रबर उत्पादनाचे तंत्रज्ञान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


रबर हा प्रचंड स्थितीस्थापकत्व असलेला पदार्थ आहे. रबराचे शास्त्रीय नाव हेबिया ब्रासालीन्सिस आहे. रबराची वादी दोन्ही बाजूंनी खेचल्यास न तुटता अनेक पट लांब होते आणि ताण सोडताच पुन्हा मूळ स्थितीत येते. रबराच्या या गुणधर्मामुळे याचा उपयोग अनेक महत्त्वाच्या वस्तू तयार करण्यासाठी होतो. विशेषत: वाहनांचे टायर्स, ट्यूब तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रबर वापरले जाते. रबर दोन प्रकारचे असते.

१) नैसर्गिक रबर, २) कृत्रिम रबर परंतु नैसर्गिक रबराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण नैसर्गिक रबराचे गुणधर्म उच्च प्रतीचे असतात. रबर हे एक महत्त्वाचे कृषी - उत्पादन आहे. रबरापासून विविध प्रकारच्या औधोगिक गरजेच्या आणि घरगुती उपयोगाच्या वस्तू तयार केल्या जातात, त्याशिवाय कृत्रिम रबर तयार करण्यास नैसर्गिक रबर एक महत्वाचा घटक आहे.

रबर म्हणजे रबराच्या झाडाच्या सालीतून वाहणारा चीक होय. रबर हे एक नैसर्गिक कच्चा माल आहे. त्याचे विविध प्रकारच्या औधोगिक, शेतीव्यवसाय आणि घरगुती वस्तूंच्या उत्पादनामध्ये महत्ताचे स्थान आहे. जगामध्ये आज रबराच्या ५०,००० विविध वस्तू आढळतात. ज्यापासून भव्य ट्रॅक्टर व ट्रक टायर्सपासून तर छोट्याशा बटनापर्यंत, कठीण वस्तूंपासून तर मऊ फोमच्या वस्तूंपर्यंत पातळ चिकट पदार्थांपासून शस्त्रक्रियेच्या साधनांपर्यंत तसेच खोडरबर, खेळणी, फुगे आणि रबरबॅन्डच्या वस्तू बनवल्या जातात. भारताला रबराच्या वस्तू बनविण्याच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे स्थान आहे. भारतात जवळजवळ ३०,००० प्रकारच्या रबराच्या वस्तू बनवल्या जातात. त्यांची विदेशातदेखील मोठ्या प्रमाणात निर्यात होते. रबराच्या बिया हे के खाद्यतेलाचे साधन आहे. भारतात जवळजवळ ४५००० टन रबर बियांचे उत्पादन मिळते. रबराच्या बियांच्या सालीमध्ये १४ ते १६ % तेलाचे प्रमाण आढळते. या तेलाचा उपयोग साबण बनविण्यासाठी, ऑईल पेंटमध्ये जवसाच्या तेलाचा विकल्प म्हणून करण्यात येतो.

रबर झाड हे मध उत्पादनाचे मुख्य साधन आहे. भारतातील मध उत्पादनाच्या ३०% मध हे रबराच्या झाडापासून मिळते. रबराच्या लाकडाचा उपयोग फर्निचर बनविण्यासाठी हार्डवूड व फायबर बोर्ड बनविण्यासाठी होतो. रबराच्या झाडाचा भुसा कागदनिर्मिती व रेयॉन उद्योगामध्ये उपयोगी पडतो.

भारतात इ. स. १८७९ मध्ये रबराच्या लागवडीस सुरुवात झाली. १९६० साली भारतातील रबराचे उत्पादन २५,००० टन इतके होते आणि १९९८ - ९९ मध्ये ६,०५,०४६ टनांपर्यंत वाढले आहे. भविष्यात रबराला प्रचंड मागणी राहणार आहे. त्यामुळे रबर लागवडीखाली अधिक क्षेत्र आणणे गरजेचे आहे.

रबराचे उत्पादन लागवडीपासून ६ ते ७ वर्षानंतर सुरू होते. आर. आर. आय. एस. - ६०० या जातीपासून एकरी ९६० किलोग्रॅम सुका रबर मिळतो. बाजारपेठेच्या मागणीनुसार सुक्या रबराऐवजी फिल्डलॅटेक्सचा पुरवठा करता येतो. सर्वसाधारणपणे रबर झाड १०० वर्षांपर्यंत जगू शकते. तर आर्थिक दृष्टीने रबर झाड २८ ते ३० वर्षांपर्यंत उत्पादनक्षम असते.

थायलंड, इंडोनिशिया आणि मलेशियानंतर नैसर्गिक रबराच्या जगातील उत्पादनात भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतातील रबर उत्पादनक्षेत्र हे कन्याकुमारीपासून ते कर्नाटकच्या कूर्ग जिल्ह्यापर्यंत पसरले आहे. याशिवाय अंदमान - निकोबार आणि भारताच्या पूर्वात्तर भागात रबराची यशस्वी लागवड चालू आहे.

हवामान आणि जमीन : रबराच्या यशस्वी लागवडीसाठी उष्णकटिबंधीय प्रदेश उपयुक्त आहे. भारताचा दक्षिण भाग, अंदमान - निकोबार व गोवा या प्रदेशांतील हवामान रबर लागवडीसाठी उपयुक्त आहे.

रबराच्या झाडाच्या जोमदार वाढीसाठी २,००० ते ३,००० मिलिमीटर वार्षिक पर्जन्यमान आवश्यक आहे. २० ते ३५ डी. सेल्सिअस तापमान रबराच्या निकोप वाढीसाठी आदर्श समजतात. तापमानातील अचानक चढ - उताराचा लागवडीवर परिणाम होतो.

रबर लागवडीसाठी जांभा खडकाची जमीन अधिक चांगली समजली जाते. रबराला सपाट, पाण्याचा चांगला निचरा होणारी तसेच डोंगरउताराची जमीन निवडल्यास मृदसंधारणाची उपाययोजना करणे आवश्यक असते.

* रबराच्या आर्थिकदृष्या महत्त्वाच्या असलेल्या जाती व त्यांची वैशिष्ट्ये.

१) आर. आर. आय. आय. १०५ : टी. जी. आय. आर. - १ आणि जी. एल. - १ यांच्या संकरातून ह्या जातीची उत्पत्ती झाली आहे. हे झाड उंच व सरळ वाढते. भरपूर फांद्या फुटतात. विस्तार हा त्याच्या शेंड्यावरच असतो. ही जात अपरिमित पानगळीसाठी प्रतिकारक आहे. परंतु तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव हा या जातीवर जास्त आढळतो. कोरडवाहू लागवडीसाठी ही जात उत्तम आहे. फांद्यांच्या रचनेमुळे वादळी वाऱ्याचा प्रतिकार करू शकते. परंतु ब्राऊन बास्ट विकृतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे तीन दिवसाआड टॅपिंग करणे रास्त समजले जाते. या जातीचे पहिल्या पंधरा वर्षांचे सरसरी उत्पादन प्रतिवर्षी प्रति एकरी ९६० किलोग्रॅमपर्यंत मिळते.

२) आर. आर. आय. आय. ५: या जातीची वाढ जोमदार होते. परंतु फांद्या मात्र कमी उंचावरून फुटतात. अपरिमित पानगळ, भुरी व ब्राऊन बास्ट विकृतीचा मध्यम प्रादुर्भाव आढळतो. पहिल्या पंधरा वर्षांचे सरासरी उत्पादन प्रतिवर्षी प्रतिएकरी ५४० किलोग्रॅमपर्यंत मिळते.

३) आर. आर. आय. आय. ११८ : मिली ३/२ आणि हिल २२८ यांच्या संकरातून ह्या जातीची उत्पत्ती झाली आहे. खोडाची वाढ जोमदार होते. तसेच खोड उंच व मजबूत असते. फांद्या भक्कम असतात. शेंड्याचा विस्तार समतोल असतो. सर्व रोगांस प्रतिकार करते. ब्राऊन बास्ट विकृतीचे प्रमाणही अल्प आढळते. पहिल्या १० वर्षांचे सरासरी उत्पादन प्रतिवर्षी प्रति एकरी ४६५ किलोग्रॅमपर्यंत मिळते.

४) आर. आर. आय. आय. २०३ : पी. बी मिल ३/२ यांच्या संकरातून ह्या जातीची उत्पत्ती झाली आहे. हे झाड दणकट असून सरळ, उंच वाढते व सर्व रोगांस प्रतिकार करते. पहिल्या १० वर्षात सरासरी उत्पादन प्रतिवर्षी प्रतिएकरी ७२७ किलोग्रॅमपर्यंत मिळते.

५) आर. आर. आय. आय. २०८ : मिल ३/२ ए.व्ही.आर.ओ.एस. - २५५ यांच्या संकरातून ह्या जातीची उत्पत्ती झाली आहे. खोडकूज रोगाला लवकर बळी पडते. सुरूवातीच्या वर्षांमध्ये कमी उत्पादन मिळते. पहिल्या १० वर्षांचे सरासरी उत्पादन प्रतिवर्षी प्रतिएकरी ७९.९ किलोग्रॅमपर्यंत मिळते.

रबराची अभिवृद्धी लैंगिक व अलैंगिक (शाखीय) या दोन्ही पद्धतीने करता येते व्यापारी तत्वावरील लागवडीसाठी 'पॉलिक्लोनल बियांपासून' अभिवृद्धी करून मिळालेले बियाणे उत्कृष्ट समजले जाते.

दक्षिण भारतात बियाणे जुलै - सप्टेंबर महिन्यांत परिपक्व होते आणि त्याच महिन्यांत बियाणे गोळा केले जाते व लगेचच रोपे तयार केली जातात. या लागवडीसाठी अधिकृत पॉलिक्लोनल रोपवाटिकेतून आणलेले बियाणेच अभिवृद्धीसाठी वापरले जाते.

बियाणे गोळा केल्याबरोबर त्याची उगवण होण्यासाठी ते रोपवाटिकेत वाफ्यावर लावले जाते. परंतु ते शक्य नसल्यास बियाण्यांची उगवणक्षमता निरनिराळ्या पद्धतींत टिकवून ठेवता येते. या पद्धतीत बियाण्यातील पाण्याचे प्रमाण रोखण्यासाठी श्वासोच्छवास नियंत्रित केला जातो. ताजे बियाणे सावलीमध्ये ठेवल्यास किमान सात दिवसांपर्यंत त्याची उगवणक्षमता टिकवून ठेवता येते किंवा बियाणे हवेशीर पेटीमध्ये सुटसुटीत ठेवून त्यामध्ये ४०% ओलावा असल्याने कोळशाची पावडर मिसळून ठेवू शकतो. त्यामुळे जवळजवळ तीस दिवसांपर्यंत ७०% उगवणक्षमता टिकवून ठेवता येते.

* लागवड: रबराची लागवड यशस्वी होण्याकरिता योग्य हवामान, रोपे किंवा खुंटाचा दर्जा आणि लागवड करताना घ्यावयाची काळजी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

* पॉलिबॅग लागवड पद्धत : पॉलिबॅगमधील झाडाच्या सर्वांत वरचा पर्णगुच्छ पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर लागवड करावी. सोटमुळे आणि उपमुळे बॅगेच्या बाहेर आली असल्यास त्यांची छाटणी करावी व नंतरच पॉलिबेग लागवडीच्या ठिकाणी न्यावी. बॅगेच्या आकारापेक्षा खड्डे मोठे असावेत. बॅगेच्या खालचा पृष्ठभाग पूर्णपणे कापावा आणि पॉलिबॅगसहित ती हुंडी खड्ड्यात ठेवावी. नंतर बॅगेच्या दोन्ही बाजूच्या भागास कप घेऊन हळुवारपणे ती बॅग वर काढून घ्यावी. म्हणजे मुळांना जमिनीत पसरण्यास भरपूर वाव मिळेल. उरलेल्या भागात माती भरताना त्या हुंडीला इजा होणार नी याची काळजी घ्यावी.

* लागवडीनंतर घ्यावयाची काळजी: लागवडीनंतर दर दहा दिवसांनी रोपांची पाहणी करावी, आणि एकच जोमदार शेंडा वाढू द्यावा. डोळा कलमाच्या बाबतीत डोळ्याचा फुटवा सोडून खुंटरोपातून निघालेले इतर फुटवे नियमित छाटावे. तसेच दोन रोपांतील आणि ओळींतील तणे काढून नष्ट करावीत.

लागवड ही मुख्यत: पावसाच्या सुरुवातीला केली जाते. अतिवृष्टी होत असतान लागवड केल्यास खड्ड्यात दलदल साचून रोपमरीचे प्रमाण वाढते. भारतातील रबर लागवडीच्या क्षेत्रामध्ये जून - जुलै या महिन्यांत पाऊस पडतो. या कालावधीत रबराची लागवड करणे फायदेशीर ठरते.

* वळण आणि छाटणी : रबराच्या झाडांच्या पानांचा पसारा वाढविण्यासाठी व वाढीचा दर वाढविण्यासाठी, टॉंपिंग करण्यासाठी व जास्तीत जास्त खोड मजबूत मिळण्यासाठी नवीन रोपट्यावर २.८ मीटरपर्यंत कोणतीही फांदी असल्यास त्याची छाटणी २ ते ३ महिन्यांच्या अंतराने करावी.

रबराची छाटणी करायची असल्यास ती लागवडीनंतर शक्य तितक्य लवकर करावी. काही जातींमध्ये ही छाटणी लागवडीनंतर २ ते ३ टप्प्यांमध्ये प्रथम ४ ते ६ महिन्यांच्या अंतराने करून अडीच वर्षांमध्ये पूर्ण करावी. ही छाटणी केली नाही तर ३ ते ६ वर्षांच्या झाडांची छाटणी करणे खर्चीक होते. वादळापासून नुकसानीची शक्यता अधिक असल्यास अशावेळी उशिरा छाटणी करावी. व्ही आकारामध्ये फांद्या असल्यास त्यांना पूर्णपाने छाटण्याऐवजी त्यांची लांबी कमी करणे सोयीचे असते. कारण पूर्णपणे छाटल्यास झाडाच्या वाढीवर उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. छाटणी केलेल्या ठिकाणी बुरशीनाशक लावावे. ही छाटणी नेहमी तिरकस करावी, जेणेकरून पाणी निघून जाईल. छाटणी नंतर तीव्र सूर्यप्रकाश मिळत असल्यास चुन्याची सफेदी लावावी.

ठिबक सिंचन पद्धत : या पद्धतीत ड्रिपरच्या सहाय्याने पाणी थेट झाडांच्या मुळांच्या जवळ सोडले जाते. उंचसखल जमिनीवर दाबनियंत्रित ड्रिपर वापरावे लागतात. हे ड्रिपर जमिनीचा चढउतार सहन करून सर्व ठिकाणी समप्रमाणात पाणी देतात व दाब नियंत्रित करतात. या पद्धतीत पाण्याची ५० ते ५५% बचत होते.

आळे पद्धत : रबराच्या झाडाला पाणी देण्याची एक महत्त्वाची व प्रचलित पद्धत आहे. शेताला जर उतार असेल तर उताराला आडवा पाट टाकून ठराविक अंतरावर पाटाजवळ ७५ सेंमी अंतरावर १ मीटर व्यासाचे आळे करून त्या आळ्यात पाणी सोडावे. या पद्धतीत जमिनीचा जास्त भाग भिजल्यामुळे पाणी जास्त लागते. अपरिपक्व कालावधीमधील सुरूवातीच्या वर्षाकरिता रबर झाडासाठी खताचे व्यवस्थापन

अ. क्र.   लागवडीचे वर्ष   लागवडीनंतरचा महिना   खते देण्याची वेळ   खताचा हप्ता प्रति झाड (ग्रॅम) १०:१०:४:१.५   प्रति हेक्टरी सरासरी मिश्रण
४४० - ४५० किलोग्रॅम प्रति हेक्टरी
१२:१२:६   १०:१०:४:१.५   १२:१२:६  
१   पहिले   तीन महिन्यांनी   सप्टेंबर - ऑक्टोबर   २२५   १९०   १००   ८५  
२   दुसरे   नऊ महिन्यांनी   एप्रिल - मे   ४५०   ३८०   २००   १७०  
३   दुसरे   पंधरा महिन्यांनी   सप्टेंबर   ४५०   ३८०   २००   १७०  
४   तिसरे   एकवीस महिन्यांनी   एप्रिल - मे   ५५०   ४८०   २५०   २१५  
५   तिसरे   सत्तावीस महिन्यांनी   सप्टेंबर   ५५०   ४८०   २५०   २१५  
६   चौथे   तेहवीस महिन्यांनी   एप्रिल - मे   ४५०   ३८०   २००   १७०  
७   चौथे   ३९ महिन्यांनी सप्टेंबर - ऑक्टोबर   ४५०   ३८०   २००   १७०  


लहान अवस्थेतील रबर झाडांसाठी खत व्यवस्थापन : झाडाच्या लहान (अपरिपक्व) अवस्थेमध्ये (टॉंपिंग पूर्व अवस्था) खते देण्याचा उद्देश एवढाच की, झाडाची वाढ वेगाने व्हावी तसेच अपरिपक्व अवस्थेपासून टॉंपिंग चालू करण्यापर्यंतचा किमान काळ ७ वर्षे असतो तो योग्य खत व्यवस्थापनाने तो अवधी किमान १ वर्षे कमी होतो.

टॉंपिंग चालू असलेले परिपक्व रबर : टॉंपिंग चालू असलेल्या रबराच्या झाडाला खते देण्याचा उद्देश झाडापासून जास्तीत जास्त रबर मिळविणे हा होय. परंतु सध्या असे निदर्शनास आले आहे की, खत व्यवस्थापनेचा उत्पादनावरील परिणाम हा पुष्कळशा गोष्टींवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ झाडाची अनुवंशिक कार्यक्षमता, झाडाचे वय, झाडाची अवस्था, टॉंपिंगचा इतिहास, जमिनीची अन्नद्रव्य पुरविण्याची क्षमता, जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि जमीन व्यवस्थापनेचा इतिहास त्यामुळे या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून त्यानंतर परिपक्व रबर झाडाचे, खत व्यवस्थापन' निश्चित केले जाते. परिपक्व रबर लागवडीखालील जमीन आणी पानांचे परीक्षण हे रबर लागवडीमध्ये योग्य ते खत व्यवस्थापन करण्यास उपयोगी पडते. १०:१०:१० नत्र, स्फुरद, पालाश, मिश्रण १०० ग्रॅम प्रतिझाडाप्रमाणे किंवा ३०० किलोग्रॅम प्रतिहेक्टरी दरवर्षी एप्रिल - मे आणि सप्टेंबर - ऑक्टोबर या महिन्यामध्ये विभागून द्यावे.

* आंतरपिकांची लागवड आणि तणनियंत्रण : मुख्य पिकाचे नुकसान न होता व झाडांची संख्या कमी न करता दुय्यम पिकाची लागवड करून त्यापासून उत्पादन घेण्याच्या पद्धतीस आंतरपीक म्हणतात. आंतरपिकामध्ये कडधान्ये, भाजीपाला पिके, तसेच अल्प कालावधीत तयार होऊन उत्पादन देणाऱ्या फळझाडांची लागवड करता येते. त्यामुळे मुख्य पिकाचे उत्पादन सुरू होईपर्यंत आंतरपिकांचे उत्पादन सुरू होते आणि लागवडीचा व मजुरीचा खर्च सुटतो.

पुष्कळशा लागवडीमध्ये सुरूवातीच्या वर्षात वार्षिक अन्नधान्य पिके किंवा नगदी पिके घेतली जातात. रबर लागवडीतील आंतरपिकांमध्ये प्रामुख्याने टॅपिओका (साबुदाणा), आले, केळीची नेंद्रबाली जात, अननस इत्यादी पिके घेतली जातात.

तणनियंत्रण : तण हे सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्यासाठी रबराच्या वाढीसाठी सुरूवातीच्या वर्षामध्ये झाडासोबत स्पर्धा करते. रबरामध्ये प्रामुख्याने लाजाळू, दर्भ, बोरू, रेशीम काटा, उन्हाळ, हरळी इ. तणे आढळतात. तणांच्या नियंत्रणासाठी रबर वाढीच्या सुरुवातीच्या काळात द्विदल वनस्पतीचे आच्छादन प्रस्थापित केल्यास तणांचे नियंत्रण होते. शिवाय झाडाचा अपरिपक्व कालावधी कमी होतो आणि रबर लागवडीच्या नियंत्रणावरील बराचसा खर्च कमी होतो. तसेच रासायनिक पद्धतीने तणे उगवण्यापूर्वी व नंतर वापरावयासाठी तणनाशकाचा वापर करून बंदोबसत करता येतो.

किडींची ओळख व नियंत्रण :

१) खवलेकीड : या किडीचा प्रादुर्भाव सामन्यात: पान, देठ आणि कोवळ्या शेंड्यावर होतो. ही कीड प्रथम पानांतील रस शोषून घेते. जास्त प्रादुर्भाव झालेला भाग कोरडा पडतो व वाळतो. किडीमार्फत बुरशीजन्य रोगाचा प्रसार होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी मॅलॅथिऑन ह्या ऑगेन्यू फॉस्फरस कीटकनाशकाची ०.०५% तीव्रतेची फवारणी करावी.

२) पिठ्या ढेकूण : या किडीचा प्रादुर्भाव झाडाच्या कोवळ्या शेंड्यावर, पानांवर व पानांच्या देठांवर होतो. हे ढेकूण कोवळ्या फुटीतून रस शोषून घेतात. किडीच्या शरीरातून निघणाऱ्या मधासारख्या पदार्थावर बुरशी वाढते. या किडीच्या नियंत्रणासाठी ऑर्गेन्यू फॉस्फरस कीटकनाशक किंवा फिश ऑईल रोझन सोपची फवारणी करावी.

३) कोळी : प्रौढ कोळी आणि लहान पिल्ले पानांतील रस शोषतात. या उपद्रवामुळे पाने वाळतात. पानांचा आकार लहान होतो. पानांच्या कडा खालच्या बाजूस वळतात. पिके फुलावस्थेत असताना प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात फुलगळ होते. फळे वेडीवाकडी होतात आणि फळांचा आकार लहान राहतो.

या किडीच्या नियंत्रणासाठी गंधक (वेटेबल) २० ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने पिकावर फवारणी करावी किंवा गंधकाची धुरळणी करावी.

४) खोड पोखरणारी अळी : ही अळी खोडावर तसेच फांद्यांवर खळ्या तयार करते. त्यात विष्टा टाकते. या खळ्यांमुळे झाडाच्या खोडातून लॅटेक्स बाहेर येते. प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी खोल खड्डा दिसतो. या किडीच्या नियंत्रणासाठी सेवीन (५%) १० किलोग्रॅम प्रति हेक्टरी वापरावे किंवा फेनव्हेलरेट भुकटी (०.४%) प्रति हेक्टरी ७ किलोग्रॅम पावडर डस्टरने धुरळावी.

किडींच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेला भाग तिक्ष्ण चाकूने कापावा व त्यातील कीड शोधून नष्ट करावी.

रोगांची ओळख आणि नियंत्रण :

१) अनियमित पानगळ : ह्या रोगाचा प्रसार फायटोफ्थोरा या बुरशीमुळे होतो. नैऋ्रत्य मान्सूनच्या कालावधीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होतो. सतत दमट हवामान आणि त्यासोबत हवेमधील जास्त आर्द्रता या रोगाचा प्रसार होण्यास पोषक ठरतात. प्रादुर्भावानंतर प्रथम फळे सडतात. त्यानंतर पाने मोठ्या प्रमाणात गळून पडतात. पाने परिपक्व झाल्यानंतर हिरव्या अवस्थेतच गळून पडतात किंवा तांबूस लाल रंगाच्या अवस्थेत गळून पडतात. पाने गळताना देठावर रबरयुक्त पांढऱ्या द्रवाचा (लॅटेक्सचा) एक थेंब बाहेर येउन तेथेच गोठतो. पानगळ झाल्यामुले झाडाचे शेंडे वाळून जातात.

या रोगाच्या नियंत्रणासाठी नैऋ्रत्य मान्सूनपूर्वी झाडाच्या संपूर्ण पालवीवर दोन टप्प्यांत फवारणी करवी. प्रत्येक टप्प्यामध्ये १७ ते २२ लि. तेलमिश्रित बुरशीनाशक प्रति हेक्टरी (१:६) १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारावे किंवा डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचे थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५०० मिली १०० लि. पाण्यातून फवारावे.

२) फांदी कूज : या रोगाचा प्रसार फायटोफ्थोरा पाल्मीव्होरा या बुरशीमुळे होतो. नैऋ्रत्य मान्सूनच्या काळामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. कोवळे हिरवे शेंडे सडतात. रोपवाटिकेतील कोवळ्या रोपांवर जास्त प्रादुर्भाव होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेतील कोवळ्या रोपांवर नैऋ्रत्य मान्सूनपूर्वी कॉपर बुरशीनाशकाची फवारणी करावी. बुरशीनाशका रोपांवर चिकटून राहण्याकरिता चिकटद्रव्य ०.५ मिली प्रति लिटर पाण्यात सँडोव्हिट, टेने, टिपॉल इ. वापरावे.

३) भुरी : या रोगाचा प्रसार ओईडीएम हेवीयी या बुरशीमुळे होतो. हा रोग मुख्यत्त्वेकरून जानेवारी ते मार्च महिन्यात झाडाला नवीन पालवी फुटण्याच्या काळात फुटव्यांवर दिसून येतो. कोवळ्या पानांवर राखाडीसारखे आच्छादन येऊन पाने आकसतात. पानांच्या कडा आतमध्ये वळतात आणि पाने गळून पडतात. पानांची देठे झाडाला लागून राहतात. त्यामुळे झाडाला झाडूसारखा आकार येतो.

या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपावर डोळे फुटण्यापासून नवीन फुटवे येईपर्यंतच्या कालावधीमध्ये ३ ते ५ टप्प्यांमध्ये आठवड्याच्या किंवा पंधरवड्याच्या अंतराने सल्फर भुकटी (३२५ मेश) ११ ते १४ किलोग्रॅम प्रति टप्पा प्रति हेक्टरी धुरळावी किंवा बाविस्टीन ०.०५% १० ग्रॅम किंवा हार्मोनी २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.

४) तांबेरा : या रोगाचा प्रसार कोर्टीसीयम सलमोनी कलर या बुरशीपासून होतो. मुख्यत: हा रोग नैऋ्रत्य मान्सूनच्या कालावधीत म्हणजेच जून महिन्यामध्ये होतो. परंतु दर्शनीय परिणाम जुलै - नोव्हेंबर या महिन्यांमध्ये निदर्शनास येतो. रोगाचा मुख्य प्रभाव झाडाच्या बेचक्यामध्ये होतो. पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाचे बुरशीदार आवरण सालीवर येते. झाडाची साल पडते, वाळते आणि तडकते. तडा गेलेल्या सालीतून पांढरा चिकट द्रव बाहेर येतो. प्रादुर्भाव झालेल्या भागातून नवीन फुटवे फुटतात. झाडाच्या टोकावरील फांद्या वाळतात आणि वाळलेली पाने फांद्यांना चिकटतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी झाडाच्या प्रत्येक बेचक्यामध्ये तसेच शेंड्याकडील तपकिरी भागावर बोर्डो पेस्ट लावावी. बोर्डो पेस्ट लांब दांडा असलेल्या ब्रशने लावावी. रोगाचा परिणाम झालेल्या फांद्या छाटून टाकाव्यात.

* काढणी, हाताळणी आणि विक्रीव्यवस्था : रबर पिकाची काढणी ही झाडाच्या सालीतून चीक (लॅटेक्स) घेऊन पूर्ण केली जाते.

१) टॅपिंग : रबराच्या झाडाच्या सालीतून चीक काढण्यात येतो. या क्रियेला टॅपिंग असे म्हणतात. टॅपिंग ही एक नियंत्रित जखम करण्याची पद्धत आहे. ज्यामध्ये झाडांच्या सालीचे पातळ थर कापले जातात. टॅपिंग केलेल्या लॅटेक्स नलिकांमधून लॅटेक्स (रबराचा पांढरा चिकट द्रव) वाहते. त्यामध्ये कणांच्या स्वरूपात ३० ते ४० % पर्यंत रबर असते. टॅपिंग एकदम पहाटे करावे. उशिरा टॅपिंग केल्याने लॅटेक्सचा प्रभाव कमी होतो. लॅटेक्स गोळा करण्यासाठी व साठविण्यासाठी प्लॅस्टिक कप, अॅल्युमिनियम बादल्या व प्रक्रिया करण्यासाठी अॅल्युमिनियम डिश वापरल्या जातात.

२) टॅपिंग सुरू करण्यासाठी झाडाची उंची व वाढ : जेव्हा रबराच्या झाडाचा जमिनीपासून १२५ सेंमी उंचीवर ५० सेमी एवढा परिघ मोजता येतो, तेव्हा ते कलमी झाड टॅपिंग करण्यासाठी कार्यक्षम झाले असे समजण्यास येते. मूळखुंट झाडामध्ये पहिले टॅपिंग जमिनीपासून ४० सेंमी उंचीवर झाडाचा परिघ ५५ सेंमी होतो तेव्हा केले जाते, समजा, जास्त उंचीवर टॅपिंग करण्याची इच्छा असल्यास जमिनीपासून ९० सेंमी उंचीवर झाडाचा परिघ ५० सेंमी असताना टॅपिंग केले जाते. झाडाचे टॅपिंग करण्यासाठी मार्च - एप्रिल हा महिना आदर्श मानला जातो. जर या महिन्यामध्ये झाडांचा परिघ थोडा कमी असल्यास अशी झाडे सप्टेंबरमध्ये टॅपिंग करतात.

कलमी झाडामध्ये टॅपिंगचा कप किमान ३० डी. तर मूळखुंटाच्या झाडामध्ये तो २० अंश उताराचा द्यावा. झाडाच्या सालीमधील लॅटेक्स नलिका उजव्या बाजूला ३ ते ५ अंशाचा कोण करतात. त्यामुळे उजवीकडे उंच आणि उतरता काप असल्यास जास्तीत जास्त लॅटेक्स नलिका उघड्या केल्या जातात.

प्रक्रिया : रबराच्या झाडापासून निरनिराळ्या प्रकारचे रबर मिळते. ते जास्त काळ तसेच राहिल्यास त्यावर जिवाणूंचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रबर साठविण्यापूर्वी किंवा बाजारात पाठविण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. टॅपिंग पॅनलवर जे लॅटेक्स गोठते त्यास 'ट्रिलेस' म्हणतात. असे रबर टॅपिंग करण्यापूर्वी टॅपर्सने टोपलीमध्ये गोळा करावे. रबराच्या पूर्ण उत्पादनापैकी किमान १५ ते २८% हे वरील ट्रिलेस प्रकारचे रबर असते. या प्रकाराला शेतात गोठवलेले रबर असे म्हणतात.

* रबराच्या झाडापासून निघालेले रबर चार प्रकारांत प्रक्रिया करून बाजारात विक्रीसाठी आणले जाते.

१ ) साठविलेले लॅटेक्स आणि तीव्र लॅटेक्स

२) धूरप्रक्रिया केलेल्या शीट

३) क्रीप रबर

४) ब्लॉक रबर किंवा क्रंप रबर

१) साठविलेले लॅटेक्स आणि तीव्र लॅटेक्स : लॅटेक्स प्रक्रिया करण्यापूर्वी त्याच्या घनीभवनावर निर्बंध घालण्यासाठी जी रसायने लॅटेक्समध्ये वापरली जातात. त्यास घनीभवन प्रतिबंधक असे संबोधले जाते. उदाहरणार्थ, अमोनिया, सोडियम, सल्फाईट, फॉरमॅलीन इ.

साठवण केलेल्या लॅटेक्सच्या प्रक्रियेमध्ये साठवणूक पदार्थ टाकणे, मिश्रण करणे, स्थिरावणे या प्रक्रिया येतात. याकरिता मिश्रण टाकीची आवश्यकता भासते. टाकीचे आकारमान हा लॅटेक्स पूर्ण सामावून घेण्याइतपत मोठे असावे. शेतामधून आणलेले लॅटेक्स गाळणीमधून गाळून घ्यावे. नंतर त्यामध्ये लॅटेक्सच्या प्रमाणात घनीभवन प्रतिबंधक पदार्थ टाकावे. लॅटेक्समध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्यास त्यामध्ये आवश्यक तेवढे डाय अमोनियम आयर्न फॉस्फेट टाकावे. त्यानंतर स्थिर होण्याकरिता एक दिवसापर्यंत ठेवावे. तळाशी असलेला गाळ काढल्यानंतर लॅटेक्स हळूवारपणे हलवावे. त्यानंतर लॅटेक्स हे बाजारामध्ये पाठविण्यासाठी तयार झाले असे समजावे.

तीव्र लॅटेक्स : तीव्र लॅटेक्स बाजारामध्ये दोन प्रकारच्या तीव्रतेमध्ये लॅटेक्स, (१) ३५ ते ५० % डी. आर. सी. असलेले लॅटेक्स,

२) ५१ ते ६० डी. आर. सी. असलेले लॅटेक्स.

साठविलेल्या तीव्र लॅटेक्सला बाजारामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. कारण त्याचे पुष्कळ से उपयोग आहेत. तीव्र लॅटेक्स दोन पद्धती ने बनवले जाते.

१) क्रिमिंग पद्धत,

२) सेंट्रिफ्युजीएशन पद्धत

प्रक्रिया केंद्रामध्ये आणलेले लॅटेक्स ४० ते ६० मेश गाळणीमधून गाळते जाते. नंतर मिश्रण टाकीमध्ये ओतून पाणी टाकून पातळ करण्यात येते.

हे लॅटेक्स प्रथम अॅल्युमिनियम डिशमध्ये गोठवले जाते. त्यानंतर गोठवलेल्या रबराच्या लाद्या गुळगुळीत रोलरमधून दाब देऊन त्यातील अनावश्यक पाणी काढले जाते. त्यानंतर अशी लादी खाचेदार रोलरमधून दाब देऊन पुन्हा काढली जाते. अशाप्रकारे त्या लादीला एका शीटचे स्वरूप येते. त्य शीट हवेमध्ये वाळवून नंतर त्यावर धुराची प्रक्रिया केली जाते. वाळविण्याच्या पद्धतीनुसार रबर शीटचे दोन प्रकार पडतात.

१) खाचेदार धूरप्रक्रिया केलेल्या शीट.

२) हवेमध्ये वाळवलेल्या शीट

१) धूरप्रक्रिया : सावलीमध्ये वाळत घातलेल्या शीट त्यातील पाणी पूर्ण निघून गेल्यावर २ ते ३ तासांनंतर धूरगृहामध्ये ठेवल्या जातात. या धूरगृहामध्ये तापमान ४० ते ६० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राखले जाते. यामुळे शीट टप्प्याटप्प्याने सुकल्या जातात. धूरप्रक्रियेचा आणखी एक फायदा असा, की यामुळे शीटवर धुरांमधील कार्बनयुक्त पदार्थाचा एक थर बसतो. ज्यामुळे शीटच्या पृष्ठाभागावर बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो.

२) हवेमध्ये वाळलेल्या शीट : अशा शीट खाचेदार धूरप्रक्रिया केलेल्या शीटप्रमाणे बनवल्या जातात. परंतु धुराऐवाजी त्या सावलीमध्ये वाळवल्या जातात किंवा एका मोठ्या पाईपमध्ये गरम हवा सोडून वाळवल्या जातात. या प्रक्रियेमध्ये सोडियम बाय सल्फाईटचा वापर आवश्यक आहे. हवेमध्ये वाळवलेल्या शीट धूरप्रक्रिया केलेल्या शीट पेक्षा जास्त किंमतीमध्ये विकल्या जातात. कारण या शीट फिक्कट लॅटेक्स क्रिब या रबर प्रकारचा विकल्प म्हणून वापरल्या जातात.

३) ब्लॉक रबर किंवा क्रंप रबर : ब्लॉक रबर किंवा तांत्रिक दृष्ट्या निर्देशित केलेले ब्लॉक रबर प्रक्रियेच्या नवीन पद्धती वापरून बनवले जाते. या प्रक्रीयेमध्ये निरनिराळ्या प्रक्रिया समाविष्ट केलेल्या असतात. उदाहरणार्थ आकारमान कमी करणे, पाणी काढून टाकणे, गाळ बाहेर काढणे, वाळवणे, प्रतवारी करणे आणि गठ्ठे बनविणे इ. सुकलेले क्रंप रबर गरम असल्यास ३० ते ५० टन दाब दिला जातो किंवा ५० किलोग्रॅमचा ब्लॉक पॉलिथीन पिशवीत गुंडाळून एचडीपीई पिशवीत बांधणी करून विक्रीस नेले जातात.

* प्रतवारी: रबराची प्रतवारी रबर शीट लख्ख प्रकाशामध्ये धरून निरीक्षण करून केली जाते. नैसर्गिक रबर तयार झाल्यानंतर त्याची बाजारात विक्री करण्यापुर्वी रबर शीटची ६ प्रतिमध्ये प्रतवारी केली जाते.

१) खाचेदार धूर प्रक्रिया केलेले शीट (R. S. S. ) - १ x

२) खाचेदार धूर प्रक्रिया केलेले शीट (R. S. S. ) - १

३) खाचेदार धूर प्रक्रिया केलेले शीट (R. S. S. ) - २

४) खाचेदार धूर प्रक्रिया केलेले शीट (R. S. S. ) - ३

५) खाचेदार धूर प्रक्रिया केलेले शीट (R. S. S. ) - ४

६) खाचेदार धूर प्रक्रिया केलेले शीट (R. S. S. ) - ५

* मालाची विक्री व्यवस्था : रबराच्या काढणीनंतर म्हणजेच टॅपिंगनंतर झाडापासून काढलेल्या लॅटेक्सवर चार प्रकारांत प्रक्रिया करून नंतरचा रबर बाजारात विक्रीसाठी आणले जाते. एका प्रकारात साठविलेले लॅटेक्स किंवा तीव्र लॅटेक्सला बाजारात जास्त मागणी आणि बाजारभाव मिळतो. म्हणून लॅटेक्सवर घनीभवन प्रतिबंधक अमोनियासारख्या रसायनाचा वापर करून हे मिश्रण तयार करताना लॅटेक्स मिश्रण टाकीमध्ये न हालवता स्थिर होण्याकरिता एक दिवसापर्यंत ठेवून त्याच्या तळाशी बसलेला गाळ काढल्यानंतर असे लॅटेक्स बाजारामध्ये विक्रीसाठी आणले जाते.

भारतातील रबर उत्पादनाच्या जवळजवळ ६७% नैसर्गिक रबर हे खाचेदार धूर - प्रक्रिया केलेल्या आणि हवेत वाळवलेल्या शीटच्या स्वरूपात विक्रीसाठी आणले जाते. हा दुसरा प्रकार, तिसऱ्या आणि चौथ्या प्रकारात क्रिप रबर व बलॉक रबर हे स्क्रेप स्वरूपात शेतामध्ये गोठलेल्या अवस्थेत गोळा करून ते पूर्ण वाळवून त्याची पॉलिथीन पिशवीत बांधणी करून बाजारात विक्रीसाठी आणले जाते.

रबराची विक्री व्यापारी अथवा दलालामार्फत करता येते. रबर किरकोळ भावाने विकण्याची प्रथा आहे. परंतु दलालामार्फत रबराची विक्री केल्यास शेतकऱ्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यासाठी सहकारी सोसायटी स्थापन करून विक्री केल्यास शेतकऱ्यांना रास्त भाव मिळून योग्य मिळकत मिळू शकते. तसेच औद्योगिक क्षेत्रात शेतकरी स्वत: एक वर्षाच्या करारावर प्रत्यक्ष रबर कंपनीला रबराचा पुरवठा करतात.