७ गुंठे 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या पहिल्या बहराचे ६० - ७० हजार रु. आंतरपीक मिरचीचे ७ हजार अजून ४ - ५ महिने देईल उत्पन्न

श्री. बाजीराव आनंदराव सुर्वे,
मु.पो. पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर.
मोबा. ९६०४७५५१४६



२०१२ मध्ये ७ गुंठ्यात 'सिद्धीविनायक' शेवगा लावला होता. १२५ झाडे आहेत. ६ महिन्यात शेंगा चालू झाल्या. आठवड्यातून २ वेळा शेंगा तोडतो. शेंग हिरवीगार, माध्यम जाडीची २ ते २।। फूट लांबीची आहे. अशा शेंगेला मागणी असते. त्यामुळे बाजारात भाव इतरांपेक्ष जादा मिळतो. २ शेंगा १० रु. ला जातात. याला फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घेतो. रासायनिक काहीच (खते, औषधे) वापरत नाही.

तोडे चालू झाल्यावर ४ - ५ महिने शेंगा चालतात. नंतर छाटणी करून पुन्हा २ - ३ महिन्यांनी दुसरा बहार चालू होतो. असे एका बहारापासून ६० - ७० हजार रु. उत्पन्न मिळते. या शेवग्याच्या २ ओळीमध्ये आंतरपिकेदेखील घेतो. गेल्यावर्षी वांगी लावली होती. चालू वर्षी जुनमध्ये मिरची लावली आहे. शेवग्याच्या दोन आळीमध्ये दोन्ही बाजुला १।। फुट अंतर ठेवून २ सऱ्या काढून त्याला ह्या मिरचीची ७०० रोपे लावली आहेत. मिरचीला देखील कुठलेही किटकनाशक, बुरशीनाशक वापरले नाही. फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत आणि त्याबरोबर गोमुत्र प्रति पंपास ५०० मिली याप्रमाणे घेऊन फवारतो. तसेच दर १० - १५ दिवसाला २ किलो गळू, २ किलो डाळीचे पीठ, ३० लि. गोमुत्रात १० दिवस आंबवून पाण्यावाटे अमृतपाणी सोडतो. सध्या ह्या मिरचीचा ४ फुटाचा घेर झाला असून १ महिन्यापासून तोडे चालू आहेत. फुलकळीदेखील भरपूर आहे. आतापर्यंत ७ हजार रु. ची मिरची (४० रु. किलोप्रमाणे) विकली असून ही मिरची अजून ४ - ५ महिने चालेल.