाऊन पिकाचे फार नुकसान करते. या किडीचा प्रादुर्भाव विशेषत : पावसाळी हंगामात जास्त दिसून येतो.

२) रताळ्यावरील सोंड्या भुंगा : (स्वीट पोटॅटो विव्हील ) : रताळ्याच्या पिकावरील ही एक महत्त्वाची कीड आहे. या किडीचे प्रौढ भुंगे रताळ्याच्या खोडात अंडी घालतात आणी अंड्यांतून निघालेल्या अळ्या जमिनीत वाढणारी रताळी पोखरून पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. रताळ्याच्या साठवणीतही या किडीचे प्रजनन चालूच राहते.

* रोग : रताळ्याच्या पिकावर रोगांचा उपद्रव फारसा दिसून येत नाही. परंतु काही प्रमाणात खोड कुजणे हा बुरशीजन्य रोग दिसून येतो. रोगट झाडाची पाने पिवळी पडतात. खोड आतून काळपट दिसते. ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बेणे वापरावे तसेच रोगप्रतिबंधक जातींची लागवड करावी.

या किडी व रोगांच्या नियंत्रणासाठी तसेच दर्जेदार, अधिक उत्पादनासाठी सप्तामृत औषधाच्या खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

* सप्तामृत फवारणी :

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १५ ते २१ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर पीक ४० ते ४५ दिवसांचे असताना) : जर्मिनेटर ५०० मिली. + थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ४०० मिली + हार्मोनी २०० मिली + स्प्लेंडर २०० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (पीक ६० ते ७५ दिवसांचे असताना) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + २०० लि.पाणी.

* काढणी : रताळ्याचे कंद काढणीस आल्यावर वेलाची पाने पिवळी पडून कोमेजल्यासारखी दिसतात. पूर्ण तयार झालेल्या रताळ्याची साल नखांनी खरडल्यास ती लगेच सुकते. परंतु तयार नसलेल्या कोवळ्या रताळ्याची साल मात्र तशीच ओली राहून नंतर त्यावर काळपट डाग पडतात. कंद अपरिपक्व असल्यास कापलेल्या भागावर गर्द हिरवट झाक येते. कंदाची काढणी करण्यापूर्वी साधारणत: ३ ते ४ दिवस आधी पाणी दिल्यास कंदांची काढणी करणे सोपे जाते. तयार झालेले कंद जमिनीत ४ ते ५ आठवडे राहू शकतात, परंतु कंदांची काढणी उशिरा केल्यास सोंड्या भुंग्याचा उपद्रव वाढतो. तसेच उत्पादन कमी येते.