गहू लागवडीची सुधारीत पद्धत

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


गहू हे रब्बी हंगामातील तृणधान्य वर्गातील महत्त्वाचे पीक आहे. सुमारे ८० - ८५ % गहू चपातीसाठी वापरला जातो. तसेच गव्हाचा उपयोग बेकरीमध्ये पाव, बिस्कीटस, केक इ. पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रात गव्हाचे सरासरी हेक्टरी उत्पादन उत्तर भारताच्या तुलनेत फारच कमी आहे. बागायती लागवड, वेळेवर पेरणी, वेळोवेळी पाणी पुरवठा, सुधारित जातींचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पीक संरक्षण इ. द्वारे गव्हाचे उत्पादन वाढवू शकतो.

हवामान : गहू पिकास थंड व कोरडे हवामान चांगले मानवते. उष्ण व दमट हवामान या पिकास अपायकारक ठरेते. बी उगवण्याच्या काळात १५ - २० डी.से., कायिक वाढीच्या अवस्थेत ८ - १० डी.से. आणि पीक तयार होण्याच्या अवस्थेत २० - २५ डी. से. तापमान आवश्यक असते. सरासरी ७ - २१ डी. से. तापमानात गव्हाची वाढ चांगली होते. जास्त तापमानमुळे फुटवे कमी येतात. तसेच उगवण झाल्यानंतर हवा उष्ण व ढगाळ असेल तर रोपांची मुळकुजव्या रोगामुळे हानी होते.

सर्वसाधारणपणे ५०० मिली मीटरपर्यंत पाऊस पडणाऱ्या भागात हे पीक जिरायती म्हणून घेतले जाते.

जमिनीची निवड : पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी, खोल जमीन निवडावी. साधारणपणे गाळयुक्त पोयट्याच्या जमिनी गव्हासाठी जास्त योग्य असतात. पिकास जास्त दलदलीची व वरकस जमीन निवडू नये. जिरायत गव्हासाठी ओलावा टिकवून ठेवणारी भारी जमीन निवडावी. चिकणयुक्त कणांचे प्रमाण ६०% पर्यंत व उपलब्ध सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ६३% असलेल्या भारी जमिनीत अधिक उत्पादन मिळते. तसेच खरीप हंगामात ज्या जमिनीत द्विदलवर्गीय (कडधान्य) पीक घेतले होते, अशी जमीन गव्हासाठी निवडावी. कारण या पिकाचा बेवड गव्हास मिळतो.

पूर्व मशागत : या पिकाच्या मुळ्या जमिनीत ६० - ६५ सें. मी. पर्यंत खोलवर जात असल्यामुळे या पिकास जमीन चांगली भुसभुशीत लागते. त्यासाठी २० से. मी. खोल नांगरत करावी. त्यानंतर २ - ३ कुळवाच्या उभ्या - आडव्या पाळ्या धाव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी वाळलेली तणे, कास्या, पिकांची धसकटे वेचून जमीन स्वच्छ करावी. तसेच एकरी १० - १२ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीवर विस्कटावे त्यानंतर कुळवाची शेवटची पाळी देऊन शेणखत जमिनीत चांगले मिसळावे. जिरायत गव्हासाठी पावसाला सुरू होण्यापूर्वीच जमिनीची खोलवर उताराला आडवी नांगरट करावी. पाऊस पडल्यानंतर एक कुळवणी करावी, त्यामुळे तणांचा बंदोबस्त होऊन, ओलावा जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते.

पेरणीची वेळ : या पिकाची पेरणी प्रामुख्याने तीन वेगवेगळ्या परिस्थितीत करण्यात येते.

१) जिरायत गहू : १५ ते ३० ऑक्टोबरपर्यंत पेरणी करावी.

२) बागायत गहू वेळेवर पेरणी : १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत करावी.

गव्हाची पेरणी वेळेवर करणे महत्त्वाचे असते. कारण या पिकाच्या निरनिराळ्या अवस्थेत निरनिराळे उष्णतामान लागते. गव्हाची पेरणी उशिरा केल्यामुळे पिकाच्या कालावधीत उष्ण हवामान जास्त असते. त्यामुळे या पिकाला आवश्यक असलेल्या थंडीचा कालावधी हा अत्यंत कमी मिळतो आणि पिकाची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही तसेच गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर केल्यास त्यानंतर प्रत्येक पंधरवड्याला प्रत्येक एकराला एक क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे १५ डिसेंबरनान्ते पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही. यासाठी गव्हाची पेरणी योग्य वेळी म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरावड्यात केल्यास पिकास लागणारे योग्य ते हवामान मिळते.

बियाणे प्रमाण : (किलो /हेक्टरी)

१) बागायत गहू (वेळेवर पेरणीसाठी) १०० किली बियाणे वापरावे.

२) बागायत गहू (उशिरा पेरणीसाठी) ११० ते १३० किलो बियाणे वापरावे.

३) जिरायत गहू पेरणीसाठी बियाणे ७५ ते १०० किलो वापरावे. कमीत कमी तीन वर्षातून एकदा बियाणे बदलणे आवश्यक ठरते. मात्र पहुर, ता. जामनेर, जि. जळगाव येथील श्री. दिलीप देशमुख हे गेले २० वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने त्यांच्याच शेतात उत्पादित केलेले २१८९ गव्हाचे बियाणे वापरून दर्जेदार उत्पादन घेत आहेत. (संदर्भ- कृषी मार्गदर्शिका २०१२, पान नं. ८०)

बीज प्रक्रिया :

१) पेरणीपूर्वी ४० किलो बियाण्यास ५०० मिली जर्मिनेटर + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंटचे ३ ते ५ लि. पाण्यात द्रावण तयार करून त्यामध्ये बियाणे पूर्णपणे घोळून घ्यावे. म्हणजे सर्व बियाण्यास प्रक्रिया झाली पाहिजे. या प्रक्रियेमुळे बियाण्याची उगवण कमी दिवसात एकसारखी व जास्तीत जास्त होऊन कायणी व बुंधाकूज या रोगांचे काही प्रमाणात नियंत्रणही होते, तसेच हवेतील नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते परिणामी उत्पादनात वाढ होते.

सुधारित वाण :

१) एच. डी. २१८९ : पक्वता कालावधी १२० दिवस, उत्पादन ३५ - ४० क्विंटल / हे., दाणे मोठे, पिवळसर व तेजदार, सरबती बाण, काळ्या व नारंगी तांबेच्यास प्रतिकारक.

२) एम. ए. सी. एस. २८४६ : पक्वता कालावधी १२० दिवस, उत्पादन ४० - ४५ क्विंटल/ हे. भरपूर उत्पादन क्षमता असणारा सरबती वाण, भरपूर फुटवे, तांबेच्यास काही प्रमाणात बळी पडतो.

३) एम. ए. सी. एस. - २४९६ : पक्वता कालावधी १२० दिवस, उत्पादन ४० ते ४५ क्विंटल / हे., भरपूर उत्पादन क्षमता असणारा सरबती वाण, भरपूर फुटवे येतात. तांबेऱ्यास काही प्रमाणात बळी पडतो.

४) डी. डब्ल्यू. आर. - १६२ : पक्वता कालावधी १२० दिवस, उत्पादन ४० - ४५ क्विंटल / हे भरपूर उत्पादन देणारा सरबती वाण.

५) एन. आय. ए. डब्ल्यू (त्र्यंबक )- ३०१ : पक्वता कालावधी ११५ दिवस, उत्पादन ४५ क्विंटल / हे. भरपूर उत्पादन क्षमता असणारा सरबती वाण, चपातीस, उत्तम, दाणे जाड व तेजदार, तांबेरा रोगास प्रतिकारक.

ब) बागायती गहू - उशिरा पेरणीसाठी:

१) एच. आय. - ९७७ : पक्वता कालावधी १०५ दिवस, उत्पादन ३० - ३५ क्विंटल / हे., मध्यम उंची, दाणे मोठे व पिवळसर, तांबेरा रोगास प्रतिकारक वाण.

२) एच. डी.- २५०१ : पक्वता कालावधी ११० दिवस, उत्पादन ३५ -४० क्विंटल/ हे., मध्यम वाढ, भरदार ओंबी, पिवळसर व तेजदार दाणे.

३) एन. आय. ए. डब्ल्यू - ३४ : पक्वता कालावधी १०० दिवस, उत्पादन ४० -४२ क्विंटल/ हे., भरपूर उत्पादन, चपातीस योग्य, भरपूर फुटवे, मध्यम उंचीचा, तांबेरा प्रतिकारक, सर्व हंगामासाठी योग्य वाण.

क) जिरायातीसाठी वाण:

१) एन - ५९ : पक्वता कालावधी ११० दिवस, उत्पादन - ८ १० क्विंटल/ हे., उंच वाढणारा, ओंबी भरदार, दाणे जाड, पिवळसर व तेजदार, तांबेर्‍यास बळी पडतो.

२) एन. - ५४३९: पक्वता कालावधी ११५ दिवस, उत्पादन १० - १२ क्विंटल/ हे., सरबती वाण चपातीस उत्तम, तांबेर्‍यास बळी पडतो. कापणी वेळेवर करावी लागते.

३) एन. - ८२३३ : पक्वता कालावधी १२० दिवस, उत्पादन १२ -१५ क्विंटल/ हे., दाणे मध्यम पिवळसर व तेजदार, सरबती वाण, पाणी दिल्यास भरपूर उत्पादन.

४) एन. आय. डी. डब्ल्यू - १५ (पंचवटी) : पक्वता कालावधी १२० दिवस, उत्पादन १२ - १५ क्विंटल/ हे. , अधिक उत्पादन देणारा बंशी वाण, दाणे जाड व तेजदार, शेवया व कुरवड्यासाठी उत्तम, तांबेर्‍यास प्रतिकारक.

पेरणीची पद्धत, पेरणीचे अंतर व खोली : गव्हाची पेरणी पाभरीने करावी. दोन ओळीतील अंतर (फणातील) पुढीलप्रमाणे ठेवावे.

१) बागायत गहू - वेळेवर पेरणीसाठी २२.५ सें.मी.

२) बागायत गहू - उशिरा पेरणीसाठी १८ सें.मी.

३) जिरायत गव्हासाठी -२२.५ - ३० सें. मी.

अशा पद्धतीने उंच जातीचे बियाणे ५ - ६ सें. मी. व बुटक्या जातीचे बियाणे ५ सें.मी. खोल अंतरावर पेरावे. जास्त खोल पेरणी केल्यास उगवणीवर परिणाम होतो. पेरणी उभी - आडवी अशा दुबार पद्धतीने न करता एकेरी करावी. त्यामुळे मशागत करणे सोपे जाते. बियाणे बुजविण्यासाठी पेरलेल्या क्षेत्रावर हलका लोड (उलटा कुळव) फिरवावा. पेरणी दक्षिणोत्तर करावी. त्यामुळे मशागत करणे सोपे जाते. बियाणे बुजविण्यासाठी पेरलेल्या क्षेत्रावर हलका लोड (उलटा कुळव) फिरवावा. पेरणी दक्षिणोत्तर करावी. त्यामुळे पिकाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. २.५ - ३ मी. रुंदीचे व ७ - १० मी. लांबीचे सारे/ वाफे सारा यंत्राने तयार करावेत. अधिक उत्पादनसाठी एक एकरी ८,८०,००० गव्हाची रोपे शेतात असणे आवश्यक असते. योग्य अंतरावर पेरणी केल्यास लागवड क्षेत्रावर रोपांची योग्य संख्या राहण्यास मदत होते. टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी दोन ओळीतील अंतर २२.५ -३० सें. मी. व दोन बियांतील अंतर १५ सें. मी. ठेवून एका ठिकाणी दोन बिया ५ - ६ सें. मी. खोल तोकाव्यात. बियाणे ओल्या मातीने लगेच बुजवावे. या पद्धतीने बियाणी कमी लागते.

खते :

१) बागायती गहू : (वेळेवर पेरणीसाठी) एकरी २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत आणि १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.

२) बागायती गहू : (उशीर पेरणीसाठी) एकरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत आणि ७५ ते ८० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.

३) जिरायत गव्हासाठी : १२ ते १५ बैलगाडी शेणखत आणि ५० ते ६० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.

पाणी व्यवस्थापन : बागायत गहू पेरणीच्यावेळी जमिनीत पुरेशी ओल नसल्यास पेरणीपूर्वी जमीन ओलवावी. जमिनीत वाफस आल्यावर गव्हाची पेरणी करावी. गहू पेरणीनंतर साधारणपणे १८ -२१ दिवसाच्या अंतराने या पिकाच्या महत्वाच्या अवस्था येतात. यावेळी पिकास पाणी द्यावे. यावेळी पिकास पाणी न दिल्यास उत्पादनात घट येते. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ - ५ वेळा पाणी द्यावे लागते. जमीन हलकी असल्यास १० - १५ दिवसाच्या अंतराने गव्हास पाणी द्यावे.

उपलब्ध पाण्याच्या पाळ्या आणि पीक वाढीच्या अवस्थेनुसार पुढीलप्रमाणे गव्हासाठी पाण्याचे व्यवस्थापन करावे.

एकूण उपलब्ध पाण्याच्या पाळ्या   पाळी क्र.   पाणी देण्यासाठी पेरणी पीक वाढीपासून महत्त्वाची अवस्था दिवस  
एक   १   फुटवे फुटण्याची अवस्था ३५ -४२  
दोन  
मुकुटमुळे फुटण्याची १८ -२१ अवस्था
पीक फुलोऱ्यात असताना ६० - ६५
तीन  


मुकुटमुळे फुटण्याची अवस्था १८ -२१
फुटवे फुटण्याची अवस्था ३५ -४२
पीक फुलोऱ्याची (लोंबीवर येताना) असताना ६० -६५
चार  मुकुटमुळे फुटण्याची अवस्था १८ -२१
फुटवे फुटण्याची अवस्था ३५ -४२
पीक फुलोऱ्यात असताना ६० - ६५
दाणे चिकात असताना ८० - ८५


आंतरमशागत : गहू पिकात चांदवेल व हरळी यासारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. यासाठी पीक १८ - २१ दिवसाचे झाल्यावर लहान कोळप्याने पिकाच्या दोन ओळीत एक पाळी देऊन तण काढावे. कोळपणीमुळे पिकाच्या दोन ओळीतील तणही निघते आणि जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी. जमीन मोकळी होऊन हवा खेळती राहते व पिकाच्या मुळांची वाढ भरपूर होते. रासायनिक पद्धतीने तणनियंत्रण करण्यासाठी २ - ४ डी. सोडियम (कर्नोक्झोन) तणनाशक २५ - ३० ग्रॅम, अधिक २०० ग्रॅम युरिया प्रति १० लि. पाण्यात मिसळून पिक व तणे उगवणीनंतर ४ - ५ आठवड्यांनी (पिकास फुटवे फुटण्याच्या वेळी) जमिनीत ओल असताना पिकांत तणांवर फवारावे. तणनाशक फवाराल्यानंतर पिकास १० -१२ दिवस पाणी देऊ नये. या तणनाशकामुळे रुंद पानांच्या वार्षिक तणांचा बंधोबस्त होतो.

पीकसंरक्षण : किडी व त्यांचे नियंत्रण :

१) मावा : ही कीड पानातील रस शोषते. नियंत्रण कीड दिसताच प्रोटेक्टंट २० ग्रॅम + डिमेक्रॉन किंवा नुऑन १० मि. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२) उंदीर : यापासून गव्हाचे जास्त नुकसान होते. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी उंदरांचा प्रादुर्भाव आढळणाऱ्या शेतात पहिल्या दिवशी जिथे उंदरांची बिळे आहेत ती बिळे उघडी पडली आहेत. त्या बिळात उंदीर आहेत असे समजावे, नंतर गव्हाच्या पिठाचे लहान - लहान गोळे करून बिळाजवळ ठेवावेत. त्यामुळे कणिक खाण्याची सवय उंदरांना लागते. त्यानंतर गव्हाचे पीठ ५० भाग आणि झिंक फॉस्फाईड एक भाग व थोड गोडेतेल मिसळून कणकीच्या लहान लहान गोळ्या कराव्यात. प्रत्येक बिळाजवळ आणि बिळात गोळया ठेवाव्यात व बिळे बुजवावीत.

महत्त्वाचा रोग व त्याचे नियंत्रण :

१) तांबेरा : या रोगाच्या नियंत्रणासाठी गव्हाची पेरणी वेळेवर करावी. रोग प्रतिकारक जातींची निवड करावी, पिकास योग्य पाणी द्यावे. पिकास योग्य वेळी नत्रखताची मात्रा द्यावी. रोग दिसताच थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली + हार्मोनी १५ ते २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. गरज भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी पुन्हा करावी.

वरील कीड रोगाच्या नियंत्रणासाठी तसेच गव्हास अधिक फुटवे निघून जोमदार वाढ होण्यासाठी आणि गव्हाच्या ओंबीची लांबी वाढून पोषण होण्यासाठी, उत्पादन दर्जा वाढण्यासाठी खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

सप्तामृत फवारणी :

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १५ ते २१ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (पीक ३० ते ४५ दिवसांचे असताना ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (पीक ६० ते ७५ दिवसांचे असताना ) : थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली + न्युट्राटोन ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ३०० ते ४०० मिली. + २०० लि.पाणी.

४ था फवारा : ७५ ते ९० दिवसांनी वरीलप्रमाणे (फवारणी क्रं. ३ प्रमाणे) करणे म्हणजे दुधाळ अवस्थेतील गव्हाचे पोषण होऊन गव्हास चमक येते. तसेच या गव्हाला कोंडा कमी निघून त्याचे रूपांतर पिठामध्ये होऊन, दर्जेदार पीठ अधिक मिळते. त्यामुळे आपोआपच व्हिटॅमिन 'बी - १२ ' चे आहारात प्रमाण वाढून नुसते उदरभरण न होता कमी अन्नात (कमी चपात्यामध्ये ) ज्यादा ताकद (सुदृढपणा) येते आणि अशा दर्जेदार गव्हाची गरज (आहारात) कमी राहून जादा लोकांपर्यंत पोहोचेल.

विशेष म्हणजे डॉ. बावसकर तंत्रज्ञानाने उत्पादीक केलेल्या गव्हास चपाती करताना जळण व तेल कमी लागते आणि सकाळी केलेली चपाती संध्याकाळपर्यंत किंबहुना दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मऊ, मुलायम राहते, ही जागतिक तेल व जळण कमी वापरून दर्जेदार अन्न देण्याची संकल्पनायुक्त कृती जागतिक अन्न व कृषी संघटना (FAO) व संयुक्त राष्ट्र संघ (UNO) च्या मानवाचे सुरक्षित व सुदृढ जीवन प्रदान करण्याच्या अजेंड्याचाच एक प्रमुख भाग आहे.

काढणी व मळणी : पिकाची कापणी पीक परिपक्व होताच करावी. परिपक्व पीक पूर्णपणे वाळते. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५% असावे. गव्हाची कापणी धारदार विळ्याने जमिनीलगत करावी. गव्हाच्या लहान - लहान पेंढ्या बांधून पेंढ्या २ - ३ दिवस शेतातच वाळू द्याव्यात. पेंढीच्या बुडक्याची माती झाडावी. त्यानंतर मळणी यंत्राच्या सहाय्याने गव्हाची मळणी करावी.

गव्हाचे मोठे क्षेत्र असेल तर गव्हाची कापणी व मळणी एकाच वेळी मोठ्या गहू कापणी यंत्राने करावी.

उत्पादन : अशा पद्धती ने गव्हाचे पीक घेतल्यास गव्हाचे एकरी सरासरी १६ - १८ क्विंटल दर्जेदार प्रतिचे उत्पादन मिळू शकते.