दुष्काळात पडीक जमिनीत 'सिद्धीविनायक' शेवग्याने दिला आधार

प्रा. कुलकर्णी माधव रामचंद्र,
मु. पो. आगळगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली,
मो. ९९७०७७०९१६१।। वर्षापुर्वी 'सिद्धीविनायक' शेवग्याची ३५० रोपे नेली होते. त्याची लागवड डिसेंबर २०१२ मध्ये ८' x ८' वर केली होती. मात्र नंतर दुष्काळ पडल्याने ठिबकवर दररोज ५ मिनीटे पाणी देऊन झाडे जगवली. त्यातील ५० झाडे गेली तरी ३०० झाडे जगली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ वेळा फवारण्या केल्या. कल्पतरू खत ३ पोती बहार लागताना दिली होती. मात्र पाणी फारच कमी असल्याने पहिल्यावर्षी माल धरला नाही.

चालूवर्षी डिसेंबर २०१३ पासून फुले लागून फेब्रुवारी - मार्चमध्ये चांगले तोडे होऊ लागले. बाजारपेठ लांब असल्याने ४ दिवसाला शेंगा तोडतो. तोड्याला १५० किलोपर्यंत तर काही वेळेस २०० - २२५ किलो देखील माल निघाला आहे. याची जयसिंगपूर, जि. कोल्हापूर आणि सांगली मार्केटला विक्री करतो. हा माल कमी (९० किलोपर्यंत) असेल तर मोटर सायकलवर आणि १२५ किलोपर्यंत असेल तर आज एक व उद्या एक खेप मोटर सायकलवरच करतो. जादा माल निघाल्यावर ३ चाकी टेम्पो करून नेतो.

आमच्यापासून जयसिंगपुर ६० किमी तर सांगली ५० किमी अंतरावर आहे.

जानेवारीत ३० -३५ रू. किलो भाव मिळाला. फेब्रुवारीत २० - २५ रू. किलो तर मार्चमध्ये भाव कमी होऊन १५ - १४ - १२ रू. किलोने जाऊ लागला. याकाळात बाजारात शेवग्याच्या शेंगाचा माल वाढल्याने भाव कमी झाले. माल पुणे - वाशी मार्केटला पाठविण्याएवढा नसल्याने तेथेच विकतो. मात्र या अनुभवातून कमी पाण्यावर, कमी खर्चात, कमी कष्टात परवडणारे पीक, आहे असे समजले म्हणून अजून १ एकर 'सिद्धीविनायक' शेवगा लावायचा आहे. आतापर्यंत ३० हजार रू. च्या शेंगा विकल्या असून अजून फुलकळी लागत आहे.

मी प्राध्यापक म्हणून वर्धमान विद्यालय, वालचंदनगर, ता. इंदापूर येथून गेल्यावर्षी निवृत्त झाल्यावर शेतीतील हा पहिलाच प्रयोग केला. एकूण ७ एकर शेती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी कमी आहे. ६ वर्षापुर्वी वडील वारल्यानंतर पडीकच होती. यासाठी चालूवर्षी २५ लाख लि. चे शेततळे स्वखर्चाने तयार केले आहे. त्याला ३ लाख रू. खर्च आला. १५ गुंठ्यामध्ये हे शेततळे आहे. पावसाळ्यात ओढ्याचे पाणी परवानगी घेऊन शेततळ्यात सोडले. शेवगा लावताना गावातील लोक नावे ठेवत. कशाला शेवगा लावला ? असे म्हणत. त्यांना फक्त बांधावरील पीक म्हणूनच परिचयाचे होते. परंतु आपले हे पीक दुष्काळात गावातील सगळी पिके गेली असताना दररोजच्या ५ मिनिटे ठिबक पाण्यावर जगलेले आणि सध्या त्याला लागलेल्या शेंगा पाहून ४ - ५ जण 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीस तयार झाले आहेत.

उपटून टाकण्याच्या अवस्थेतील झेंडूपासून मिळाले समाधानकारक उत्पन्न

शेवग्यानंतर झेंडूचा प्रयोग केला. अॅरोगोल्ड झेंडू १ एकरमध्ये ६००० रोपे ३ x २ फुटावर लावली. त्याला ठिबक होते. लागवडीनंतर १ महिना परदेशी अबुधाबीला मुलीकडे जावे लागल्याने ज्याच्यावर झेंडूची जबाबदारी दिली त्याला ते जमले नाही. त्यामुळे झेंडूची रोपे मरू लागली. प्लॉटकडे बघवेना असा झाला. मग काढून टाकण्याचा विचार केला. तत्पुर्वी सरांचा एकदा सल्ला घ्यावा म्हणून मार्चमध्ये येऊन सरांना भेटलो. झाडाची वाढ जागेवरच राहून काडी जळायला लागली होती. सरांनी सांगितले, झाडे काढू नका. मग त्यावर सरांनी सांगितल्याप्रमाणे सप्तामृत फवारणी १५ दिवसाला २ वेळा केली आणि जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले. त्यामुळे नवीन फुट निघू लागली, झाडांना तरतरी आली. वाढ होऊ लागली. त्यामुळे संपुर्ण उत्पन्न बुडणार होते ते वाचले आणि फुले लागून आतापर्यंत ५००० रू. ची फुले विकली. अजून फुले चालू आहेत. दिवसाड तोडली तर १० ते १५ किलो फुले निघत आहेत. याची विक्री मिरज मार्केटला १० रू. पासून ५० रू. पर्यंत वेगवेगळे दर मिळाले.

या शेवग्याच्या अनुभवातून अजून १ एकर शेवगा लागवडीसाठी सरांचा सल्ला घेण्यासाठी आलो आहे. शेततळ्याच्या आधारे बागायत क्षेत्र यावर्षी वाढवणार आहे.