वाल उत्पादनाचे तंत्रज्ञान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


वाल या पिकाचे 'वाल' हे नाव गुजराती भाषेत जास्त प्रचलित आहे. वालाच्या शेंगांची भाजी करतात, तर वालाच्याच दाण्यांचा उपयोग उसळीसाठी होतो. प्राचीन काळापासून भारतात, बहुतेक ग्रामीण भागात या पिकाची लागवड केली जाते. या पिकाचे अनेक स्थानिक वाण देशभर उपलब्ध आहेत. वाल हे पीक द्विदल वर्गातील असून या पिकामुळे जमिनीतील नत्राचा साठा वाढतो. हे पीक कोरडवाहू असून कमी पाण्यावर येणारे आहे. ज्वारीच्या शेतात पिकाच्या ओळीत मिश्रपीक म्हणूनही हे पीक घेतात. या पिकातील वेगवेगळ्या प्रकारच्या जातींना देशाच्या निरनिराळ्या भागांत शेंगांचा आकार, रंग आणि स्वादाप्रमाणे मागणी असते. या पिकाचे क्षेत्र आणि उत्पादन वाढविण्यासाठी मशागतीच्या सुधारित तंत्रांची माहिती असणे आवश्यक असते.

* महत्त्व : 'वाल' हे पीक ग्रामीण भागात शेतात, शेताच्या बांधावर किंवा परसबागेतील कुंपणावर लावलेले दिसते. वाल हे पीक शेंगवर्गीय असल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी आणि पिकाची फेरपालट करण्यासाठी महत्त्वाचे पीक आहे. पूर्वी हे पीक दुर्लक्षित समजले जात होते. मात्र अलिकडच्या काळात डाळींचा तुटवडा जाणवत असल्यामुळे द्विदल वर्गातील पिकांबरोबरच याही पिकाचे महत्त्व वाढले आहे. हे पीक वाल अथवा वाल पापडी म्हणून ओळखले जाते. या पिकाच्या शेंगांची भाजी, दाण्यांची उसळ, डाळ यासाठी उपयोग होतो.

वाल पिकाचे दोन प्रकार आहेत. यातील एक प्रकार हंगामी तर दुसरा प्रकार बारामाही आहे. हंगामी पिकामध्ये बुटक्या जातींचा समावेश होतो. या जातींना आधार देण्याची आवश्यकता नसते. बारामाही प्रकारात वेलींसारख्या वाढणाऱ्या जातींचा समावेश होतो. या जातींना आधार द्यावा लागतो. बुटक्या जातींची लागवड विदर्भात केली जाते. प्रोटीन्सच्या भरपूर प्रमाणामुळे या पिकाची पोषकताही चांगली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या पिकाला महत्त्व येत चालले आहे. वालाच्या शेंगांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते.

वालाच्या शेंगांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण

अन्नघटक   प्रमाण %   अन्नघटक   प्रमाण  
पाणी   ८५   कार्बोहायड्रेटस   ६.७  
प्रोटीन्स   ३.८   फॅटस   ०.७  
तंतुमय पदार्थ   १.८   खनिजे   ०.९  
मॅग्नेशियम   ०.०३   कॅल्शियम   ०.२  
फॉस्फरस   ०.०७   लोह   ०.००२  
जीवनसत्त्व 'अ'   ३१२ इंटरनॅशनल युनिट   जीवनसत्त्व 'क'   ०.००९  
उष्मांक (कॅलरी)   ४८      


* हवामान आणी जमीन : वाल या पिकास थंड हवामान मानवत असले तरी या पिकाची लागवड जवळजवळ वर्षभर केली जाते. वालाच्या लागवडीसाठी १८ ते ३० अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे.

वालाचे पीक विविध प्रकारच्या आणी सर्वसाधारण सुपीक जमिनीत घेता येते. परंतु हे पीक इतर शेंगवर्गीय पिकांप्रमाणे हलक्या ते मध्यम खोलीच्या, गाळाच्या किंवा पोयट्याच्या जमिनीत उत्तम वाढते. कोकणामध्ये भाताच्या कापणीनंतर भातखाचरातील उपलब्ध ओलाव्यावर वालाची लागवड केली जाते.

* लागवडीचा हंगाम : या पिकाची लागवड जातीनुसार खरीप हंगामामध्ये आणि रब्बी हंगामात करतात.

* विविध प्रकार आणि उन्नत वाण : वालाच्या जातीचे दोन प्रकार असतात :

अ) झुडपासारख्या वाढणाऱ्या बुटक्या जाती

आ) वेलीसारख्या वाढणाऱ्या उभट जाती

अ) कोकणभूषण : ही जात कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी १९८४ साली विकसित केली आहे. या जातीच्या झाडांची उंची ७५ ते ८० सेंटिमीटर असून पाने गर्द हिरव्या रंगाची असतात. या जातीचा लवकर फुले येऊन शेंगा ५५ ते ६० दिवसांत काढणीस येतात. फुले पांढरी असतात. याजातीचे बी मोठे आणिविटकरी रंगाचे असते. या जातीच्या शेंगांमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण १४.७ % आहे. शेंगांची लांबी ७ - ८ सेंमी असून शेंगा शिरविरहित आणि कोवळ्या असल्याने सालीसह भाजीसह भाजीसाठी उपयुक्त आहेत. ही जात पानांवर येणाऱ्या मोझॅक या विषाणुजन्य रोगाला कमी प्रमाणात बळी पडते. या जातीच्या पिकाचा कालावधी ९० ते ११० दिवसांचा आहे. या जातीची लागवड हिवाळ्यातही करतात. एकाच हंगामात दोन बहार घेता येतात. उसात आंतरपीक म्हणून घेण्यास योग्य वाण प्रत्येक झाडाला १२५ - १८० शेंगा येतात. सरासरी एकरी ३ ते ४ टन उत्पादन मिळते.

२) सी. ओ. - १ : वालाची ही जात तामिळनाडू राज्यातील कोईमतूर येथे १९८० साली स्थानिक जातीतून निवड पद्धतीने विकसित करण्यात आली. या जातीच्या झाडांची उंची ६० ते ७० सेंमी असून शेंगा चपट्या व हिरव्या रंगाच्या असतात. शेंगा पक्व झाल्यावर गडद तपकिरी रंगाच्या होतात. याजातीच्याशेंगांतील बी मोठे वकाळे असते. पिकाचा कालावधी १४० दिवसांचा आहे. दाण्यासाठी उत्तम असून यावाणाचे उत्पन्न एकरी ६ ते ७ क्विंटल येते.

३) सी. ओ. - २ : ही जातसुद्धा कोईमतूर येथे विकसित करण्यात आली. या जातीच्या झाडांची उंची ६० सेंमी असून झाडे झुडपासारखी खुरटी परंतु सरळ वाढतात. झाडाला ५ ते ६ फांद्या असतात. या जातीच्या झाडांची फुले सुरूवातीला गुलाबी रंगाची असतात. नंतर ही फुले निळसर गुलाबी रंगाची होतात. या जातीच्या शेंगा हिरव्या रंगाच्या, चपट्या असतात, एका शेंगेत ४ दाणे असतात. शेंगेंतील बी मध्यम आकाराचे, अंडाकृती आणि काळसर असते.

या व्यतिरिक्त वालाचे कोकण - १, जवाहर सेम, इत्यादी विकसित वाण आहेत.

आ) वेलीसारख्या वाढणाऱ्या उभट जाती :

१) दसरा वाल : ही जात वेलीसारखी वाढणारी (पोल टाईप) असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी स्थानिक जातींतून १९८५ साली निवड पद्धतीने शोधून काढली आहे. या जातीच्या शेंगा हिरवट लालसर रंगाच्या, चपट्या आणि मध्यम आकाराच्या असून बी पांढऱ्या रंगाचे, मध्यम आकाराचे असते. बियांवर काळा ठिपक असतो. दसरा वाल ही जात पानावरील मोझॅक या रोगाला कमी प्रमाणात बळी पडते. या जातीच्या शेंगा रोगाला कमी प्रमाणात बळी पडते. या जातीच्या शेंगा पेरणीपासून १२० ते १२५ दिवसांत तोडणीस येतात. वालाची ही जात भरपूर उत्पादन देणारी असून तिचा कालावधी १८० ते २०० दिवसांचा आहे.

२) दिपाली वाल : ही जात वेलीसारखी वाढणारी असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे १९८५ साली स्थानिक जातीतून निवड पद्धतीने विकसित केली आहे. शेंगा चपट्या, लांब, पापडीसारख्या आणि हिरवट पांढऱ्या रंगाच्या असतात. शेंगा १५० ते १५५ दिवसांत तोडणीस येतात. बी मध्यम चपटे, लाल रंगाचे असते. ही जात भरपूर उत्पादन देणारी असून तिचा कालावधी १८० ते २०० दिवसांचा आहे. ही जात पानांवर येणाऱ्या मोझॅक रोगास कमी प्रमाणात बळी पडते.

३) हेब्बल अॅव्हरे - ३ : ही जात कर्नाटक कृषी विद्यापीठाने १९७८ साली विकसीत केली. या जातीच्या झाडांची उंची ६५ ते ७५ सेंमी असून वेळ सरळ झुडपासारखा वाढतो. या जातीची फुले पांढऱ्या रंगाची तर शेंगा हिरव्या रंगाच्या असतात. एका शेंगेत २ ते ३ बिया असतात. बी गोल व विटकरी रंगाचे असते. या जातीचा कालावधी ९० ते १०० दिवसांचा आहे. बियाण्याचे सरासरी हेक्टरी ८ - १० क्विंटल उत्पादन येते. या वाणावर प्रकाश कालावधीचा परिणाम होत नाही.

४) पुसा अर्ली प्रॉलिफिक : ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांनी विकसित केली आहे. या जातीला झुपक्यात बारीक शेंगा धरतात. ही जात पावसाळ्याच्या शेवटी आणि हिवाळ्यात लागवडीसाठी योग्य आहे. या व्यतिरिक्त १२५ - १३६, कल्याणपूर टाईप - २, रजनी इत्यादी वेलासारखे वाढणारे विकसित वाण आहेत.

* बियाण्यांचे प्रमाण, लागवडीचे अंतर आणी लागवड पद्धती : वालाच्या बुटक्या झुडपासारख्या वाढणाऱ्या जातींची लागवड ६० x ६० सेंमी अंतरावर करतात. वालाच्या बुटक्या जातींचे हेक्टरी २० ते २५ किलो बी लागते. तर वेलीसारख्या उंच वाढणाऱ्या जातीची लागवड ९० x ९० सेंमी किंवा १ x १ मिटर अंतरावर करतात. या जातींचे बी हेक्टरी १० ते १५ किलो लागते.

बियांची पेरणी करण्यापूर्वी जमीन नांगरून चांगली भुसभुशीत करावी. जातीप्रमाणे ठराविक अंतरावर प्रत्येक ठिकाणी २ ते ३ बिया टोकतात. मात्र खालीलप्रमाणे बीजप्रक्रियेसाठी जर्मिनेटर चा वापर केला असता १ ते २ बियापासूनही रोपांची उगवण होऊन झाडांची वाढ जोमदार होते. ज्वारीच्या पिकात वालाचे पीक मिश्रपीक म्हणून लावायचे असल्यास प्रत्येक ६ ते ८ फुटानंतर या वालाच्या बियांची एक ओळ पेरतात किंवा बी टोकतात.

* बीजप्रक्रिया : २५ ते ३० मिली जर्मिनेटर १ लि. पाण्यामध्ये घेऊन त्या द्रावणात १ किलो बी ५ ते ६ तास भिजवून नंतर लागवड केल्यास उगवण चांगली, निरोगी व जोमदार होते.

* खते आणि पाणी व्यवस्थापन : वालाच्या कोरडवाहू पिकाला फार कमी प्रमाणात खते दिली जातात. बियांची पेरणी करण्यापूर्वी ४ ते ५ टन शेणखत आणि ५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत एकरी जमिनीत मिसळून द्यावे. लागवडीनंतर ४५ दिवसांनी २५ ते ३३ किलो कल्पतरू खताची दुसरी मात्रा दर एकरी द्यावी. लागवडीअगोदर बियाण्यास जर्मिनेटरची बीजपक्रिया केल्यामुळे नत्रयुक्त खतात बचत होऊन उत्पादनात १० ते १५ % वाढ होते.

वालाचे पीक प्रामुख्याने कोरडवाहू पीक म्हणून किंवा शेताच्या कडेला घेतले जात होते, मात्र अलिकडच्या काळात बागायती जमिनीतही लागवड केली जात आहे. या पिकाचा कालावधी लक्षात घेता हिवाळ्यात आणी उन्हाळ्यात वालाच्या पिकास १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दिल्यास चांगले उत्पादन मिळते.

* आंतरमशागत आणि आंतरपिके : लागवडीनंतर सुरूवातीला आवश्यक असल्यास विरळणी करावी. एका ठिकाणी दोनच रोपे ठेवावीत. तसेच १ ते २ खुरपण्या करून सुरूवातीलाच तण काढावे. कारण पुढे वेल पसरल्यानंतर तण काढता येत नाही. वालाचे पीक आंतरपीक म्हणून इतर जास्त कालावधीच्या पिकांमध्ये, तसेच फळबागांमध्ये ही घेता येते.

* वळण आणि आधार देणे : उंच वाढणाऱ्या वेलींना आधाराची गरज असते. या पिकाला आधार दिल्यावर निश्चितच उत्पन्नात वाढ होते.

त्यासाठी सीरच्या दोन्ही टोकाला ७ ते ८ फुट उंचीचे लाकडी डांब रोवून त्याला १० गेजच्या तारेने बाहेरील बाजूस ताण द्यावा. दोन्ही दांबांना १२ किंवा १४ गेजची तार ओढावी. तार जमिनीपासून ६ ते ६।। फुट उंच असावी. प्रत्येक वेलाजवळ १ फुट उंचीची काडी टिपरी रोवून तिला सुतळी बांधून सुतळीचे दुसरे टोक वर तारेला बांधावे. वेल दीड ते दोन फुट उंचीचे झाल्यावर बगलफुट काढून ते वेल सुतळीवर वरच्या दिशेने चढवावेत. वेल तारेपर्यंत जाईपर्यंत बगल फुट काढावी. पाने काढू नये. नंतर फुटवे काढणे बंद करून फुटे दोन्ही बाजूस पसरावेत. त्यानंतर प्रत्येक कांदी दीड ते दोन फुट अंतरावर कापावी म्हणजे फुलांचे घोस मोठ्या प्रमाणात लागतात. असा ताटी पद्धतीने आधार दिल्यास व दर महिन्यास वेलींची छाटणी केल्यास या पिकांपासून वर्षभर उत्पादन मिळते.

* महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण : वालाच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात होतो. घेवडा पिकावर येणाऱ्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वालाच्या पिकावर दिसून येतो. तपकिरी रंगाची ही अळी वालाची शेंग पोखरून आत शिरते आणि आतील कोवळ्या बिया खाऊन फस्त करते.

* महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

१) भुरी: हा बुरशीजन्य रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या खोडावर, पानांवर आणि शेंगावर पांढऱ्या रंगाचे डाग दिसतात. रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्यास पाने गळून पडतात. झाडांना शेंगा धरत नाहीत.

२) रोपाची मर : हा बुरशीजन्य रोग असून बियांमार्फत या रोगाचा प्रसार होतो. बुरशीची लागण झालेली रोपे सडतात व जमिनीवर कोलमडतात.

३) पानावरील ठिपके : हा बुरशीजन्य रोग असून या रोगामुळे पानांवर ठिपके पडतात. ठिपक्यांच्या मध्यभागी राखाडी रंगाचा भाग असून ठिपक्याच्या कडा लाल रंगाच्या असतात. ठिपके हळूहळू संपूर्ण पानावर पसरतात.

४) पानावरील मोझेक : हा विषाणुजन्य रोग असून त्यामुळे पानावर पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात.

वरील कीड व रोग यांचे नियंत्रणासाठी तसेच भरघोस दर्जेदार उत्पादनासाठी डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

फवारणी :

१) पहिली फवारणी : ( उगवणीनंतर १० -१५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली + स्प्लेंडर ४०० मिली + २०० लि. पाणी.

* काढणी आणि उत्पादन : वालाच्या जातींच्या कालावधीनुसार वालाच्या शेंगा काढणीस तयार होतात. शेंगा पूर्ण वाढलेल्या परंतु कोवळ्या असतानाचा काढतात. शेंगांमधील दाणे निब्बर होऊ देऊ नयेत. शेंगाची तोडणी ६ ते ८ दिवसांच्या अंतराने करावी. वालाच्या बुटक्या जातीच्या शेंगांचे उत्पादन दर एकरी २ ते ३ टन मिळते. तर उंच वेलीसारख्या जातींमध्ये शेंगाचे उत्पादन दर एकरी ४ टनांपर्यंत मिळते.